'व्हेनेझुएला'नंतर अमेरिकेची जागतिक भूमिका ठरणार का? ट्रम्प यांच्या राजकारणावर काय परिणाम?

फोटो स्रोत, US government
- Author, अँथनी झुर्कर
- Role, उत्तर अमेरिका प्रतिनिधी
व्हेनेझुएलामध्ये कारवाई केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्र-निर्मितीच्या अजेंड्यावर परतल्याचं पाहायला मिळालं.
शनिवारी (3 जानेवारी) सकाळी, ट्रम्प यांनी त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये एका महत्त्वाची आणि सगळ्याचं लक्ष वेधून घेणारी पत्रकार परिषद घेतली.
काराकासमध्ये केलेल्या कारवाईत अमेरिकेच्या सैन्यानं व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केल्याचं ट्रम्प यावेळी म्हणाले.
परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांचा समावेश असलेली एक टीम व्हेनेझुएलामधील लोकांबरोबर काम करत असून, अतिशय कठीण अशा परिस्थितीत सापडलेल्या या राष्ट्राची जबाबदारी तेे घेतील असंही ट्रम्प म्हणाले.
"जोपर्यंत आम्ही एक सुरक्षित, योग्य आणि न्याय्य सत्तांतर करत नाही, तोपर्यंत आम्ही या देशाचा कारभार चालवणार आहोत," असं ट्रम्प यांनी सांगितलं.
'देशाचा कारभार चालवणं' म्हणजे नेमकं काय, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या वक्तव्यातून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या धोरणात अचानक झालेला बदल दिसतो.
पण त्यात अतिशय कठीण, आव्हानात्मक अडथळे असून या धोरणात अनेक विरोधाभासही आढळतात.
'इफ यू ब्रेक इट, यू ओन इट'
ट्रम्प यांनी नेहमीच, 'कायमस्वरुपी चालणाऱ्या युद्धां'च्या विरोधात प्रचार केला. सत्तापालट करण्याच्या भूतकाळातील अमेरिकेच्या प्रयत्नांवर तीव्र टीका केली आणि 'अमेरिका फर्स्ट' हे परराष्ट्र धोरण लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं.
पण राष्ट्राध्यक्ष असलेलेच तेच ट्रम्प आता, दक्षिण अमेरिकेतील एका अशा देशात कारवाई करत आहेत. विशेष म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेल्या स्थितीत आहे आणि अनेक दशकांच्या हुकुमशाहीमुळं या देशाचं राजकीय स्थैर्य खिळखिळं आहे.
पण अशा अडचणी असतानाही डोनाल्ड ट्रम्प प्रचंड आशावादी होते.
त्यांच्या प्रशासनाचा 'न हारता जिंकण्याचा इतिहास आहे' आणि यावेळेसदेखील तसंच होईल, असं ते म्हणाले.
व्हेनेझुएलातील ढासळलेल्या औद्योगिक पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्याचं काम अमेरिकेतील ऊर्जा कंपन्यांना देण्यासाठीची वचनबद्धता त्यांनी दाखवली.
व्हेनेझुएलाच्या पुनर्बांधणीच्या कामातील अमेरिकेच्या प्रयत्नांसाठी त्यामुळं निधी उपलब्ध होईल आणि त्यातून व्हेनेझुएलाच्या लोकांचा फायदा होईल, असं त्यांचं मत आहे.

फोटो स्रोत, Donald Trump / TruthSocial
हे प्रयत्न पुढे नेण्यासाठी अमेरिकेचे सैनिक व्हेनेझुएलामध्ये तैनात करण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळली.
"आम्ही तिथे सैन्य पाठवायला घाबरत नाही. काल रात्री आमचे सैनिक तिथे उतरले होते," असं ट्रम्प पत्रकारांना म्हणाले.
ट्रम्प यांनी इराकवरील अमेरिकेच्या आक्रमणावर तीव्र टीका केलेली आहे. मात्र त्यांना आता अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल यांचे, "इफ यू ब्रेक इट, यू ओन इट" हे शब्द लक्षात घ्यावे लागतील.
त्याचा अर्थ, जर तुम्ही काही नुकसान केलं, तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असता आणि त्याची किंमत तुम्हालाच मोजावी लागते.
कॉलिन पॉवेल यांना इराक युद्धाच्या शिल्पकारांपैकी एक मानलं जातं.
या कारवाईद्वारे, अमेरिकेनं व्हेनेझुएलाचं भवितव्य बदलून टाकलं आहे. मत ते चांगलं असेल किंवा वाईट असेल.
शांततेचा पुरस्कार करणारे ट्रम्प लष्करी कारवाईस उत्सुक
जवळपास वर्षभरापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यावेळेस त्यांनी शांततेचा पुरस्कार करणारे किंवा शांतता दूत होण्याचं आश्वासन दिलं होतं.
मात्र गेल्या वर्षभरात त्यांनी हे दाखवून दिलं आहे की, ते जगभरात कुठेही लष्करी बळाचा वापर करण्यासाठी ते तयार असून त्यात ते संकोच करणार नाहीत.
गेल्या आठवड्यात, डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरिया आणि नायजेरियावर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले होते.
2025 मध्ये त्यांनी इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांना, कॅरेबियन भागातील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या संशयित बोटींना, येमेनमधील बंडखोर गटांना, सोमालियातील सशस्त्र गटांना आणि इराकमधील इस्लामिक कट्टरतावाद्यांना लक्ष्य केलं होतं.
पूर्वीच्या कारवायांच्या तुलनेत ट्रम्प यांचा व्हेनेझुएलातील हल्ला आणि त्या देशाच्या भवितव्याबद्दलची त्यांची वचनबद्धता लक्षणीयरित्या वेगळी आहे.
आधीच्या कारवायांमध्ये प्रामुख्यानं क्षेपणास्त्रं आणि विमानांचा वापर करण्यात आला होता. कारण यामुळे अमेरिकेच्या सैन्याला असणारा धोका कमी होतो.
ट्रम्प यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की "व्हेनेझुएलाला पुन्हा महान बनवणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे."
मागा समर्थकांना व्हेनेझुएलातील कारवाई पचणं कठीण
ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन'च्या काही समर्थकांना कठीण जाऊ शकतं.
काँग्रेसच्या सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन या ट्रम्प यांच्या एकेकाळच्या निष्ठावान समर्थक होत्या. मात्र ट्रम्प यांनी त्यांचा राजकीय आधार सोडून दिल्याचा आरोप करून त्या ट्रम्प यांच्यापासून दुरावल्या होत्या.
या कारवाईनंतर त्यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या कृतीचा लगेचच निषेध केला.
त्यांनी लिहिलं आहे, "अमेरिकेच्या सरकारच्या कधीही न संपणाऱ्या लष्करी आक्रमकतेबद्दल आणि परदेशातील युद्धांना त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल अमेरिकेतील लोकांमध्ये असलेला तिरस्कार रास्त आहे. कारण या गोष्टींसाठीच्या खर्चाचा भार आम्हाला उचलावा लागतो."
"रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन्ही पक्ष अमेरिकेच्या लष्करी यंत्रणेला नेहमीच निधी पुरवत राहतात. मागा या घोषणेला पाठिंबा देणाऱ्या अनेकांना वाटलं की त्यांनी हे थांबवण्यासाठीच मतदान केलं आहे. मात्र आम्ही पूर्णपणे चुकीचे होतो, हे आमच्या आता लक्षात आलं आहे."
केंटुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेस सदस्य थॉमस मॅसी ट्रम्प यांचे आणखी एक प्रमुख टीकाकार आहेत.
त्यांनी मादुरो यांच्या अटकेमागील कायदेशीर कारण - शस्त्रास्त्रं आणि कोकेनच्या तस्करीचे आरोप - आणि ट्रम्प यांनी त्यासाठी दिलेल्या स्पष्टीकरणाची तुलना केली.
ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, दंडात्मक कारवाईसाठी जप्त करण्यात आलेलं अमेरिकेचं कच्चे तेल परत मिळवण्यासाठी आणि फेंटनीलचं उत्पादन थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
मनरो डॉक्ट्रिनला पुन्हा उजाळा
रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश खासदारांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. हाऊसचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी याचं वर्णन, 'गुन्हेगारी राजवटी'च्या विरोधातील 'निर्णायक आणि न्याय्य' लष्करी कारवाई असं केलं होतं.
ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, व्हेनेझुएलातील कारवाईमुळे त्यांच्या 'अमेरिका फर्स्ट'च्या प्राधान्यक्रमांना चालना मिळाली आहे. कारण यामुळे अमेरिकेच्या प्रादेशिक सुरक्षेची खातरजमा झाली आहे आणि कच्च्या तेलाचा एक स्थिर स्त्रोत उपलब्ध झाला आहे.
'मनरो डॉक्ट्रिन' किंवा 'मनरो सिद्धांत', हे 19 व्या शतकाच्या सुरुवातीचं अमेरिकेचं परराष्ट्र धोरण होतं.
त्यात पश्चिम गोलार्ध युरोपातील सत्तांच्या प्रभावापासून मुक्त असावा, असं ठामपणे आणि स्पष्टपणे म्हटलं होतं. या मनरो डॉक्ट्रिनला त्यांनी पुन्हा पुढे आणलं आणि त्याला, 'डोनरो डॉक्ट्रिन' असं नवीन नाव दिलं.

फोटो स्रोत, Truth Social/CBS
ट्रम्प म्हणाले की व्हेनेझुएलातील कारवाईतून दिसून येतं की "पश्चिम गोलार्धातील अमेरिकेच्या वर्चस्वाबाबत पुन्हा कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाणार नाही."
अमेरिकेच्या नव्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचं उद्दिष्ट, "आमच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यापार, भूप्रदेश आणि संसाधनांचं रक्षण करणं", हे आहे असंही ते म्हणाले.
त्यांनी पश्चिम गोलार्धाला अमेरिकेचा 'घरचा भूप्रदेश' असं म्हटलं.
मादुरो यांना पकडण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक राजकारणाबाबत गंभीर आणि व्यापक समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्याचा जगातील इतर प्रमुख लष्करी सत्तांबरोबरच्या अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम होईल.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं या कारवाईनंतर एक वक्तव्य जारी केलं आहे. त्यात त्यांनी या कारवाईमुळे धक्का बसल्याचं म्हटलं आहे आणि एका सार्वभौम देशावरील अविचारी हल्ल्याचा निषेध केला आहे.
बायडन सरकारच्या कार्यकाळात, रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेनं अशाच प्रकारे तीव्र निषेध केला होता.
आता ट्रम्प सरकार रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा करार रशियासाठी अधिक अनुकूल असल्याचं वारंवार दिसून आलं आहे.
रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सनी केली टीका
डॉन बेकन हे रिपब्लिकन पक्षाचे मध्यममार्गी काँग्रेस सदस्य आहेत. ते यावर्षाच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. ट्रम्प यांच्या कारवाईमुळे कोणता संदेश जाऊ शकतो, याबद्दल चिंता व्यक्त केली.
ते म्हणाले, "माझी मुख्य चिंता अशी आहे की, आता रशिया याचा वापर युक्रेनविरोधातील त्यांच्या बेकायदेशीर आणि क्रूर लष्करी कारवाईचं समर्थन करण्यासाठी करेल किंवा चीन याचा वापर तैवानवरील आक्रमणाचं समर्थन करण्यासाठी करेल."
डेमोक्रॅटिक पक्षातील ट्रम्प यांच्या टीकाकारांनी अधिक थेट भूमिका घेतली.

फोटो स्रोत, Getty Images
हवाईचे ब्रायन शाट्झ सीनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे सदस्य आहेत. ब्रायन म्हणाले, "अमेरिकेनं कोणत्याही कारणामुळे इतर देशांचा कारभार चालवू नये.
आतापर्यंत आपण हे शिकायलं हवं होतं की अंतहीन युद्धांमध्ये आणि राजवट बदलण्याची मोहिमांमध्ये आपण गुंतू नये. याचे अमेरिकेतील लोकांवर विनाशकारी परिणाम होतात."
काँग्रेसचे सदस्य हकीम जेफ्रीज, नोव्हेंबर नंतरच्या मध्यावधी निवडणुकांनंतर जर डेमोक्रॅटिक सदस्यांनी पुन्हा सभागृहावर नियंत्रण मिळवलं तर हाऊसचे अध्यक्ष होऊ शकतात.
हकीम म्हणाले की मादुरो हे एक गुन्हेगार आहेत आणि मानवाधिकारांचं उल्लंघन करण्याचा इतिहास असलेले हुकुमशहा आहेत. मात्र, हा हल्ला करण्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांशी सल्लामसलत न करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला.
ते म्हणाले, "डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायद्याचं पालन करण्याची आणि अमेरिकेतील लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी आहे. अमेरिका फर्स्ट धोरणासाठी हेच आवश्यक आहे."
ट्रम्प यांचं भवितव्य पणाला
ट्रम्प त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते की त्यांनी हा हल्ला करण्यापूर्वी काँग्रेसला याची कल्पना दिली नाही, कारण त्यांना या हल्ल्याचे तपशील 'लीक' होतील अशी चिंता वाटत होती.
ही लष्करी कारवाई यशस्वी झाली. यात अमेरिकेच्या एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नाही आणि अमेरिकेच्या उपकरणांचंही मर्यादित नुकसान झालं.
ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या बढाईखोर, दिखाऊ शैलीत या कारवाईचं वर्णन 'भव्य हल्ला' आणि "अमेरिकेच्या इतिहासातील, अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचं आणि कार्यक्षमतेचं सर्वात आश्चर्यकारक, प्रभावी आणि शक्तिशाली प्रदर्शन असं केलं."

फोटो स्रोत, Getty Images
या कारवाईच्या यशावर ते आता त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाचं भवितव्य पणाला लावत आहेत. कारण अमेरिका म्हणते आहे की, ते व्हेनेझुएलाचा कारभार पाहतील आणि त्याची पुनर्बांधणी करतील.
अर्थात याचा नेमका अर्थ काय आहे, याची आपल्याला कल्पना नाही.
ट्रम्प आणि त्यांच्या टीमनं, अनेक दशकांपासून अशांत असलेल्या या देशाला मजबूत केलं पाहिजे. तर त्याचवेळी या प्रदेशातदेखील स्थैर्य आणलं पाहिजे.
ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणात त्यांच्यासाठी काय दडलेलं आहे, याबद्दल हा प्रदेश निश्चितपणे अतिशय सावध असेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.













