डोळ्यांच्या पापणीत 200 च्या वर उवा, गुजरातच्या या महिलेबरोबर नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Supplied
- Author, अपूर्व अमीन
- Role, बीबीसी गुजराती
अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला येथील रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील एक दुर्मिळ असं अनोखं प्रकरण समोर आलं आहे.
सुरतमधील 66 वर्षीय गीताबेन तपासणीसाठी नेत्र विभागात आल्या होत्या. त्यांना दीड महिन्यापासून डोळ्यांच्या पापण्यांमध्ये तीव्र वेदना आणि खूप खाज येत होती. डोळा लाल झाला होता, त्यामुळे त्यांना झोपही येत नव्हती.
जेव्हा गीतीबेन यांनी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मृगांक पटेल यांना आपले डोळे दाखवले, तेव्हा समजलं की त्यांच्या डोळ्यांच्या पापणीत चक्क जिवंत उवा आहेत. आणि त्या एक-दोन नाही, तर तब्बल 250 इतक्या संख्येने होत्या.
उवांची प्रकाशाप्रतीची संवेदनशीलता आणि वैद्यकीय उपचारांतील काही मर्यादा लक्षात घेऊन डॉक्टरांनी इंजेक्शन न देता त्या उवा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया सुमारे दोन तास चालली होती.
वैद्यकीय भाषेत या स्थितीला 'फ्थिरायसिस पॅल्पेब्ररम' म्हणतात. ही अवस्था कशामुळे होते, तिची लक्षणं कोणती असतात आणि अशी समस्या टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत आपण जाणून घेऊया.
या विचित्र प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे?
सावरकुंडला येथील लल्लूभाई शेठ आरोग्य मंदिर रुग्णालयातील नेत्र विभागाचे डॉ. मृगांक पटेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "गीताबेन या मूळच्या सावरकुंडलाच्या आहेत आणि सध्या त्या सुरतमध्ये राहतात."
गीताबेन जेव्हा उपचारासाठी ओपीडीमध्ये आल्या, तेव्हा त्यांची मुख्य तक्रार होती की दीड महिन्यापासून त्यांच्या पापणीवर खूप खाज येत होती.
डॉ. मृगांक पटेल म्हणाले, "पापणीवर खाज येण्याचं सामान्य कारण म्हणजे कोंडा किंवा संसर्ग असतो, पण पापणीवर उवा असणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. आम्ही अत्यंत काळजीपूर्वक पाहिलं तेव्हा पापणीवर उवा हालचाल करताना दिसल्या."
"त्यावेळी उवांनी घातलेली लहान गोल अंडीही दिसली. हा एक वेगळ्या प्रकारचा परजीवी आहे. वैद्यकीय भाषेत या स्थितीला 'फ्थिरायसिस पॅल्पेब्ररम' म्हणतात."
"आम्हाला सर्वात मोठं आव्हान होतं की, डोळ्यात उवा असल्याचे ऐकून रुग्णाने घाबरू नये. त्यामुळे आम्ही त्यांचं समुपदेशन केलं. तसेच त्यांना समजावलं की, उवांचं प्रमाण जास्त असल्यामुळे उपचाराला थोडा जास्त वेळ लागू शकतो."

फोटो स्रोत, Supplied
ही परिस्थिती कुटुंबासाठीही खूप कठीण होती. त्यांनी सुरतमधील काही रुग्णालयांतही दाखवलं होतं, पण कुठेही योग्य परिणाम पाहायला मिळाला नाही.
रुग्ण गीताबेन यांचा मुलगा अमित मेहता यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आईच्या डोळ्यांना खूप खाज यायची आणि रात्री झोपही लागत नव्हती. आम्ही सुरतमधील काही रुग्णालयांत दाखवलं, पण काहीच फरक पडला नाही. नंतर सावरकुंडलाला गेलो, तेव्हा डॉ. मृगांक यांनी सांगितलं की आईच्या डोळ्यांत उवा आहेत आणि त्या काढाव्या लागतील."
डॉ. मृगांक म्हणाले, "या उवा आपल्या शरीराचं रक्त पितात. डोळ्यांच्या पापणीची त्वचा खूप पातळ असल्यामुळे या उवांना तिथून रक्त शोषणं सोपं जातं."
"या उवा पापण्यांना घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे रुग्णाला खाज सुटते. आणि जेव्हा त्या काढायचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्या सहज निघतही नाहीत."
उवा काढण्याची प्रक्रिया
या प्रकारच्या उवा प्रकाशाला संवेदनशील असतात, त्यामुळे त्या प्रकाशात हलू लागतात. म्हणून त्यांना काढण्यासाठी 'मॅकफर्सन' नावाचं विशेष उपकरण वापरावं लागतं. मग एकेक ऊ पकडून काळजीपूर्वक काढावी लागते
डॉ. मृगांक पटेल म्हणाले, "सुरुवातीला रुग्णाच्या डोळ्यांना बधीर करण्यासाठी टॉपिकल अॅनेस्थेशियाचे (बधिर करणारे) डोळ्यांत थेंब टाकले. उवा काढताना वेदना जाणवू नये यासाठी हे करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे दोन तास चालली."
"ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला आराम वाटू लागला. खाजही कमी झाली. त्यानंतर आम्ही रुग्णाचं समुपदेशन केलं."
डॉ. मृगांक म्हणाले, "अशी काही प्रकरणे भारतात आधीही आढळून आली आहेत. साधारण पाच महिन्यांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण आलं, तेव्हा मी त्यावर संशोधन लेखही वाचले होते. ही खूप दुर्मिळ अवस्था आहे."

फोटो स्रोत, Supplied
या कठीण प्रक्रियेत डॉ. मृगांक पटेल आणि त्यांच्या टीमनं महिलेच्या दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांमधून तब्बल 250 पेक्षा जास्त उवा आणि 85 पेक्षा जास्त अंडी काढली. या शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा महिला परत तपासणीसाठी ओपीडीमध्ये आल्या, तेव्हा त्यांचे डोळे पूर्णपणे स्वच्छ आणि निरोगी दिसत होते.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश कटारिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मला 21 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे, पण आजपर्यंत असं प्रकरण पाहिलं नव्हतं. आमच्या रुग्णालयात आलेली ही केस खूप कठीण होती, कारण यासाठी जास्त अॅनेस्थेशिया (भूल देण्याचं औषध) देण्याची आवश्यकता होती."
"रुग्ण गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून त्रस्त होते, त्यांना झोपही लागत नव्हती. त्यांनी आधी सुरतमधील दोन-तीन डॉक्टरांना दाखवलं होतं, पण निदान झालं नव्हतं. यावरून प्रकरण किती गंभीर होतं, हे लक्षात येतं."
सुमारे पाच महिन्यांपूर्वी, सावरकुंडला येथे असंच एक प्रकरण घडलं होतं. त्यावेळी एका मुलाच्या पापणीवर उवा होत्या. त्या सहज बाहेर आल्या आणि तो अवघ्या दीड तासात बरा झाला होता.
फ्थिरायसिस पॅल्पेब्ररम म्हणजे नक्की काय?
अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या माहितीनुसार, फ्थिरायसिस पॅल्पेब्ररम ही एक दुर्मिळ वैद्यकीय अवस्था आहे. यात फ्थिरस प्यूबिस नावाच्या उवा डोळ्यांच्या पापण्यांवर संसर्ग करतात.
हा संसर्ग सहसा संक्रमित वस्तूंच्या संपर्कातून पसरतो. याची लक्षणं म्हणजे तीव्र खाज, पापण्या लाल होणं आणि झोप न लागणं. हा संसर्ग साध्या डोळ्यांच्या इन्फेक्शनसारखा नसल्यामुळे त्याचं निदान करणं थोडं अवघड ठरतं.
एनसीबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, फ्थिरायसिस पॅल्पेब्ररम (ज्याला फ्थिरायसिस सिलीयारिस किंवा सिलियरी फ्थिरायसिसही म्हणतात) ही पापणीवर होणारी एक परजीवी संसर्गजन्य अवस्था आहे.
डोळ्यांवर उवा कशा प्रकारे होऊ शकतात?
अहमदाबादमधील ध्रुव हॉस्पिटलचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. हर्षद आगजा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "हा आजार अतिशय दुर्मिळ आहे. जसं डास अंडी घालतात आणि त्यातून लार्व्हा किंवा अळ्या तयार होतात, तसंच इथंही होतं. अनेकदा स्वच्छतेचा अभाव किंवा डोळे वारंवार चोळल्याने हा संसर्ग होऊ शकतो."
"आमच्या कारकिर्दीत अशी एक केस आम्ही अनेक वर्षांपूर्वी अहमदाबादमधील शारदाबेन रुग्णालयात पाहिली होती. पण ही केस अतिशय दुर्मिळ आहे."
हे होण्याचं कारण कधी कधी घरातील उशा किंवा विशिष्ट वातावरणही असू शकतं. अशा ठिकाणांमुळे उवा शरीरात प्रवेश करू शकतात.

फोटो स्रोत, Supplied
डॉ. मृगांक म्हणतात, "हा आजार फक्त माणसांमध्येच नाही, तर जनावरांमध्येही दिसू शकतात. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालं तर ओढणी, चादर, उशा, रजई किंवा कपड्यांमध्येही या उवा लपून राहू शकतात."
"दुसरं कारण असं की, हा आजार कधी चुकून किंवा अपघातानेही होऊ शकतो. जसं की, जंगलात जाणं किंवा जनावरांच्या संपर्कात येणं. अशा वेळी या उवा शरीरावर चिकटतात आणि नंतर डोक्यावरून पापण्यांवर पोहोचतात."
नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. आलाप बाविशी यांनी बीबीसीला सांगितलं, "ही केस खूपच दुर्मिळ आहे आणि गुजरातमध्ये पहिल्यांदाच नोंदवली गेली आहे. पण अशा उवा दक्षिण भारतात जास्त आढळतात, विशेषतः मार्च-एप्रिल महिन्यांत."
"ही केस तितकी गुंतागुंतीची नाही, पण डोळ्यांतून उवा काढण्याची प्रक्रिया मात्र खूप नाजूक आणि अवघड असते. कारण कोणतेही औषधं या उवा किंवा त्यांच्या अळ्यांना मारू शकत नाहीत.
त्यामुळे एकेक उवा हाताने पकडून काढावी लागते. त्यातही त्या प्रकाशापासून दूर पळतात, म्हणून टॉर्चशिवाय त्यांना ओळखून काढणं आणखी कठीण होतं."
डोक्यातील उवा आणि पापण्यांवरील उवा, यात नेमका फरक काय?
डॉ. आलाप बाविशी म्हणाले, "डोक्यावरील उवा आणि डोळ्यांवरील उवा वेगळ्या असतात. डोळ्यांतील उवा डोळ्याच्या पांढऱ्या भागाजवळ फिरतात आणि प्रकाशापासून दूर राहतात. त्यामुळे त्या पापणीच्या आतील अंधाऱ्या भागात लपून बसतात."
"अशा प्रकारच्या उवा स्वच्छतेच्या अभावामुळेच नाही, तर शेतीत पीक कापणीच्या हंगामात हवेत उडताना डोळ्यांत शिरू शकतात. सुरुवातीला फार वेदना होत नाहीत, त्यामुळे अनेकदा त्याची वेळेवर जाणीवही होत नाही."

फोटो स्रोत, Supplied
डॉ. मृगांक म्हणाले, "उवा विविध प्रकारच्या असतात, जसं की डोक्यावरील उवा, प्यूबिक उवा इत्यादी. या उवा नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या केवळ सूक्ष्मदर्शकातूनच पाहता येतात."
"या उवा दिसायला पारदर्शक असतात, त्यामुळे त्या त्वचेवर बसल्या तरी ओळखणं कठीण असतं. सूक्ष्मदर्शकातून पाहिलं तर त्यांच्या शरीरात रक्त फिरताना दिसतं, आणि त्यामुळे त्यांच्या शरीररचनेबद्दलही समजतं."
प्राथमिक लक्षणं
डॉ. मृगांक यांनी सांगितलं की, रुग्ण सुरतमध्ये राहत होते आणि त्यांचं एक घर सावरकुंडलामध्येही होतं. ते घर बहुतेक वेळा बंद असायचं. त्यामुळे घर बंद असणं आणि आसपास जनावरांची वर्दळ असणं, या कारणांमुळे उवा तिथे आल्या असाव्यात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. मृगांक म्हणतात की, डोळ्यांत वेदना होणं, सतत खाज येणं आणि झोप न लागणं, ही त्याची प्रमुख लक्षणं असू शकतात.
पापण्यांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी येणं किंवा सूज येणं, ही सुरुवातीची लक्षणं आहेत. त्वचेवर होणाऱ्या या संसर्गामुळेच खाज येऊ लागते.
अशा प्रकारच्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
डॉ. हर्षद आगजा म्हणाले, "रुग्णांनी हात स्वच्छ ठेवावेत आणि दिवसातून किमान दोन-तीन वेळा चेहरा धुवावा. अशा प्रकारच्या समस्या प्रामुख्याने मुलं आणि वृद्धांमध्ये दिसून येतात, तर तरुणांमध्ये त्याचं प्रमाण कमी असतं."
डॉ. प्रकाश कटारिया म्हणाले, "कोणालाही डोळ्यांविषयी शंका वाटल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर आराम मिळाला नाही, तर अनुभवी डॉक्टरांकडे जावे. डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास नंतर ती अधिक गंभीर होऊ शकतात. घरातही स्वच्छतेकडे लक्ष देणं आवश्यक आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











