बोटाच्या नखावर मावेल एवढी छोटी तोफ कशी बनली? जाणून घेण्यासाठी वाचा-

बोटांच्या नखावर मावेल एवढी छोटी तोफ
फोटो कॅप्शन, गोरे यांनी बनवलेली तोफ
    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आपण कधी कोणत्या किल्ल्यांवर भटकायला गेलो तर तिथे आपल्याला अवाढव्य अशा तोफा दिसतात.

काही तोफा तर एवढ्या मोठ्या असतात की, त्या समोर आपणही खुजे दिसू लागतो. काही तोफा एवढ्या वजनदार असतात की, दहा लोक मिळूनही त्यांना किंचितही हलवू शकत नाही. अशा तोफा तुम्ही अनेकवेळा पाहिल्या असतील.

मात्र जर तुम्हाला आम्ही सांगितलं की, जगात अशीही एक तोफ आहे की जी तुमच्या बोटाच्या नखावर मावू शकेल, तर तुमचा विश्वास बसेल का?

तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही. मात्र हे शक्य करून दाखवलंय औरंगाबादच्या विठ्ठल गोरे यांनी. विठ्ठल गोरे यांनी अवघ्या 5 मीलिमिटर एवढी लहान तोफ बनवून एक नवीन रेकॉर्ड बनवलाय.

तांबं आणि पितळ वापरून बनवलेल्या या तोफेची लांबी 5 मिलीमीटर असून तिची उंची 2.7 मीलीमिटर आहे. तर रुंदी साडेतीन मिलीमीटर आहे.

या तोफेचे वजन 140 मिलिग्रॅम इतके आहे. विशेष म्हणजे या तोफेमध्ये स्फोटंक भरून ती पेटवताही येऊ शकते.

photo of tiny cannon
फोटो कॅप्शन, अवघ्या 5 मिलीमीटरची तोफेची लांबी

पुस्तकं वाचून इंजिनिअरिंग शिकलो

विठ्ठल गोरे यांचं स्वतःचं एक वर्कशॉप आहे. या वर्कशॉपच्या माध्यमातून ते वेगवेगळी यंत्र बनवतात. त्यांचं काम हे एखाद्या इंजिनिअरप्रमाणेच आहे. मात्र ते स्वतः इंजिनिअर नाहीत.

विठ्ठल गोरे वर्कशॉपमध्ये काम करताना
फोटो कॅप्शन, विठ्ठल गोरे वर्कशॉपमध्ये काम करताना

गोरे सांगतात, “माझं शिक्षण फक्त 12 वी होतं. त्यानंतर मी पुढं शिकू शकलो नाही. पण इंजिनिअरिंग शिकण्याची इच्छा होती ती मात्र तशीच होती. त्या इच्छेपोटी मी मित्रांचे इंजिनिअरिंगचे पुस्तक आणले ते वाचले.

त्यातून इंजिनिअरिंग कशी असती ते शिकलो. मग मशिन डिझाईन करताना ते कसं केलं जातं ते शिकलो.

ते शिकत शिकत मी माझं स्वतःचं छोटं वर्कशॉप चालू केलं आणि मी मशीन बनवायला सुरूवात केली. या मशीन बनवत असताना माझा जो छंद होता तो म्हणजे किल्लांवरती भटकंती करण्याचा. या किल्ल्यांच्या भटकंतीवरूनच मी शस्त्रांच्या अभ्यासाकडे वळालो. त्यांचा अभ्यास केला.”

ऐतिहासिक वस्तूंची आवड

विठ्ठल यांना इंजिनिअरिंगसोबतच पर्यटनाचीही खूप आवड आहे. त्यामुळेच सुटीच्या दिवशी ते त्यांच्या मित्रांसोबत गडकिल्ले चढायला जातात.

या पर्यटनातूनच त्यांच्यात इतिहासाविषयीची आवड निर्माण झाली आणि इतिहासाची ही आवड अजून कशा पद्धतीने जोपासता येईल याबद्दल त्यांचा शोध सुरू झाला.

देवगिरी किल्ला आणि विठ्ठल गोरे यांनी बनवलेल्या तोफा
फोटो कॅप्शन, देवगिरी किल्ला आणि विठ्ठल गोरे यांनी बनवलेल्या तोफा

ऐतिहासिक वस्तूंची आवड कशी लागली याबद्दल विठ्ठल सांगतात, “तोफांनी साम्राज्य बनवलेली आहेत, तोफांनी साम्राज्य तोडलीपण आहेत. तर अशा तोफा बघत असताना ही तोफ आपण संग्रही ठेवू शकतो का असा एक विचार माझ्या मनात एकादिवशी आला.

साधारण एक 13 वर्षांपूर्वी 2010 ला मी एक छोटी तोफ बनवली. साधारण 4-5 इंच लांबीची ती तोफ होती. मग मी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र बनवायला सुरूवात केली. जे खासकरून मध्ययुगीन काळात मराठ्यांनी किंवा इतर लोकांनी वापरले होते.”

सर्वात लहान तोफेची निर्मिती

विठ्ठल यांनी अनेक प्रकारची हत्यारं बनवली आहेत. त्यामुळे त्यांच आवडतं हत्यार म्हणजे तोफ. त्यांनी अनेक प्रकारच्या तोफा या अभ्यासपूर्ण पद्धतीने आहेत. त्यांचे कपाट उघडताच तुम्हाला अनेक प्रकारच्या तोफा दिसायला लागतात.

तोफेचं वजन 40 मिलीग्रॅम
फोटो कॅप्शन, तोफेचं वजन 40 मिलीग्रॅम
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते सांगतात, “सुरूवातीला मी काही छोट्या तोफा बनवल्या, तर काही मोठ्या तोफा बनवल्या, असं करत करत मी एक मोठीच तोफ बनवली. साधारण 26 किलो वजनाची ती तोफ आहे.

मात्र ही तोफ गडकिल्ल्यावर घेऊन जाता येत नव्हती म्हणून मी अजून एक छोटी तोफ बनवली. त्यानंतर अजूनएक मी छोटी तोफ बनवली. असं करत करत मी खूपच छोटी तोफ बनवली.”

विठ्ठल यांची ही तोफ साध्या डोळ्यांनी पाहाणे खुपच कठीण जाते. सामान्य डोळ्यांनी या तोफेवरील नक्षीकाम पाहाणं शक्यच होत नाही. तेव्हा ही एवढी लहान तोफ त्यांनी कशी बरं बनवली असेल असा प्रश्न सहाजिकच मनात येतो.

याबद्दल विचारले असता ते सांगतात, “ही तोफ बनवत असताना बरीचशी आव्हानं माझ्यासमोर होती. त्यातील सर्वात पहिलं म्हणजे एवढं छोटं मटेरियल हातात पकडायचं कसं.

मग त्यावरती कुठल्या मशीनीचा वापर करायचा. आणि आपल्याला कमीत कमी मशीनचा वापर करून ती हाताने बनवायची होती. यासाठी आपण 0.3 मीलीमिटर आकाराचं ड्रील वापरलं आणि हे बनवत असताना मी खूप सावकाशपणे ते वापरलं.

या तोफेसाठी मी एक खास सुक्ष्मदर्शी बनवली आणि त्यावर तिच्यावर भिंगाच्या काचा लावून मी या तोफेची निर्मिती केली. यासाठी काही खास प्रकारचे टूल्स बनवावे लागले.

ही तोफ बनवल्यावर मी जेव्हा तिचं वजन केले तर ते 140 मिलीग्रॅम एवढं भरलं.”

सर्वात लहान तोफ
फोटो कॅप्शन, सर्वात लहान तोफ

एवढी छोटी तोफ का बनवावीशी वाटली?

“ ही छोटी तोफ बनवत असताना मी हे शोधण्याचा प्रयत्न केला की, आपल्याकडे सर्वात छोटी तोफ किती लांबीची आहे.

तेव्हा असं लक्षात आलं की जयपूरला एक गृहस्थ होते त्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी 11 मीलीमिटर मापाची तोफ बनवली होती.

पुढे शोध घेताना असं लक्षात आलं की, आतापर्यंत बनलेली सर्वात छोटी तोफ ही 6 मीलीमिटर लांबीची आहे. मग मी असं ठरवलं होतं की, आपण यापेक्षाही छोटी तोफ बनवू शकतो आणि मी ती बनवलीसुद्धा”

सर्वात लहान तोफेचा नवीन विक्रम

विठ्ठल यांच्या या लहान तोफेची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

या तोफेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीये
फोटो कॅप्शन, या तोफेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीये

शिवाजी महाराजांची वाघनखं, जगदंबा तलवारीची प्रतिकृती

तोफेसोबतच विठ्ठल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं, त्यांची कट्यार आणि जगदंबा तलवारीचीही प्रतिकृती बनवली आहे.

ही सर्व अवजारं बनवताना त्यांनी मूळ हत्यारांची मापं घेऊन अगदी हुबेहूब पद्धतीने ही हत्यारं बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

वाघनखांची प्रतिकृती
फोटो कॅप्शन, वाघनखांची प्रतिकृती

जुन्या लिपीही केल्या आत्मसात

इतिहासाची आवड गोरे यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे ते काही ना काही मार्गाने इतिहासाशी आपण कसे जोडले जाऊ याचे मार्ग शोधत असतात. याचंच उदाहरण म्हणजे, त्यांनी मोडी, ब्राम्ही लिपींचा केलेला अभ्यास.

आज ते अगदी सहजपणे या लिपी लिहिताना दिसतात.

मोडी लीपी
फोटो कॅप्शन, मोडी लीपी

विठ्ठल सांगतात, “मध्ययुगीन काळात जी लिपी वापरली जायची ती म्हणजे मोडी लिपी. मराठे खासकरून याच लिपीचा वापर करायचे. त्यामुळे मला ती लीपी शिकण्याचा मोह होऊ लागला आणि मी त्या लिपीचा अभ्यास सुरू केला. यासोबतच मी ब्राम्हीचा लिपीचाही अभ्यास केला. मी या दोन्ही लिपी चांगल्याप्रकारे वाचू आणि लिहू शकतो.

मी मोडी लिपी शिकवायलाही लागलो. आतापर्यंत मी दीडशे लोकांना मोडी लिपी शिकवली आहे. ब्राम्ही लिपीही बऱ्याच लोकांना शिकवली आहे. या लिपींसोबतच मी फारशी भाषेचा अभ्यास करतोय. उर्दूचा अभ्यासतर चालूच आहे. या लिपींचा अभ्यास करून आपण इतिहासातले मुळ कागदपत्र वाचू शकतो. त्यांचा मुळ अर्थ समजू शकतो.”

‘इतिहासातल्या कागदालाच काय तर दगडालाही महत्त्व असतं’

गोरे म्हणतात, “आपण जेव्हा किल्ल्यांवरती भटकंती करतो, तेव्हा लोक तोफांवरती चढून फोटो काढतात किंवा त्या शस्त्रांचा अपमान करताना दिसतात. मुळात ही शस्त्र अत्यंत पवित्र आहेत. यांचा वापर करून आपल्या पुर्वजांनी इतिहास निर्माण केलाय. इतिहासातला कागदचं काय तर इतिहासातला दगडही खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट जपली पाहिजे आणि ती जपवणूक करण्यासाठी लोकांनी याकडे लक्ष द्यावं म्हणून मी या शस्त्रांची निर्मिती करून लोकांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)