फॅट लॉस ड्रग्ज म्हणजे काय? ही औषधे कोणती आणि ती कसे काम करतात? जाणून घ्या फायदे अन् धोके

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शुभ राणा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अलीकडेच डेन्मार्कमधील औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने आपलं प्रसिद्ध 'ओझेम्पिक' हे औषध भारतात लाँच केलं आहे.
हे औषध मुळात टाइप-2 डायबिटीजच्या उपचारासाठी तयार करण्यात आलं होतं, पण तिच्या वापरामुळे वजन कमी होतं (चरबी कमी होणं) म्हणून आता जगभरात तिची चर्चा होत आहे.
2023 मध्ये 'द लॅन्सेट डायबिटीज अँड एंडोक्राइनोलॉजी' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, भारतात सुमारे 10 कोटी 10 लाख लोकांना मधुमेह आहे. यामध्ये टाइप-2 मधुमेहाचे रुग्ण सर्वाधिक असून त्यांची संख्या वेगाने वाढतं आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत जनजागृतीचा दावा केला आहे, परंतु प्रत्यक्षात मधुमेह अजूनही एक मोठं आव्हानच आहे.
मधुमेहाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी काही नवीन औषधं (विशेषतः जीएलपी-1 आधारित) आता 'फॅट लॉस ड्रग्ज' म्हणूनही चर्चेत आहेत.
खरं तर जीएलपी-1 हे आतड्यांतून तयार होणारं एक नैसर्गिक हार्मोन (संप्रेरक) आहे. ते इन्सुलिनचं स्राव वाढवतं, पचनाची प्रक्रिया मंद करतं आणि भूक कमी करतं, त्यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सध्या ही औषधं टाइप-2 डायबिटीज आणि वजन कमी (लठ्ठपणा) करण्यासाठी इंजेक्शन किंवा गोळीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.
ही औषधं नेमकी काय आहेत, ती कशी काम करतात, त्यांचे फायदे आणि धोके काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

फोर्टिस-सी-डॉक सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबिटीजचे अध्यक्ष डॉ. अनूप मिश्रा म्हणतात, "भारतामध्ये टाइप-2 मधुमेहाचं वाढतं प्रमाण हे सार्वजनिक आरोग्याचं मोठं संकटच किंवा आरोग्य आणीबाणी आहे, असं म्हणता येईल."
ते म्हणतात, "शहरीकरण, बैठी जीवनशैली, अपायकारक आहार, आनुवंशिक कारणं, ताणतणाव आणि प्रदूषण यामुळे ही समस्या वाढत आहे. 'दहा मिनिटांत फास्ट फूड डिलिव्हरी'ने तर परिस्थिती आणखी बिघडवली आहे. आता अगदी विशीतील तरुणही याला बळी पडत आहेत."
डॉ. मिश्रा यांच्या मते, "पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये मधुमेह कमी वयात आणि कमी वजनातच सुरू होते. त्यामुळे उपचारांसोबतच त्याची प्रतिबंधक काळजी घेणं खूप गरजेचं आहे."

मॅक्स हेल्थकेअरमधील एंडोक्राइनोलॉजी अँड डायबिटीज विभागाचे अध्यक्ष डॉ. अंबरीश मित्तल टाइप-2 मधुमेहाच्या उपचारांबाबत सांगतात की, "सेमॅग्लुटाइड (ओझेम्पिक/वेगोवी) आणि टिरझेपेटाइड (मौंजारो) यांसारख्या नवीन औषधांचा वजन कमी करण्यात खूप चांगला परिणाम दिसून येतो.
तर, ही औषधे केवळ साखर नियंत्रणात ठेवत नाहीत तर भूक कमी करतात आणि पोट लवकर भरल्याची भावना देतात. यामुळे वजन 15 ते 20 टक्क्यांनी कमी होऊ शकतं."
डिसेंबर 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) लठ्ठपणाच्या उपचारासाठी जीएलपी-1 औषधांच्या वापरावर प्रथमच जागतिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
डब्ल्यूएचओने लठ्ठपणाला एक दीर्घकाळ टिकणारा आणि वारंवार परत येणारा आजार मानलं आहे.
डब्ल्यूएचओच्या मते, "प्रौढांमधील लठ्ठपणाच्या दीर्घकालीन उपचारासाठी जीएलपी-1 औषधांचा वापर करता येऊ शकतो. परंतु, ही औषधं आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या देखरेखीखालीच वापरली पाहिजे."
डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस म्हणतात, "फक्त औषधांमुळे हे जागतिक आरोग्य संकट संपणार नाही. पण जीएलपी-1 औषधं लाखो लोकांना लठ्ठपणाशी लढण्यास मदत करू शकतात आणि त्यामुळे होणारी हानी कमी करू शकतात."

डॉ. अंबरीश मित्तल म्हणतात, "आपल्या शरीरात जीएलपी-1 हा एक नैसर्गिक हार्मोन असतो. जेव्हा आपण जेवतो किंवा अन्न खातो तेव्हा तो आतड्यातून बाहेर पडतो, भूक नियंत्रित करतो, पोट हळू-हळू रिकामं होऊ देतो आणि इन्सुलिनच्या माध्यमातून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो."
ते म्हणतात की, "ही औषधं अमेरिकेच्या एफडीए आणि युरोपमधील आरोग्य संस्थांकडून लठ्ठपणाच्या उपचारासाठी मान्यता मिळवलेली आहेत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ती अशा लोकांना दिली जातात, ज्यांचा बीएमआय 30 किंवा त्याहून जास्त आहे, किंवा जे जीवनशैली बदलूनही वजन कमी करू शकले नाहीत."
या औषधांमुळे फक्त वजनच कमी होत नाही तर आरोग्यातही सुधारणा होत असल्याचा दावा केला जातो.
डॉ. मित्तल यांच्या मते, या औषधांना 'कॉस्मेटिक' समजणं चुकीचं आहे. ते म्हणतात की, लठ्ठपणा हा एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे मधुमेह, हृदयविकार आणि फॅटी लिव्हरसारख्या समस्या उद्भवतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. अंबरीश मित्तल यांच्या मते, या औषधांचे संभाव्य फायदे आहेत. टाईप-2 मधुमेहावर चांगलं नियंत्रण, वजन कमी होऊन अनेक आजारांचा धोका कमी होणं, हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका सुमारे 20 टक्क्यांनी कमी होणे, फॅटी लिव्हरमध्ये सुधारणा आणि किडनीशी (मूत्रपिंड) संबंधित गुंतागुंत टाळण्यास मदत होते.
भारतामध्ये जंक फूड, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव आणि प्रदूषणामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे.
विशेषत: पोटाभोवती जमा होणारी चरबी (सेंट्रल ओबेसिटी) जास्त धोकादायक मानली जाते.

डॉ. मित्तल या औषधांच्या दुष्परिणामांबाबतही सावध करतात. ते म्हणतात की, सुरुवातीला 40 ते 50 टक्के लोकांना पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात, जसं की मळमळ किंवा उलटी, अॅसिडिटी, गोळा येणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार.
ते इशाराही देतात की, वेगाने वजन कमी झाल्यास 20 ते 40 टक्के स्नायू कमी होण्याचा धोका असतो. यापासून वाचण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेणं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं आवश्यक आहे.
या औषधांच्या वापरावर डॉ. अनूप मिश्रा इशारा देतात की, "ही औषधं सर्वांसाठी नाहीत. सडपातळ लोक, टाइप-1 मधुमेह असलेले, पँक्रियाटायटिस (स्वादुपिंडाचा दाह) किंवा काही विशिष्ट थायरॉइड कॅन्सरचा इतिहास असलेले रुग्ण यांच्यासाठी ही औषधं योग्य नाहीत. भारतात त्यांचा जास्त खर्च आणि मर्यादित उपलब्धता ही देखील एक मोठी अडचण आहे."

तर प्रश्न असा आहे की, ही औषधं खरंच वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट आहेत का?
डॉ. अनूप मिश्रा जीएलपी-1 औषधांबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात, "ही औषधं काही खास रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात, जसं की ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे, ज्यांची साखर सामान्य उपचाराने नियंत्रणात येत नाही, किंवा ज्यांना हृदय, किडनी, फॅटी लिव्हर किंवा स्लीप अॅप्नियाचा धोका जास्त आहे."
त्यांना काळजी आहे की, लोक सोशल मीडियाच्या दबावामुळे ही औषधं फक्त वजन कमी करण्यासाठी, डॉक्टरांचा सल्ला न घेता वापरत आहेत.
ते लक्ष वेधतात की, "भारतामध्ये कुपोषण आणि लठ्ठपणा दोन्ही समस्या आहेत. म्हणून औषधांचा वापर फक्त तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच करावा."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











