एका आयफोनमुळं पोलिसांना 40 हजार फोन चोरून चीनला पाठवल्याचा संशय असलेली टोळी कशी सापडली? जाणून घ्या

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फोन तस्करीत सहभागी असलेल्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला पकडण्यात युके पोलिसांनी यश मिळालं आहे.
    • Author, सिमा कोटेचा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

फोन तस्करीत सहभागी असलेल्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला पकडण्यात युके पोलिसांनी यश मिळालं आहे.

गेल्या वर्षभरात या टोळीनं युकेमधून तब्बल चाळीस हजार मोबाईल फोन चोरून चीनमध्ये पाठवल्याचा संशय आहे.

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितलं की, फोन चोरीविरुद्धची ही युकेमधील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित 18 संशयितांना अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना दोन हजारहून अधिक चोरीचे फोन सापडले आहेत.

या टोळीनं लंडनमध्ये चोरीला गेलेल्या सर्व फोनपैकी निम्मे फोन निर्यात केले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. युकेमध्ये चोरी होणाऱ्या फोनपैकी बहुतांश लंडनमधून चोरीला जातात.

टोळीबाबतची माहिती कशी मिळाली?

'बीबीसी न्यूज'ला पोलिसांची ही संपूर्ण कारवाई जवळून पाहण्याची परवानगी देण्यात आली होती.

पोलिसांनी बीबीसीला संशयितांबद्दल, त्यांनी कशाप्रकारे हे काम केलं त्याबद्दल तसेच लंडन आणि हर्टफोर्डशायरमधील 28 ठिकाणी टाकलेल्या छाप्यांबद्दल माहिती दिली.

गेल्या वर्षी एका पीडितेनं तिचा चोरीला गेलेला फोन स्वत:हून ट्रॅक केला. त्यानंतर पोलिसांनी हा तपास सुरू केला.

"ही घटना ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला घडली होती. पीडितेनं तिचा चोरीला गेलेला आयफोन हिथ्रो विमानतळाजवळील एका गोदामात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शोधला," अशी माहिती गुप्तहेर निरीक्षक मार्क गेविन यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, "गोदामातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना मदत केली. त्यांना 894 इतर फोनसह एका बॉक्समध्ये हा चोरीला गेलेला आयफोन सापडला."

अशी करण्यात आली कारवाई

या कारवाईत पोलिसांना आढळलं की, बॉक्समधील जवळजवळ सर्व फोन हे कुणाचे ना कुणाचे तरी चोरीला गेलेले फोन होते.

शिवाय, हे सर्व फोन हाँगकाँगला पाठवले जात होते. त्यानंतर, पोलिसांनी हस्तक्षेप करत संभाव्य सर्व शिपमेंट थांबवल्या आणि पॅकेजेसच्या फॉरेन्सिक चाचण्या केल्या.

या चाचण्यांमुळे त्यांना गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींची ओळख पटवण्यास मदत झाली.

या कारवाईत पोलिसांना असं आढळलं की, बॉक्समधील जवळजवळ सर्व फोन हे कुणाचे ना कुणाचे तरी चोरीला गेलेले फोन होते.
फोटो कॅप्शन, या कारवाईत पोलिसांना असं आढळलं की, बॉक्समधील जवळजवळ सर्व फोन हे कुणाचे ना कुणाचे तरी चोरीला गेलेले फोन होते.

पोलिसांनी या दोन आरोपींवर लक्ष केंद्रित केलं. ते त्यांचा माग घेत राहिले. त्यानंतर त्यांनी कारवाई करत रस्त्याच्या कडेला एक कार अडवली.

अधिकाऱ्यांच्या बॉडी कॅमेऱ्यांमध्ये ही कारवाई रेकॉर्ड झाली आहे. या कारवाईदरम्यान काही अधिकाऱ्यांनी त्यांचे 'टेसर' तयार ठेवले होते.

टेसर म्हणजे एखाद्याला तात्पुरतं अक्षम करण्यासाठी त्यांच्यावर करण्यात येणारा गोळीबार होय. यामुळे आरोपी तात्पुरता अक्षम होतो आणि त्याला पकडणं सोपं होतं.

तेव्हा पोलिसांना या गाडीच्या आत फॉइलमध्ये गुंडाळलेले फोन आढळले. हे फोन सापडू नयेत, म्हणून चोरांनी ही युक्ती आजमावली होती.

कोण होते आरोपी?

हे दोन्हीही आरोपी 30 वर्षांचे अफगाण नागरिक होते. त्यांच्यावर दोन गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला.

एक म्हणजे चोरलेल्या वस्तू मिळवण्याची योजना आखणं आणि दुसरा आरोप म्हणजे बेकायदेशीर मालमत्ता लपवण्याची किंवा हलवण्याची योजना आखणं.

पोलिसांनी त्या दोघांना थांबवलं तेव्हा त्यांच्या गाडीत पोलिसांना कित्येक डझन फोन सापडले. पोलिसांना त्यांच्या घरांमध्ये सुमारे दोन हजार चोरीचे फोन सापडले.

पोलिसांनी आणखी एका तिसऱ्या व्यक्तीलाही आरोपी बनवलं आहे. हा तिसरा व्यक्ती एक भारतीय नागरिक असून तो 29 वर्षांचा आहे. त्याच्यावरही हेच आरोप लावण्यात आले.

गुप्तहेर निरीक्षक गॅविन म्हणाले की, "फोनची पहिली शिपमेंट सापडणं हा या प्रकरणातील महत्त्वाचा क्षण होता. यामुळे पोलिसांना एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीचा पर्दाफाश करण्यास मदत झाली.

पोलिसांना असं वाटतं की, या टोळीने लंडनमध्ये चोरीला गेलेल्या सर्व फोनपैकी सुमारे 40 टक्के फोन निर्यात केले असावेत."

पोलिसांनी त्या दोघांना थांबवलं तेव्हा त्यांच्या गाडीत त्यांना कित्येक डझन फोन सापडले. पोलिसांना त्यांच्या घरांमध्ये सुमारे दोन हजार चोरीचे फोन सापडले.
फोटो कॅप्शन, पोलिसांनी त्या दोघांना थांबवलं तेव्हा त्यांच्या गाडीत त्यांना कित्येक डझन फोन सापडले. पोलिसांना त्यांच्या घरांमध्ये सुमारे दोन हजार चोरीचे फोन सापडले.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गेल्या आठवड्यात, अधिकाऱ्यांनी चोरी आणि चोरीचे फोन हाताळल्याच्या संशयावरून आणखी 15 लोकांना अटक केली. संशयितांपैकी एक वगळता सर्व महिला आहेत. यात एका बल्गेरियन महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी पहाटे टाकलेल्या छाप्यांमध्ये चोरीची सुमारे 30 उपकरणं सापडली.

लंडनमध्ये चोरीला गेलेल्या फोनची संख्या चार वर्षांत जवळजवळ तिप्पट झाली आहे. 2020 मध्ये, सुमारे 28,609 फोन चोरीला गेले. 2024 मध्ये, ही संख्या 80,588 पेक्षा जास्त फोनवर पोहोचली.

आता, यूकेमध्ये चोरीला गेलेल्या प्रत्येक चार फोनपैकी तीन लंडनधले असतात.

दरवर्षी, 20 दशलक्षहून अधिक पर्यटक लंडनला भेट देतात. वेस्ट एंड आणि वेस्टमिन्स्टर सारखी ठिकाणं आता फोन चोरीसाठीच ओळखली जाऊ लागली आहेत.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मते, मार्च 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये चोरी होण्याचं प्रमाण 15 टक्क्यांनी वाढलेलं आहे.

2003 नंतर अशा चोरींचं हे सर्वोच्च प्रमाण आहे. युके आणि इतर देशांमध्ये सेकंड-हँड फोनची वाढती मागणी हे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे एक मुख्य कारण आहे. अनेक पीडितांना त्यांचे चोरीचे फोन कधीही परत मिळत नाहीत.

चोरांचे आयफोन्सवर असते लक्ष

पोलिसिंग मिनिस्टर सारा जोन्स म्हणाल्या की, "काही गुन्हेगारांनी ड्रग्ज विकणं बंद केलं आहे. त्याऐवजी, ते आता फोन चोरून विकत आहेत कारण त्यातून जास्त पैसे मिळतात."

पुढे त्या म्हणाल्या, "तुम्ही फोन चोरी करत असाल आणि तो फोन शेकडो पौंडांचा असेल, तर गुन्हेगार या गुन्ह्यांकडे का वळत आहेत, हे समजणं फारच सोपं आहे."

'बीबीसी न्यूज'ला पोलिसांची ही संपूर्ण कारवाई जवळून पाहण्याची परवानगी देण्यात आली होती.
फोटो कॅप्शन, 'बीबीसी न्यूज'ला पोलिसांची ही संपूर्ण कारवाई जवळून पाहण्याची परवानगी देण्यात आली होती.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या टोळीनं प्रामुख्यानं अ‍ॅपल फोनना लक्ष्य केलं आहे. कारण अ‍ॅपलची उत्पादने परदेशी बाजारपेठेत अधिक फायदेशीर असतात. तपासात असं आढळून आलंय की, रस्त्यावरील चोरांना प्रत्येक चोरीच्या आयफोनसाठी £300 पर्यंत पैसे दिले जात होते.

मेट पोलिसांना असंही आढळून आलं की, हे चोरीचे फोन चीनमध्ये प्रत्येकी £4,000 पर्यंत विकले जात होते. हे फोन तिथे अधिक मौल्यवान यासाठी आहेत कारण ते इंटरनेट वापरण्यासाठी सक्षम आहेत आणि लोकांना ऑनलाइन सेन्सॉरशिप बायपास करण्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरू शकतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)