'सहा-सात महिने कापूस घरात पडून आहे, 7 हजाराचा दर आहे; यात आमचा खर्चही निघत नाही'

फोटो स्रोत, getty images
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेनं राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांना कापूस घरात तसाच ठेवला आहे.
पण, गेल्या काही महिन्यांमध्ये कापसात दरात वाढ झाल्याचं चित्र नाहीये. कापसाचा दर प्रती क्विंटल 7000 ते 7500 रुपयांच्या दरम्यान राहिला आहे.
अशातही काही शेतकरी भाववाढीची अपेक्षा ठेवून आहेत. पण, भविष्यात कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे का, याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
कापूस उत्पादक चिंतेत
Agmarknet ही भारत सरकारची अधिकृत वेबसाईट आहे, जिथं तुम्हाला देशभरातील बाजारपेठांमधील वेगवेगळ्या पिकांचे बाजारभाव पाहता येतात.
वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2023 पासून कापसाचा दर जैसे थे असल्यासारखा आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या डोनवडा येथील शेतकरी कैलास पवार यांनी 4 एकर क्षेत्रावरील 20 क्विंटल कापूस 6 महिन्यांपासून घरात ठेवला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “6 ते 7 महिने झाले कापूस घरात पडून आहे. भाव वाढतच नाहीये. 7 हजारापर्यंत भाव भेटत आहे. या भावात तर आमचा खर्चपण निघत नाही.
कापसाचा सीझन ज्यावेळी सुरू झालं होतं तेव्हा 7700 ते 7800 पर्यंत भाव मिळत होता. त्यामुळे तो वाढून 8000 ते 8500 रुपयांपर्यंत जाईल असं आम्हाला वाटलं होतं, पण भाव कमीच होत गेला.”
कापसाच्या दरात जवळपास 800 रुपयांची घसरण
Agmarknet या वेबसाईटवरील आकड्यांनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये कापसाला सरासरी 6904 रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळाला.
आता 6 महिन्यांनंतर या दरात केवळ प्रती क्विंटल 74 रुपये एवढी वाढ झाली आहे.
2024 च्या 16 ते 23 एप्रिल या आठवड्यात कापसाला प्रती क्विंटल सरासरी 6 हजार 978 इतका दर मिळत आहे.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कापसाला जो दर मिळतोय त्यात प्रती क्विंटल 763 रुपयांनी घसरण झाली आहे.
2023 च्या 16 ते 23 एप्रिलच्या आठवड्यात कापसाला प्रती क्विंटल सरासरी 7 हजार 741 रुपये इतका दर मिळाला होता.
कापसाचे दर वाढत का नाहीयेत?
महाराष्ट्र राज्य कॉटन फेडरेशनचे सेवानिवृत्त महाप्रबंधक गोविंद वैराळे सांगतात की, “कापसाचे दर गेल्या काही महिन्यांपासून कमी झाले आहेत. यामागे काही प्रमुख कारणं आहेत. त्यामध्ये देशातील कापसाच्या उत्पादनात वाढ झाली आहे हे एक कारण आहे.
“यासोबतच आंतरराष्ट्रीय मार्केटमधील रुईचे दर 100 सेंटपर्यंत होते, ते आता 82 ते 85 सेंटपर्यंत खाली आले आहेत. तिसरं कारण म्हणजे याआधी सरकीचे रेट वाढलेले होते. तेसुद्धा आता कमी झाले आहेत. या कारणांमुळे कापसाचे दर वाढत नाहीयेत.”

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
विदर्भातील कापूस अभ्यासक स्वप्निल कोकाटे यांच्या मते, “सुरुवातीला कापसाला 8300 पर्यंत भाव मिळाला. तो आता घसरून 7300 रुपये प्रती क्विंटल झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे भाव कमी झाले की ते आपल्याकडेही कमी होतात.”
विदर्भात 25 ते 30 % शेतकऱ्यांनी अद्याप घरातच कापूस साठवून ठेवला असल्याचंही ते पुढे सांगतात.
भविष्यात कापसाचे बाजारभाव वाढतील का?
गोविंद वैराळे यांच्या मते, “कापसाला सध्या 7000 ते 7500 रुपये प्रती क्विंटल एवढा दर मिळत आहे. पुढच्या काळात दर यापेक्षा खालावण्याची शक्यता कमी आहे. कापसाच्या दरात वाढ झाली तर ती 10 % होऊ शकते.”

फोटो स्रोत, bbc
तर स्वप्निल कोकाटे सांगतात,"जानेवारीनंतर भाव वाढले होते, पण ते पुन्हा कमी झाले. मे महिन्याच्या सुरुवातीला कापसाचे भाव पीक लेव्हलला असतात. पण, यंदा उलटी परिस्थिती दिसत आहे. भविष्यातही कापसाचे भाव वाढण्याची शक्यता दिसत नाहीये."
पण, ही झाली शेतमाल अभ्यासक आणि इंडस्ट्रीमधील कापूस पिकाशी संबंधित लोकांची मतं. पण, या मतांसोबतच शेतकऱ्यानं स्थानिक बाजारपेठेतील बाजारभावातील चढ-उतार बघून कापसाची विक्री करणं कधीही योग्य ठरू शकतं.











