इसबगोल: पोट साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाची शेती कशी करतात?

इसबगोल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रुचिता पुरबिया
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

"मी दोन वर्षांपूर्वी दोन बिघे (बिघा हे भारतातील काही भागांत जमीन मोजण्याचं गुंठ्यासारखं परिमाण आहे) जमिनीवर इसबगोलचं पिकं घेतलं होतं. त्यानंतर झालेलं उत्पादन मी 1,800 रुपये प्रति मण (एक मण म्हणजे 40 किलो) दरानं विकलं. त्यातून मला 2.20 लाखांचं उत्पन्न मिळालं.

"यावर्षी मी 10 बिघे जमिनीवर इसबगोलचं पिक लावलंय. हवामान ठिक राहिलं तर अंदाजे 100 मण उत्पादन होईल आणि आजच्या दरानुसार मी किमान सहा-सात लाखांचं उत्पन्न मिळवेल, अशी मला आशा आहे. "

मेहसाणाच्या गोधना गावातील शेतकरी बच्चूभाई यांचा हा अनुभव आहे. इसबगोलच्या शेतीबाबतच्या अपेक्षा त्यांनी अशाप्रकारे व्यक्त केल्या.

त्याचप्रकारे त्यांच्याप्रमाणेच गुजरातमध्ये इसबगोलची पेरणी करणाऱ्या इतरही बहुतांश शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.

संपूर्ण भारताचा विचार करता मेहसाणामध्ये इसबगोलचं सर्वाधिक उत्पन्न घेतलं जातं.

ऊंझा कृषी उत्पन्न बाजारसमितीचे अध्यक्ष दिनेश पटेल यांनी याबाबत बीबीसीबरोबर चर्चा केली.

"सध्या इसबगोलचा दर 3,500 रुपये प्रति मण एवढा आहे. पण हा दर गेल्यावर्षी निघालेल्या पिकासाठीचा आहे. यावर्षी निघालेलं नवं पीक बाजारात पोहोचायला आणखी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे दर वाढतील किंवा कमी होतील, हे आताच सांगणं घाईचं ठरेल. पण उत्पादन पाहता दरात जास्त घसरण झाली नाही, तर यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणात इसबगोल असेल," असं ते म्हणाले.

विशेष म्हणजे, कृषी संचालक कार्यालयाची आकडेवारी पाहता, यावेळी इसबगोलचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकीकडं शेतकरी यावेळी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेऊन चांगली कमाई करण्याची स्वप्नं पाहत आहेत. पण दुसरीकडं अवकाळी पावसामुळं या स्वप्नाववर पाणी फेरलं जाण्याची भीतीही आहे.

विशेष म्हणजे, इसबगोलच्या पिकावर कायमच अशाप्रकारे अवकाळी पावसाचा धोका असतो.

यावेळी इसबगोलचं बंपर उत्पन्न होण्याची आशा आहे. त्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर पिकणाऱ्या या पिकामुळं शेतकरी कशाप्रकारे मालामाल होऊ शकतात? हे आपण पाहूया.

इसबगोलचं पीक घेताना काय काळजी घ्यावी?

इसबगोल हे गुजरातमधील महत्त्वाचं नकदी पीक आहे.

आयसीईएआरचा अहवाल आणि संशोधक डॉ. पी. जे. पटेल यांनी इसबगोलच्या पिकाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

उपयुक्त जमीन :

इसबगोल हे हिवाळ्यातील पीक आहे.

या पिकासाठी हलकी, वालुकामय, मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी मृदा (माती) उपयुक्त असते.

त्याशिवाय जर मातीमध्ये पावसाच्या पाण्याची आर्द्रता दीर्घकाळासाठी टिकवून ठेवण्याची क्षमता असेल तर मात्र पीक सडून जातं.

इसबगोलच्या पिकाला प्रत्यक्षात खूप कमी पाणी लागतं. या पिकाला कोरडं आणि थंड हवामान अधिक फायदेशीर ठरतं.

याचं पीक चांगलं येण्यासाठी पाण्याचा निचरा चांगल्याप्रकारे होणं गरजेचं असतं.

इसबगोल

फोटो स्रोत, Getty Images

हवामान:

गारा पडणे आणि आर्द्रता ही इसबगोलचं पीक खराब होण्यामागची मुख्य कारणं असतात.

पाऊस झाला तर सर्व पीकं जमीनदोस्त होतात अशा स्थितीत शेतकऱ्याच्या हाती काहीही लागत नाही.

त्याचबरोबर हिवाळ्यातला अवकाळी पाऊस हानिकारक आहे. अवकाळी पाऊस झाला नाही तर इसबगोलसाठी आणखी एक मोठं आव्हान असतं.

कीड आणि रोग:

हे पीक उत्तर गुजरातच्या वालुकामय मातीमध्ये घेतलं जातं, त्यामुळं पिकाला उधईचे कीडे लागण्याची शक्यता असते.

त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य त्या औषधांची फवारणी करावी.

दुसरं आव्हान म्हणजे, इसबगोलवर एफिड्स नावाचा रोग पडू शकतो.

एफिड्स हा या पिकावर पडोमारा मुख्य रोग आहे. तो पेरणीच्या 50-60 दिवसांनंतर दिसू लागतो. त्यामुळे 12-15 दिवसांच्या फरकानं कीटकनाशकांची फवारणी करायला हवी.

इसबगोल

फोटो स्रोत, Getty Images

खते :

या पिकाला फार रासायनिक खतांचीही गरज पडत नाही. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटाशयुक्त खतांचा वापर करावा.

या पिकाला कमी प्रमाणात नायट्रोजनची गरज असते. त्यामुळं मातीमध्ये असलेल्या नायट्रोजनचं प्रमाण प्रति हेक्टर120 किलोग्रॅमपेक्षा कमी असेल, तरच नायट्रोजनचा वापर करावा. साधारणपणे प्रति हेक्टर 20-30 किलोग्रॅम नायट्रोजन आणि 15 किलोग्रॅम फॉस्फरसचा वापर पुरेसा असतो.

यंदा चांगल्या पिकाची आशा

ऊंझा बाजार समितीतील इसबगोलचे दर 3,250 रुपये ते 4,125 रुपये प्रति मण आहेत.

कृषी संचालकांच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात इसबगोलची सर्वाधिक पेरणी झाल्याची नोंद झाली आहे.

2024 च्या आर्थिक वर्षात 31,208 हेक्टरपेक्षा जास्त कृषीक्षेत्रात इसबगोलची पेरणी करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार 2023 मधील 13,245 हेक्टहून यंदा 2024 मध्ये इसबगोलचं क्षेत्रफळ 135% वाढलं आहे.

इसबगोलची निर्यात

भारत जगभरात इसबगोलचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. गुजरातशिवाय राजस्थान आणि मध्य प्रदेशातही याचं चांगलं उत्पादन होतं.

साधारणपणे औषध कंपन्या आणि फार्मा उद्योगांत औषधं तयार करण्यासाठी याची खरेदी करतात.

याचे बहुतांश प्रमुख निर्यातदार किंवा प्रक्रिया उद्योजक गुजरातच्या मेहसाणी जिल्ह्याच्या सिद्धपूर आणि बनासकांठा जिल्ह्यांत आहेत.

गुजरातच्या माहिती विभागाच्या एका ट्विटनुसार भारताकडून इसबगोलची सर्वात जास्त आयात अमेरिका करतं.

इसबगोल

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय कृषी संशोधन परिषद, भारत सरकारच्या कृषी संशोधन संस्थेचे औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संचलनालयाच्या एका शोधनिबंधात याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार :

  • इसबगोलच्या बियांवर असलेला बाहेरचा थर अत्यंत फायदेशीर समजला जातो. ही वनस्पती अनेक आजारांवर उपचारांसाठी वापरली जाते.
  • बद्धकोष्टासारख्या आजारांवर ते उपयोगी आहे.
  • इसबगोल आकुंचन पावलेल्या आतड्यांवरील उपचारासाठी फायदेशीर ठरतं.
  • इसबगोल खाद्यपदार्थांचं डिझायनिंग करणाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय साहित्य आहे.
  • फायबरचं प्रमाण अधिक असलेला नाश्ता, धान्य, ब्रेड आणि आइस्क्रिमपासून औषधांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी ते फायदेशीर ठरतं. सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनासाठीही याचा वापर केला जातो.