प्रिन्स ते मिस्टर: अँड्र्यू यांच्या शाही शिखरावरुन सुरू झालेल्या प्रवासानं एकदम तळ कसा गाठला?

अँड्र्यू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, स्टीफन हॉक्स आणि अँड्र्यू वेब
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

एकेकाळी ब्रिटनच्या राजघराण्यातील सर्वाधिक लक्षवेधी चेहऱ्यांपैकी एक...

शौर्य, शाही वर्तणूक आणि सार्वजनिक भूमिकांमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उभे असलेले अँड्र्यू.

पण पदव्या, सन्मान आणि ओळख हरवत गेल्यावर उरलं ते शांतता शोधणाऱ्या, पण प्रश्नांच्या सावटातून सुटू न शकणाऱ्या एका माणसाचं आयुष्य.

वर्षानुवर्षे शाही प्रतिमेत चमकलेल्या अँड्र्यूंच्या प्रवासाने गेल्या काही वर्षांत नाट्यमय वळण घेतलं.

एकेकाळचा 'प्रिन्स' आज 'मिस्टर विंडसर' म्हणून ओळखला जातो.

केवळ पदव्या गेल्यामुळे नव्हे, तर स्वतःच्या ओळखीवर उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे राजमहालांच्या सावलीत सुरू झालेलं हे आयुष्य आज सँडरिंगहॅमच्या एका एकाकी घरात थांबलं आहे.

ही केवळ एका राजपुत्राची घसरण नाही...

तर गौरव, सत्ता, निर्णय आणि परिणाम यांच्या ताण्यातून उभा राहिलेला खोल अंतर्गत संघर्ष आहे.

हेल्मेटसह घोडेस्वारीचे कपडे घातलेले अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर

फोटो स्रोत, Reuters

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरुन अटक केली आहे.

त्यांनी वयाची 66 वर्षं ज्यादिवशी पूर्ण केली, त्याच दिवशी त्यांना अटक झाली.

विंडसरमधील रॉयल लॉज सोडण्याचे आदेश मिळाल्यापासून ते नॉरफोकमधील सँडरिंगहॅम येथील एका घरात राहत होते. तिथूनच त्यांना अटक करण्यात आली.

दोन्ही ठिकाणी पोलीस अजूनही तपास करत आहेत.

गुन्हेगार जेफ्री एपस्टिन याच्याशी संबंध असल्याबद्दल असंख्य आरोपांचा सामना करणाऱ्या माजी राजपुत्राला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

थेम्स व्हॅली पोलिसांनी सांगितलं की, माजी राजपुत्राने व्यापारदूत असताना एपस्टिनला गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप असलेल्या तक्रारीची ते चौकशी करत आहेत.

अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांनी यापूर्वी एपस्टिनशी संबंधित कोणतेही गैरकृत्य केल्याचा आरोप नाकारला आहे. मात्र, जानेवारी 2026 मध्ये जेफ्री एपस्टिनशी संबंधित लाखो फाइल्स जाहीर झाल्यानंतर त्या ठोस आरोपांवर बीबीसीने विचारलेल्या प्रश्नांना अद्याप त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.

किंग चार्ल्स यांनी अँड्र्यूंच्या अटकेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत म्हटलं की, ही बातमी ऐकून 'मला खूप धक्का बसला आहे' आणि 'या प्रकरणात कायद्याला आपलं काम करू द्यावं लागेल'.

जेफ्री एपस्टिन कोण होता आणि अँड्र्यूशी त्याचे नेमके काय संबंध होते?

जेफ्री एपस्टिन हा एक हेज-फंड मॅनेजर होता. लैंगिक तस्करी आणि कट रचल्याच्या आरोपांखाली तो तुरुंगात होता. 2019 मध्ये तुरुंगात असतानाच त्याचा मृत्यू झाला. न्यूयॉर्कच्या वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे सांगण्यात आले.

2005 मध्ये, एका 14 वर्षांच्या मुलीच्या पालकांनी फ्लोरिडा पोलिसांना सांगितलं की, एपस्टिनने त्यांच्या मुलीचा त्याच्या पाम बीच येथील घरात विनयभंग केला होता. पोलिसांनी केलेल्या झडतीत त्या संपूर्ण घरात मुलींचे फोटो सापडले होते.

एपस्टिनला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र, त्याने केवळ 13 महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका करून त्याला प्रोबेशनवर सोडण्यात आलं होतं.

जुलै 2019 मध्ये पॅरिसहून आपल्या खासगी जेटने परतल्यानंतर एपस्टिनला न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली होती.

ऑगस्टमध्ये न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन करेक्शनल सेंटरमधील आपल्या कोठडीत तो मृतावस्थेत आढळला. फेडरल खटल्याच्या सुनावणीची तो तेथे वाट पाहत होता.

2002 ते 2005 या काळात मॅनहॅटन आणि फ्लोरिडामधील आपल्या आलिशान घरांमध्ये 18 वर्षांखालील मुलींना लैंगिक कृत्ये करण्यासाठी पैसे दिल्याचा एपस्टिनवर आरोप होता.

त्याने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले होते आणि न्यायालयात आपण निर्दोष असल्याचं सांगितलं होतं.

चालताना अँड्र्यू जेफ्री एपस्टीनशी बोलत आहेत.

फोटो स्रोत, News Syndication

फोटो कॅप्शन, डिसेंबर 2010 मध्ये न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कमध्ये अँड्र्यू आणि जेफ्री एपस्टिन (उजवीकडे) एकत्र फिरताना काढलेला त्यांचा फोटो.

अँड्र्यू यांनी 2019 मध्ये बीबीसीच्या न्यूजनाइट कार्यक्रमात, डिसेंबर 2010 मध्ये न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमधील भेटीनंतर आपण एपस्टिनशी सर्व प्रकारचे संपर्क तोडले होते, असं सांगितलं होतं.

मात्र नंतर समोर आलेल्या ई-मेलमधून असं दिसतं की, काही महिन्यांनंतर अँड्र्यू यांनी खासगीरित्या एपस्टिनशी पुन्हा संपर्क साधला होता आणि त्यात 'लवकरच पुन्हा काहीतरी करू' असा आश्वासक शब्दही दिला होता.

अँड्र्यू यांची माजी पत्नी सारा फर्ग्युसन यांचीही एपस्टिनबरोबर असलेल्या मैत्रीबाबतची नवीन माहिती समोर आली आहे.

एपस्टिन अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी तुरुंगात असताना सारा फर्ग्युसन त्याच्या संपर्कात होत्या, असं ई-मेलमधून दिसून आलं. त्यानंतर त्यांची संस्था 'साराज ट्रस्ट' काही काळासाठी बंद ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली.

अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी राजपुत्राला आता अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर या नावाने ओळखले जाते.

प्रिन्स अँड्र्यू मिस्टर विंडसर कसे झाले?

व्हर्जिनिया गिफ्रे म्हणते की, तिला अँड्र्यूसोबत तीन वेगवेगळ्या प्रसंगी सेक्स करण्यास भाग पाडलं गेलं.

ऑक्टोबर 2025 मध्ये किंग चार्ल्स तृतीय यांनी आपल्या भावाची 'प्रिन्स' ही शाही पदवी काढून घेतली.

त्या वेळी बकिंगहॅम पॅलेसने स्पष्ट केलं होतं की, "कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांबद्दल आणि त्यातून वाचलेल्या व्यक्तींविषयी किंगला मनापासून सहानुभूती आहे आणि ती पुढेही कायम राहील."

व्हर्जिनिया गिफ्रे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हर्जिनिया गिफ्रे म्हणाली की तिला तीन वेगवेगळ्या प्रसंगी अँड्र्यूसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले होते.

ऑक्टोबर 2025 मध्ये अँड्र्यू यांनी 'ड्यूक ऑफ यॉर्क'सह आपल्या सगळ्या शाही पदव्या सोडल्या. हे व्हर्जिनिया गिफ्रेच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या 'नोबडीज गर्ल' या आत्मचरित्रामुळे झाले.

या पुस्तकात तिने ती अल्पवयीन असताना अँड्र्यू यांनी तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. अँड्र्यू यांनी मात्र हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

"आपल्या सत्य आणि विलक्षण धैर्याच्या जोरावर तिने (व्हर्जिनिया) एका ब्रिटिश राजपुत्राला खाली खेचलं," असं पॅलेसच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना गिफ्रेच्या कुटुंबीयांनी म्हटलं. गिफ्रेने यावर्षीच्या सुरुवातीला आत्महत्या केली होती.

अँड्र्यू सध्या कुठे राहतात?

2003 मध्ये अँड्र्यू यांनी रॉयल लॉजच्या लीजवर सही केली. हे विंडसर ग्रेट पार्कमध्ये असलेले, 30 खोल्यांचे मोठे आणि जुने (ग्रेड 2 सूचीतील) घर आहे, जे विंडसर कॅसलच्या अगदी जवळ आहे.

रॉयल लॉज
फोटो कॅप्शन, अँड्र्यू दक्षिण इंग्लंडमध्ये असलेल्या क्राउन इस्टेटवरील रॉयल लॉज हे घर भाड्याने घेऊन राहत होते.

फेब्रुवारी 2026 पासून ते राजाच्या खर्चावर सँडरिंगहॅम इस्टेटमधील एका खासगी घरात राहतात.

रॉयल लॉजमध्ये स्वतःचे एक छोटे चॅपल (प्रार्थनास्थळ) आहे.

फोटो स्रोत, BBC / Picturepoint

फोटो कॅप्शन, रॉयल लॉजमध्ये स्वतःचे एक छोटे चॅपल (प्रार्थनास्थळ) आहे.

अँड्र्यू अजूनही राजसिंहासनाच्या वारसा यादीत का आहेत?

अँड्र्यू अजूनही राजसिंहासनाच्या वारसांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्याच्यानंतर त्याची मुलगी प्रिन्सेस बीट्रिस नवव्या, तर प्रिन्सेस युजेनी बाराव्या क्रमांकावर आहे.

हाऊस ऑफ कॉमन्स लायब्ररीच्या मार्गदर्शनानुसार, संसदेत कायदा करून ही स्थिती बदलता येऊ शकते.

याला आधीचा दाखला आहे. 1701 च्या अ‍ॅक्ट ऑफ सेटलमेंटनुसार, 1978 मध्ये कॅथोलिक महिलेशी लग्न केल्यामुळे प्रिन्स मायकेल ऑफ केंट यांना राजसिंहासनाच्या वारसाहक्कातून काढून टाकण्यात आले होते.

मात्र 37 वर्षांनंतर सक्सेशन टू द क्राउन अ‍ॅक्ट लागू झाल्यावर त्यांना पुन्हा वारसाहक्कात सामील करण्यात आले. सध्या ते वारसाहक्काच्या यादीत 53व्या क्रमांकावर आहेत.

बीबीसी ग्राफिक

पण अँड्र्यू यांना वारसाहक्कातून काढण्यासाठी, किंग चार्ल्स ज्या उरलेल्या 14 देशांचे प्रमुख आहेत, त्या सर्व देशांची संमतीही लागेल :

  • अँटिग्वा आणि बार्ब्युडा
  • ऑस्ट्रेलिया
  • बहामास
  • बेलीज
  • कॅनडा
  • ग्रेनेडा
  • जमैका
  • न्यूझीलंड
  • पापुआ न्यू गिनिआ
  • सेंट कीट्स अँड नेव्हिस
  • सेंट लुसिया
  • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
  • सॉलोमन आयलंड
  • तुवालू

व्हर्जिनिया गिफ्रेने अँड्र्यू यांच्यावर कोणते आरोप केले?

अँड्र्यू, व्हर्जिनिया गिफ्रे (मध्यभागी) आणि गिलीन मॅक्सवेल

फोटो स्रोत, US Department of Justice

फोटो कॅप्शन, अँड्र्यू, व्हर्जिनिया गिफ्रे (मध्यभागी) आणि गिलीन मॅक्सवेल (गिलीनला नंतर जेफ्री एपस्टिनला अल्पवयीन मुली उपलब्ध करून दिल्याच्या गुन्ह्यात तुरुंगवास झाला.

2021 मध्ये अमेरिकेत दाखल झालेल्या दिवाणी खटल्यात, व्हर्जिनिया गिफ्रेने अँड्र्यू यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला.

न्यायालयीन कागदपत्रांत तिने सांगितलं होतं की, वयाच्या 16व्या वर्षापासून ती फायनान्सर जेफ्री एपस्टिनच्या लैंगिक शोषण आणि तस्करीची बळी ठरली होती.

यामध्ये तिला अँड्र्यूसारख्या ताकदवान लोकांकडे 'पाठवलं' जात होतं. 18 वर्षांची होण्यापूर्वी अँड्र्यू यांनी तीन वेगवेगळ्या प्रसंगी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला.

बीबीसीच्या न्यूजनाईट कार्यक्रमात अँड्र्यू

फोटो स्रोत, Mark Harrison / BBC

फोटो कॅप्शन, 2019 मध्ये बीबीसीच्या न्यूज नाइट कार्यक्रमात एमिली मेटलिस यांना दिलेल्या मुलाखतीत अँड्र्यू यांनी गिफ्रेची भेट झाल्याचं त्यांना आठवत नसल्याचं म्हटलं होतं.

गिफ्रेने केलेले आरोप अँड्र्यू कायम नाकारत आले आहेत. न्यूज नाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तिला कधी भेटल्याचे आठवत नसल्याचे म्हटलं होतं.

दोन्ही पक्षांनी 2022 मध्ये न्यायालयाबाहेर समझोता केला. अँड्र्यू यांनी कोणतीही जबाबदारी न स्वीकारता गिफ्रेला अघोषित रक्कम दिली.

व्हर्जिनिया गिफ्रे तिचे वकील डेव्हिड बोईस यांच्यासोबत

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जेफ्री एपस्टिनच्या मृत्यूनंतर झालेल्या सुनावणीसाठी व्हर्जिनिया गिफ्रे आपले वकील डेव्हिड बोईस यांच्यासोबत न्यूयॉर्कमधील न्यायालयात दाखल होताना.

व्हर्जिनिया गिफ्रेच्या पुस्तकात काय म्हटलंय?

गिफ्रेला भीती होती की, ती एपस्टिन आणि त्याच्या सर्कलमुळे 'लैंगिक गुलाम म्हणूनच मरेल' असे तिच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या आत्मचरित्र नोबडीज गर्ल मध्ये म्हटलं आहे.

तसेच अत्याचाराच्या केंद्रस्थानी एपस्टिनची माजी मैत्रीण गिलीन मॅक्सवेल होती, जी सध्या बाल लैंगिक तस्करीसाठी 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

अनेक वर्षांनंतर, गिफ्रेला दोघांबद्दल किती भीती वाटत होती हे आठवतं. तिच्या पुस्तकाचा बराचसा भाग वाचताना खूपच त्रासदायक आहे, कारण तिने एपस्टिनच्या क्रूर लैंगिक शोषणाचे तपशील दिले आहेत.

व्हर्जिनिया गिफ्रेच्या पुस्तकात अँड्र्यूबद्दल काय म्हटलंय?

मार्च 2001 मध्ये, मॅक्सवेलने तिला उठवलं आणि सांगितलं की आजचा दिवस 'खास आहे' आणि 'सिंड्रेला सारखा' तिला एक 'सुंदर राजकुमार' भेटायला येणार आहे, असे गिफ्रेने पुस्तकात लिहिलं आहे.

जेव्हा ते भेटले, तेव्हा तिने सांगितले की, मॅक्सवेलने 41 वर्षांच्या अँड्र्यूला तिचं वय किती असेल याचा अंदाज घेण्यास सांगितलं.

"त्याने बरोबर सांगितलं-17," असं गिफ्रे सांगते आणि पुढे म्हणाले की, "माझ्या मुली (प्रिन्सेस बीट्रिस आणि प्रिन्सेस युजेनी) तुझ्यापेक्षा थोड्याशा कमी वयाच्या आहेत."

त्या रात्री, ती, एपस्टिन आणि मॅक्सवेल अँड्र्यूसोबत लंडनमधील ट्रँप नाइटक्लबमध्ये गेले, जिथे अँड्र्यूला 'प्रचंड घाम आला' होता, असे गिफ्रे सांगते.

नंतर, जेव्हा हे चौघे मॅक्सवेलच्या घरी परत जात होते, तेव्हा मॅक्सवेलने तिला सांगितलं की, "घरी पोहोचल्यावर, जेफ्रीसाठी जे तू करतेस तेच त्याच्यासाठी पण करशील."

गिफ्रे सांगते की, "तो पुरेसा मैत्रीपूर्ण असा व्यक्ती होता, पण तरीही त्याच्यात अधिकारवाणी जाणवायची - जणू काही त्याला वाटत असे की माझ्याशी लैंगिक संबंध ठेवणं हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे."

"दुसऱ्या दिवशी सकाळी, हे स्पष्ट झालं की मॅक्सवेलने तिच्या रॉयल मित्राशी बोलून ठरवलं होतं, कारण तिने मला सांगितलं, 'तू चांगलं काम केलंस. राजपुत्राला मजा आली."

गिलीन मॅक्सवेलला जेफ्री एपस्टिनसोबत सेक्ससाठी मुलींची लैंगिक तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवलं गेलं आहे.

फोटो स्रोत, US Department of Justice / PA Media

फोटो कॅप्शन, गिलीन मॅक्सवेलला जेफ्री एपस्टिनसोबत सेक्ससाठी मुलींची लैंगिक तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवलं गेलं आहे.

गिफ्रेला मात्र 'खूप वाईट वाटलं'. ती पुढे म्हणते: "लवकरच, एपस्टिनने मला 15 हजार डॉलर्स दिले, कारण मी त्या माणसाची सेवा केली होती, ज्याला टॅब्लॉईड्स (वृत्तपत्रं) 'रँडी अँडी' म्हणत असत. हे भरपूर पैसे होते."

ती सांगते, साधारण एक महिन्याने, तिने न्यूयॉर्कमधील एपस्टिनच्या टाउनहाऊसमध्ये अँड्र्यूसोबत दुसऱ्यांदा लैंगिक संबंध ठेवले.

व्हिक्टोरिया गुइफ्रे

फोटो स्रोत, Family via Penguin Random House

फोटो कॅप्शन, व्हिक्टोरिया गिफ्रेचा एक फॅमिली फोटो, त्यावेळी ती व्हिक्टोरिया रॉबर्ट्स म्हणून ओळखली जात होती.

तिसरी घटना एपस्टिनच्या बेटावर झाली, ज्याचा गिफ्रे 'एक नंगा नाच किंवा ग्रूप सेक्स' म्हणून वर्णन करते.

"एपस्टिन, अँडी आणि इतर अंदाजे आठ तरुण मुली आणि मी एकत्र सेक्स केला," असं ती म्हणते.

"इतर सर्व मुली या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दिसत होत्या आणि त्यांना काहीच इंग्रजी बोलता येत नव्हतं."

ती म्हणते, "एपस्टिन हसत होता आणि म्हणत होता की त्यांच्याशी बोलणं शक्य नाही, पण जुळवून घेण्यास या मुली सोप्या आहेत."

व्हर्जिनिया गिफ्रे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, "इतक्या वेदना होत होत्या की मी बेशुद्ध पडेन असं वाटायचं,", गिफ्रे यांनी त्यांच्या मरणोत्तर आत्मचरित्रात एपस्टीनच्या क्रूर लैंगिक शोषणाचा उल्लेख केला आहे.

2022 च्या न्यायालयाबाहेरील तहाचा उल्लेख करत, गिफ्रे लिहिते: "मी एका वर्षाची बोलण्यास बंदी (गॅग ऑर्डर) स्वीकारली, जी राजकुमाराला महत्त्वाची वाटली. कारण यामुळे त्याच्या आईच्या सत्तरीला (प्लॅटिनम ज्युबिली) आणखी डाग लागला नसता."

बकिंगहॅम पॅलेसच्या एका सूत्राने बीबीसीला सांगितलं की, "राजघराण्याच्या अधिकाऱ्यांना हे मान्य होतं की या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे 'अजून वेदनेचे काही दिवस येऊ शकतात'."

2019 मध्ये अँड्र्यू यांनी बीबीसी न्यूजनाइटमध्ये काय सांगितलं?

अँड्र्यू यांनी 2019 मधील बीबीसी न्यूजनाइट मुलाखतीचा उपयोग गिफ्रेबरोबरचे लैंगिक संबंध नाकारण्यासाठी केला, आणि त्या रात्री ते प्रिन्सेस बीट्रिसला पिझ्झा एक्सप्रेस रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेल्याचं सांगितले.

त्यांनी असंही ठामपणे सांगितलं की, ते ती व्यक्ती असूच शकत नाही, ज्याचं गिफ्रेने 'प्रचंड घाम आलेला' व्यक्ती असं वर्णन केलं होतं.

बीबीसी न्यूजनाईट
फोटो कॅप्शन, एमिली मॅटलिस यांनी 2019 मध्ये बीबीसीच्या न्यूजनाइट कार्यक्रमात अँड्र्यू यांची घेतलेली मुलाखत जगभरात चर्चेचा विषय ठरली होती.

अँड्र्यू यांनी न्यूजनाइटला सांगितलं की, "त्या वेळी मला घाम आलेला नव्हता, कारण फॉकलंड्स युद्धात मी गोळ्या लागल्यावर अनुभवलेल्या अति ॲड्रिनालिनमुळे असं म्हणता येईल की, मी आधीच खूप तणावात होतो."

"मला घाम येणे जवळजवळ अशक्य होतं."

मात्र, नंतर वर्तमानपत्रांनी त्या काळातील अँड्र्यू यांचे काही फोटो प्रसिद्ध केले, ज्यात ते घामेजलेले दिसत होते.

ब्रिटिश पोलीस आणखी काय तपास करत आहेत?

लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितलं की, ते 2011 मध्ये घडलेल्या घटनेची चौकशी करत आहेत. अँड्र्यूने आपल्या बॉडीगार्डला गिफ्रेबद्दल 'काही बदनामीची माहिती शोधा' असं सांगितलं होतं. ही माहिती वर्तमानपत्रात आली होती.

मेल ऑन संडेने लिहिलं की, अँड्र्यूने बॉडीगार्डला तिची जन्मतारीख दिली. त्याने तिचा अमेरिकेचा सोशल सिक्युरिटी नंबर देखील दिला. तिचा कुठल्या गुन्ह्यात सहभाग आहे, का किंवा तिच्याबद्दल इतर कोणतीही हानीकारक माहिती मिळू शकते का, हे तपासणे, हे यामागचं कारण होतं.

राजाचे पुत्र असल्यामुळे, अँड्र्यू जन्माला आल्यानंतर लगेच राजकुमार झाले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजाचे पुत्र असल्यामुळे, अँड्र्यू जन्माला आल्यानंतर लगेच राजकुमार झाले.

त्या वेळी, राजघराण्याच्या सूत्रांनी सांगितले की अँड्र्यूविरुद्धचा हा आरोप खूप गंभीर आहे. त्याची योग्य पद्धतीने तपासणी होणे आवश्यक आहे.

अँड्र्यू यांनी 2019 पासून राजघराण्यासोबत काम करणं थांबवलं. म्हणून गेल्या काही वर्षांत बकिंगहॅम पॅलेस त्यांच्यासाठी जबाबदार नाही.

माउंटबॅटन-विंडसर हे आडनाव कुठून आले?

माउंटबॅटन-विंडसर हे आडनाव राणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या कुटुंबातील आडनाव मिळून तयार झाले आहे.

1960 मध्ये त्यांच्या वारसांसाठी हे तयार केलं गेलं, आणि अँड्र्यू यांनी हे सारा फर्ग्युसन यांच्याबरोबरच्या विवाहाची अधिकृत नोंद करण्यासाठी वापरलं होतं.

अँड्र्यू आणि सारा फर्ग्युसन
फोटो कॅप्शन, अँड्र्यू यांचा विवाह सारा फर्ग्युसन यांच्याशी झाला होता.

1917 मध्ये, पहिल्या महायुद्धादरम्यान, तेव्हा राजसत्तेत असलेले जॉर्ज पंचम यांनी यूकेमधील जर्मनीविरोधी भावना पाहून आपल्या कुटुंबाचं जर्मन आडनाव सॅक्स-कोबर्ग आणि गोथा बदलून कॅसलच्या नावावर विंडसर असं केलं.

त्याचवेळी, अँड्र्यू यांच्या वडिलांच्या बाजूने, त्यांची आजी प्रिन्सेस ॲलिस ऑफ बॅटनबर्ग यांनीही आपल्या कुटुंबाचे आडनाव इंग्रजीत रूपांतर करून माउंटबॅटन केलं.

अँड्र्यू यांच्या या प्रवासामागे आणखी कोणती कारणं आहेत?

एप्रिल 2025 मध्ये काही गुप्त कागदपत्रे समोर आली. त्यात अँड्र्यू यांचे एका कथित चिनी गुप्तहेराशी संबंध दाखवले होते. ही माहिती बीबीसी आणि इतर माध्यमांनी न्यायालयात जाऊन सार्वजनिक केली होती.

या कागदपत्रांवरून दिसतं की, अँड्र्यू यांना वाटत होतं की ते चिनी व्यापारी यांग टेंगबोच्या मदतीने चीनमध्ये व्यवसाय करू शकतील. अशाने ते लोकांसमोर आपले प्रतिष्ठित स्थान टिकवू शकतील.

प्रिन्स अँड्र्यू

फोटो स्रोत, AFP via Getty Images

अँड्र्यू यांचे माजी सल्लागार डॉमिनिक हॅम्पशायर यांना 2019 मधील न्यूजनाइट मुलाखतीनंतर अँड्र्यू यांना 'अंधारातून बाहेर येण्यासाठी हाच एकमेव आशेचा किरण' वाटत होता.

ही कागदपत्रे अँड्र्यू यांचे चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या 'कम्युनिकेशन चॅनेल'चीही (संपर्क मार्ग) माहिती देतात. त्यात अँड्र्यू दरवर्षी वाढदिवसाचे पत्र पाठवायचे. तसेच, युकेची सुरक्षा संस्था एमआय5 ने त्यांना यांग यांच्याशी संपर्क ठेवू नये असं सांगितलं.

अँड्र्यू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पत्रकारांचं लक्ष टाळण्यासाठी, अँड्र्यू यांना किंगसोबतच्या बैठकीसाठी विंडसर कॅसलमध्ये लपवून नेण्यात आलं होतं.

हॅम्पशायर यांच्या साक्षीपत्रात हेही समोर आले आहे:

  • अँड्र्यू यांचे यांग यांच्याशी असलेल्या संबंधांवरुन हॅम्पशायर आणि किंग यांच्यात दोन बैठका झाल्यात. यासाठी पत्रकारांचं लक्ष टाळण्यासाठी अँड्र्यू यांना विंडसर कॅसलमध्ये लपवून नेण्यात आलं होतं.
  • अँड्र्यू यांच्या सहाय्यकांमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे, काही बैठकीत त्यांच्या खाजगी सचिवाला व्यवसायाबाबतच्या चर्चेतून वगळण्यात आले.
  • अँड्र्यू यांनी सांगितलं की, सरकारच्या सल्ल्यानंतर त्यांनी यांग यांच्याशी सर्व संपर्क थांबवला होता. सर्व बैठका 'अधिकृत मार्गाने' होत्या आणि 'कधीही संवेदनशील गोष्टींची चर्चा झाली नाही.'
  • गुप्तहेर म्हणून आपलं वर्णन करणे 'संपूर्णपणे असत्य' आहे, असं यांनी म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)