मुसळधार पावसाने मुंबईत मेट्रो स्टेशन तुंबलं, प्रशासनानं दिलं हे कारण, राज्यात कुठे काय स्थिती?

मुंबईतील भुयारी मेट्रो स्टेशन

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, मुंबईत आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भिंत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरले.
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

यंदा मान्सून नेहमीपेक्षा तब्बल 8 दिवस आधी दाखल झाला आहे. दरवर्षी साधारण 20 मेपर्यंत अंदमान-निकोबार आणि 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारे नैऋत्य मोसमी वारे यावेळी 13 मे रोजीच निकोबारमध्ये दाखल झाले होते.

राज्यभरात काल (25 मे) रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झालीय.

मुंबईला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला असून ठिकठिकाणी याचे परिणाम दिसून येत आहेत.

नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईनवर असलेल्या एका मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलं. . अ‍ॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या प्रवेश/निकास मार्गावर पावसाचं पाणी शिरलं.

सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल (भिंत) कोसळल्याने ही घटना घडली. त्यामुळं आचार्य अत्रे भुयारी मेट्रो स्थानकावर पाणी साचल्याचं दिसून आलं.

यासंदर्भात मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, "स्थानकाचं काम अपूर्ण आहे. त्यामुळं जिथून पाणी शिरलं तो मार्ग स्थानकावर येण्यासाठी किंवा बाहेर पाडण्यासाठी वापरला जात नव्हता.

अजूनही तिथं काम पूर्ण झालेलं नाही. (येत्या 3 महिन्यांत होईल). मात्र तूर्तास तिथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू होतं.

हे काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसामुळे ही भिंत पडली."

मेट्रो 3 प्रशासनाने पुढे म्हटलं की, "खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे."

भुयारी मेट्रो स्टेशन.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, भुयारी मेट्रो स्टेशन.

राज्यभरात रविवारी (25 मे) रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडल्या असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पुण्यातील बारामतीमध्ये कालवा फुटल्याचीही घटना घडली.

पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यात पावसाचं थैमान

महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या भागात कमी वेळात जास्त पाऊस पडल्याचं दिसून आलं.

याबाबत आम्ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "यावेळी अरबी समुद्र आणि बंगालची खाडी असे दोन्हीकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले.

हे दोन्ही कमी दाबाचे पट्टे वारंवार तयार होत होते. त्यामुळे मान्सूनला आपल्याकडे येण्यासाठी दोन्हीकडून पोषक वातावरण निर्माण झालं आणि आपल्याकडे एवढ्या लवकर पाऊस पडला."

पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचं मोठं नुकसान

मान्सूनपूर्व पावसाने शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा ओला झाल्याने 60 ते 70 टक्के कांदा सडल्याचं नाशिक जिल्ह्यातील कांडा उत्पादन शेतकरी संघटनेनं सांगितलं आहे.

शेतकऱ्यांनी कांद्याचे पंचनामे करत प्रतिक्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई पोटी अनुदान देण्याची मागणी देखील केली आहे.

कांदा उत्पादक शेतकरी

नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील मरळगोई बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी उत्तम नामदेव जगताप यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांनी पाच एकरावर अंदाजे चार लाख रुपये खर्च करत उन्हाळी कांद्याचे पीक घेतले होते.

अपेक्षेप्रमाणे कांद्याचे पीकही जोमदार आलं होतं. सुमारे सहाशे क्विंटल च्या जवळपास कांद्याचे उत्पादन निघाल्यानंतर बाजारात भाव नसल्याने हा कांदा शेतामध्ये साठवण्यात आला होता.

पण, सततच्या मान्सूनपूर्व पावसाने कांदा ओला झाल्याने साठ ते सत्तर टक्के कांदा सडल्यामुळे कांद्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे आता हा कांदा फेकून देण्याची वेळ आल्याचं उत्तम जगताप यांनी सांगितलं.

कोकणात मुसळधार, रस्ते ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. पावसाने संपूर्ण जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यानंतर अनेक ठिकाणचे रस्ते ठप्प झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक पावसामुळे ठप्प झाली आहे. फुरूस इथं पुलाचं काम सुरु होतं... त्या ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं लोकांना त्रासाला सामोरं जावं लागलं.

पुढचे 5 दिवस 'इथे' पावसाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी महाराष्ट्राच्या काही भागात, संपूर्ण गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. पुढचे 3 दिवस मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मध्य महाराष्ट्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढच्या 5 दिवसांमध्ये राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या पाच दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राला लागून असलेल्या डोंगररांगांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

25 ते 27 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पावसासह वादळे, विजांच्या कडकडाटासोबतच ताशी 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

कुठे काय परिस्थिती?

पुणे जिल्ह्यात पावसानं अक्षरश: थैमान घातलंय. पुण्यातल्या दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालंय.

खबरदारी म्हणून एनडीआरएफची दोन पथकं तैनात करण्यात आली आहे.

पावसाच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांची एनडीआरएफ पथकाकडू सुटका
फोटो कॅप्शन, पावसाच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांची एनडीआरएफ पथकाकडू सुटका

पुणे-सोलापूर महामार्गावर पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचं चित्र आहे.

तर बारामतीमधील एमआयडीसी पेन्सिल चौकाशेजारील तीन इमारती पावसामुळे खचल्याची माहिती आहे. काही ठिकाणी पावसाचं पाणी घरांत घुसल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं आहे.

बारामती नीरा डावा कालवा फुटला

बारामती तालुक्यातील मुसळधार पावसानं निरा डावा कालवा फुटला असून कालव्याचे पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरुन मोठा फटका बसला आहे.

बारामती

पुराच्या पाण्यामुळं संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला फटका बसला आहे. तर काटेवाडी भवानीनगर हा रस्ता तूर्तास बंद करण्यात आला आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जाम

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला पुराच्या पाण्यामुळं ओढ्याचं स्वरूप आलंय. पुराच्या पाण्यात काही वाहनंदेखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

यानंतर पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून स्वामी चिंचोलीपासून सोलापूरच्या दिशेकडे तर पुण्याच्या बाजूकडे जवळपास दहा किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.

इंदापूरच्या भिगवण बस स्थानकाच्या आवाराला तळ्याचं स्वरूप

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळतोय.

इंदापुरातील भिगवण बस स्थानकाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं त्याला तळ्याच स्वरूप आलंय.

भिगवन बस स्थानकातून बारामती अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र, हा परिसर पाण्याखाली गेल्यामुळं प्रवाशांची मोठी गैरसोय झालीय.

दौंडच्या स्वामी चिंचोलीत दहा घरांमध्ये शिरलं पाणी

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील साधारणपणे दहा घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय.

दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

सांगली

स्वामी चिंचोली गावातील जवळपास दहा घरांमध्ये हे पावसाचं पाणी शिरून घरातील धान्याची पोती भिजलेली गेली आहेत जीवनावश्यक वस्तूंचे देखील नुकसान झालं आहे.

ग्रामपंचायतीकडून नागरिकांना योग्य त्या सूचना दिल्या जात असून थोड्याच वेळा या ठिकाणी पथक देखील दाखल होणार आहे. परिस्थिती काहीशी निवळलेली असून येण्या-जाण्याच्या रस्त्यावरील पाणी ओसरल्याने ग्रामस्थ ये-जा करू शकत आहेत.

सांगलीतल्या नद्या दुथडी भरून वाहून लागल्या

सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत.

रविवारी (25 मे) सांगली जिल्ह्यामध्ये सरासरी 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये सरासरी 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
फोटो कॅप्शन, सांगली जिल्ह्यामध्ये सरासरी 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सतत्या पावसामुळं जिल्ह्यातील कृष्णा, वारणा आणि त्याचबरोबर दुष्काळी भागातील असणारी येरळा नदी सध्या दुथडी वरून वाहू लागल्या आहेत.

सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पुलाची पातळी 15 फुटांवर गेल्यानं सांगलीवाडीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर, कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने म्हैसाळ येथील बंधारादेखील पाण्याखाली गेला आहे. यासह वाझर या ठिकाणी येरळा नदीवर असणारा बंधारा तुडुंब भरला आहे.

'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये'

सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.

दरम्यान, आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही कृषी विभागाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

यावर्षी मान्सून लवकर का?

हवामानातल्या वेगवेगळ्या परिस्थिती आणि प्रणाली मान्सूनसाठी पोषक - पूरक ठरत असतात. त्यात IOD, El Niño सोबतच आणखी काही घटक महत्त्वाचे असतात.

हिंदी महासागरातल्या पूर्व आणि पश्चिम भागातल्या पाण्याचं तापमान असमान असतं. हिंदी महासागराप पश्चिमेकडचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असेल, तर ती परिस्थिती मान्सूनसाठी पोषक ठरते. याला 'इंडियन ओशन डायपोल' म्हटलं जातं.

एल्-निनो आणि ला - निना या दोन्ही परिस्थितींचा परिणाम मान्सूनवर होत असतो. पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढतं आणि तो उष्ण प्रवाह पश्चिमेला आशियाकडे सरकतो तेव्हा त्याला 'एल-निनो' म्हणतात. असं झालं तर पाऊस कमी पडतो. त्याउलट परिस्थितीला 'ला निना' म्हणतात ज्यामुळे पाऊस जास्त पडतो. पण यावेळी El Niño Southern Oscillation (ENSO) न्यूट्रल स्थितीत आहे ज्याचा फायदा मान्सूनला होतोय.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर गोलार्धात हिवाळ्यात आणि त्यानंतरच्या महिन्यात कमी हिमवर्षाव झाला, तर त्यावर्षी पाऊस जास्त होतो. यावेळी हिमालयामध्ये हिमाच्छित प्रदेश कमी आहे. उत्तर गोलार्धात युरेशियाच्या भागात यावेळी कमी हिमवृष्टी झाली आहे.

या सगळ्या कारणांमुळे मान्सून लवकर आलाय आणि यंदा तो सरासरीपेक्षा जास्त असेल, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.

यावेळी मान्सून लवकर तर आलाच आहे पण अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा प्रवासही वेगाने झालाय. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनलाही गती मिळाली आणि तो वेळेआधी महाराष्ट्रात दाखल झाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)