रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निकाल : प्रतिष्ठेच्या निवडणुकीत नारायण राणे यांचा 47 हजारांच्या मताधिक्याने विजय

फोटो स्रोत, FACEBOOK
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोकणातील अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या नारायण राणे यांनी विजय मिळवला आहे.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा 47 हजार 858 मतांनी पराभव केला.
भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात ही लढत रंगली असली तरी खऱ्या अर्थानं इथं ठाकरे विरुद्ध राणे अशीच स्थिती होती.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा निलेश राणे पराभूत झाले. त्यामुळं पुन्हा मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी नारायण राणे मैदानात उतरले होते.
नाथ पै आणि मधु दंडवतेंचा मतदारसंघाला वारसा
2008 साली लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार झाला.
आताच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात 2009 सालापर्यंत कुलाबा, राजापूर आणि रत्नागिरी असे लोकसभा मतदारसंघ होते.
2008 सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेतून या तीन मतदारसंघांचे ‘रायगड’ आणि ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ असे दोन मतदारसंघ तयार झाले.
यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत पसरला आहे.
भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठ्या भूभागावरील या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, तर सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी असे विधानसभेचे सहा मतदारसंघ मोडतात.

फोटो स्रोत, Getty Images
आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जो भाग येतो, त्या भागाचं 1957 ते 1971 या काळात समाजवादी नेते नाथ पै आणि 1971 ते 1991 या काळात समाजवादी नेते मधु दंडवते यांनी प्रतिनिधित्व केलं होतं.
माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही 1996 ते 2009 या काळात या भागातून चारवेळा खासदार म्हणून निवडून येत शिवसेनेचं संसदेत प्रतिनिधित्व केलं आहे.
इथवर म्हणजे 2009 पर्यंत या मतदारसंघाचं नाव ‘राजापूर’ होतं. 2008 साली पुनर्रचनेनंतर ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ असं नामकरण झालं आणि नव्या नावासह झालेल्या 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव करत, काँग्रेसच्या तिकिटावर निलेश राणे हे खासदार बनले.
नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या व्रतस्थ राजकारण्यांचा या मतदारसंघाला वारसा आहे. आजही या मतदारसंघातले बुजुर्ग या द्वयींची आदरानं आठवण काढतात. मात्र, वर्तमान राजकारणी पै-दंडवते द्वयींचा वारसा जपतात का, हा प्रश्न इथल्या लोकांना नकारार्थी मान डोलवण्यास भाग पाडतो.
आताची राजकीय समीकरणं काय आहेत?
या मतदारसंघातल्या सहा विधानसभा जागांपैकी तीन रत्नागिरी जिल्ह्यात आणि तीन सिंधुदुर्गात येतात. शिवसेनेची ताकद असलेल्या या मतदारसंघात होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानं पक्षात फूट पडल्यानं शिवसेनेची ताकदही ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटात विभागली गेली होती.
दुसरीकडे, भाजपची ताकद नारायण राणेंच्या पक्ष प्रवेशानं वाढली असली, तरी त्या ताकदीलाही मर्यादा होत्या. मात्र, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे आता भाजपप्रमणित महायुतीतले साथीदार असल्यानं स्वतंत्र भाजपची नसली, तरी महायुती म्हणून ताकद बऱ्यापैकी वाढल्याचं दिसून आलं होतं.

गेल्या दोन-तीन दशकांपासून कोकणातल्या या भागात शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला दिसतो. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेनेच्या ताकदीला तडा गेला. त्यामुळं या मतदारसंघाची लढत ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. तसंच राणेंसाठीही ही वर्चस्वाची लढाई बनली होती.











