बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील खाणाखुणांचा थेट तिथूनच घेतलेला मागोवा...

फोटो स्रोत, Viabhav Walunj/London
- Author, वैभव वाळुंज
- Role, मुक्त पत्रकार
- Reporting from, लंडन
भारतीय विद्यार्थ्यांसाठी लंडनमध्ये असणं हे एखाद्या दुधारी तलवारी सारखं असतं. एकीकडे जगातील सर्वात जुन्या आणि नामांकित विद्यापीठांमध्ये शिकताना, दुसरीकडे एका नव्या समाजात आल्यानंतर तिथल्या बदलांशी तुम्हाला जुळवून घ्यायला लागतं.
आदिवासी भागातील एखाद्या लहानशा पाड्यावरून थेट इंग्लंडमध्ये आल्यानंतर मलाही याबद्दल जाणवलं, पण या कामी आधार वाटला तो शिक्षणाची पायवाट रुजवणाऱ्या बाबासाहेबांच्या लंडन आठवणींचा.
पहिला प्रवास, पहिलं स्मारक - लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठांमधील शिक्षणानंतर पहिल्यांदा 1916 च्या ऑक्टोबरमध्ये बाबासाहेब पहिल्यांदा लंडनमध्ये आले. अमेरिकेत त्यांनी जातीवर लिहिलेला प्रबंध गाजत होता. समाजशास्त्राचा अभ्यास झाल्यानंतर तत्कालीन जगाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमध्ये आंबेडकरांचा अर्थशास्त्रज्ञ बनण्याचा प्रवास सुरू झाला.
जगप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे दाखला घेतल्यानंतर पुढील काही वर्षांसाठी लंडन त्यांच्या शिक्षणाचं ठिकाण बनलं.
लंडनमध्ये आल्याआल्या बाबासाहेबांच्या अडचणी सुरू झाल्या होत्या; कारण जहाजातून थेम्सच्या किनारी उतरल्यानंतरच पोलिसांनी त्यांची क्रांतिकारक असल्याच्या संशयावरून झडती घ्यायला सुरुवात केली. त्यांचे बूट आणि लहान- सहान वस्तू तपासून पाहण्यात आल्या. सुदैवाने त्यांच्याकडे आपल्या शिक्षकांनी दिलेली शिफारस पत्रे असल्याने त्यांची सुटका लवकर करण्यात आली.

फोटो स्रोत, Vaibhav Walunj/London
आज या ठिकाणी बाबासाहेबांची कागदपत्रे, काही वस्तू व एक अर्धाकृती पुतळा त्यांच्या येथील वास्तव्याची आठवण करून देतो. विद्यापीठाने त्यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, त्यांच्या मूळ हस्ताक्षरातील लेखन आणि काही विषय बदलून घेण्यासाठी केलेले अर्ज इथे जपून ठेवले आहेत. हे स्मारक सर्वांसाठी खुलं आहे.
दुसरं स्मारक - ग्रेज इन
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या कठोर अभ्यासक्रमासोबतच त्यांनी ग्रेज इन येथेही काम केलं. बॅरिस्टर पदवीचं प्रशिक्षण इंग्लंडमधल्या चार वेगवेगळ्या इन नावाच्या संस्थांमध्ये दिलं जातं. यातल्या ग्रेज इन या संस्थेला जवळपास 600 वर्षांपेक्षा जुना इतिहास आहे.

फोटो स्रोत, Vaibhav Walunj/London
बाबासाहेबांच्या योगदानासाठी ग्रेज इन वास्तूमधील एका खोलीला आंबेडकरांचं नाव देण्यात आलं आहे. आजही या वास्तूमध्ये बाबासाहेबांची दोन भित्तिचित्रे लावण्यात आलेली आहेत. हा बहुमान मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत.
अर्थात, या खोल्यांमध्ये जाण्यासाठी विशिष्ट परवानगी लागते. शक्यतो पर्यटकांना या ठिकाणी जाऊ दिले जात नाही.

बाबासाहेबांची निवासस्थानं
अचानक बंद झालेल्या शिष्यवृत्तीअभावी बाबासाहेबांना 1917 मध्ये पुन्हा भारतात परतावं लागलं. मात्र, त्यांची शिक्षणाची ओढ अजून संपली नव्हती.
1920 वर्षी दुसऱ्यांदा लंडनमध्ये आल्यानंतर 1922 पर्यंत ते लंडनमध्ये राहिले. पहिल्या महायुद्धाचा धुमाकूळ संपला होता आणि लंडन शहराचं एक वेगळं रूप त्यांना पाहायला मिळालं. नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांसाठी लंडनमध्ये सर्वात अवघड बाब म्हणजे परवडेल अशा किमतीमध्ये घर शोधणे.

फोटो स्रोत, Vaibhav Walunj/London
आंबेडकरांनाही याचा सामना करावा लागला. त्यांच्या राहण्याच्या जागी विषयी आणि रोजच्या दिनक्रमाविषयी जास्त माहिती नसली तरी या कालखंडात एका स्थिर ठिकाणी बस्तान बसेपर्यंत त्यांनी दोनदा आपला पत्ता बदलला होता. इंडिया हाऊसमध्ये राहणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा क्रांतिकारी चळवळीशी संबंध असल्याने त्यांच्यामागे ब्रिटिश पोलिसांचा ससेमिरा असे.
कोणत्याही हिंसक कारवायांमध्ये सहभाग घेण्याऐवजी आंबेडकरांनी आपलं लक्ष शिक्षण पूर्ण करण्याकडे वळवलं होतं. त्यामुळे या जागेपासून दूर राहत त्यांनी लंडनमध्ये आल्यानंतर पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठीच्या एका लॉजवर दिवस काढले, मात्र तेथेही सतत पोलिसांची ये-जा असे.
सुरुवातीचे काही दिवस 21, क्रोमवेल रस्ता या ठिकाणी ते राहिले. नंतरच्या काळात या जागेला मोठं महत्त्व आलं आणि सध्या इथे फ्रान्स सरकारचा दूतावास आहे. ही जागा मध्यवर्ती ठिकाणी असली तरीही अतिरिक्त भाडं असल्यामुळे त्यांना इथे राहणं सोयीस्कर वाटलं नसावं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
दुसरं घर आणि अडचणी
थोड्याच दिवसात त्यांनी आपला पत्ता 95, ब्रूक ग्रीन, हॅमरस्मिथ या भागामध्ये हलवला. या ठिकाणी राहताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असावा, कारण येथून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या मुख्य इमारतीपर्यंत जाण्यासाठी जवळपास दीड तास चालावं लागतं.
एकीकडे अवाजवी घरभाडं, खाण्या-पिण्याची योग्य सोय नसणे, भारतीय विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक तसेच वर्ण आणि जातीवरून होणारा भेदभाव अशा अनेक घटकांचा सामना आंबेडकरांना लंडनमध्येही करायला लागला होता.

फोटो स्रोत, Vaibhav Walunj/London
जेवणाची तरतूदही इतकी वाईट होती की त्यांनी आपला मित्र प्रभाकर पाध्ये यांच्याकडे इथल्या जेवणाची तक्रार केली होती.
“माझी घर मालकीण इतकी कजाग आहे की तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी प्रार्थना करत असतो पण ती नरकात जाणार हे नक्की” असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं. त्यामुळे जुलै 1920 पासून ते जवळपास 1921 च्या जानेवारी महिन्यापर्यंत बाबासाहेब येथे राहिले असावेत.
मूकनायक पत्राचे संपादक म्हणून त्यांची मतं ब्रिटिश नोकरशाही आणि राजकीय पटलावर उत्सुकतेनं ऐकली जात. त्यानंतर मात्र त्यांना परवडेल आणि ये-जा करण्यासाठी सोयीस्कर होईल असं घर मिळालं ते ‘10KHR’ या ठिकाणी.
आंबेडकर हाऊस
आज आंबेडकर हाऊस म्हणून प्रसिद्ध झालेल्या या ठिकाणी बाबासाहेबांचं दीर्घकाळ वास्तव्य होतं. किंग हेन्री रस्ता नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावरील दहाव्या क्रमांकाचं हे घर जातीअंताच्या आणि प्रबुद्ध भारताच्या दिशेने जाण्यासाठीचं विद्यापीठ बनलं आहे.
महाराष्ट्र सरकारने ही जागा स्थानिक मालकाकडून खरेदी केल्यानंतर इथं डागडूजी करून नीलफलक तसेच बाबासाहेबांचा एक पूर्णाकृती, तसेच रमाईंसोबतचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलाय.
या कामी फेडरेशन ऑफ बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन या संस्थेचे काम महत्त्वाचं ठरलं.

फोटो स्रोत, Getty Images
बाबासाहेबांचे पुतळे अनेक ठिकाणी जगभरात आहेत मात्र इथल्या पुतळ्याची खासियत म्हणजे तो कुंपणात नसून खऱ्या अर्थाने मुक्त आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही मोकळेपणानं बाबासाहेबांच्या पुतळ्याला स्पर्श करू शकता, त्यांनी वापरलेल्या वस्तू तसेच पुस्तके पाहू शकता.
नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे, बाबासाहेबांना एक मेंटोर, वाटाड्या व मार्गदर्शक म्हणून पाहणाऱ्या आंबेडकरवाद्यांसाठी –
“तुझ्या खांद्यावर हात ठेवणे इतके मोठेपण नको आहे मला
मला आवडते तुझे एकुलते एक लाडके मूल व्हायला”
हा अनुभव इथंच घेता येतो. कधीकाळी ते राहत असणारं हे घर आता त्यांच्या अनुयायांसाठी परक्या मुलुखामध्ये आपलं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे. याच घरामधून बाबासाहेबांनी भारतामध्ये आणि जगभरात बराच पत्रव्यवहार केला. त्यांच्या रोजच्या वापरातल्या वस्तू, पुस्तकं आणि काही आठवणी इथे जपून ठेवण्यात आल्या आहेत.

फोटो स्रोत, Vaibhav Walunj/London
ब्रिटिश ग्रंथालय - बाबासाहेबांचं पर्यायी घर
आपल्या घरातून बाबासाहेब शहराच्या एका बाजूला असणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला जात आणि तिथून परतल्यानंतर विरुद्ध बाजूला असणाऱ्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये जाऊन तासनतास बसत.

फोटो स्रोत, Getty Images
ग्रंथालयामध्ये बसून पाव खाण्याच्या आणि सतत पुस्तकांमध्ये रमण्याच्या बाबासाहेबांच्या गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या त्याच ठिकाणी आज माझ्यासारखे देशाच्या विविध भागातून आलेले पहिल्या पिढीचे विद्यार्थी येऊन शिक्षण घेऊ शकतात, बसू शकतात.
राजकारणी आंबेडकरांच्या आठवणी
बाबासाहेबांच्या तिसऱ्या लंडन भेटीत गोलमेज परिषद केंद्रस्थानी होती. 1930 साल येईपर्यंत आंबेडकरांचे लेखन ब्रिटिश संसदेच्या पटलावर चर्चिले गेले होते.
भारतातील जातीयतेचे राजकारण देशाबाहेर गेल्यास राष्ट्रीय चळवळीला धोका पोचू शकेल, अशी काँग्रेस पक्षाच्या भीतीची पार्श्वभूमी या वेळच्या लंडन दौऱ्याला होती.
या वेळी भेटीच्या मुख्य ठिकाणी न राहता त्यांनी शहरातील सर्वपक्षीय ब्रिटिश खासदार आणि मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. हूजुर पक्षाच्या अनेक खासदारांनी त्यांच्याशी अस्पृश्यतेच्या विषयावर दीर्घ चर्चा केली.
यावेळी बाबासाहेबांनी लंडनच्या अनेक हॉटेलांमध्ये तसेच संसद परिसरात बैठकी घेतल्याच्या नोंदी आहेत. त्यांची ही भेट ब्राह्मणेतर चळवळीला अनेक अर्थांनी पूरक ठरली.

फोटो स्रोत, Vaibhav Walunj/London
बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांसाठी बाबासाहेब अभिमानाचा विषय होते, मात्र भारतात त्यांच्या कौतुकाप्रीत्यर्थ कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करणं अडचणीचं ठरत होतं. लंडनमध्ये त्या जाचक बंधनांपासून मोकळीक मिळताच गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांसाठी सत्कार व मोठी मेजवानी आयोजित केली. महाराजांचा मुक्काम असणाऱ्या लंडनच्या प्रसिद्ध हाईड पार्क हॉटेलमध्ये ही मेजवानी आयोजित करण्यात आली होती.
या मेजवानीत आंबेडकरांनी दिलेलं अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भातील भाषण आणि पाश्चात्त्य जगाची त्याबाबतची जबाबदारी युरोपीय आणि अमेरिकन पत्रकारांसाठी नवलाईची बाब होती. स्थानिकच नव्हे, तर न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रात याची मोठी बातमी करण्यात आली.
कोलंबिया विद्यापीठाच्या मुशीतून आलेलं नेतृत्व म्हणून अमेरिकन लोकांनी त्यांचं स्वागत केलं. त्यामुळं दलित बहुजन वर्गाच्या समस्या या हॉटेलमधील भाषण व मुलाखतींमधून पहिल्यांदाच त्रिखंडात पोचल्या.
परक्या देशात असणाऱ्या या जागांचे नेमकं काय मोल आहे?
विसाव्या शतकात लंडन शहर आणि त्यापासून प्रेरित झालेले आंबेडकर अशी एका बाजूने ज्ञानाची, चळवळीची आणि न्याय-अधिकारांच्या लढाईचं आवर्तन घडलं. जातीयतेच्या जंजाळातून मोकळा श्वास घेण्याचा अवकाश या शहरात बाबासाहेबांना मिळाला म्हणून जतीअंताचं स्वप्न तग धरू शकलं.
आता शंभर वर्षांनंतर विकसित झालेल्या आंबेडकरी राजकारणाची दिशा विरुद्ध बाजूनं या शहरात प्रसरण पावत आहे. जगाचे आर्थिक-सामाजिक बंध बदलत असताना येथील दलित-बहुजन समुदाय परदेशी संस्कृतीसाठी एक वेगळा बंध रचत पाश्चात्य जगाला दिशादर्शक ठरत आहे.
जातीअंताच्या कार्यक्रमाची आणि लाखो उपेक्षित नागरिकांची जातीयतेच्या पेचातून सुटका होण्याच्या प्रयत्नांमध्ये जातीच्या आंतरराष्ट्रीयकरणामुळे एका नव्या जागतिक आयामाची निर्मिती होत आहे.
अमेरिकेतील सीएटल आणि इतर राज्यांमध्ये जातीयतेच्या विरोधी कायदे बनवले जात आहेत. मध्यंतरीच अनेक आंतरराष्ट्रीय दलित संघटनांना संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्कोकडून मान्यता मिळाली. अनेक आंबेडकरवादी विविध देशांमध्ये गेल्यामुळे भीमजयंतीचंही आंतरराष्ट्रीयकरण झालं.
नवयान बुद्धीझमविषयी लोकांना असणारं आकर्षण, प्रशासनातील दलित नेतृत्व, राजकारणाविषयीच्या आंबेडकरी / प्रयोजनवादाच्या संकल्पना इथल्या राजकीय - सामाजिक परिघासाठी दिशादर्शक ठरत आहेत. रंगभेदाच्या पार्श्वभूमीवर जातीचा अभ्यास करण्याऐवजी युरोपीय-अमेरिकन विषमतेला आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न अकादमिक पातळ्यांवर होत आहे.

फोटो स्रोत, Vaibhav Walunj/London
बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या बहुतांश जागा त्यांच्या अनुयायांसाठी फक्त प्रेरणास्थानं नसून शैक्षणिक केंद्रं किंवा ग्रंथालयं झाली आहेत. लंडनच्या साऊथहॉल येथील बुद्धविहार विद्यार्थ्यांना अगदी माझ्या पाड्या-वस्त्यांतील नवयान विहाराइतकाच जवळचा वाटतो.
लंडनच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेला बाबासाहेबांचा पुतळा आता जगभरातील विद्यार्थ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरतो. इथून जाताना जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये विद्यार्थी आंबेडकर आणि त्यांच्या कल्पना यांची चर्चा करत असताना भारावून जायला होतं. म्हणूनच जातीच्या राजकारणापलीकडे एक तत्त्ववेत्ता म्हणून बाबासाहेबांची प्रतिमा जगभर ओळखली जात असताना या प्रेरणास्थळांचं मोल वाढलं आहे. यातल्या अनेक ठिकाणी आता आंबेडकरी विचारांचा पाया रुजला आहे.
ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रसिद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात ही ठिकाणं अनेकदा दाखवली गेली आहेत. हा चित्रपट बनत असताना महाराष्ट्र सरकारच्या निधीच्या कमतरतेमुळे अडचणी आल्या व विविध संस्थांनी हा प्रकल्प पुढे नेला. आंबेडकर हाऊस येथील स्मारक पुरेशा देखरेखीअभावी संघशासनाने आपल्या ताब्यात घेतलं.
बाबासाहेबांच्या इतर स्मारकांच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या नेत्याचं व पर्यायानं जनतेचं जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी इतर अनेक ठिकाणी आहे. म्हणून बाबासाहेबांचा वारसा जपायचा असेल तर सरकारांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे.
(वैभव वाळुंज हे सध्या इंग्लंडमध्ये युके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ विषयात संशोधन करत आहेत.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








