येशू ख्रिस्तांच्या 'या' चित्रात असं काय आहे, ज्याची विक्री तब्बल 68 कोटी रुपयांनी झाली?

फोटो स्रोत, Sotheby's
- Author, कर्टिस लँकेस्टर
15 व्या शतकातील एका अतिशय दुर्मीळ चित्राची लिलावादरम्यान तब्बल 68 कोटी रुपयांना विक्री झाली. या चित्रात येशू ख्रिस्तांनी केलेले पाच चमत्कार चित्रित करण्यात आले आहेत.
या चित्राला ट्रिप्टिक म्हणतात. ट्रिप्टिक म्हणजे तीन चित्रांचा समूह असतो.
अनेक धार्मिक आणि राजकीय चढउतार आले असताना देखील हे चित्र इंग्लडमधील डॉर्सेट प्रांतातील शेरबर्न शहरात असलेल्या आल्म्सहाऊस चॅपलमध्ये 500 वर्षांहून अधिक काळ सुरक्षित राहिले.
या चित्रासाठी बोली 3.5 दशलक्ष पाउंड ( अंदाजे 42 कोटी) पासून सुरू करण्यात आली होती. या चित्राला लिलावात 5.2 दशलक्ष पाउंड (अंदाजे 68 कोटी) रुपये इतके किंमत मिळाली आहे.
हे चित्र डॉर्सेट संग्रहालयात होतं. या चित्राची खरेदी एका ख्रिश्चन धर्मादाय संस्थेनी केली आहे.
तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, हे ब्रसेलमध्ये राहणाऱ्या एका अज्ञात चित्रकाराचे एकमेव उपलब्ध चित्र आहे.
जेव्हा या चित्राच्या विक्रीवर शिक्कामोर्तब झालं, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात या गोष्टीचं स्वागत झालं असं या लिलावाच्या वेळी उपस्थित असणारे आल्महाऊसचे पदाधिकारी माइक बुर्क्स यांनी सांगितले. ही गोष्ट अभूतपूर्व होती असं त्यांनी म्हटलं.
चित्र विकण्याचा निर्णय का घेण्यात आला?
आल्म्स हाऊसच्या वास्तूचा पुननिर्माण होत आहे आणि त्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता होती. त्याच वेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या या चित्राचे मूल्य किती आहे, हे तपासून पाहिले आणि त्यानंतर जर हे चित्र आपण विकले तर वास्तूच्या निर्मितीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होईल.
बुर्क्स सांगतात की, या निधीमुळे आम्हाला शेरबर्न शहरातल्या अनेकांची मदत करता येणार आहे. तसेच, धर्मदाय कार्यक्रमांसाठी पुरेसा निधी हातात राहिल्यामुळे आमचे कार्य अखंडितपणे सुरू राहील असा विश्वास बुर्क्स यांनी व्यक्त केला.

फोटो स्रोत, Jaggery
बुर्क्स यांनी सांगितले की, त्यांना आनंद होत आहे की हे चित्र पुन्हा एका ख्रिस्ती धर्मदाय संस्थेकडेच राहील आणि तो लोकांना पाहता येईल.
शेरबर्नचे आल्महाऊस 1437 मध्ये राजे हेन्री- 6 यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते. या धर्मदाय संस्थेचे नेतृत्व त्यावेळी बिशप ऑफ सॅलसबरी, रॉबर्ट नेविल यांनी केले होते.
निराधारांचे सेवा करणे हेच या संस्थेचे ब्रीद आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











