मिसेस: पितृसत्तेचं वास्तव की फेमिनिझमचं षड्यंत्र?

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
- Author, लक्ष्मी यादव
- Role, बीबीसी मराठीसाठी
"तुला साडी घालून चुलीवर पुरणपोळीचा स्वयंपाक येतो का?" काही वर्षांपूर्वी माझ्या नोकरी करणार्या बहिणीला लग्नासाठी गावाकडं पाहायला आलेल्या मुलानं प्रश्न विचारला होता. या स्थळाला तिनं नकार दिला.
काही वर्षांनंतर माझ्याकडं एक ओळखीतला मुलगा त्याची केस घेऊन आला होता. त्याला घटस्फोट हवा होता. खरं तर त्याचं काहीच महिन्यांपूर्वी लग्न झालेलं, त्यामुळं लगेच घटस्फोट घ्यायची वेळ का आली हे समजून घ्यायचा मी प्रयत्न केला.
त्यानं सांगितलं की त्याची बायको भांडण करते आणि म्हणते, "मी एकटीनंच पहाटे उठायचं, सगळ्यांचा नाश्ता बनवायचा. ऑफिसचे डबे, घरच्यांचं जेवण बनवायचं. सगळे निवांत, उशिरा उठतात. मग सगळ्यांचा चहा, नाश्ता द्यायचा, घराची साफ सफाई करायची. हे सगळं मीच एकटीनं का करायचं?"
मुलाचं म्हणणं, "लग्नाआधी माझी आई हे सगळं करायची, माझ्या मावशा पण करतात. सगळ्याच बायका करतात. हिलाच काय प्रॉब्लेम आहे?"
अर्थातच त्याचा घटस्फोट झाला.
मिसेस सिनेमा: सोशल मीडियावरील वाक्-युद्ध
सध्या 'मिसेस' या हिंदी सिनेमावर सोशल मीडियावर अनेक लोक लिहीत आहेत. 'द ग्रेट इंडियन किचन' या सिनेमावर आधारित हा सिनेमा आहे.
'मिसेस' सिनेमात एक नृत्य शिक्षिका लग्न करून नवर्याच्या घरी येते आणि इथे कशा पद्धतीनं घरकामात तिची पिळवणूक होते, तिला तिचे करिअर करू दिले जात नाही, मानसिक, शारीरिक आणि लैंगिक त्रास होतो हे दाखवलं आहे.
बहुतांश पुरुष या सिनेमावर भडकले आहेत आणि कमेंट करणार्या सगळ्या स्त्रियांना हा सिनेमा आपलीच कथा पडद्यावर उतरली आहे असं काहीसं वाटत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पुरुषांच्या हक्कांसाठी सत्याग्रह करायची आवश्यकता असं सांगणारे 'पुरुष बचाव' गटाचे लोक या सिनेमांचा वापर आपल्या प्रचारासाठी करत आहेत. मिसेस, द ग्रेट इंडियन किचन, द डार्लिन्स आणि थप्पड या सिनेमांच्या खाली 'फेमिनिजम इज अ कॅन्सर' अशी टॅगलाईन लावून त्यांचा अपप्रचार करत आहेत.
काहींना हे एक संस्कृती भ्रष्ट करून आणखी कोणती तरी संस्कृती आणायचं फेमिनिजमचं षड्यंत्र वाटतं आहे, तर काही लोक 'ये फिल्म देखकर मेरी दादी ने कहा की इस करम मोहीको दो आदमीयोंका खाना नही हो रहा' असा मेसेज शेयर करत आहेत. यातल्या कमेंट्स समजून घ्यायला हव्यात कारण त्या समाजमनाचा आरसा आहेत.
या सिनेमातील पुरुषांच्या कमेंट्स वाचून वाटलं होतं की, यात पुरुषांना धक्का बसेल असं काहीतरी असेल. पण सिनेमा पाहिल्यावर लक्षात आलं की हा सिनेमा स्त्रिच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल बोलतो. स्त्रीच्या पुरुषाच्या, पितृसत्तेच्या बरोबरच्या संघर्षावर हा सिनेमा भाष्य करतो.


लग्न: बाईचं आयुष्य पलटवणारा टप्पा
लग्न झाल्यावर रिचासारख्या अनेक मुली अनेक सुंदर स्वप्नं घेऊन सासरी येतात. मुलगी आपलं घर सोडून येते. नवऱ्याच्या घराला आपलं घर समजून तिथं राहते. हे सोपं नाही.
मागची अनेक वर्षे ज्या नावानं ती व्यक्ती ओळखली जाते ते आडनाव, कधीकधी नावही बदललं जातं. नाती बदलतात, व्यक्त होण्याच्या जागा बदलाव्या लागतात. आई वडिलांना, भावंडांना सोडून राहावं लागतं. सगळा भवतालच बदलतो. यातील कोणतीच गोष्ट करणं या जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी अवघडच आहे.
एखाद्या पुरूषांनं हे करण्याचा विचार करून पाहावा. निदान आपल्या आई वडिलांना सोडून बायकोच्या घरी जाऊन आयुष्यभर राहायची नुसती कल्पना तरी करून पाहावी (माहिती आहे, पुरुष कल्पना पण करून पाहणार नाहीत; त्यांना कमीपणा येईल).
आजपर्यंत सगळया स्त्रिया हेच करत आल्या आहेत, आपली ही रीत आहे असं म्हणणं म्हणजे अन्यायकारक पितृसत्तेला संस्कृतीच्या गोड आवरणाखाली झाकणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
'ही आपली चालत आलेली संस्कृती आहे' असं भारतात म्हटलं की त्यात जे-जे येईल ते-ते गपगुमान करावं लागतं. लग्न करायचं आहे का, मूल हवं आहे का हे तिच्यासाठी पर्यायी प्रश्न नसतात.
अशा संस्कृतीबद्दल स्त्रियाही प्रश्न विचारत नाहीत. मुलीनेच हे सगळं करायचं याच्यामागं काय लॉजिक किंवा शास्त्र आहे बरं?
स्त्रीनं विवाहसंस्थेला, पुरूषांना चालत आलेल्या चुकीच्या रूढी परंपरांबद्द्ल प्रश्न विचारले की ते अस्वीकारार्ह असतं.
भारतात आदर्श स्त्री, आदर्श पत्नी अशा संकल्पना आहेत. समंजस, गृहिणी, मनमिळावू, सुपरवूमन, सहनशील, पतिव्रता, उलट न बोलणारी, पदर पडू न देणारी, नवर्यानं छळलं तरी सहन करणारी असे आणखी बरेच गुण असलेली स्त्री चांगली बायको असते.
मात्र लग्नासाठी मुलाला नोकरी, जमीन किंवा घर असावे अशाच अपेक्षा असतात.
लग्न झालं की बर्याचदा पुरुषाच्या आयुष्याचा आलेख वरच्या दिशेनं वाढत जातो, तर स्त्रियांचा खालच्या दिशेनं झुकतो.
तिचं आयुष्य कुटुंब, किचन याभोवती गुंडाळलं जातं. त्यामुळेच रिचा जेव्हा डान्स टीचर म्हणून नोकरी करायचं म्हणते तेव्हा दिवाकर लगेच म्हणतो, "हॉबी को करियर कौन बनाता है?"
महिलांच्या आयुष्यातील मॅरेज आणि चाईल्ड पेनल्टी?
भारतातच नव्हे तर जगभरात लग्नानंतर स्त्रियांनी कुटुंबाला प्राथमिकता देण्यासाठी म्हणून नोकरी सोडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. यालाच 'मॅरेज पेनल्टी' असाही शब्द वापरतात.
अनेक घरांमध्ये स्त्रिया घरातील सगळ्या जबाबदार्या पार पाडतात, तरी त्यांना करियर करू देत नाहीत. अनेक मुलींना लग्नाआधी नोकरी करू देणार असं सांगतात, पण लग्नानंतर मूल झाल्यावर मुलाचंच बघ आता, एक मूल झालं की दुसरं हवं.
मुलं मोठी होताना त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष नको, नवर्याच्या करिअरमध्ये अडथळा नको, मी कमावतो आहे ना, मग तुला काम करायची काय गरज आहे, आमच्या खानदानातील महिला घराबाहेर कामं करत नाहीत अशा दुष्टचक्रात बायकांना अडकवलं जातं. यातून बाहेर पडण्यासाठी महिलांना खूप संघर्ष करावा लागतो.

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक बँकेच्या 2024 मधील एका अभ्यासानुसार लग्नानंतर 12 टक्के महिला नोकरी सोडतात. 2023 मध्ये काम करणार्या महिलांचं प्रमाण 32 टक्के आणि पुरुषांचं 77 टक्के आहे.
महिला जर उत्पादन क्षेत्रात आल्या, तर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 51 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं असं विधान जागतिक बँकेचे दक्षिण आशियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ फ्रांझीस्का यांनी केलं आहे.
स्वयंपाकघर: महिलांच्या नवनिर्मितीपुढील आव्हान?
"किचनमध्ये स्त्रिच्या सगळ्या क्रियेटीव्हिटी मरतात," लग्नाआधी नोकरी करणारी पण आता किचनमधून बाहेर पडू न शकणारी एक मैत्रीण म्हणाली होती.
अनेक हुशार, करिअर करू इच्छिणाऱ्या, फिरायची आवड असणाऱ्या मुलींचं आयुष्य घरापुरतं मर्यादित राहातं. त्यांच्या कामाची यादी संपतच नाही आणि त्या कधी घराबाहेर पडतच नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
पुरुषांच्या कामाची व्याख्या ही फक्त घराबाहेर कामावर जाण्याशी संबंधित असते. महिलांसाठी ती तशी बिलकुल नसते. "दिवाकर काम से आकर थक जाते है और यहाँ काम ख़तम ही नहीं होता."
सिनेमातील हिरोईन म्हटल्याप्रमाणे ती एक तर दिवसरात्र, रविवारी, नवरा मुलांच्या सुट्टी दिवशीसुद्धा कामच करत असते. ती कधीच सुट्टी नसलेली, घर, मुलं, नोकरी असं सगळं सांभाळणारी 'सुपरवूमन' असते. हे चित्र पुरुषांनी समजून घेण्याची गरज आहे.
महिलांना लग्न संबंधात संपत्ती मिळते?
याबद्दल बरेच तरुण असं म्हणताना दिसतात की मुलींना सहा आकडी पगार कमावणारा नवरा हवा असतो, मग त्या घर सोडून का येणार नाहीत? या तर्कानं मुलांना सहा आकडी पगार कमावणारी बायको मिळाल्यावर ते सासरी जातात का नांदायला?
दूसरा मुद्दा, या सहा आकडी पगारातील किती पगार त्या स्त्रीला मिळतो किंवा नवर्याच्या संपत्तीमधील किती संपत्ती बायकोच्या नावावर होते? आपल्याकडे विवाहांतर्गत संपत्तीविषयक व्यवस्थित कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे लग्न झालं तरी नवर्याचा पगार, संपत्ती, घर यातील कोणतीच गोष्ट बायकोच्या नावावर होत नाही.
अजूनही अनेक स्त्रिया टिकलीसाठी पण नवर्याच्या पैशांच्या 'मोहताज' असतात. आदल्या दिवशी भाजीसाठी दिलेल्या पैशांचा हिशेबसुद्धा अशावेळी नवरा मागतो.
स्त्रीला नवर्यासोबत राहायची चॉइस आहे की तिला वाटत नसताना त्याच्या सोबत राहावं लागतं? अनेकदा स्त्रिच्या नावावर सासरची मालमत्ता नसते आणि माहेरचीसुद्धा.
माहेरची संपत्ती भावावरील प्रेमापोटी देऊन मोकळ्या झालेल्या स्त्रियांना नवरे त्यांच्या घरात "चल, निघ इथून. तुझ्या बापाचं काय आहे इथं?" असं सुनावतात.

फोटो स्रोत, Getty Images
काही सेलिब्रेटींना घटस्फोटानंतर मिळालेल्या पोटगीची उदाहरणं पाहून अनेक पुरूषांना वाटतं की, सगळ्या घटस्फोटीत महिलांना पोटगी मिळते. मात्र, 2013 मध्ये 'भारतातील विभक्त आणि घटस्फोटीत महिला: आर्थिक हक्क' या पुस्तकाच्या निमित्ताने केल्या गेलेल्या अभ्यासातील आकडे वेगळंच वास्तव सांगतात.
या अभ्यासानुसार, 47 टक्के स्त्रिया पोटगी मागत नाहीत, 49 टक्के पोटगीच्या केस प्रलंबित आहेत, 42 टक्के केसमध्ये पोटगी दावा दाखल करून घेतला, 9 टक्के दावे फेटाळले गेले आणि फक्त 36 टक्के महिलांना पोटगी मिळाली.
71 टक्के महिलांना विभक्त झाल्यावर सासरचं घर सोडून माहेरी यावं लागलं आणि त्यातील 42 टक्के महिलांचे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते.
जगभरातील एकूण कामांपैकी 60 टक्के काम महिला करतात आणि त्यांच्या नावावर 1 टक्क्याहून कमी संपत्ती आहे. इंडिया ह्यूमन डेवलपमेंट सर्व्हे 2010-11 नुसार फक्त 6 टक्के महिलांच्या नावावर जमीन आहे.
विवाहसंस्थेतील पुरुषत्व
"घरकामातही मीच मदत करायची असेल तर मी लग्न कशाला केलं? आणि लोक काय म्हणतील?" एक ओळखीतला मुलगा एका चर्चेत म्हणाला.
पितृसत्ताक व्यवस्थेत पुरूषांची वाढ कशी होते याचं वर्णन करताना एक पुरुष संवेदनशील मित्र प्रांजळपणे कबूल करत म्हणाला, "आम्हा पुरूषांना लहानपणापासून लीडरच्या भूमिका दिल्या जातात. घरात बहिणीचा लीडर, शाळेत, सगळ्या ठिकाणी लीडर."
"कामाच्या ठिकाणीसुद्धा टीम लीडर, अन् मग एके दिवशी एक स्त्री माझ्या आयुष्यात येते आणि मला सांगायला लागते की तू चुकीचं वागतो आहेस. मला शॉक बसतो. आजवर माझ्या चुका कुणीही काढलेल्या नसतात, आता तुला सुधारावं लागेल असं बायको सांगते."
"मला अनेकदा कळत असतं की, मी चुकतो आहे, माफी मागायला हवी, माझ्यातील काही गोष्टी बदलायला हव्यात. पण माझा अहंकार आडवा येतो."
बायकोनं घरात काम नाही केलं किंवा पारंपरिक भूमिका केली नाही, तर त्याची इज्जत जाईल ही पण त्याला भीती असते. घरातले, बाहेरचे, नातेवाईक, मित्र सगळे त्यालाच दोष देतात आणि म्हणतात, "तुझ्याच्यानं बायको सांभाळली जात नाही. कसली आहे तुझी बायको?"
अशावेळी नवरा किती योग्य आणि ठाम भूमिका घेतो, घरकामाची जबाबदारी वाटून घेतो हे महत्त्वाचं ठरतं. त्या पुरुषाचं अनुकरण त्याची मुलं करणार असतात ही पुढची महत्त्वाची पायरी.

फोटो स्रोत, Getty Images
ऑफिसमध्ये जेवल्यावर जेवण केलेला साधा डबाही धुवून आणता येत नाही, स्वतःचे कपडे धुणे तर लांबची गोष्ट. मात्र स्वतःचे कपडे कपाटातून काढून घेणंही जमत नसेल, तर पुरुषांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
ते जेव्हा स्त्रीला 'मी आहे म्हणून तुला सांभाळलं' असं म्हणतात, तेव्हा अनेक बाबींसाठी पुरुष स्त्रियांवर अवलंबून आहेत हे ध्यानात घ्यावं.
ग्रामीण भागात मी नेहमी पाहते की, ज्या स्त्रिया गावात, वस्तीवर, शेतात राहतात त्या कधीच एकट्या घराबाहेर जाऊ शकत नाहीत.
स्त्री म्हणून असणारी बंधनं तर आहेतच, पण त्यांना कोणतंही वाहन चालवता येत नसतं. त्यामुळं घरातल्या वस्तू बिघडल्या, तर जोवर पुरुष त्या नीट करून आणत नाही तोवर त्यांना प्रचंड त्रास होतो.
कधीकधी असंही दिसतं की, काही पुरुषांना माझ्याशिवाय तू कशी हतबल होते हे दाखवायचं असतं किंवा स्त्रियांना त्रास झालेला पाहायचा असतो. स्त्रियांकडे प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांचे नंबर असण्याची शक्यता नसते.
एक तर त्यांच्याकडे फोनच नसतात, असेल तर पर पुरुषाचा नंबर कसा सेव्ह करणारं त्या. मिसेज फक्त हिमनगाचे टोक आहे. ग्रामीण भाग घेतला किंवा शहरी भागातही याहून भयाण अवस्था आहे.
अनेकदा पुरुषांसाठी आखून दिलेल्या प्रतिमा पुरूषांना बदलवायच्या असतात, मात्र त्यांना तसा घरातून अथवा समाजातून पाठिंबा मिळत नाही. अशावेळी पुरूषांना बदलासाठी ठाम रहावं लागेल.
गृहिणीपद : स्वेच्छा की बंधन?
माझ्या शेजारी राहणारी पन्नास वर्षांची मैत्रीण नवरा, मुलगा, मुलगी आणि ती असं सगळ्यांसाठी वेगवेगळं जेवण बनवते. तिला सगळं चालतं; मात्र बाकी प्रत्येकाला वेगळं लागतं. दिवसभर ती स्वयंपाकच करत असते.

फोटो स्रोत, Getty Images
'स्त्रिया फक्त घरकामच करतात, आपल्या कुटुंबाला प्रेमानं खायला घालतात. त्यासाठी कौतुकाची (आणि पैशांचीही) काय गरज आहे' असा एक गोड विचारप्रवाह आहे.
प्रत्येक व्यक्तीला कौतुकाची, आपण करत असलेल्या गोष्टीला इतरांनी ओळखावं अशी इच्छा असते. कौतुक करणं ही स्त्रिया करत असलेल्या गोष्टींबद्दल कमीत कमी करण्याची गोष्ट आहे. पण निदान तिने केलेल्या जेवणाबद्दल, इतर कामांबद्दल वाईट तरी बोलू नये.
अनेकदा स्त्रियांना त्यांचे करिअर असो की इतर गोष्टी घरातील पुरुष "तुला काहीच नीट करता येत नाही," असं म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान करतात, त्यांचा आत्मविश्वास कमी करतात. असा अपमान झाल्यानं स्त्रियांना कोणत्याही गोष्टी करण्याची इच्छा उरत नाही.
सुपरवूमन नावाचा फुगा : घरकाम फक्त स्त्रीचीच जबाबदारी?
गेल्या आठवड्यात गावातील महिलांसोबत व्यवसाय मार्गदनर्शपर शिबिरात बोलत असताना मी महिलांना प्रश्न विचारला की तुम्हाला रोज घरातली, मुलांची, शेतातली कामं असतात, मग तुम्ही व्यवसाय कसा करणार? त्यांनी उत्तर दिलं, "आम्ही पहाटे तीन वाजता उठू. घरातली, शेतातली कामं आटोपून मग व्यवसाय करू."
गाव असो की शहर, एखाद्या स्त्रिला करियर करायचे असेल तर तीन घरातील, बाहेरची कामं करूनच करावं हा अलिखित नियम आहे. अनेकदा लग्नाआधी नोकरी करणार्या स्त्रिया मुलं झाली की नोकर्या सोडतात कारण मुलांना सांभाळायला कुणी नसतं.
महिला पहाटे लवकर उठून घरातलं, मुलांचं करून ऑफिस गाठतात. ऑफिसचा ताण आणि मुलांना पाळणाघरातून घेऊन, भाजी, सामान घेत घर गाठतात. घरी जाऊन स्वयंपाक, इतर कामे करतात. रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठतात.
काहींचं आयुष्य घराभोबती गुंफलेलं असतं. तरी तिच्या ना घरकामाची कुणी दाखल घेतं, ना तिला कुणी ब्रेड विनर म्हणून मान देतं. सिनेमातील दिवाकर बायकोला म्हणातो,"12-12 घंटे काम करता हूं. लंच तो टाईम पे डिझर्व्ह करता हूं।" मात्र, ती बारापेक्षा अधिक तास जास्त काम करते याकडं त्याचं लक्ष जात नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या स्त्रियांना हे चक्र तोडायचं आहे त्यांना एक तर स्वत:ला झिजवून सगळं करावं लागतं, नाही तर घटस्फोट घेऊन.
ज्या स्त्रियांना गृहीत धरवायचं नाही त्यांच्यासाठी समाज एक संदेश देतो, "सासू सासरे नको असतील, घरकामे करायची नसतील, तर अशा मुलींनी अनाथ आश्रमातील मुलाशी लग्न करावं." पण याउलट कोर्टाने असं म्हटलं आहे की स्त्रीनं फक्त स्वयंपाक करावा, घर सांभाळावं यासाठी पुरुष लग्न करत असतील तर त्यांनी घरी स्वयंपाकी ठेवावा, लग्न करू नये."
भारतामधल्या लग्न व्यवस्थेत स्त्रियांच्या कष्टांचा सन्मान नाही आणि त्यांचे कष्ट देश राष्ट्रीय उत्पन्नात धरत नाही. एवढे कष्ट करूनही स्त्रियांच्या हाती काहीच उरत नाही.
लग्नातील श्वास संपलेला सेक्स
भारतात अनेक लग्ने सेक्सविरहित आहेत किंवा यांत्रिक सेक्स असणारी आहेत. या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे की यात सेक्स या विषयावर काही प्रमाणात का होईना चर्चा केली आहे.
एका सीनमध्ये आदल्या दिवशीच्या शारीरिक संबंधांनंतर नायिका नवर्याला सेक्ससंदर्भात तिच्याही काही भावना आहेत हे सांगते. तेव्हा तो तिला 'अनुभवी' असल्याचा सेक्सीस्ट टोमणा मारतो. शिवाय मूल हवं आहे यावर काहीही चर्चा झालेली नसताना तिला पिरीयड आल्यावर तो म्हणतो, "मैंने सोचा हम सब कुछ परफेक्ट कर रहे है, फॉर यू टू गेट प्रेग्नंट।" पितृसत्ता प्रजोत्पादनासाठी संबंध आणि मेकॅनिकल सेक्स या संकल्पांनाना जन्म देते.
"सेक्स फक्त मूल जन्माला घालण्यासाठी करत नाहीत," हे नायिकेचं वाक्य पितृसत्तेच्या तोंडात चपराक मारते. पितृसत्ता स्त्रीच्या लैंगिकतेला प्रतिबंधित करते. तिच्या आवडीनिवडी, इच्छा गौण करते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हे 2019-21 नुसार, 82 टक्के महिलांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात कधी ना कधी नवर्यानं जबरदस्ती केल्याचं सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
बर्याचदा शिकलेल्या पुरुषांचीसुद्धा सेक्सची व्याख्या फक्त त्याने संबंध करणे किंवा पेनीट्रेशनपुरती मर्यादित असते. त्यात स्त्रीचा आनंद, इच्छा किंवा फोअरप्ले, आफ्टर प्ले या गोष्टींना थारा नसतो. याविषयी, आपल्या इच्छा पूर्ण होत नसल्याविषयी, त्रासाविषयी स्त्रियांनी बोललं की तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात.
दिवाकर रिचाला आधी किचनमधील वास सेक्सी असतो म्हणतो तोच जेव्हा ती त्याला सेक्ससाठी विरोध करते तेव्हा तुझ्या शरीराचा किचनचा घाण वास येतो म्हणतो. म्हणजे दोन्ही बाजूंनी तिचं व्यक्तिमत्व खराब करून टाकलं जातं.
याच धाग्याला धरून हा सिनेमा पिरीयडबद्दलही बोलतो. रिचाला चार दिवस आराम मिळतो. मात्र तिच्या नवर्याच्या दवाखान्यात साफ सफाईचं काम करणार्या ताईला घरातील कामं करायला सांगितलं जातं.
ही ताई खालच्या समजल्या जाणार्या जातीतील असते. म्हणजे एका बाईचा आराम पण तिच्या कामाचा भार दुसर्या स्त्रीला, तेही तिच्याहून कमी सत्ता असलेल्या. पुरुष इथेही जबाबदारी घेत नाहीत. ही ताई म्हणते, "अब मुझ जैसी औरत अगर पाँच दिन आराम करेगी तो काम कैसे चलेगा?" हे पाहून आपण सुन्न होतो.
ही ताई असल्यामुळं रिचाचे सासरे तिने चहाचा कप दिल्यावर तो कपड्यानं धरतात. ही ताईच स्वयंपाक करणार असते. ती म्हणते, "बाबूजी कहते है, चुल्हे की आग मे बहुत ताकद होती है, सारी अशुद्धियाँ जला देती है।"
स्त्री पुरूषांकडे चौकटीत पाहू नये
महिलांना अनेक बाबतीत गृहीत धरलं जातं. स्त्रिला लग्न करावंच लागेल, तेही आई वडिलांनी पाहिलेल्या मुलाशी, मुलांना जन्म द्यावाच लागेल, घरकाम तर महिला करतातच. असं हे स्त्रियांना गृहीत धरणं सोडावं लागेल.
स्त्रीत्वाच्या संकल्पनांमध्ये स्त्रिला अडकवू नये. दुसर्या बाजूने पुरूषांनासुद्धा पुरुष कसा असावा हे समाजानं जसं ठरवलं आहे ते बदललं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
पुरूषानं घरकाम करू नये, स्वयंपाक करणारा किंवा बायकोचं ऐकणारा पुरुष खरा पुरुष नसतो किंवा बायकोचा बैल असतो (मग सगळ्याच स्त्रिया नवर्याच्या गाय असणार!) असं म्हणणं किंवा नोकरी न करता घर, मुलं सांभाळणार्या पुरुषाचा छळ थांबवायला हवा आहे.
हे केलं तरच पुरुष स्वत:च्या पुरुषी प्रतिमेतून बाहेर पडून मणूस बनेल. मग तो मिसेस किंवा सिनेमातील नवरा किंवा सासरा बनणार नाही. आणि त्याला असं नुसतं माणूस बनण्यासाठी फक्त पुरुषांचीच नव्हे तर पारलिंगी आणि स्त्रियांचीही मदत लागणार आहे.
मिसेस आणि स्त्रिया
मिसेस सिनेमाच्या पार्श्वभूमीवर मुलींनीही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. लग्न झाल्या झाल्या सासरच्या लोकांना खुश करत राहायचं, जे जमत नाही तेही करायचं, स्वत:च्या करियर किंवा इतर आवडी निवडींना बाजूला करायचं, आपले मित्र मैत्रिणी यांच्याशी नातं तोडायचं हे करू नये.
एक लग्न जमत असतानाच आपल्या करियरबद्दलच्या गोष्टी, आपल्या बाउंडरीज नवरा किंवा सासरच्या लोकांना स्पष्ट सांगायला हव्यात. तसेच लग्नाच्या पहिल्याच महिन्यापासून आधी सुरू असलेलं करियर तसंच सुरू ठेवायचं. लग्नानंतरचा पहिला महिना त्या मुलीचं त्या घरातील स्थान ठरवत असतो.

फोटो स्रोत, Getty Images
जर पहिल्यांदाच सासरच्या लोकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या, तर पुन्हा त्यांना कमी करता येत नाहीत. चांगलं, योग्य वागणं आणि 'सासरच्यांना खुश ठेवण्यासाठी करत राहणं' यात फरक आहे. तिनं स्वत:ला नवरा किंवा सासरच्या लोकांच्या बरोबरीचं समजून राहायला हवं.
आता ही भूमिका सगळ्याच सूना घेऊ शकतील असं नाही. मात्र जमेल तसं स्वत:साठी जागा बनवता आली पाहिजे कारण त्याशिवाय पर्याय नाही.
आधीच्या पिढीच्या स्त्रियांनी त्यांचेही शोषण केलेल्या पितृसत्तेचा वारसा आपल्या सूनेकडे न देता सूनेला त्यातून मुक्त होण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
कमी वयात विधवा बनली तरी मुलांचं, दोन भावाच्या विधवा मुलींचं शिक्षण करून त्यांना पायावर उभं केलं; त्यातील एकीचा पुनर्विवाह केला अशी एक गावातली स्त्री नुकतीच भेटली होती. बाई एका वयाच्या टप्प्यानंतर पण खमकी होत असते.
काही नाती सोडून देणं सगळ्यांच्या फायद्याचं असतं हे स्त्रीनंही समजून घ्यायला हवं. मात्र ते सोडून दिल्यावर जी किंमत मोजावी लागेल त्यासाठी बाईनं स्वत:ला खंबीरपणानं उभं राहायला हवं. नाती नुसती ओढत राहण्यानं त्याला पूर्णत्व येत नाही.
पितृसत्तेच्या चाकोर्या मोडणारे स्त्री पुरुष
ज्या स्त्रिया या पितृसत्तेच्या स्त्रियांसाठी ठरवून दिलेल्या चाकोऱ्या मोडतात, करियर करतात, घरात कामाची विभागणी करतात, नवर्याकडून घरकामाची अपेक्षा करतात, मुलांना पाळणाघरात ठेवतात, कामासाठी मदतनीस घेतात; त्यांना सध्याच्या भाषेत फेमिनिस्ट, कुटुंब तोडणार्या बायका हे बिरुद लावलं जातं.
अनायसे या बायका चांगल्या किंवा आदर्श बायकांच्या यादीतून बाहेर पडतात. एका प्रशिक्षण वर्गात नवर्याच्या हिंसेची बळी झालेली एक आजी म्हणाली, "आमी गरीब हुतू म्हणून सन केलं अन संसार हितवर आणला. आताच्या पोरी आगाव निगल्यात, सन न्हाईत करत."

फोटो स्रोत, Getty Images
या स्त्रिया कमी प्रमाणात असल्यानं यांचा आवाज क्षीण असतो. उदा. नायिकेच्या सासर्याच्या भावाच्या मुलाची बायको सगळे जण चहा, शिकंजी, कोल्ड कॉफी अशी वेगवेगळी फर्माईश करतात तेव्हा सर्वांना चहा प्यायला सांगते. तेव्हा सगळे विरोध करतात. याउलट तिची आई, पीएचडी होऊनही नोकरी न केलेली सासू, नवर्याची आत्या सगळ्या पितृसत्ता वाहणार्या असतात.
'द ग्रेट इंडियन किचन' या सिनेमावर भारतीय पुरुष मिसेसप्रमाणे तुटून पडलेले दिसत नाहीत. मला वाटतं मिसेसने विवाहाच्या अनेक अंगांना स्पर्श केला आहे. या दोन्ही सिनेमात महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे इंडियन किचन सिनेमातील नायिका शांतपणे नायकाला सोडून जाते, तर मिसेस सिनेमातील नायिका नवर्याला, आई वडिलांना आणि एकुणात पितृसत्तेला जाब विचारते.
स्त्रीनं एक तर सगळं सहन करावं, नाही तर कालवा न करता गुमान नवर्याला सोडून जावं अशी अपेक्षा पितृसत्ताक समाज करतो.
बाई पुरुषाला का सोडून जाते?
कोणतीही स्त्री, नवर्याला सोडून का जाते याची अनेक कारणे आहेत. नात्यातली हिंसा असह्य होणं, प्रेम न मिळणं, नात्यात शून्य किंमत असल्याची जाणीव झाली की स्त्री नात्याबद्दल रिती होते आणि जोडीदाराला सोडून जाते.
रिचानेसुद्धा नवरा, सासरा आणि इतरांना खुश ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र तिचा श्वास कोंडायला लागला तेव्हा ती घराबाहेर पडली. भारतात सहजासहजी घटस्फोट होत नाहीत, ग्रामीण भागात तर नाहीच.
स्त्री जेवढी आर्थिदृष्ट्या सक्षम असते, तेवढा घटस्फोटाचा निर्णय घेणं सोपं जातं.
पुरुषत्व, भावनांक आणि बरंचं काही
मुलीसाठी नोकरी सोडलेली आणि 20 वर्षे अगदी छोट्या घरात राहिलेली माझी एक मैत्रिण नवर्याला घर घेण्याविषयी बोलली, तर नवरा म्हणाला, "मी नोकरी सोडून घरी बसतो, तूच नोकरी कर आणि घर घे."
संसारात पुरूषानं स्त्रिला तिच्या त्याग आणि समर्पणासकट समजून घ्यायची गरज आहे. माणूस म्हणून अपेक्षा केल्या, तर त्याला फेमीनिसम म्हणून आरडाओरडा करू नये. जन्मत: पुरुषाला पुरुष असण्याचे फायदे मिळतात.
सिनेमात दाखवल्याप्रमाणे पुरुषाची बाहुली पुढे आणि स्त्रीची मागे असते याची जाणीव ठेवून, स्त्रीच्या ठिकाणी स्वत:ला ठेवून तिच्याकडं पाहायला हवं.
असं निरीक्षण आहे की, पुरूष घाण साफ करायची कामं सहसा करत नाहीत. उदा. टॉयलेट, बाथरूम, किचन सिंक साफ करणे इ. घाण साफ करणं हे हलक्या दर्जाचं काम समजलं जातं, जशी इतर घरकामं. अशी घाण समजली जाणारी कामं एक तर शुद्रांनी करायची किंवा स्त्रियांनी.
अशा कामांमध्ये पुरुषत्व की आणखी काही आडवं येतं आहे का हे पुरुषांनी एकदा पाहायला हवं.
बर्याचदा पुरुषत्व किंवा आपण स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहोत ही भावना पुरुषांच्या माणूस बनण्यातला मुख्य अडथळा बनते.

फोटो स्रोत, Getty Images
बायको जर नवरा, त्याचे घरचे यांचं हवं बाकी ते पाहते तर बायकोला काय हवं आहे याची विचारणा आणि विचार करायलाच हवा. मी दिवसभर ऑफिसात काम करतो, तू बसून तर असते दिवसभर घरात. काय काम करते? वरून अनेकदा असं पुरुष बायकोला विचारतात.
एखाद्या दिवशी इतर काही काम सांगितलं तर "आता नोकरी सोडतो आणि घरीच बसतो," असं म्हणतात. नवरा जेव्हा बाहेर दहा कामं करत असेल तर बायको घरात हजार कामं करते.
मनातल्या सलणाऱ्या गोष्टी सांगितल्या की आल्या आल्या तुझी किरकिर सुरू झाली म्हणण्यापेक्षा तिच्या मनातलं आवाज ऐकायला हवा. "साधं घर सांभाळणं होत नाही, इतर वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्त्रिया मुकाटपणे काम करतात," अशी कमेंट जिव्हारी लागते बायांच्या.
वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्त्रियांना त्रास होत नाही, त्यांची तक्रार नसते असं नाही. त्यांच्याशी जाऊन कधी कुणी "बाई ग, एवढं काम विना तक्रार करतेस. काही त्रास आहे का तुला?" असं कुणी विचारत नाही हाच फरक आहे. स्त्रीचा त्रास जोडीदार समजून घेणार नाही तर कोण घेणार?
पुरुष काय गमावत आहेत?
घरकामातील पुरुषांचा सहभाग वाढणं ही स्त्रियांना मुक्त करणारी गरज नाहीये तर पुरूषांना समृद्ध माणूस बनवणारी गोष्ट आहे. ज्या पोटावर पण जगतो, ज्या घरात वावरतो; त्या कामात स्वावलंबी होण्याइतकी महत्वाची गोष्ट कुठलीही नाही.
बायको, आई किंवा बहिणीवरील प्रेम त्यांच्यासोबत घरकामं करून, मुलं सांभाळून पण व्यक्त करायला हवं. स्त्रियांची क्रिएटिव्हिटी किचनमध्ये स्वयंपाक करत आणि घर आवरत वाया जायला नको आहे. आपल्या स्त्री नातेवाईकांचं मन जाणून त्यांचा भार कमी करणं हेही प्रेमाचच रूप आहे.
माझं आईवर खूप प्रेम आहे पण ती घरकाम करत असताना मी लोट पडतो याला संधीसाधू प्रेम म्हणतात. स्त्री जोडीदार जर आनंदात नसेल तर संसारसुद्धा सुखाचा होणार नाही हे सत्य आहे.
पुरुषांकडून भावनिक प्रगल्भता कमी पडते आहे का याची तपासणी पुरुषांनी करणं खूप गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एखादी मुलगी जेव्हा लग्न करून नवर्याच्या घरी आनंदी सहजीवनासाठी येत असते, तेव्हा तिनं मागे सोडून आलेल्या हजारो गोष्टींची कदर नवर्यानं ठेवलीच पाहिजे. हे मान्यच केलं पाहिजे की लग्नासाठी आणि नवर्यासाठी बायको जे आरते ते पुरुष करत नाहीत आणि सध्या तरी करू शकत नाहीत.
जी मुलगी स्वत:चं घर सोडून येते तिला वारंवार 'हे घर माझं आहे, तुझ्या बापाचं इथं काय आहे, चालती हो घरातून' म्हणणं हा तिचा अपमान आहे हे समजून घ्यायला हवं. बर्याचदा लग्न केल्यामुळं स्त्रीचं शिक्षण, करियर बंद पडतं.
अशावेळी तिची आर्थिकी कोंडी करणं किंवा आपणच कसं पैसे कमवून घर चालवतो, बायकोला खायला (तेही आयतं) घालतो असं म्हणणं हा दांभिक खोटारडेपणा आहे. आणलेलं करून घालणं यालाही प्रचंड कष्ट लागतात.
फेमिनिझमला प्रचंड बदनाम करण्यात आलं आहे. फेमिनिझमचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. फेमिनिझम हे पुरुषांच्या नव्हे तर पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात आहे, हे पुरुषांनी समजून घ्यायला हवं.
मुळात फेमिनिझम स्त्री, पुरुष किंवा तृतीय पंथी किंवा पारलिंगी व्यक्तींच्या हक्कांबद्दल बोलते किंवा व्यक्तीवर त्यांच्या लिंगावर आधारित काही अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवते हे पुरुषांना ठाऊक नाही. त्यामुळं महिलांना टोमण्यातून फेमिनाझीझ म्हणणं हे आपलं विचार दारिद्र्य आणि स्त्रियांप्रतीची असूया आहे आहे.
विवाह तेव्हाच सहजीवन बनतील...
रिचाच्या मैत्रिणीचा नवरा तिला, तिच्या कामाला समजतो, घरकाम पण ते मिळून करतात. असे चाकोरी मोडणारे पुरुष वाढले की सहजीवन खर्या अर्थानं फुलेल. मुळात विवाहाच्या नात्याची एकमेकांना गरज असते. त्या नात्याचा मान दोघांनी ठेवायला हवा. या नात्यात घर सांभाळणे, घराबाहेर काम करणे, नातेवाईक सांभाळणे या सगळ्या गोष्टी दोघांनी आणि घरातील सगळ्यांनी मिळून करायच्या असतात.
मुलग्यांना घरकाम येत नसेल तर शिकायची गरज आहे कारण सिमोन म्हणते तसं स्वयंपाक गर्भाशयाने करता येत नाही. तो हातानेच करावा लागतो कारण ते एक जीवन कौशल्य आहे. या पुढच्या पिढ्यातील मुलगे स्वायपक शिकले नाही तर त्यांचे घटस्फोट होणं अटळ आहे. मुलाग्यांचे घटस्फोट रोखायचे असतील तर मुलांना स्वयंपाक शिकवायलाच हवा.
मुळात स्त्रिया कोणत्या तणावाच्या परिस्थितीतून जातात हे समजून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. "जो इज्जत बेटोंको मिलती है वही बेटी को भी मिलनी चाहिए। माँ बाप ने ही अपने बेटोंको बिगाडके रखा है। अपना पानी भाई लेकर पिये..."असं आपल्या आई वडिलांना म्हणते.
याचा सरळ अर्थ मुलग्यांना आपल्या जबाबदार्या घ्यायला शिकलं पाहिजे. स्त्रीलाही गरमगरम जेवण आवडतं हे साधं सत्य पुरुषांनीसुद्धा ध्यानात घेऊन त्यांच्या ताटात गरम भाकरी टाकावी.
मूल ही फक्त स्त्रीचीच नव्हे तर नवरा, कुटुंब, समाज आणि शासनाची पण जबाबदारी आहे. कामाच्या ठिकाणीही पाळणाघरे असणं आवश्यक आहे. महिलांना चाईल्ड पेनल्टी द्यावी लागू नये ही काळजी सगळयांनी घ्यायला हवी.

फोटो स्रोत, Getty Images
लग्न किंवा मुलांमुळं ब्रेक घेण्यार्या महिलांच्या सोयीनुसार त्यांच्यासाठी योग्य पगाराच्या नोकर्या, कामे उपलब्ध करून देण्याची खूप आवश्यकता असते. अशाने महिलांचा आत्मविश्वास कायम राहील आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील. टाटा ग्रुप महिलांसाठी असा उपक्रम राबवते.
"रिचाला इतकी कामं करताना पाहून मी जे पात्र साकारले त्या पात्राची मला लाज वाटते," मिसेस सिनेमातील सासर्याची भूमिका साकारणारे अभिनेते कनवलजित सिंग एका मुलाखतीत म्हणाले.
घरातील व्यक्ती जबाबदार्या वेगवेगळ्या घेत असल्या तरी त्या समान असतात, हे न्याय तत्व पाळलं तरी कोणतीही सून घर सोडून निघून जाणार नाही.
घरातल्या स्त्रियांनी प्रत्येक गोष्ट पुरुषांच्या हाती नेऊन देणं बंद करावं लागेल.
शिवाय स्त्रियांनी प्रत्येकवेळी सगळ्यात शेवटी, शिळं खाणं सोडून द्यावं. स्वत:ला प्राथमिकता देत योग्यवेळी आहार घ्यावा. स्वत:साठी खाणं हा स्वार्थीपणा नसतो तर शरीराची गरज असते. जगासाठी वेळ काढणार्या स्त्रीनं स्वत:साठी वेळ काढून व्यायाम करावा. स्वत:च्या आवडीचं इतरांना खायला घालावं. पुरुषांच्या सोबतीशिवाय हे सोपं नसतं हे पुरुषांनी समजून घ्यावं.
सिनेमात मदतनीस ताईंनी पाण्याची बादली फरशी धुण्यासाठी ओतणं, रिचानं आरशावरील दव बाजूला सारून चेहरा पाहणं या आशेचा किरण आहेत. हे किरण शोधता आले पाहिजेत.
समतेवर आधारित सहजीवन: सत्य की इमपॉसिबल ड्रीम?
इमपॉसिबल ड्रीम्स नावाचा एक खूपच सुंदर ॲनिमेटेड सिनेमा आहे ज्यात स्त्री दिवस रात्र घरकाम, मुलं सांभाळणे, नोकरी असं सगळं करत असते. हे करता करता तिला स्वप्नं पडतं की तिचा नवरा मुलं सांभाळत आहे, ती स्वयंपाक करताना तिच्यासोबत किचनमधील कामे करतो आहे आणि तेवढ्यात तिचा पहाटे कामं करण्यासाठी उठायचा गजर वाजतो आणि सिनेमाचं शीर्षक समोर येतं. इमपॉसिबल ड्रीम्स. असं हे प्रत्येक स्त्रीचं इमपॉसिबल ड्रीम्स पॉसिबल व्हावं जेणे करून स्त्री पुरुष एकमेकांना पूरक म्हणून सोबत राहू शकतील.
मुळात या सिनेमा घरकामाबद्दलचा नाहीये, तर स्त्रियांना कशा पद्धतीनं वागणूक दिली जाते, स्त्री पुरुष उतरंड कशी आहे हा विषय आहे. स्त्रियांच्या घर कामातील सहभागाला म्हणजे थोडक्यात शरीरश्रमाच्या कामांना गौण मानणे, केवळ घराबाहेरच्या, बौद्धिक कामाला, ज्यात पैसे मिळतात त्यालाच काम म्हणणे या बाबींबद्दल हा सिनेमा बोलतो.
मात्र असं नेहमीच का होतं की स्त्रियां त्यांच्यावरील बंधनांबाबत बोलतात, त्यातून मुक्त होऊ पाहतात आणि पुरुषांना ती आपल्यावरील टीका आहे असं वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
थामन एस नावाचा संगीतकार नुकतच म्हणाला, " लग्नं टिकणं अवघड झालं आहे कारण स्त्रियांना स्वातंत्र्य हवं आहे." स्त्रिया जन्मत: स्वतंत्र असतात, त्यांना पारतंत्र्यात टाकलं जातं.
कुटुंबात स्त्री पुरुषाइतकीच महत्वाची सदस्य आहे. तिलाही तिच्या गोष्टी करण्याची स्पेस मिळावी आणि ती जे करत असेल त्याचा सन्मान दिला जावा. असा सन्मान मिळाला तर ती कुटुंबाची सदस्य म्हणून राहिलं नाही तर पितृसत्ताक समाजाच्या तोंडावर घाण पाणी टाकून निघून जाईल. असं होणं समाजाच्या स्थिरतेसाठी हानिकारक आहे. त्यामुळं पुरुषांनी या सिनेमाकडं स्त्रीला समजून घेण्याची संधी म्हणून पाहायला हवं आहे.
या सिनेमातील किचन सिंकखाली साठलेलं पाणी जेव्हा ती सासरा आणि नवर्याच्या अंगावर टाकते तो सीन या सिनेमाचं सार आहे. एवढे दिवस मनात साचलेला तणाव ती त्यांच्यावर ओतून रिकाम्या पाऊली बाहेर पडते. लाल पाऊलांची लक्ष्मी गाडी रिव्हर्स करून घे सोडून निघून जाते.
एकीकडे दिवाकरला आणखी एक कुक आणि कामवाली मिळते, जिच्या करपलेल्या फुलक्याची तारीफ करत दिवाकर खातो तर दुसरीकडे डान्सच्या कार्यक्रमाच्या दिवशी स्वत:लाच फुले भेट देणारी रिचा मुक्त झालेली दिसते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












