ममता बॅनर्जी आणि डॉक्टरांत सविस्तर चर्चा नाहीच, सीबीआयची प्राचार्य-पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई

फोटो स्रोत, ani
कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.
शनिवारी ममता बॅनर्जी आणि डॉक्टरांमध्ये चर्चेचा प्रयत्न झाला. पण डॉक्टर चर्चेचं थेट प्रक्षेपण करण्याच्या मागणीवर अडल्यानं ती चर्चा पुढं सरकू शकली नाही. त्यामुळं कोलकात्यात अजूनही त्यांचं आंदोलन सुरुच आहे.
शहरातील सॉल्ट लेक भागात असलेल्या स्वास्थ्य भवनच्या समोर डॉक्टर आंदोलन करत आहेत.
दुसरीकडं, सीबीआयनं या प्रकरणी माजी प्राचार्य आणि पोलिस ठाण्याचे प्रभारी यांच्यावर कारवाई केली आहे. पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
टाला पोलिस ठाण्याचे प्रभारी अभिजित मंडल यांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी (14 सप्टेंबर) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे आंदोलन करणाऱ्या ज्युनिअर डॉक्टरांची भेट घेऊन संवाद साधला. यानंतर कालीघाट येथील मुख्यमंत्री निवासस्थानी चर्चा होण्याचं ठरलं.
ठरलेल्या वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता आंदोलनकर्ता डॉक्टर मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले, मात्र चर्चेचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.
या संभाषणाचे थेट प्रक्षेपण व्हायला हवे, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. मात्र, हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने याला परवानगी देता येणार नाही, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
तत्पूर्वी शनिवारी संध्याकाळी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे, त्यांच्या उपस्थितीत पूर्ण पारदर्शकतेने सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले.
चर्चेची वेळ ठरली पण..
शनिवारी (14 सप्टेंबर) दुपारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना लवकरात लवकर कामावर परतण्याचे आवाहन केले. तसेच, नुकत्याच झालेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या डॉक्टरांवर राज्य सरकार कोणतीही कारवाई करणार नाही, अशी ग्वाही दिली.
ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पण, डॉक्टरांनी मात्र समाधानकारक पावलं उचलेपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतला.
यानंतर डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे चर्चेसाठी प्रतिनिधी पाठवण्यास सहमती दर्शवली. संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कालीघाट येथे चर्चेची वेळ निश्चित करण्यात आली.
संततधार पावसाचा अडथळा असतानाही डॉक्टरांचे प्रतिनिधी वेळेत कालीघाटावर पोहोचले. मात्र सायंकाळी साडेआठपर्यंत चर्चेबाबतचा तोडगा निघालाच नाही.

फोटो स्रोत, ani
चर्चेचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं, अशी डॉक्टरांची मागणी होती. पण, प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट असल्यानं थेट प्रक्षेपण करता येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. आम्ही याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करू, पण सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर तुम्हाला ते रेकॉर्डिंग मिळेल,” असं सांगण्यात आलं. त्यामुळं चर्चा पुढं सरकू शकली नाही.
तत्पूर्वी शुक्रवारीही (13 सप्टेंबर) डॉक्टरांचं आंदोलन सुरू असल्यानं आरोग्य व्यवस्था कोलमडली. त्यामुळं 29 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
त्याआधी गुरुवारी (12 सप्टेंबर) ज्युनिअर डॉक्टरांशी चर्चेचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी (14 सप्टेंबर) दुपारी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्ता डॉक्टरांची भेट घेतली. दोषींना सोडले जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
तत्पूर्वी, आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी (12 सप्टेंबर) रोजी एक वेळ निश्चित केली होती. मात्र आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी संवाद झाला नाही.
सचिवालयात ज्युनिअर डॉक्टरांच्या शिष्टमंडळाशी बोलण्यासाठी दोन तास वाट पाहिल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “माझा आणि माझ्या सरकारचा खूप अपमान झाला आहे. याबाबतीत बराच अपप्रचार केला गेला. मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांना न्याय नको तर माझी खुर्ची हवी आहे.”
“शिष्टमंडळातील बहुतांश लोक बैठकीत सहभागी होण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना कोणतीही तडजोड न करण्याचा आदेश बाहेरून दिला होता,” असा त्यांनी दावा केला.

फोटो स्रोत, ani
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ज्युनियर डॉक्टरांच्या आंदोलनामुळे आतापर्यंत 27 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सात लाख लोक उपचाराविना आहेत. यापेक्षा लाजिरवाणं काहीही होऊ शकत नाही.”
तिकडे पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी एक व्हीडिओ संदेश जारी केला आणि म्हटलं, “बंगालच्या लोकांबरोबर सौहार्द दाखवत मी हा संकल्प केला आहे की मी मुख्यमंत्र्यांवर सामाजिकदृष्ट्या बहिष्कार घालणार आहे.”


सामाजिक बहिष्कार म्हणजे मी मुख्यमंत्र्यांबरोबर कोणत्याही सार्वजनिक मंचावर जाणार नाही तसंच मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात मी भाग घेणार नाही असं बोस यांनी स्पष्ट केलं.
आर. जी. कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने कामावर परतण्याचं आवाहन करूनसुद्धा डॉक्टर त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. या प्रकरणी रुग्णालयाचे प्राचार्य संदीप घोष यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
हे प्रकरण योग्य पद्धतीने न हाताळल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी राजीनामा दिला आहे.
ममता बॅनर्जी राज्याच्या आरोग्यमंत्री आणि गृहमंत्रीसुद्धा आहेत. सुरुवातीला हे प्रकरण कोलकाता पोलिसांनी हाताळलं. त्यानंतर चार दिवसांनी कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच कोलकाता पोलिसांवर पुरावे नष्ट करण्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











