डॉक्टरांनी 'शोधलेल्या' भयानक रोगामुळे हिटलरच्या छळापासून वाचले शेकडो ज्यूंचे प्राण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जॉन फ्रान्सिस अल्फान्सो
- Role, बीबीसी वर्ल्ड न्यूज
एका अज्ञात प्राणघातक रोगाची साथ आलेली असते. त्यातही नाझी सैनिकांकडून लोकांचा छळ सुरू असतो. पण काही शूर डॉक्टर या लोकांच्या मदतीला धावून येतात.
एखाद्या हॉलिवूडपटालाही लाजवेल असं कथानक घडलं होतं दुसऱ्या महायुद्धात. 1943 च्या उत्तरार्धात रोममध्ये हे सगळं घडलं.
नाझी जर्मन सैन्याने व्यापारी आणि राजकारण्यांच्या मदतीने इटलीची राजधानी रोम काबीज केली आणि त्यांचा मित्र असलेल्या फॅसिस्ट बेनिटो मुसोलिनीचा पाडाव केला.
शहर ताब्यात घेतल्यानंतर, अॅडॉल्फ हिटलरच्या सैन्याने शहरातील ज्यू समुदायाचा शोध सुरू केला. हिटलरच्या सैन्याने शोध सुरू करण्यापूर्वी ज्यू लोक क्रूर छळ आणि संहारापासून वाचण्यासाठी युरोपच्या इतर भागांमधून इथे आले होते.
हिटलरने ज्यू लोकांसाठी छळछावण्या उभारल्या होत्या. त्याबद्दल माहिती मिळताच हे ज्यू लोक शेजारच्या चर्च, ख्रिश्चन मठ, कॉन्व्हेंट आणि अगदी कॅथलिक चर्चद्वारे चालवल्या जाणार्या रुग्णालयांमध्ये आश्रय घेऊ लागली.
यापैकी एका रुग्णालयातील तीन डॉक्टरांनी डझनभर लोकांना दाखल करून घेतलं आणि त्यांना एक भयानक प्राणघातक आजार असल्याचं निदान केलं. या आजाराबद्दल कोणीही पूर्वी ऐकलं नव्हतं. कारण हा रोग अस्तित्वातच नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
भयानक रोग
16 ऑक्टोबर 1943 च्या पहाटेपासून जर्मन सैनिकांनी इटलीवर हल्ले करायला सुरुवात केली. व्हॅटिकनपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्यू क्वार्टरवर जर्मन सैनिकांनी हल्ला केला.
त्यांनी पुरुष, महिला आणि मुलांसह एकूण 1,000 पेक्षा जास्त लोकांना कैद केलं. काही लोक नशीबवान होते, त्यांना पळून जाण्यात यश मिळालं. या वाचलेल्या लोकांनी सॅन जुआन कॅबिलिटा रुग्णालयात आश्रय घेतला.

फोटो स्रोत, ZABELIN
437 वर्ष जुनं आणि होली सीच्या मालकीचं असलेलं हे रुग्णालय टायबर नदीच्या मध्यभागी एका लहान बेटावर स्थित आहे.
नाझी सैनिकांनी आपला शोध सुरूच ठेवला. त्यांनी हे रुग्णालय गाठलं. रुग्णालयाचे तत्कालीन संचालक जियोव्हानी बोरोमियो यांनी गणवेशधारी अधिकाऱ्यांचं स्वागत केलं आणि त्यांना तपास करण्याची परवानगी दिली.
पण सैनिक जेव्हा एका खोलीजवळ पोहोचले तेव्हा बोरोमियो यांनी त्यांना अडवलं. त्या खोलीत धोकादायक आजाराची लक्षणं असलेल्या रुग्णांना वेगळं ठेवण्यात आल्याचं बोरोमियो यांनी सांगितलं.
बोरोमियो यांनी सैनिकांना सांगितलं की हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. त्याचा परिणाम मानवी मज्जासंस्थेवर होऊन मृत्यू ओढवतो.

फोटो स्रोत, Getty Images
2004 मध्ये डॉ. व्हिटोरियो सॅकरडोटी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, "कमांडर केसेलिंगच्या नावावरून आम्ही या रोगाला 'के सिंड्रोम' असं नाव दिलं. नाझी सैनिकांनी कमांडर केसेलिंगच्या नेतृत्वाखाली इटलीवर ताबा मिळवला होता. हा क्षयरोगासारखा काही आजार आहे असं समजून नाझी घाबरून पळून गेले."
डॉ. व्हिटोरियो सॅकरडोटी, जियोव्हानी बोरोमियो आणि अॅड्रियानो ओसिनी यांनी त्या डझनभर ज्यूंचे प्राण वाचवले होते. खरं तर या आजाराची कल्पना अॅड्रियानो ओसिनी या इटालियन डॉक्टरच्या सुपीक डोक्यातून आली होती.
1930 च्या दशकात मुसोलिनीने लागू केलेल्या वांशिक कायद्यांद्वारे ज्यूंना प्रतिबंधित करण्यात आले होते. मात्र असं असतानाही बोरोमियो यांनी रोमन रुग्णालयात काम करण्यासाठी ज्यू डॉक्टरांची भरती केली होती.
बऱ्याच ठिकाणी असा दावा केला जातो की, के सिंड्रोम नावाच्या काल्पनिक रोगाला जर्मनीचे पोलीस आणि सुरक्षा सेवेचे प्रमुख ह्यूबर्ट केप्लर यांचं समर्थन मिळालं होतं. पण इतर तज्ञ या दाव्याशी सहमत नाहीत.
स्पॅनिश लेखक कॉर्टेसिया जेसस सँचेझ अॅडालिड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "के सिंड्रोम हा क्षयरोगाइतकाच धोकादायक आहे असं सांगण्यासाठी हे नाव देण्यात आलं होतं. त्या वेळी हंगेरी आणि पोलंडमधील हिटलरच्या अनेक सैनिकांसाठी क्षयरोग ही एक मोठी समस्या बनली होती."
कॉर्टेसिया जेसस सँचेझ अॅडालिड यांची 'अ लाइट इन द नाईट ऑफ रोम' ही कादंबरी हल्लीच प्रकाशित झाली आहे. ही कादंबरी एक श्रीमंत मुलगी आणि ज्यू तरुण यांच्यातील प्रेमकथेवर आधारित आहे.
भव्य कामगिरी
डॉ. व्हिटोरियो सॅकरडोटी, जियोव्हानी बोरोमियो आणि अॅड्रियानो ओसिनी यांनी आता मोठा खेळ सुरू केला होता. त्यांनी या आजाराने संक्रमित ज्यू लोकांच्या वैद्यकीय नोंदी ठेवण्यास सुरुवात केली. या ऑपरेशनसाठी त्यांना अनेक बाहेरील लोकांची गरज होती.
कॉर्टेसिया जेसस सँचेझ अॅडालिड सांगतात, त्यांची टीम खूप मोठी होती. त्यात रुग्णालयाचे सर्वेसर्वा ऑर्डर ऑफ सॅन जुआन डी डिओसचे प्रमुख देखील समाविष्ट होते.

फोटो स्रोत, CORTESÍA JESÚS SÁNCHEZ ADALID
जुन्या ऐतिहासिक दस्ताऐवजावरून लक्षात येतं की, भावी पोप पॉल सहावे आणि त्यावेळेस व्हॅटिकन सचिवालयातील उच्च अधिकारी यांना त्या रुग्णालयात काय सुरू आहे याची माहिती होती. यासाठी त्यांचं समर्थन होतं. चर्चच्या उच्च अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यामुळे बोरोमियोचं काम सोपं झालं होतं.
या कथित प्राणघातक रोगामुळे नाझी दूर राहिले असले तरी डॉक्टरांनी वेळोवेळी खबरदारी घेतली आणि नाझी परत आले तर काय करायला हवं याबद्दल ज्यूंना सूचना दिल्या.
ही घटना घडली तेव्हा गॅब्रिएल सोनिनो अवघ्या चार वर्षांचा होते आणि त्यांनाही त्या कॅथोलिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
गॅब्रिएलने 2019 मध्ये जर्मन टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमातील मुलाखतीत सांगितलं होतं की, "डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जर जर्मन परत आले तर सगळ्यांनी मोठमोठ्याने खोकायचं, जेणेकरून तुम्ही गंभीर आजारी आहात असं भासेल."
कॉर्टेसिया जेसस सँचेझ अॅडालिड सांगतात, "नाझींनी या रोगाची खातरजमा करण्यासाठी जर्मन डॉक्टरांना पाठवलं होतं. पण इटालियन डॉक्टरांच्या स्पष्टीकरणाने ते समाधानी होते. त्यामुळे रुग्णांनी खचाखच भरलेल्या रुग्णालयात संसर्गाचा धोका पत्करण्याची किंवा वेळ वाया घालवण्याची त्यांना गरज वाटली नाही."
ते पुढे सांगतात की "जर जर्मन डॉक्टरांनी कथित रूग्णांची तपासणी केली असती तर त्यांना इटालियन डॉक्टरांचा खोटेपणा पकडला असता, पण त्यांनी तसं केलं नाही."
मे 1944 मध्ये नाझी सैनिक पुन्हा रुग्णालयात आले. ज्यूंना ठेवलेल्या खोल्यांजवळून जात असताना त्यांना मोठमोठ्याने खोकल्याचा आवाज ऐकू आला.
एका महिन्यानंतर मित्र राष्ट्रांच्या सैन्याने रोम ताब्यात घेतलं आणि तिथल्या नाझी सैनिकांना हुसकावून लावलं. त्यामुळे रुग्णालयात कथितपणे भरती झालेल्या ज्यू रुग्णांना देखील सोडण्यात आलं.
रहस्य
रोमन रुग्णालयात घडलेल्या या घटनेला इतिहासकार आणि विविध अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. या कामगिरीसाठी जियोव्हानी बोरोमियो यांना 2004 मध्ये इस्रायलच्या 'होलोकॉस्ट' मेमोरियल सेंटर 'याड वाशेम' द्वारे विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. हा विशेष पुरस्कार फक्त दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांना वाचवणाऱ्या किंवा मदत करणाऱ्यांनाच दिला जातो.
जेसस सँचेझ अॅडालिड सांगतात, की सिंड्रोमच्या कारणामुळे किती जीव वाचले याची संख्या उपलब्ध नाही. कारण रुग्णालय एक सुटकेचा मार्ग होता.
कादंबरी लिहिण्यासाठी सँचेझ यांनी शोआ फाऊंडेशन आणि याड वाशेम यांच्यावर संशोधन करण्यासाठी दोन वर्षे घालवली.
सँचेझ म्हणाले की, "या रुग्णालयात दाखल झालेल्या कथित आजारी लोकांना खोटी कागदपत्रे देण्यात आली जेणेकरून ते स्वित्झर्लंड किंवा इतर देशांमध्ये जाऊ शकतील. त्यात एका वेळी 75 मुले होती."
सँचेझ सांगतात की, "युद्ध संपल्यानंतर हे ज्यू लोक लॅटिन अमेरिकेत स्थलांतरित झाले. पण त्यांची ओळख गुप्त ठेवायची आहे असं म्हणत त्यांनी त्यांचे तपशील देण्यास नकार दिला."
सँचेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार "चर्चने 4,480 ज्यूंना रुग्णालय, चर्च, मठ आणि कॉन्व्हेंटमध्ये आश्रय देऊन त्यांचा जीव वाचवला होता."
"ज्यावेळी नाझींचे राजकीय पोलिस गेस्टापोचे अधिकारी रोममध्ये आले तेव्हा त्यांनी काही कॉन्व्हेंटना भेटी दिल्या. त्यांना एका कॉन्व्हेंटमध्ये 70 नन्स पाहून आश्चर्य वाटलं. यातल्या अनेकजणी नन्सच्या वेशातील ज्यू स्त्रिया होत्या. पण नाझींची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हा वेश धारण केला होता. शिवाय रोम ही कॅथलिक धर्माची राजधानी असल्याने तेथे जास्त नन्स असल्याचंही त्यांनी नाझी पोलिसांना सांगितलं."
तो फक्त आसरा नव्हता
हे रुग्णालय केवळ ज्यू लोकांना वाचवण्याचं ठिकाण नव्हतं.
सँचेझ सांगतात, "हे रुग्णालय हेरगिरीचं केंद्र, संवादाचं ठिकाण आणि इटालियन प्रतिकारासाठी एक बैठकीचं ठिकाण बनलं होतं."
रेडिओ व्हिक्टोरियाही याच रुग्णालयातून चालवला जात होता.
मित्र राष्ट्रांना संदेश देण्यासाठी इटालियन वंशाच्या अमेरिकन लोकांनी हा रेडिओ व्हिक्टोरिया सुरू केला होता.
रोमन रुग्णालयातील या घटनेला 80 वर्ष उलटून गेली. आणि त्याच्या वर्धापन दिनीच 'अ लाइट इन द नाईट ऑफ रोम' ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
सँचेझ सांगतात, "मानवी इतिहास बघायला गेलं तर मानवी उत्कृष्टता ही केवळ वाईट क्षणांमध्ये उदयाला येते."
त्यांच्या संशोधनामुळे ही वस्तुस्थिती उजेडात आली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








