'एवढ्या पिढ्या गेल्या, गावात नळ पाहिला नाही', पूर्णा नदीकाठी असून बाराही महिने तहानलेली गावं

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
रसत्याने जाणाऱ्या दुचाकी, सायकली आणि त्यांच्या दोन्ही बाजुला लटकत असलेले दोन-दोन किंवा चार चार प्लास्टिकचे डबे किंवा कॅन.
गजानन महाराजांच्या नावानं प्रसिद्ध असलेलं शेगाव ओलांडलं की रसत्यानं हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असं बाराही महिने असंच चित्र दिसतं.
दुचाकी आणि सायकलवरून हे लोक पाच ते सहा किलोमीटरवरून त्यातून पिण्याचं पाणी घेऊन जात असतात.
पण, त्यांच्यावर ही परिस्थिती का आली? हे जाणून घेण्यासाठी आम्ही गावात पोहोचलो आणि तिथं एक वास्तव समोर आलं.
प्रत्येक नागरिकाला पिण्याचं शुद्ध पाणी घरपोच मिळावं हा त्याचा हक्क आहे. पण याठिकाणचे नागरिक गेली कित्येक वर्ष या हक्कापासून वंचित आहेत.
एक-दोन नाही तर शेगाव तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक म्हणजे जवळपास 38 गावंही बाराही महिने तहानलेली असतात. पूर्णा नदीच्या पट्ट्यातली ही गावं आहेत.
नदीचं पाणी गावात येत असल्यानं काही गावांचं 80 च्या दशकात नदीपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर पुनर्वसन झालं, तर काही गावं अजूनही तिथंच आहेत.
पण, अगदी उशाशी नदी असलेल्या या गावांमध्ये पिण्याचं पाणी मात्र अद्याप पोहोचलं नाही.
'पाण्याचा त्रास जन्मापासूनचाच'
पूर्णा नदीपासून एक किलोमीटर अंतरावर वसलेल्या पोहुरपुर्णा गावचे भारत सुलतान त्यांची व्यथा सांगत होते.
"आमच्या गावात 1984 साली पुनर्वसन झालं तेव्हापासून प्यायच्या पाण्याची लय मोठी समस्या आहे. गावात कायमची पाण्याची व्यवस्था अजून झालीच नाही.
गावात कोणाच्याच घरी नळ नाही. बोअरवेल आहेत. पण, त्याचं पाणी पिऊ शकत नाही. कारण त्या पाण्याचा टीडीएस हजाराच्या घरात आहे. प्यायचं पाणी आम्हाला दूरवर असलेल्या वॉल्व्हवरून आणायला लागतं."
त्यासाठी लोकांना कामातून वेळ काढून पिण्याच्या पाण्यासाठी डब्बे घेऊन फिरायला लागतं. वारी धरणाहून शेगाव नगरपरिषदेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली आहे. या पाईपलाईनवर लोकांनी वॉल्व्ह तयार केले. तिथूनच हे लोक तीन-चार किलोमीटवरहून दररोज पाणी भरतात.
हे पाणी भरण्याची परवानगी लोकांकडे नाही. पण, त्यांच्याकडं दुसरा पर्याय नसल्यानं ते वॉल्व्ह बंद झाला तरी पुन्हा सुरू करतात आणि पाणी भरतात.
आम्ही या गावांमध्ये पोहोचलो तेव्हा दुरुस्तीच्या कामासाठी शेगाव नगर परिषदेची पाईपलाईनही बंद होती, त्यामुळं सगळ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला होता.

फोटो स्रोत, Getty Images
लोक कंबरभर खड्ड्यात उतरून पाईपलाईनमधून सांडणारं थेंब थेंब पाणी भरत होते. पाण्याचा हा त्रास जन्मापासूनचा असल्याचं कालखेड गावातल्या कल्पना खंडेराव सांगतात.
त्या म्हणाल्या की, "आम्ही पाण्यासाठी लय दिवस काढले. आधी तळ्यावरून डोक्यानं पाणी भरत होतो. कधी नदीवरून डोक्यानं पाणी भरत होतो. आता शेगावला पाईपलाईन गेली तिथल्या वॉल्व्हवरून पाणी आणतो. पण तो बंद झाला की, असं खड्ड्यात उतरून पाणी भरावं लागतं. हा रोजचा त्रास आहे."
शेगावच्या पाईपलाईनवरून पाणी भरतात ते अधिकृत नाही. ते अधूनमधून बंद होत असतं. ते बंद झालं की लोकांना बोरवेलच्या खाऱ्या पाण्याशिवाय पर्याय नसतो किंवा गावात पाण्याच्या कॅन येतात. मग ते पाणी विकत घ्यावं लागतं.
खाऱ्या पाण्यामुळे संडास-उलट्यांचा त्रास होत असल्याचं भोनगावातील नर्मदा तराळे सांगतात.
त्या म्हणतात की, "तब्येती खराब होतात. त्यामुळे आम्ही प्यायचं पाणी विकत घेऊन पितो. बोरवेलचं खारं पाणी पित नाही."
पाण्यामुळे बिघडलं आर्थिक गणित
या पाण्यामुळे फक्त लोकांच्या आरोग्यावरच परिणाम होतोय असं नाही, तर लोकांचं आर्थिक गणितही सुद्धा बिघडलं आहे.
शेवगावच्या या पाईपलाईनपासून 15-20 किलोमीटर दूर वसलेली जी गावं आहेत त्यांना पिण्याचं पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही.
लोक आरोग्याच्या भीतीनं पिण्यासोबत स्वयंपाकासाठीही विकतचं पाणी वापरतात.
गावात सकाळीच पिण्याच्या पाण्याची गाडी येते. त्यावेळी हे लोक पाणी विकत घेतात.
आम्ही सकाळीच गावात पोहोचलो तेव्हा पुंडलिक भिवटे यांनी चार कॅन पाणी विकत घेतलं होतं. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी दहा असे चाळीस रुपये दिले.
त्यांच्या घरात सहा सदस्य आहेत. त्यामुळं स्वयंपाक आणि पिण्याचं असं मिळून जवळपास 40 लिटर पाणी दिवसाला लागतं.

पुंडलिंक यांचा मुलगा उल्हास घरात एकटाच कमावता आहे. पण त्याच्या रोजच्या दोनशे रुपये कमाईतले दररोज पाण्यालाच 40 रुपये द्यावे लागतात. त्यामुळं आर्थिक गणित बिघडल्याचं उल्हास सांगतो.
बीबीसी मराठीसोबत बोलताना त्यांनं म्हटलं की, "आमच्या घरात सहा सदस्य आहोत. पाच एकर कोरडवाहू शेती आहे. पीक काही होत नाही. कमावणारा मी एकटाच आहे. बाबांना पायाचा त्रास आहे. उत्पन्न भेटलं तर एक दीड लाख रुपये भेटतं.
दोन-अडीचशे रुपये रोज पडतो. त्यातले चाळीस रुपये पाण्यालाच लागतात. लेकरांचे दवाखाने आहेत. त्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली. सगळ्या गावाची समस्या सारखीच आहे.
गावात खारं पाणी आहे. ते पाणी पित होतो तर पोटाचा त्रास होत होता. किडनी स्टोनचे रुग्ण वाढले. ते पाणी पिणं बंद केलं तर त्रास कमी झाला.
पुढे चाळीस रुपये गेले तर परवडेल पण तब्येती चांगल्या राहतील या हिशेबानं आम्ही दहा रुपयाची एक कॅन विकत घेतो. दवाखान्यात पैसे भरण्यापेक्षा पाणी विकत घेणं कधीही चांगलं."
'इतक्या पिढ्या गेल्या अजून नळ पाहिला नाही'
नदीकाठी वसलेलं भोनगाव तर वर्षानुवर्ष तिथंच आहे. पण, त्या गावातही पिण्याचं पाणी पोहोचलेलं नाही.
गावात जलजीवन मिशनचे बॅनर लागले आहेत. पण, लोक पिण्याचं पाणी मात्र विकतच घेतात. तर इतर कामासाठी पूर्णा नदीचं दूषित पाणी वापरतात.
पावसाळ्यात थोडं कमी पाणी लागत असलं तरी उन्हाळ्यात पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.
ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची वारंवार मागणी केली. या मागणीला सरकारकडून ओ मिळाला 2019 ला. या 38 गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली. पण कित्येक वर्ष गेले, लोकांच्या पिढ्या गेल्या तरी गावात शुद्ध पाण्याचा नळ पोहोचलाच नाही.
2019 ला मंजूर झालेल्या या योजनेचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं अधिकारी सांगतात.

बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या मते, "शेगाव तालुक्यातील गावांसाठी जलजीवन प्राधिकरणाकडून एक पाणी पुरवठा योजना सुरू आहे.
धरणापासून दोन किलोमीटर अंतरावर फिल्ट्रेशन प्लांट आहे. तिथून 35 किलोमीटरवरील गावं कव्हर करायची योजना आहे. 2019 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत हे काम सुरू झालं होतं.
काही परिसर वनविभागाचा आहे. अकोला एमजेपी आणि बुलढाणा एमजेपी, जलजीवन मिशन अशा सर्वांच्या मार्फत ही योजना सुरू आहे. योजनेचं काम 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. साधारण नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत चाचणीची परिस्थिती येईल."
या गावांना नोव्हेंबरपर्यंत पाणी भेटेल असं अधिकारी सांगत असले, तरी प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र वेगळीच आहे. काही गावांमध्ये अजून टाक्याही बांधलेल्या नाहीत, तर काही गावांत अजून नळ कनेक्शन पोहोचले नाहीत. काही ठिकाणी टाक्यांची कामं अर्धवट आहेत, पण पाईपलाईन नाही.
"टाक्या बांधल्या आहेत, पण नळाचं कनेक्शनच नाही ना. कामच पूर्ण नाही तर काय पाणी येईन. आम्ही लग्न करून आलो तेव्हापासून कधी पाणी दिसलंच नाही. आता पिढ्या चालल्या आमच्या.
जुन्या गावात आम्ही डोक्यानं आणून पूर्णा नदीचं पाणी पित होतो. तिथंही नळ नव्हते," असं पोहूरपूर्णाच्या 80 वर्षाच्या केतर उमाळे सांगत होत्या.
पुंडलिंक भिवटेंनीही जन्मापासून गावात पिण्याच्या पाण्याचा नळ न बघितलेला नाही. त्यामुळं गावात पिण्याचं पाणी येईल याची आशाच त्यांनी सोडून दिली आहे.
सरकारवर रोष व्यक्त करताना ते म्हणाले ती, "आम्ही मेल्यावर आम्हाला प्यायचं पाणी देणार आहेत का? इतक्या पिढ्या गेल्या अजून नळ पाहिला नाही, तर आता ते काय पाणी देतात?"
प्यायला पाणी मिळावं ही या 38 गावातल्या लोकांची साधी अपेक्षा आहे. पण स्वातंत्र्याची 77 वर्ष उलटली तरी या गावांना अजूनही प्यायला पाणी का मिळू शकलं नाही याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












