थेट न्यायाधीशांच्या कक्षातून चोरी, सफरचंद आणि हँडवॉश गायब; सोशल मीडियावर कंमेट्सचा पाऊस

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यायाधीशांच्या सूचनेनंतर न्यायालयीन रीडरने ही तक्रार दाखल केली आहे (प्रातिनिधिक फोटो)
    • Author, एहतेशाम अहमद शमी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये एक अजब प्रकरण समोर आलं आहे.

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पोलिसांनी सत्र न्यायालयातील एका न्यायाधीशांच्या कक्षातून दोन सफरचंद आणि एक हँडवॉशची कथित चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात न्यायाधीशांच्या रीडरने दिलेल्या तक्रारीनुसार लाहोरच्या इस्लामपुरा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

लाहोरच्या इस्लामपुरा पोलीस स्टेशनचे ड्युटी ऑफिसर इम्रान खान यांनी बीबीसीला सांगितले की त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या रीडरकडून गुन्हा दाखल करण्याची विनंती आली होती आणि त्यावरून त्यांनी एफआयआर नोंदवली आहे.

त्यांनी सांगितलं आहे की एफआयआरची प्रत आणि संबंधित नोंदी पुढील कारवाईसाठी इन्व्हेस्टिगेशन विंगकडे पाठवण्यात आल्या आहेत.

या प्रकरणातील एफआयआरनुसार, 5 डिसेंबरला लाहोरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नूर मोहम्मद बिस्मिल यांच्या कक्षामधून दोन सफरचंद आणि हँडवॉशची एक बाटली चोरी झाली होती.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की चोरीला गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत 1,000 पाकिस्तानी रुपये आहे.

या प्रकरणात न्यायाधीशांच्या कोर्टातील रीडरच फिर्यादी आहेत.

त्यांनी एफआयआरमध्ये नमूद केलेले आहे की न्यायाधीशांनीच त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेची नोंद करण्याचे निर्देश दिले होते.

'पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वांत मोठी चोरी'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लाहोर पोलिसांनी पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 380 अंतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे.

पाकिस्तान दंड संहितेचे कलम 380 हे चोरीशी संबंधित आहे.

या कलमानुसार चोरीचा दोषी ठरल्यास आरोपीला कमाल सात वर्षांची शिक्षा किंवा दंड, किंवा दोन्ही होऊ शकतात.

पाकिस्तानमध्ये अशी एफआयआर नोंदवली जाईल आणि तिची सोशल मीडियावर चर्चा होणार नाही, हे तर शक्यच नाही.

सोशल मीडियावर अनेक जण दोन सफरचंद आणि हँडवॉशची चोरी झाल्याने गुन्हा नोंदवला गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काहीजण पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत.

सोशल मीडिया वेबसाईट एक्सवर असरार अहमद लिहितात की 'लाहोर पोलिसांनी या प्रकरणात त्वरित एफआयआर नोंदवली आहे आणि चोरी गेलेल्या सफरचंद आणि हँडवॉशच्या शोधासाठी विशेष तपास समिती स्थापन केली जावी.'

ते म्हणतात, सामान्य जनतेला जर छोट्या-मोठ्या चोरींच्या प्रकरणात असेच सहकार्य पोलिसांकडून मिळाले तर देश नक्कीच सुधारेल.

एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, "कधी कधी गरीब लोक आयुष्यभराची कमाई गमावल्यानंतरही एफआयआर नोंदवू शकत नाहीत."

हसन शब्बीर नावाच्या एका वापरकर्त्याने लिहिले, "सामान्य लोकांचे कोट्यवधी रुपये चोरीला गेले तरीही पोलीस एफआयआर नोंदवण्यास कचरत असतात, पण एका जजचे दोन सफरचंद आणि हँडवॉश चोरी झाले तर संपूर्ण देशात गोंधळ उडाला."

दुसरीकडे हैदर मजीद नावाच्या एका युजरने 'पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वांत मोठी चोरी' असे वर्णन केले आहे.

अनेक सोशल मीडिया युजर्सनी या घटनेची तुलना काही दिवसांपूर्वी इस्लामाबादमध्ये कारच्या धडकेत स्कूटरवरील दोन मुलींच्या मृत्यूशी केली आहे.

सफरचंद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोशल मीडियावर अनेक जण दोन सफरचंद आणि हँडवॉशची चोरी झाल्याने गुन्हा नोंदवला गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत

वकास खलील नावाच्या एका युजरने लिहिले की 'एका बाजूला इस्लामाबादमधील एका कोर्ट अधिकाऱ्याच्या मुलाने दोन निरपराध मुलींना चिरडले, पण कायदा शांत राहिला. आणि दुसऱ्या बाजूला एका जजच्या कोर्टातून फक्त दोन सफरचंद चोरी झाल्याने गुन्हा दाखल झाला.'

'पोलिसांनी रुमाल चोरी झाली तरीही एफ़आयआर नोंदवणे आवश्यक'

दुसऱ्या बाजूला काही जणांचे म्हणणे आहे की चोरी म्हणजे चोरी आणि पोलिसांनी छोट्या-मोठ्या प्रत्येक चोरीची नोंद करणे बंधनकारक आहे.

पाकिस्तान पोलिसांचे निवृत्त आयजी मोहम्मद अल्ताफ कमर यांनी सांगितले की घटना मोजे चोरीला जाण्याची असो किंवा रुमालाची, एफआयआर नोंदवणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे.

बीबीसी उर्दूशी बोलताना त्यांनी सांगितले की जर छोट्या घटना दुर्लक्षित केल्या तर मोठ्या घटना घडतात.

त्याचप्रमाणे, अपराधिक कायदे तज्ज्ञ शकीला सलीम राणा अॅडव्होकेट म्हणतात, "अपराध म्हणजे अपराधच, तो एक रुपयाचा असो किंवा एक कोटी रुपयांचा. हा अपराध आहे आणि तो तपासला जाऊ शकतो."

मात्र, त्या म्हणतात की न्यायाचा हा निकष सर्वांसाठी समान असला पाहिजे.

त्या म्हणतात, "हा न्याय कोणताही भेदभाव न करता सर्वांना मिळाला पाहिजे. आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याच्यासाठी कायद्याने समानपणे काम केले पाहिजे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.