पॅरिस फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या एला वाडियाचं मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी काय आहे नातं?

एला वाडिया फ्रेंच फॅशन इव्हेंट 'ले बॉल' मध्ये सहभागी झाली.

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन, एला वाडिया फ्रेंच फॅशन इव्हेंट 'ले बॉल' मध्ये सहभागी झाली.
    • Author, ताबिन्दा कौकब
    • Role, बीबीसी उर्दू

'एला वाडिया' हे नाव आणि त्यासंबंधित पोस्ट गेल्या एक-दोन दिवसांपासून पाकिस्तानच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत. सध्या हे नाव तिथे प्रचंड चर्चेत आहे.

पॅरिसमधील एका फॅशन इव्हेंटमधील त्या तरुणीचा ग्लॅमरस लुक, फक्त एवढं एकमेव कारण त्यामागे नाही, तर पाकिस्तानचे संस्थापक असलेल्या मुहम्मद अली जिन्ना यांच्याशी असलेले तिचे नातं हेदेखील एक कारण तिच्या या चर्चेत येण्यामागे आहे.

भारतातील उद्योजक कुटुंबाशी संबंध असलेली एला वाडिया ही मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुलीची नात असल्याचं सांगितलं जातं.

एलाने 2025 च्या 'ले बॉल' या फ्रेंच फॅशन इव्हेंटमध्ये भाग घेतला. या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील उच्चभ्रू कुटुंबांमधून 21 वर्षांखालील मुलींची निवड केली जाते.

'ले बॉल दे डेब्युटँटे' या फॅशन इव्हेंटमध्ये राजघराणी, उद्योजक घराणी तसेच सेलिब्रेटी घरातील युवा सहभागी होतात. धर्मादाय कामांसाठी पैसे उभारण्यासोबतच, उच्चभ्रूंमध्ये संबंध निर्माण करणं हेदेखील एक या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे.

या फॅशन इव्हेंटमध्ये प्रसिद्ध आणि चर्चेतील कुटुंबातील तरुणी सर्वोत्तम डिझायनर्सनी बनवलेले कपडे घालून सहभागी होतात.

यापूर्वी, या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या भारतीय मुलींमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, राजकुमारी अक्षिता भांजदेव आणि मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांचा समावेश होता.

मात्र, या फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाल्यामुळे एला वाडियाला इतकी प्रसिद्धी का मिळते आहे? या प्रश्नाचं अगदी सोपं उत्तर द्यायचं झालं तर तिचे मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी असलेले नातं, हे असेल.

पण त्याहूनही अधिक चर्चा वेगळ्याच गोष्टीची होत आहे. सोशल मीडिया युझर्स तिचं नागरिकत्व आणि तिच्या कुटुंबाचं मोहम्मद जिन्ना यांच्याशी असलेलं त्यांचं नातं, याबद्दल चर्चा करत आहेत.

पण त्याआधी आपण हे जाणून घेऊयात की 'ले बॉल' नावाचा हा इव्हेंट नक्की आहे तरी काय?

काय आहे 'ले बॉल'?

'ले बॉल दे डेब्युटंटस', ज्याला फक्त 'ले बॉल' या नावानं ओळखलं जातं. हा एक डेब्यूटंट बॉल आणि फॅशन कार्यक्रम आहे, जो दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये आयोजित केला जातो.

दरवर्षी, विविध पार्श्वभूमी आणि श्रीमंत कुटुंबातील 16 ते 21 वयोगटातील अंदाजे 20 मुलींची निवड केली जाते. या कार्यक्रमात फक्त त्याच मुली सहभागी होऊ शकतात, ज्यांना निमंत्रण दिलेलं असेल.

या कार्यक्रमाचं आयोजन 1994 पासून फ्रान्सचे ओफेली रेनॉड करत आलेले आहेत.

डेब्युटंट बॉलची संकल्पना सांस्कृतिकदृष्ट्या 18 व्या शतकातील इंग्रजी परंपरेशी जोडलेली आहे. या कार्यक्रमामध्ये तरूण मुलींना राणीच्या समोरच समाजाशी परिचित करून दिलं जात होतं.

ओफेली रेनॉड यांनी 1994 मध्ये 'ले बॉल डे डेब्युटंटे' नावाच्या या जुन्या परंपरेची एक प्रकारे आधुनिक आवृत्ती सुरू केली. हे नवे आयोजन लवकरच जुनी परंपरा चालू ठेवण्यासाठी म्हणून नावारुपास आली.

11 मार्च 2012 रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे सीएन वाडिया गोल्ड कप घोड्यांच्या शर्यतीत सेलिना वाडिया आणि एला वाडिया.

फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images

फोटो कॅप्शन, 11 मार्च 2012 रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे सीएन वाडिया गोल्ड कप घोड्यांच्या शर्यतीत सेलिना वाडिया आणि एला वाडिया.

सुरुवातीपासूनच, 'ले बॉल' या कार्यक्रमाने राजेशाही कुटुंब, रुपेरी पडद्यावरील दिग्गज आणि ग्लॅमरस महिलांना आकर्षित केलेलं आहे.

या वर्षी हा कार्यक्रम 29 नोव्हेंबर 2025 रोजी आयफेल टॉवरजवळील पॅरिसमधील शांग्री-ला हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमादरम्यान, मुली कॉचर गाऊन घालतात. या गाऊनची किंमत बहुतेकदा 50 हजार डॉलर ते एक लाख डॉलर्स या दरम्यान असते.

हा कार्यक्रम आयफेल टॉवरच्या शेजारी असलेल्या इमारतीत होतो. या कार्यक्रमामध्ये मौल्यवान दागिने परिधान केलेल्या मुली झुंबरांनी चमकणाऱ्या हॉलमध्ये कार्यक्रमात सहभागी होतात.

या कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या इव्हेंट प्लॅनर ओफेली रेनॉड यांनी सांगितलं की, सध्याच्या या कार्यक्रमाचा उद्देश तरुणींना लग्नासाठी तयार करणं हा नाही.

त्याऐवजी, हा उत्सव अशा तरुण मुली आणि त्यांच्या शैलीभोवती केंद्रित असतो. ती एक अशी रात्र असते, जी त्यांना एखाद्या परीकथेसारखी वाटते.

जिन्नांशी संबंध

तरुणींना आधार देणाऱ्या धर्मादाय संस्थांसाठी निधी उभारणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 'ले बॉल' दरवर्षी 1,100 हून अधिक मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही करतं.

याव्यतिरिक्त, न्यू यॉर्क शहरातील सेलिनी इन्स्टिट्यूटला मदत केली जाते. ही एक ना-नफा संस्था आहे जी कमी वयात आई झालेल्या मुलींना मदत करते.

एला वाडिया ही खरं तर भारतीय उद्योगपती जहांगीर वाडिया आणि सेलिना वाडिया यांची मुलगी आहे. तिचे पालक 'सी फेम' या फॅशन ब्रँडचे मालक आहेत.

उजवीकडे दीना, मध्यभागी जिना आणि डावीकडे जिन्नांची बहीण फातिमा

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, उजवीकडे दीना, मध्यभागी जिना आणि डावीकडे जिन्नांची बहीण फातिमा

जहांगीर वाडिया हे बॉम्बे डाईंग, गो फर्स्ट आणि बॉम्बे रिअॅल्टीचे व्यवस्थापक आहेत आणि त्यांची आई फॅशन डिझायनर आहे.

जहांगीर वाडिया यांचे वडील, नसली वाडिया हे प्रत्यक्षात दिना जिन्ना यांचे पुत्र होते. दीना जिन्ना यांचा जन्म मोहम्मद अली जिन्ना यांच्या दुसऱ्या पत्नी रतनबाई यांच्या पोटी झाला होता. रतनबाई या एका पारसी कुटुंबातून आल्या होत्या.

नुस्ली वाडिया यांनी भारतात वाडिया ग्रुपची स्थापना केली होती. जहांगीर वाडिया यांना एला वाडिया आणि जहांगीर वाडिया ज्युनियर अशी दोन मुलं आहेत.

आपल्या पदार्पणासाठी एलाने लेबनीज फॅशन डिझायनर एली साबचा गाऊन निवडला होता.

एला वाडियाने जरी या कार्यक्रमाद्वारे फॅशन जगतामध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केला असला तरी, सध्या ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही.

तिचं इंस्टाग्राम अकाऊंटही प्रायव्हेट आहे.

सोशल मीडियावर चर्चा

पाकिस्तानी सोशल मीडिया युझर्स एला वाडियाला मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी जोडत आहेत. तर, भारतीय युझर्स म्हणत आहेत की, ती एका भारतीय पारसी कुटुंबातील मुलगी आहे.

पाकिस्तानमधील सोशल मीडियावरच नाही तर वृत्त माध्यमांनीही एलाची ओळख मोहम्मद अली जिन्ना यांची पणतू म्हणून करून दिली आहे.

राबिया नावाच्या एका यूझरनं लिहिलं आहे की, "अरे देवा, अनेक भावनिक लोक या घटनेला इस्लामशी जोडतील, पण मी त्याकडे खुल्या मनाने पाहते आहे आणि या गोष्टीला आयुष्यातील स्वातंत्र्याचा अधिकार मानते."

कमल चंडोला या भारतीय युझरनं उपहासात्मकपणे लिहिलंय की, "फाळणीमुळे एक असा देश निर्माण झाला ज्यानं 'पाश्चात्य अधोगती' नाकारली. आणि एका शतकानंतर, देशाच्या संस्थापकाचीच पुढची पिढी पॅरिसच्या बॉलरूममध्ये पोज देत आहे.

खरं तर ज्या देशाची त्यांनी कल्पना केली होती, तो देश आज गहू, वीज आणि व्हिसासाठी संघर्ष करतो आहे."

मार्च 2020 रोजी मुंबईत झालेल्या सीएन वाडिया गोल्ड कपच्या शर्यतीच्या दिवशी एला वाडिया तिचे काका नेस वाडिया आणि भाऊ जेह वाडिया ज्युनियर यांच्यासोबत.

फोटो स्रोत, Rubina A. Khan/Getty Images

फोटो कॅप्शन, मार्च 2020 रोजी मुंबईत झालेल्या सीएन वाडिया गोल्ड कपच्या शर्यतीच्या दिवशी एला वाडिया तिचे काका नेस वाडिया आणि भाऊ जेह वाडिया ज्युनियर यांच्यासोबत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आणखी एक भारतीय यूझर प्रियांका म्हणाली की, "ती तिच्या संपूर्ण कुटुंबासारखीच भारतीय आहे. कारण जिन्नांच्या मुलीने तिच्या वडिलांनी निर्माण केलेल्या देशात जाण्याऐवजी भारतात राहणं पसंत केलं. विशेषतः तेव्हा, तिचे वडील एका पारशी व्यक्तीशी लग्न करण्यास सहमत नव्हते."

पाकिस्तानी यूझर सना मुस्तफा या चर्चेत पाकिस्तानच्या संस्थापकांचा बचाव करताना दिसतात.

त्या म्हणाल्या की, "जिना यांनी आपल्या मुलीला सोडून दिलं कारण तिनं पारशी व्यक्तीशी लग्न केलं होतं आणि तिला मुस्लीम व्हायचं नव्हतं.

ती त्यांची एकुलती एक मुलगी होती, पण जिना यांनी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले. त्यांना या गोष्टीचं खूप दुःख झालेलं असलं तरी त्यांनी त्यांच्या मुलीपेक्षा इस्लामला अधिक प्राधान्य दिलं."

आमना हसन या पाकिस्तानी युजरने फेसबुक पोस्टवर कमेंट करत लिहिलंय की, "मला वाटतं की दीना वाडियानं भारतातच राहावं. ती सुंदर आहे, पण ती पाकिस्तानी असल्याचा दावा करू नका, कारण ती आणि तिचं कुटुंब भारतीय आहे.

पाकिस्तानी म्हणून, आम्ही तिचं कौतुक फक्त दक्षिण आशियाई वंशाची महिला म्हणून करतो, पण आम्ही तिला पाकिस्तानी म्हणू शकत नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)