केसांपासून बनलेल्या टूथपेस्टचे होऊ शकतात हे फायदे; दात राहतील मजबूत, थांबेल झिज

डॉ. शेरिफ एल्शरकॅवी

फोटो स्रोत, King’s College London

फोटो कॅप्शन, डॉ. शेरिफ एल्शरकॅवी हे या शोधनिबंधाचे मुख्य लेखक आहेत.
    • Author, हॅरि लो
    • Role, बीबीसी न्यूज

तुमच्या झिजत चाललेल्या दातांचं रक्षण करायला तुमच्याच केसांची टूथपेस्ट करुन लावली तर... हो हे वाचायला विचित्र वाटत असलं तरी हा उपाय संशोधकांनी सुचवला आहे. आपल्या झिजणाऱ्या दातांसाठी अशी टूथपेस्ट उपयोगी आहे असं संशोधक सांगतात.

युनायटेड किंग्डममधल्या किंग्ज कॉलेजच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. या कॉलेजचं नाव किंग्ज कॉलेज लंडन असं आहे. ते संशोधक सांगतात, केसामध्ये, त्वचेत, लोकरीमध्ये केराटिन हे प्रथिन असतं त्याचा उपयोग दातांवर असलेल्या थराची दुरुस्ती (इनॅमलची) करण्यासाठी आणि त्याची पुढची झिज थांबवण्यासाठी केला जाऊ शकतो.

केराटिन हे एक आवरण तयार करतं आणि ते लाळेतल्या खनिजांच्या संपर्कात आल्यावर अगदी नैसर्गिक इनॅमलसारखं काम करतं असं हे संशोधन सांगतं.

दात

फोटो स्रोत, King’s College London

फोटो कॅप्शन, आम्लयुक्त पदार्थ आणि पेयांनी दातांवरचं इनॅमल नाहीसं होतं मग दात झिजायला लागतात, शेवटी मग दात पडतात किंवा काढावे लागतात.

किंग्ज कॉलेजमध्ये पीएचडी संशोधक असणाऱ्या सारा गॅमिआ म्हणाल्या, "सध्याच्या दाताच्या उपचारांना पर्याय ठरू शकेल असं केराटिन काम करतं."

त्या पुढे म्हणाल्या, "हे तंत्रज्ञान जीवशास्त्र आणि दंतरोगशास्त्र यातली पोकळी भरुन काढतं. यामुळे नैसर्गिक प्रक्रियांना पर्यावरणस्नेही अशा जैवपद्धतीचा पर्याय उपलब्ध होईल."

त्या सांगतात, "साधारणपणे दंतचिकित्सेत उपचारांसाठी प्लॅस्टिकचा वापर होतो, ते दीर्घकाळ टिकत नाही आणि विषारीही असतं. आता मात्र त्वचा आणि केसांद्वारे तयार केला जाणारा हा पर्याय जास्त शाश्वत आहे."

त्यांचं हे संशोधन 'ॲडव्हान्स्ड हेल्थकेअर मटेरियल्स'मध्ये प्रकाशित झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकरीपासून केराटिन तयार केलं होतं.

इमॅमलची दुरुस्ती करायला केसांपासून काढलेलं केराटिन उपयोगी पडू शकतं असं संशोधक सांगतात.

फोटो स्रोत, King’s College London

फोटो कॅप्शन, इमॅमलची दुरुस्ती करायला केसांपासून काढलेलं केराटिन उपयोगी पडू शकतं असं संशोधक सांगतात.

केराटिन दातावर लावल्यावर जेव्हा ते लाळेतल्या खनिजांच्या संपर्कात येतं तेव्हा ते एक विशिष्ट पद्धतीचं स्फटिकरुपी आवरणात रुपांतरित होतं. आपल्या दातांवर असलेल्या नैसर्गिक इनॅमलसारखंच ते कार्य करतं.

कालांतराने हे आवरण कॅल्शियम आणि फॉस्फेटचे कण आकर्षित करतं आणि त्याचं दातांचं संरक्षण करणारं एक इनॅमलसारखं आवरण होतं, असं हे संशोधक सांगतात.

आम्लयुक्त पदार्थ आणि पेयं, तोंडाची स्वच्छता नीट न ठेवणं यामुळे दातांवरचं इनॅमलचं विदारण होतं आणि ते झिजतात. दातामध्ये झिणझिण्या येतात, वेदना होतात आणि शेवटी दात गमवावे लागतात.

किंग्ज कॉलेज लंडन इथं हे संशोधन झालं आहे.

फोटो स्रोत, King’s College London

फोटो कॅप्शन, किंग्ज कॉलेज लंडन इथं हे संशोधन झालं आहे.

डॉ. शेरिफ एल्शरकॅवी हे या शोधनिबंधाचे मुख्य लेखक असून ते किंग्ज कॉलेज येथे दंतचिकित्सा विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. ते सांगतात, "हाडं आणि केसांप्रमाणे इनॅमल पुन्हा तयार होत नाही. एकदा ते गेलं की गेलं. "

"आपण आता जैवतंत्रज्ञानाच्या एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. त्यामुळे आपल्याच शरीरातले घटक वापरुन आपल्याच जैविक कार्यपद्धती कार्यरत राहायला मदत होणार आहे."

"आता यापुढे अधिक संशोधन करुन आणि योग्य उद्योग भागीदार मिळाल्यावर आपण लवकरच फक्त केसांपासून एक सुहास्य फुलवू शकू," एल्शरकॅवी म्हणतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.