मीठ किती खावं? जास्त मीठ खाल्ल्यानं आरोग्याला काय त्रास होतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इफ्तेखार अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आपल्या रोजच्या जेवणात चव आणण्यासाठी मीठ हे आवश्यक असतं. पण हेच मीठ जर मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात घेतलं, तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
संशोधनानुसार, जास्त मीठ खाण्यामुळे हाय ब्लडप्रेशर, हृदयविकार आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो.
मीठ हे आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. मीठ हे केवळ चवीसाठी नाही तर शरीरासाठीही ते उपयोगी आणि फायद्याचं असतं. मिठामुळे शरीरातील पाण्याचं संतुलन टिकून राहतं आणि स्नायूंना योग्य प्रकारे काम करायला मदत मिळते.
जसं प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, तसं खूप जास्त मीठ खाणंही शरीरासाठी घातक ठरू शकतं. काहीवेळा तर जास्त मीठ खाल्ल्यानं जीव जाण्याचीही शक्यता असते.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीच्या वैज्ञानिकांनी काही माहिती दिली आहे, ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं.
परंतु, त्याआधी हे समजून घेऊया की आपल्या शरीराला रोज किती प्रमाणात मीठाची गरज असते आणि जर आपण त्यापेक्षा जास्त मीठ खाल्लं, तर त्याचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर काय वाईट परिणाम होऊ शकतो.

जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्यामुळे आपण कोणतं मीठ खातो यापेक्षा किती मीठ खातो, याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे.
हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे की, मीठ फक्त घरच्या जेवणातूनच मिळत नाही, तर अनेक पॅकबंद आणि तयार अन्नपदार्थांमध्येही त्याचं प्रमाण खूप जास्त असतं.

फोटो स्रोत, Getty Images
अशा गोष्टींचा अतिवापर केल्यास, रोजच्या जेवणात कमी मीठ घेतलं तरीही, आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशीनुसार, प्रत्येक व्यक्तीने दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं. 5 ग्रॅम मीठ हे सुमारे एका चमच्याइतकं असतं.
नुकताच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे की, भारतातील लोक या निश्चित प्रमाणापेक्षा जास्त मीठ खात आहेत.

- मीठ घातल्यावर अन्नाची चव वाढते
- शरीरात मीठाची कमतरता जीवघेणी ठरू शकते
- सोडियममुळे शरीरात पाण्याचं संतुलन राखलं जातं.
- सोडियम शरीराच्या पेशींना (कोशिकांना) पोषक तत्त्वं शोषायला मदत करतं.

आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या मते, भारतात लोक खूप जास्त मीठ खातात, आणि त्यामुळे ही एक शांतपणे वाढणारी मोठी आरोग्य समस्या बनत चालली आहे.
त्यांचं म्हणणं आहे की, जास्त मीठ खाल्ल्यानं रक्तदाब (हायब्लड प्रेशर), स्ट्रोक, हृदयाचे आजार आणि किडनीशी संबंधित त्रासाचं प्रमाण वेगानं वाढत आहे.
अभ्यासांतून समोर आलं आहे की, शहरी भागात राहणारे भारतीय दररोज सरासरी 9.2 ग्रॅम मीठ खातात, तर ग्रामीण भागात हे प्रमाण सुमारे 5.6 ग्रॅम आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेली ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीपेक्षा खूप जास्त आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जास्त मीठ खाल्ल्यानं अनेक आजार होण्याचा धोका वाढू शकतो. परंतु, मर्यादित प्रमाणात मीठ घेतल्यास हे टाळता येऊ शकतं.
दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटलमधील लिव्हर, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि पॅन्क्रिएटिको-बिलियरी सायन्सेस विभागाचे उपाध्यक्ष डॉ. पीयूष रंजन यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की, सतत जास्त मीठ खाणं हे उच्च रक्तदाबाशी (हायपरटेन्शन) संबंधित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी सांगितलं, "हाय ब्लड प्रेशर हा एक मल्टीसिस्टमिक म्हणजेच अनेक अवयवांवर परिणाम करणारा आजार आहे. याचा सर्वात मोठा परिणाम हृदय आणि किडनीवर होतो."
"शारीरिक अवस्थेमध्ये, जेव्हा शरीरात वेगवेगळे आजार होतात, तेव्हा सोडियम म्हणजेच मीठ शरीरात साठू लागतं. शरीरात मीठ आणि पाण्याचं योग्य संतुलन राखण्याची जबाबदारी किडनीची असते."
त्यांनी सांगितलं, "रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काही औषधं दिली जातात, ज्यांना डाययुरेटिक्स (लघवीचं प्रमाण वाढवणारं) म्हणतात. ही औषधं किडनीद्वारे शरीरातील मीठ बाहेर टाकतात, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं."
"हृदयविकार (कार्डिॲक फेल्युअर), किडनीचे आजार आणि लिव्हर सोरायसिस सारख्या प्रकरणांमध्ये उपचाराचा एक भाग म्हणून मीठाचं प्रमाण मर्यादित ठेवावं लागतं."
म्हणून फक्त आजाराच्या स्थितीतच नाही, तर दैनंदिन जीवनातही रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हृदय व किडनीचं संरक्षण करण्यासाठी मिठाचं मर्यादित प्रमाणात सेवन करणं फायदेशीर ठरतं.

कोणत्याही वयात जास्त मीठ खाल्ल्यानं रक्तदाब वाढू शकतो. म्हणून शक्य तितकं मिठाचं सेवन कमी असणं फायदेशीर ठरतं. विशेषतः ज्या पदार्थांमध्ये लपलेलं (छुपं) मीठ असतं, अशा गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. पीयूष रंजन यांच्या मते, अनेक साध्या अन्नपदार्थांमध्ये लपलेलं (छुपं) मीठ असतं.
- लोणचं
- पापड
- पॅकेटमधले खाद्य पदार्थ – जसं की नमकीन, चिप्स, सॉस आणि रेडी-टू-इट पदार्थ
- प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ (प्रोसेस्ड फूड) – जसं की सॉसेज, नूडल्स, केचप, बिस्किट्स वगैरे.
या पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण सामान्यपेक्षा खूप जास्त असतं. त्यामुळे हे विकत घेताना त्यावरच्या लेबलवर सोडियमचं प्रमाण नक्की तपासा आणि शक्य असेल तेव्हा असे पदार्थ टाळा किंवा मर्यादित प्रमाणातच खा.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











