Exclusive : नागपुरातील आतापर्यंतच्या 5 स्फोटांच्या मृत्यूंमध्ये 75 टक्के महिला; चौकशी अहवालात कोणती कारणं आढळली?

नागपूर जिल्ह्यात एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत स्फोट झाला.
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

(सूचना - लेखातील काही माहिती तुम्हाला विचलित करू शकते.)

नागपूर जिल्ह्यात एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत काही दिवसांपूर्वी स्फोट झाला. यामध्ये 19 जणांचा जीव गेला, तर 22 जण होरपळल्यानं गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये सर्वाधिक म्हणजेच 16 महिलांचा समावेश आहे. हे सगळे घरात एक एकरही शेती नसलेले हातावर पोट भरणारे मजूर होते.

फक्त एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्येच स्फोट झाला असं नाही. गेल्या डिसेंबर 2023 पासून नागपुरात स्फोटकांच्या 5 कंपन्यांमध्ये स्फोट झाले, तर एमआयडीसीमधील इतर 2 कंपन्यांमध्ये स्फोट झाले.

या कंपन्यांबाबत झालेल्या चौकशीचा अहवाल बीबीसीने मिळवला. त्यातील त्रुटींबद्दल आम्ही सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत संपर्क साधला. पण त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

दरम्यान, आता स्फोट झालेल्या SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीचा परवाना पेसोकडून रद्द करण्यात आला आहे. तसेच कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी यांच्याविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

हे स्फोट कधी झाले? यामध्ये किती लोकांचा जीव गेला? आणि त्यामधील चौकशी अहवालांचं पुढे काय झालं? जाणून घेऊयात.

पण, त्याआधी नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या नेमक्या किती कंपन्या आहेत? यावर एक नजर टाकुयात.

नागपूर जिल्ह्यात 50 टक्के स्फोटक युनिटचे लायसन्स सोलर ग्रुपला

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्फोटकांच्या या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम पेसो म्हणजेच पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटना या प्रमुख संस्थेचे असते. या संस्थेचे मुख्यालय नागपुरातील सिव्हील लाईन परिसरात आहे. पेसोकडूनच या स्फोटकांच्या कंपन्यांना लायसन्स दिलं जातं.

त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सध्या स्फोटकांचे लायसन्स असलेले एकूण 48 फॅक्टरी युनिट सुरू आहेत. हे फॅक्टरी युनिट 9 प्रमुख स्फोटक कंपन्यांचे आहेत.

यामध्ये सर्वाधिक लायसन्स असलेले युनिट सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे आहेत. या कंपनीला 48 पैकी 17 स्फोटक युनिटचे लायसन्स मिळाले आहेत, असं या वेबसाईटवर दिसते.

तसेच इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव्ह लिमिटेडला सुद्धा 9 स्फोटक युनिटसाठी लायसन्स दिले आहेत.

सोलर आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही कंपन्या सोलर ग्रुपच्या अंतर्गत येतात. त्याचे मालक सत्यनारायण नुवाल असून त्यांना काही दिवसांपूर्वी भाजप सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.

या ग्रुपला भारतीय संरक्षण क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्ट सुद्धा दिले जातात. यानंतर केलकेट एनर्जी लिमिटेड या कंपनीला 6 वेगवेगळे लायसन्स मिळालेले आहेत.

स्फोटकांच्या या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम पेसो म्हणजेच पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटना या प्रमुख संस्थेचे असते.
फोटो कॅप्शन, स्फोटकांच्या या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम पेसो म्हणजेच पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटना या प्रमुख संस्थेचे असते.

एकट्या नागपूर जिल्ह्यातले हे 48 लायसन्सधारक स्फोटक युनिट असून यापैकी सगळ्याच कंपन्यांच्या स्फोटकांच्या फॅक्टरी काटोल आणि कळमेश्वर या 2 तालुक्यांमध्ये आहेत.

या भागामध्ये शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे शेती नाही असे मजुर इथं कामाला जातात.

यापैकी काही कंपन्यांमध्ये RDX आणि TNT सारख्या अत्यंत संवेदनशील स्फोटकांचं उत्पादन केलं जातं. स्फोटकांचं उत्पादन, त्याची हाताळणी हे संवेदनशील असतं. थोडीशीही चूक झाली तरी स्फोट होण्याची शक्यता असते.

अशा कंपनीत उच्च कौशल्य असलेली, प्रशिक्षित कामगार असावे, असे नियम सांगतात. पण, स्फोटकांचं काम इतकं धोकादायक असताना देखील परिसरातील स्थानिक मजुरांना ठेकेदारीत कामाला घेतलं जातं.

आतापर्यंतच्या स्फोटात जितक्या कामगारांचा मृत्यू झाला ते सगळे ठेकेदारीत काम करणारे स्थानिक लोकच होती.

आता स्फोट झालेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये तर सगळ्या सूचना, नियम हे इंग्रजीमध्ये लावलेले होते आणि इथं काम करणारे मजूर कोणी 8 वी नापास, कोणी 10वी. जीवाला धोका असतानाही फक्त 250 ते 300 रुपये मजुरीसाठी हे मजूर या कंपन्यांमध्ये कामाला जातात. कारण, या परिसरात हाताला दुसरं काम नाही.

अडीच वर्षांतील स्फोटकांच्या कंपनीत झालेल्या मृत्यूंमध्ये 75 टक्के महिला

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि आम्ही त्या त्यावेळी केलेल्या रिपोर्टींगनुसार, नागपुरात गेल्या डिसेंबर 2023 पासून स्फोटकांच्या कंपनीत 5 वेळा स्फोट झाले.

पहिला स्फोट 17 डिसेंबर 2023 रोजी बाजारगावजवळील चाकडोह इथल्या सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीत झाला. या कंपनीत 9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 6 महिलांचा समावेश होता, तर 3 पुरुष होते.

या घटनेच्या 6 महिन्यानंतर 13 जून 2024 रोजी नागपूरपासून 20 किलोमीटरवर असलेल्या धामना लिंगा इथल्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह या कंपनीत स्फोट झाला. यामध्ये देखील 6 महिलांसह 9 जणांचा मृत्यू झाला होता. फटाक्याची वात तयार करताना हा स्फोट झाला होता.

नागपूर जिल्ह्यात एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत स्फोट झाला.
फोटो कॅप्शन, नागपूर जिल्ह्यात एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत स्फोट झाला.

आधीच्या घटनेच्या 8 महिन्यांनी 16 फेब्रुवारी 2025 ला एशियन फायर वर्क या कोतवालबर्डी इथल्या कंपनीत स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर 3 कामगार जखमी होती.

या घटनेनंतर 7 महिन्यांनी पुन्हा सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीत 4 सप्टेंबर 2025 ला स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर 13 जण जखमी होते. हा सोलार कंपनीतील दीड वर्षातील दुसरा स्फोट होता.

पुन्हा 6 महिन्यानंतर आता 1 मार्च 2026 ला एसीबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत स्फोट झाला. यामध्ये 19 कामगारांचा मृत्यू झाला. यापैकी 16 महिला आहेत, तर 22 कामगार गंभीर भाजले गेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या अडीच वर्षात फक्त स्फोटकांच्या 5 कंपन्यांमधील स्फोटात 41 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 31 म्हणजे 75 टक्के महिलांचा समावेश आहे.

तसेच 38 जण जखमी होते. यापैकी काही जणांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्यांना आता काम करता येईना.

अशा कामगारांचं पुनर्वसन करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

बीबीसीनं मिळवले आधीच्या स्फोटांमधील अहवाल, नेमकं काय म्हटलं?

सोलारमधील दोन स्फोट, चामुंडी आणि एसबीएल यामध्ये स्फोटक साठ्याचा स्फोट झाला, तर एशियन फायर वर्कमध्ये फटाक्याची वात करताना स्फोट झाला होता.

एसबीएलमध्ये सुरक्षेचे नियम पाळले नाहीत. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे स्फोट झाल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलं.

पण याआधीच्या 4 स्फोटकांच्या कंपनीतील स्फोटांची पेसो, डिश (डायरेक्टरेट इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ) या संस्थांकडून चौकशी सुद्धा झाली. त्यानंतरही चौकशी अहवाल समोर आले नाहीत. ते अहवाल सार्वजनिक केले गेले नाहीत.

आम्ही पेसोच्या अधिकाऱ्यांना या अहवालाबद्दल विचारणा केली. पण, चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सबमिट केला जातो. त्यामुळे या गोष्टींची माहिती त्यांच्याकडेच मिळेल, असं सांगण्यात आलं.

आम्ही जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्यासोबत संपर्क साधला. तर त्यांच्या कार्यालयाकडून आकडेवारी देण्यात आली.

फक्त एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्येच स्फोट झाला असं नाही. गेल्या डिसेंबर 2023 पासून नागपुरात स्फोटकांच्या पाच कंपन्यांमध्ये स्फोट झाले, तर एमआयडीसीमधील इतर दोन कंपन्यांमध्ये स्फोट झाले.
फोटो कॅप्शन, फक्त एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्येच स्फोट झाला असं नाही. गेल्या डिसेंबर 2023 पासून नागपुरात स्फोटकांच्या पाच कंपन्यांमध्ये स्फोट झाले, तर एमआयडीसीमधील इतर दोन कंपन्यांमध्ये स्फोट झाले.

हे अहवाल आतापर्यंत समोर आलेले नाहीत. पण, बीबीसीनं अधिकृत यंत्रणेकडून गेल्या 2 स्फोटांमधील अहवालांमध्ये महत्वाचे काय फायडींग्स आहेत ती माहिती मिळवली.

यानुसार, एशियन फायरवर्क या कंपनीत कामगार स्मोकींग करत असल्यानं स्फोट झाल्याचं अहवालात सांगण्यात आलं.

"सोलार एक्सप्लोजीव्हच्या चौकशी अहवालातीलही माहिती मिळाली. यामध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे म्हणजे क्रेट्स ओढताना तसेच मटेरियलची चाळणी अयोग्य पद्धतीनं झाली होती.

तसेच धोकादायक स्फोटक पदार्थ हाताळण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे प्रशिक्षण कामगारांना दिले नसल्याचं दिसून आल्याचं" या अहवालात म्हटलं आहे.

पुढे म्हटलं, "चाळणी टेबलच्या हॉपरजवळ साचलेल्या TNT धुळीच्या प्रज्वलनामुळे स्फोट झाला असावा. TNT हातानं घासणं किंवा त्याची हाताळणी अत्यंत हलगर्जीपणानं करणं यामुळे स्टॅटीक चार्ज निर्माण झाला असावा. त्यामुळे हा स्फोट झाला."

"कामगारांच्या मृतदेहांचे अवशेष घटनास्थळापासून दूर आणि शेजारच्या इमारतहीवरही आढळले. यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येते."

चामुंडी एक्स्प्लोजीव्हचा अहवाल अजूनही तयार व्हायचा आहे. मॅजिस्ट्रेट चौकशी असल्यामुळे वेळ लागतोय अशी माहिती आहे.

पण, स्फोट होतात, जीव जातात, चौकशी होते, मग चौकशी करणाऱ्या संघटनांकडून अहवाल वेळेच्या वेळी सार्वजनिक का केले जात नाहीत? त्याला अडीच-तीन वर्षे का लागतात? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

एमआयडीसीमधल्या 2 कंपन्यांच्या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू

याशिवाय नागपूर जिल्ह्यात इतर 2 कंपन्यांमध्ये सुद्धा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 11 एप्रिल 2025 ला उमरेडमधील एम. एम. पी. या फॉईल अँड अल्युमिनियम कंपनीत स्फोट झाला होता. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता, तर 6 जण जखमी होते.

तसेच बुटीबोरी इथल्या अवाडा इलेक्ट्रो लिमिटेड या कंपनीत 19 डिसेंबर 2025 ला प्रेशराईज वॉटर टँकमधील दबाव वाढल्यानं टँकमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर 9 कामगार जखमी होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)