जेव्हा रिमा लागूंना धर्मेंद्र यांच्या आईचा रोल ऑफर झाला होता

'हम आपके हैं कौन' मधली सुंदर आई

फोटो स्रोत, Rajashree Productions

फोटो कॅप्शन, 'हम आपके हैं कौन' मधली सुंदर आई
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे भरपूर पैसा असावा, गाड्या-बंगले नोकर चाकर असावेत…”

पंधराएक वर्षांपूर्वी आलेल्या 'नुपूर' या मराठी सीरियलमधल्या मुख्य पात्राच्या तोंडी असलेलं हे वाक्य. त्या व्यक्तिरेखेचं नाव नुपूर. आईवडिलांची लाडकी, हसतमुख, पण ढ गोळा. ज्याला इंग्लिशमध्ये 'गुड फॉर नथिंग' म्हणतात ती.

यशावकाश तिचं लग्न होतं, पण लग्नानंतर काही काळातच तिचा तरुण नवरा मरतो. तिच्यावर आभाळ कोसळलेलं असताना तिची सासू तिला अक्षरशः रस्त्यावर आणते.

हिंदी सिनेमातल्या खूनशी सासूचे सगळे गुण दाखवणारं सासूचं पात्र. ती तिच्या सुनेला मुलाच्या संपत्तीत, कंपनीत अधिकार तर नाकारतेच, पण ज्या ऑफिसात तिचा नवरा बिग बॉस होता तिथे एका कमी पगाराच्या जागेवर काम करायला लावते. परत ऑफिसात नव्याने बनलेल्या तिच्या मित्रावरून तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावते.

यथावकाश ती सून एकेक गोष्ट शिकते, जगाला सामोरी जाते, कणखर बनते, हुशार बनते. गुड फॉर नथिंगपासून गुड अॅट एव्हरीथिंग बनते. मग उलगडते तिच्या सासूची हळवी बाजू. आपला मुलगा तर गेलाच, पण आपल्या ढ सुनेला या जगात राहाण्याचे, जगण्याचे नियम शिकवायचे, तिला कणखर बनवायचं म्हणूनच सासूने असा सगळा बनाव रचलेला असतो.

हिंदी मराठी चित्रपटांमध्ये सासूच्या दोन टिपिकल भुमिका असतात. एकतर काही न कळणारी, खूपच चांगली पण रडकी नाहीतर ललिता पवार यांनी रंगवलेली वाईट, क्रूर, खुनशी.

पडद्यावर पहिल्यांदाच तिसऱ्या प्रकारची सासू कोणीतरी रंगवली होती आणि त्यात जीव ओतला होता अभिनेत्री रिमा लागू यांनी.

रिमा म्हटल्या की अनेक भूमिका पटकन आठवतात. त्यात ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हम आपके है कौन’ मधली आई आठवणार नाही असं होणार नाही, पण माझ्या मनात त्यांनी नुपूरमध्ये केलेली सासूची भूमिका ठसली आहे.

रिमा लागू

फोटो स्रोत, Rajashree Marathi

एकतर मुलगा गेल्याचं दुःख, त्यात सुनेला एवढा मोठा बिझनेस सांभाळण्यासाठी घडवायचं, त्यात लोकांनी अडचणी आणण्यापेक्षा, मीच अडचणी आणून तिला शिकवेन पण सावरूनही घेईन असा हेतू. एखाद्या प्रॅक्टिकल आईसारखा.

रिमांनी आई ज्या व्यक्तिरेखा रंगवल्या त्या ग्लॅमरस होत्या, ‘मुलांची मैत्रीण’ अशा ढाचाच्या होत्या, खेळकर होता, पण मला त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान वेगळंच वाटतं - आईला माणूस म्हणून पडद्यावर दर्शवायचं निर्विवाद श्रेय जातं रिमा लागूंना.

मग ती 'वास्तव'मधली एका गुंडाची आई असेल, जी आपल्या मुलाचा शेवट स्वतःच करतेय किंवा ‘हम साथ साथ हैं’ सारख्या गुडीगुडी पिक्चरमध्ये रामायणातली कैकयी उभी करणारी आई असेल. ती आई असेल पण त्याबरोबरीने माणूस होती. माणसात असणारे सगळे गुण-दोष घेऊन रिमांनी आई साकारली.

ग्लॅमरस आईचं श्रेय

रिमा ओळखल्या जातात ते त्यांच्या ग्लॅमरस, सुंदर दिसणारी, तरुण मुलांची मैत्रीण म्हणून वावरणारी आई रंगवण्यासाठी.

या आधी हिंदी चित्रपटसृष्टीत कायम रडकी, सोशिक आणि गरीब आई रंगवण्यात आली होती. तशा भूमिका निरूपा रॉय यांनी अजरामर केल्या.

हिंदी चित्रपटांमध्ये दिसणारी आईची ही भूमिका त्यावेळी भारतीय जनमानसात आईची जी प्रतिमा होती त्याच्याशी साधार्म्य साधणारी होती.

नव्वदच्या दशकात भारतात अनेक बदल होत होते. नव्याने आलेल्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे भारतात उच्च मध्यमवर्ग तयार झाला होता. त्यांच्या प्रतिमा, भावना, इच्छा, आकांक्षा वेगळ्या होत्या. उदारीकरणामुळे पाश्चात्य जगाशी संपर्क आला त्यामुळे भारतीयांच्या मुल्यांवर त्याचाही परिणाम झाला होता.

अशाच हिंदी चित्रपटसृष्टीत नवीन ट्रेंड सुरू झाले नसते तर नवलच.

कृत्रिम पापण्या आणि मस्त अशी लिपस्टिक लावणारी ग्लॅमरस आई पहिल्यांदा पडद्यावर दिसली ती ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात. हा पिक्चर तुफान चालला आणि पर्यायाने रिमा भारतातल्या उच्च मध्यमवर्गीय आयांची एस्पिरेशन बनल्या.

'मैंने प्यार किया' चित्रपटातलं एक दृश्य

फोटो स्रोत, Rajashree Productions

फोटो कॅप्शन, 'मैंने प्यार किया' चित्रपटातलं एक दृश्य

बीबीसीच्या एका मुलाखतीत बोलताना त्या म्हणतात, “याचं श्रेय जातं सुरज बडजात्यांना. मी त्यांना पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आतापर्यंत आईची भूमिका जशी वठवली गेलीये मी त्यातलं काहीच करणार नाही. मी आहे तशीच दिसणार, मी केस पांढरे करणार नाही. कारण तुमचा हिरोही वयाने लहान आहे. त्यांनी माझं ऐकलं.”

इथूनच रिमा आणि सुरज बडजात्यांचे सूर जुळले. त्यांनी नंतर बडजात्यांच्या अनेक पिक्चर्समध्ये तशी आई रंगवली. त्या म्हणतात की हे आमच्या दोघांमुळे शक्य झालं कारण मी माझे विचार सांगितले आणि त्यांनाही पटले आणि आम्ही दोघांनी त्यावर काम केलं.

अभिनयाची सुरुवात घरातूनच

रिमा यांचं माहेरच नाव नयन भडभडे. त्यांचा जन्म 1958 मध्ये झाला. त्यांच्या आई मंदाकिनी भडभडे याही त्यावेळेच्या नाट्य अभिनेत्री. त्यामुळे अभिनयाचा वारसा त्यांच्याकडे होताच.

शाळा कॉलेजपासूनच वेगवेगळ्या नाटकांमध्ये अभिनय त्या करत होत्या. लहानपणी त्यांनी अनेक सिनेमांमध्ये बालकलाकाराची भूमिका केली.

पुल देशपांडेच्या ‘ती फुलराणी’ नाटकातली मुख्य भूमिका करायला त्या मुंबईत आल्या. त्यानंतर अनेक मराठी नाटकं आणि चित्रपटांमध्ये दिसल्या. सिंहासन चित्रपटातही त्यांनी भूमिका केली आहे.

एका बाजूला नाटकांमधून काम करत होत्या, दुसरीकडे त्यांनी मानसशास्त्र या विषयात पदवी घेतली आणि एका बँकेत नोकरी करत होत्या. त्यांनी अनेक वर्षं बँकेत नोकरी केली. इथेच त्यांना त्यांचे माजी पती विवेक लागू भेटले. दोघांनी काही महिन्यांच्या ओळखीनंतर प्रेमविवाह केला.

त्यांना एक मुलगी आहे. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघे विभक्त झाले.

अपघातानेच हिंदी चित्रपटसृष्टीत

रिमा लागू

फोटो स्रोत, Rajashree Productions

फोटो कॅप्शन, 'हम साथ साथ हैं' चित्रपटातलं एक दृश्य
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हिंदी चित्रपटात येण्याचं रिमा यांच्या ध्यानीमनीही नव्हतं.

बीबीसीच्या मुलाखतीत त्या म्हणतात, “मी कधी त्याचा विचार केला नव्हताच. मला अचानक हिंदी चित्रपटाची ऑफर आली. नाहीतर मी नाट्यक्षेत्रात खूश होते.”

रिमा यांनी मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश नाटकं केलेली आहेत. त्यावेळीही त्यांचा पूर्णवेळ नाटकातच जायचा.

मुंबईच्या पृथ्वी थिएटरला एक नाटक करत असताना त्या शशी कपूर यांच्या नजरेला पडल्या. त्यांनी रिमांना आपल्या ‘कलियुग’ चित्रपटात भूमिका दिली. हा चित्रपट श्याम बेनेगल दिग्दर्शित करत होते.

सुरुवातीच्या अनुभवाबद्दल बोलताना रिमा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, “माझ्या मनात खूप किंतू-परंतु होते. मला आठवतं जेव्हा मला कुलभूषण खरबंदा यांच्याबरोबर एक बेडरूम सीन करायला सांगितला तेव्हा मी ढसाढसा रडायला लागले. श्याम बेनेगल मला समजावयाचा प्रयत्न करत होते पण माझं रडणं थांबतच नव्हतं.”

या भूमिकेनंतर त्यांनी काही लहानसहान भूमिका केल्या. पण आपली बँकेतली नोकरीही चालूच ठेवली.

रिमांचा पहिला आईचा रोल म्हणजे ‘कयामत से कयामत’मधली जुही चावलाची आई. हा पिक्चर 1988 साली आला होता. त्यानंतर पुढच्याच वर्षी आला ‘मैंने प्यार किया’ आणि इथून हिंदी सिनेमातल्या आईचा इतिहास बदलला.

खरंतर ‘मैंने प्यार किया’ मध्ये आपल्याला भूमिका मिळेल असं त्यांना वाटलंही नव्हतं. ‘कयामत से कयामत’ तक मधला त्यांचा रोल बराच कापला गेला होता. त्यामुळे त्या नाराजही झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीत काही भविष्य नाही.

त्या काळात त्या पुन्हा मराठी नाटकांकडे वळल्या. त्या बरोबरीने त्या जाहिरांतीमध्ये काम करत होत्या, न्यूजरीडर म्हणून काम करत होत्या, काही सीरियलमध्येही काम करत होत्या.

पण त्यांना ‘मैंने प्यार किया’ मध्ये सलमानच्या आईची भूमिका मिळाली. त्यांनी चित्रपट पूर्ण केला आणि त्याबद्दल फारशी अपेक्षा ठेवली नाही. ‘कयामत से कयामत’ चा अनुभव होताच. पण हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला.

'सिंहासन' चित्रपटातलं एक दृश्य

फोटो स्रोत, Sujata Chitra/Jabbaar Patel

फोटो कॅप्शन, 'सिंहासन' चित्रपटातलं एक दृश्य

नव्वदच्या दशकात त्या घराघरात पोचल्या ते ‘श्रीमान श्रीमती’ आणि ‘तू तू मैं मैं’ या दोन सिरीयलमुळे. आई किंवा सासू खट्याळही असू शकते हे या भूमिकांमधून दिसलं.

रिमांनी आईच्या भूमिका इतक्या वेगवेगळ्यापणाने साकारल्यात आणि प्रत्येक आईला तिची एक कहाणी आहे. भले त्यांच्या गुडीगुडी चित्रपटातली आई जास्त गाजली असेल पण ‘हम आप के हैं कौन’ मधल्या ‘आज हमारे दिल में अजब एक उलझन हैं, गाने बैठे गाना सामने संमधन हैं’ या गाण्यात त्या ज्याकाही कमाल दिसल्यात आणि लाजल्यात की आजही अनेक व्याह्यांच्या हृदयात कळ येत असेल.

अशा आदर्श भारतीय कुटुंबातली आई त्यांनी साकारली तशीच प्रवाहाविरुद्ध जाणारी आईही साकारली.

1999 साली आलेल्या ‘वास्तव’ मधली मुलाला गोळी घालणारी आई आहे. ही आई ‘मदर इंडियात’ अभिनेत्री नर्गिस यांनी साकारलेल्या आईपेक्षा थोडी वेगळी आहे. ‘मदर इंडिया’तली आपल्या डाकू मुलाला गोळी घालते ते नैतिक अधिष्ठानातून. ‘वास्तव’ मधली रिमांची आई संजय दत्तच्या पात्राला गोळी घालते ते आपल्या मुलाला त्याच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी.

‘कल हो ना हो’ मध्ये रिमांनी आपल्या मुलाच्या आजारीपणाशी झुंजणारी आणि त्याचा शेवट काय असणार आहे हे मान्य करून आहे ते क्षण मुलासोबत एन्जॉय करणारी एकल माता रंगवली.

महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ तली आई वर उल्लेखलेल्या नुपूर या मराठी सीरियलच्या आईच्या जवळ जाणारी.

ही पण सिंगल पॅरेंट, मुलाला तिने कष्टाने मोठं केलंय आणि हा मुलगा पण जगाची जाणीव नसणारा, प्रेमात आकंठ बुडालेला. तेव्हा त्याच्या प्रेयसीला ती सांगते की प्रेम पुरेसं नसतं. तुझं स्वतःचं असं काय अस्तित्व आहे, तुझी स्वतःची काय जागा आहे ती शोध.

हिंदी सिनेमात रिमा लागूंना कधी मुख्य भूमिका करता आल्या नाहीत. पण त्याचं त्यांना दुःखही नव्हतं.

बीबीसीच्या मुलाखतीत त्या म्हणतात, “मी हिंदी चित्रपटाच उशीरा आले. त्यावेळी नवनव्या, अगदी तरुण हिरो हिरोईनची एन्ट्री होत होती. रेखांसारख्या अभिनेत्रींचा जुना काळ संपत होता. या नव्या मुलींच्या तुलनेत मी मोठी होते, त्यामुळे मला वयाने जास्त असणाऱ्या भूमिका मिळणार हे स्पष्ट होतं. पण मी मराठीमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. त्यामुळे मला दुःख नाही.”

'वास्तव' मध्ये संजय दत्त आणि रिमा

फोटो स्रोत, Adishakti Films

फोटो कॅप्शन, 'वास्तव' मध्ये संजय दत्त आणि रिमा

पण रिमा यांच्या वाटेला आलेल्या प्रत्येक आईच्या भूमिकेत त्यांनी वेगळं काहीतरी दाखवलं. त्यांनी साकारलेली आई अशी होती जी आपल्यासारख्यांच्या घरात होती, कदाचित आपली आई होती.

‘धर्मेंद्र यांच्याही आईचा रोल आला होता’

जेव्हा रिमा यांना ‘मैंने प्यार किया’ मधल्या आईची भूमिका मिळाली तेव्हा त्याचं वय होतं फक्त 31. आज त्या वयाच्या अभिनेत्री मुख्य भूमिका करताना दिसतात. यावर बोलताना रिमा हसतात आणि म्हणतात, “मला खूप हसू यायचं. ऋषी कपूर मला चिडवायचे. ते माझ्यापेक्षा एका वर्षांने मोठे होते. ते मला म्हणाले तू माझ्या आईचा रोल करतेस, विचित्र वाटत नाही का? मी म्हटलं मी नाही केला तर दुसरं कोणीतरी करेल.”

“एकदा धर्मेंद्र भेटले होते, मी त्यांना म्हटलं नशीब मला तुमच्या आईचा रोल करावा लागला नाही. ते म्हणाले काही सांगता येत नाही, करावाही लागू शकतो. मी म्हटलं अहो, ऑफर झाला होता. मीच नाही म्हटलं. इंडस्ट्रीत असंच होतं. इथे आईचा रोल म्हणजे आईचा रोल. भले ती कोणाचीही आई असो.”

‘हिंदी इंडस्ट्रीत गंज लागेल असं वाटलं’ रिमा जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत आल्या तेव्हा मराठीतल्या एक प्रस्थापित नाट्य कलाकार होत्या. अनेक नाटकं करत होत्या.

चित्रपट आणि नाटक यात काय फरक आहे विचारल्यावर त्या म्हणतात, “फिल्म इंडस्ट्रीत कलाकाराचे खूप लाड होतात. त्यांना बिघडवून टाकतात म्हणा ना. पण नाट्यक्षेत्रात एक शिस्त असते. माझा शो रात्री 8 चा असेल तर मला तिथे संध्याकाळी 7 ला पोचणं आहेच. तयारी करायची असते, कामावर एकाग्र व्हायचं असतं. शो संपला की सरळ घरी.”

“हा शारिरीकदृष्ट्या थकवणारा असतो. त्याच्या रिहर्सलला वेळ जातो. तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना ओळखायला लागता. नाशिक, पुणे, मुंबईचा प्रेक्षक वेगळा आहे हे कळतं आणि त्यानुसार तुम्ही तुमची अदाकारी बदलता.”

पण सिनेमात येऊन मी आळशी झाले असं त्या म्हणतात.

रिमा लागू

फोटो स्रोत, Colours PR

“मला जणूकाही सुस्ती चढली होती. सकाळी यायचं. माझ्या मागेपुढे फिरणारा पर्सनल स्टाफ आहे. मी गाडीतून उतरले की मेकअप रूममध्ये जाऊन बसायचं. फोटोग्राफर येणार. मग जेवणाची सुट्टी. एवढं करून संध्याकाळी कुठे एकदोन शॉट्स व्हायचे. मला गंज लागेल असं वाटायला लागलं. मग मी वाचन करायला लागले, माझ्या नाट्यग्रुपला बोलवून तालमी करायचे. मला इंडस्ट्रीत स्थिरस्थावर व्हायला एक दोन वर्षं गेली.”

“सुरुवातीला मला वाटायचं की अरे बापरे, एवढ्या वेळात तर मी नाटकाचे दोन शो करून आले असते. सकाळपासून मला बसवून ठेवलं, रात्री 8 वाजता माझा शॉट येतोय, तेवढ्यात तर मी सकाळी 11 आणि दुपारी 3 चा शो करून आले असते.”

रिमा नेहमीच चांगल्या रोलच्या शोधात असायच्या आणि जो रोल वाटेला आला तो चांगला करायची धडपड करायच्या. त्यांनी स्वतः बीबीसीच्या मुलाखतीत तसं म्हटलं होतं.

त्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होत्या. 18 मे 2017 ला त्या आपली शुटिंगची शिफ्ट संपवून घरी आल्या आणि त्याच रात्री त्यांना हार्टअॅटॅक आला. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)