'जेन झी'बाबत मोहन भागवतांच्या वक्तव्याचा अर्थ काय? विजयादशमीच्या भाषणाचे विश्लेषण

भारतातील नव्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना वाढल्याचे संघ प्रमुखांना वाटते.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, भारतातील नव्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना वाढल्याचे संघ प्रमुखांना वाटते.
    • Author, राघवेंद्र राव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, नागपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी नागपूरमध्ये आपलं वार्षिक भाषण दिलं.

संघस्थापनेला या वर्षी 100 वर्षं पूर्ण झाली. म्हणूनच यंदाच्या त्यांच्या भाषणालाही विशेष महत्त्व होतं.

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात पहलगाम हल्ला, नक्षलवाद आणि अमेरिकेचे टॅरिफ धोरण या सारख्या मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं. तसेच भारताच्या शेजारील देशांमधील अस्थिरतेचाही त्यांनी उल्लेख केला.

मोहन भागवत नेमकं काय म्हणाले, त्यांच्या भाषणाचा अर्थ काय आहे, ते समजून घेऊया.

पहलगाम हल्ला आणि नक्षलवाद

आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलं.

ते म्हणाले, "पहलगाममध्ये एक दुर्घटना घडली. सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी हल्ला केला. 26 भारतीय नागरिकांची धर्म विचारून हत्या केली गेली. पण यामुळे संपूर्ण देशात दुःख आणि संतापाची लाट उसळली. सरकार आणि आपल्या लष्कराने पूर्ण तयारी करून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं."

"या संपूर्ण घटनेत आपल्या नेतृत्वाची दृढता, आपल्या लष्कराचे शौर्य आणि कौशल्य, समाजाची एकता आणि ठामपणा हे सर्व स्पष्ट दिसून आले. या घटनेतून आपल्याला शिकवण मिळते की, आपण सर्वांबद्दल मित्रभाव ठेवतो आणि ठेवू, पण आपली सुरक्षा कशी टिकवायची याबाबत आपल्याला अधिक सतर्क राहावं लागेल."

"आपल्याला सक्षम बनावं लागेल, कारण या घटनेनंतर जगातील वेगवेगळ्या देशांनी आपापली भूमिका घेतली. यातून आपल्याला समजलं की, आपले मित्र कोण आहेत," असं ते म्हणाले.

2 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात विजयादशमीच्या कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत भाषण करताना.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, 2 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात विजयादशमीच्या कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत भाषण करताना.

त्यानंतर भागवत यांनी नक्षलवादावर आपलं मत मांडलं.

त्यांनी म्हटलं की, "देशात अशांतता पसरवणाऱ्या संविधानविरोधी नक्षलवादी आंदोलनावर सरकार आणि प्रशासनाने ठोस कारवाई केली. त्यांच्या विचारसरणीचा पोकळपणा आणि त्यांच्या क्रौर्याचा अनुभव घेतल्यानंतर समाजाचाही त्यांच्याबाबत भ्रमनिरास झाला आणि समाज त्यांच्यापासून दुरावला."

"नक्षलवाद्यांवर नियंत्रण तर मिळवता येईल, पण त्या क्षेत्रातील मुख्य अडथळे दूर केल्यावर तिथे न्याय, विकास, सद्भावना, संवेदना आणि सहमती कशी आणायची हे पाहणं गरजेचं आहे. यासाठी समाजाने आणि सरकारने दोघांनीही योजना राबवायला हव्यात, कारण या गोष्टींचा अभावच अशा कट्टरतावादी शक्तींच्या वाढीस कारणीभूत ठरतो."

शेजारील देशांमध्ये अस्थिरता

त्यानंतर मोहन भागवत यांनी भारताच्या शेजारील देशांमधील अशांततेच्या घटनांचा उल्लेख केला.

त्यांनी सांगितलं, 'नैसर्गिक उलथापालथ झाली तर लोकांच्या जीवनातही गोंधळ दिसून येतो. श्रीलंकेनंतर बांगलादेश आणि आता नेपाळमध्ये. आपल्या शेजारील देशांमध्येही याचा अनुभव आपल्याला आला.

कधी कधी असं घडतं.. जेव्हा प्रशासन लोकांच्या जवळ जात नाही, त्यांच्यात संवेदनशीलता नसते आणि ते लोकाभिमुख राहत नाही. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरणं बनवली जात नाहीत, तेव्हा असा असंतोष निर्माण होतो. पण तो असंतोष अशा पद्धतीने व्यक्त करणं, हे कोणाच्याही फायद्याचं नाही."

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (उजवीकडे) हे यावेळी विजयादशमीच्या आरएसएसच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (उजवीकडे) हे यावेळी विजयादशमीच्या आरएसएसच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

"बदल लोकशाही मार्गानेच घडतो, अशा हिंसक मार्गाने बदल होत नाही. अशामुळे गोंधळ होतो, पण परिस्थिती तशीच राहते", असं ते म्हणाले.

त्यांनी असंही सांगितलं की, "जगाच्या इतिहासात पाहिलं तर जेव्हा जेव्हा 'अशा गोंधळ निर्माण करणाऱ्या क्रांती (रिव्होल्यूशन)' झाल्या, त्या कोणत्याही क्रांतीने आपलं उद्दिष्ट साधलं नाही."

"अशा हिंसक बदलांनी उद्दिष्ट साधलं जात नाही. उलट, या गोंधळाच्या परिस्थितीत देशाबाहेरच्या स्वार्थी शक्तींना आपले खेळ खेळण्याची संधी मिळते," असं त्यांनी यावेळी सांगितलं.

'जेन झी'वर निशाणा?

अलीकडेच नेपाळमध्ये एका हिंसक आंदोलनाची घटना घडली. याचं नेतृत्व जनरेशन झी किंवा 'जेन झी' ने केलं.

संघ प्रमुख मोहन भागवत यांनी कोणाचं नाव न घेता या पिढीच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "एक विपरीत आणि घातक विचार घेऊन चालणारा नवीन पंथ पूर्वीच उदयाला आला आहे. आजकाल तो भारतातही आपले पाऊल पसरवण्याचा प्रयत्न करत आहे."

यंदाच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण केली.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, यंदाच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण केली.

त्यांनी सांगितलं की, 'सर्व देशांत यामुळे समाजजीवन अस्वस्थ झालं आहे आणि संपूर्ण समाज एका प्रकारच्या अस्थिरतेकडे जात आहे. अशी शक्यता दिसते कारण त्याचा अनुभव सर्व देशांत होत आहे.

"म्हणूनच या सर्व परिस्थितींबद्दल जग जेव्हा विचार करतो, तेव्हा भारताकडे आशेनं पाहिलं जातं. जगाला अपेक्षा आहे की, भारत यावर काहीतरी तोडगा काढेल."

भागवत म्हणाले, "सुदैवाने भारतात आशेचा किरण दिसतो आहे. नवीन पिढीमध्ये देशभक्तीची भावना आणि आपल्या संस्कृतीवरील श्रद्धा आणि विश्वास सतत वाढत आहे."

भागवतांच्या या भाषणाचा अर्थ काय?

निलांजन मुखोपाध्याय हे पत्रकार, लेखक आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी बाबरी मशीदच्या विध्वंसावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख व्यक्तींवर पुस्तकं लिहिली आहेत.

ते म्हणतात, "भारताच्या शेजारील देशात एक बंड झालं आहे. सरकारमध्ये आणि अगदी आरएसएसमध्येही हे लक्षात आलं आहे की, आर्थिकदृष्ट्या ही सरकारं पूर्णपणे अपयशी ठरली आहेत. बेरोजगारीची पातळी अत्यंत उच्च आहे."

"जर सरकारने कोव्हिडनंतर मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला नसता, तर भारतात लोक उपासमारीने मरण पावले असते. इतक्या मोठ्या संख्येने लोक सरकारद्वारे दिलेल्या मोफत अन्नावर अवलंबून आहेत. हे सरकारच्या कामगिरीचा चांगला निर्देशांक दाखवत नाही."

त्यामुळे नेपाळमध्ये जे घडलं तसंच भारतातही घडू शकतं अशी चिंता आहे, असं म्हणणं योग्य ठरेल का?

यावर मुखोपाध्याय म्हणतात, "हो, नक्कीच अशी चिंता आहे की, कधीही बंड होऊ शकतं. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत काही सर्वेक्षणांत लोकांमध्ये अस्वस्थता दिसून आली होती. याचं कारण होतं, दैनंदिन गरजा- अन्न, वस्त्र, निवारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारी."

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात अमेरिकेच्या टॅरिफचाही उल्लेख केला होता.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात अमेरिकेच्या टॅरिफचाही उल्लेख केला होता.

लेखिका आणि राजकीय विश्लेषक राधिका रामसेशन यांचं मत आहे की, भारताच्या शेजारील देशांत जो गोंधळ झाला, तसं भारतात होणं फार कठीण आहे.

पण मोहन भागवतांनी 'जेन झी'बाबत जे मत व्यक्त केलं, त्याचे अर्थ खूप खोल आहेत.

ग्राफिक्स

त्या म्हणतात, "भागवतांनी नक्कीच चिंता व्यक्त केली आहे. पाहा, नरेंद्र मोदींच्या सरकारला बरीच वर्षे झाली आहेत. निवडणुकीसाठी अजून भरपूर वेळ आहे. पण आरएसएसचं नेटवर्क इतकं पसरलं आहे की, त्यांना दररोज फीडबॅक मिळत असतो. त्यांना कळत असतं की, कुठे लोक समाधानी आहेत आणि कुठे परिस्थिती चिंताजनक आहे."

"येणाऱ्या काळात काही ठिकाणी निवडणुकाही येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, संघालाही फीडबॅक मिळाला असेल की युवा वर्गात असंतोष निर्माण होत आहे. याचं मुख्य कारण बेरोजगारी आहे. ज्यामुळे काही भागातून लोक स्थलांतर करतात. त्यामुळे मोहन भागवत भाजप सरकारला संकेत देत आहेत की, त्यांनी डोळे उघडं ठेवावेत आणि सतर्क राहावं."

धार्मिक सहिष्णुता

मोहन भागवत यांनी भाषणात धार्मिक सहिष्णुतेचाही उल्लेख केला.

मुस्लीम आणि ख्रिस्ती समुदायांकडे बोट दाखवत ते म्हणाले की, भारतावर हल्ले झाले आणि परदेशी लोक भारतात आले. वेगवेगळ्या कारणांनी भारतातील लोकांनीही त्यांच्या विचारधारेला आणि पंथांना मान्यता दिली.

भागवत म्हणाले, "ते परदेशी परत गेले, पण अजूनही आपले बांधव त्यांच्या धर्माला मान्यता देऊन राहतात, ते आपल्या देशात आहेत. सुदैवाने भारतात सर्व प्रकारच्या विविधतेचं स्वागत आणि सन्मान करण्याची परंपरा आहे. म्हणून परदेशातून आलेल्या विचारधारेला आपण परकीय म्हणून पाहत नाही, वेगळं मानत नाही."

भागवत म्हणाले की, लोकांमध्ये एकमेकांबद्दल सद्भावना आणि संयम असावा. त्यांनी सांगितलं, "छोट्या-मोठ्या गोष्टींवर किंवा फक्त मनात शंका असल्यास, कायदा हातात घेऊन रस्त्यावर येणं, दहशत निर्माण करणं, हिंसा करणं ही वृत्ती बरोबर नाही. एखाद्या समुदायाला भडकवण्यासाठी किंवा स्वतःची ताकद दाखवण्यासाठी असं कृत्य करणे हे नियोजनबद्ध असतं."

ग्राफिक्स

संघ आणि त्याच्याशी संबंधित काही संघटनांवर धार्मिक असहिष्णुता पसरवण्याचे आरोप नेहमी होत आले आहेत. अशा वेळी मोहन भागवतांच्या या विधानाकडे कसं पाहावं?

या प्रश्नावर निलांजन मुखोपाध्याय म्हणाले की, "असं नाही की, अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात नाही. कधी कधी मुस्लिमांवर हल्ले केल्याच्या बातम्या ऐकायला येतात. अशा परिस्थितीत भागवतांनी असं वक्तव्य करणं फार विशेष ठरत नाही. कारण त्यांनी याआधीही अशी विधानं केली आहेत. पण जेव्हा अशा घटना होतात, तेव्हा सरकार कोणतीही कारवाई करत नाही."

ते म्हणतात, "आरएसएस आपल्या संघटनेचा भाग असलेल्या अशा लोकांविरुद्ध काही कारवाई का करत नाही? आरएसएस का सांगत नाही की, आतापासून आमचा यांच्याशी काही संबंध राहणार नाही आणि हे लोक आरएसएसच्या कोणत्याही व्यासपीठाचा वापर करू शकणार नाहीत?"

"ते अशा सूचना त्यांना देत नाहीत. त्यामुळे हे लोक त्यांच्या व्यवस्थेचा भाग राहतात. संघाला फायदा होतो तेव्हा ते त्यांचा उपयोग करतात."

आरएसएसचे वर्तमान सरसंघचालक मोहन भागवत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आरएसएसचे वर्तमान सरसंघचालक मोहन भागवत

राधिका रामसेशन म्हणतात की, अशा गोष्टी सांगण्यापूर्वी आरएसएस प्रमुखांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांना आधी समज द्यायला हवी.

त्या म्हणतात की, "धार्मिक सहिष्णुतेबद्दल बोलण्यापूर्वी संघाने स्वतःच्या आत डोकावलं पाहिजे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समजावून सांगायला हवं की किरकोळ कारणं काढून अल्पसंख्याकांवर हल्ले करू नयेत."

"भारतात लोक इतर धर्म स्वीकारतात, यामागचं मुख्य कारण म्हणजे हिंदू धर्मातील जातीवर आधारित केला जाणारा भेदभाव आहे. आजही असे लोक आहेत ज्यांना विहिरीतून पाणी भरू दिलं जात नाही, मंदिरात प्रवेश दिला जात नाही. ते शेतात काम करतात पण त्यांना पीक मिळत नाही," असं त्या सांगतात.

राधिका रामसेशन म्हणतात, "संघाने या लोकांकडे फक्त व्होट बँक म्हणून न पाहता, त्यांना आपलं मानून सामावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा."

भाजपबाबत संघाची नरमाई?

गेल्या काही वर्षांत विजयादशमीला आरएसएस प्रमुख जे मुद्दे मांडतात, तो केंद्र सरकारसाठीचा संदेश मानला जातो. पण यंदाच्या भाषणातून तसं काही दिसून आलं नाही.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून आरएसएसची स्तुती केली होती. 100 वर्षे पूर्ण झाल्यावर संघाचा दृष्टिकोन भाजपबाबत सौम्य होताना दिसतो आहे का?

यावर राधिका रामसेशन म्हणतात, "मोदींसारखे पंतप्रधान आरएसएसला लगेचच मिळणार नाहीत. ते आरएसएसचं उद्दिष्ट पूर्ण करत आहेत. इतके वर्ष त्यांनी स्वतः प्रचारक म्हणून काम केलं आहे. त्यामुळे जर ते आरएसएसला समजून घेणार नाहीत तर कोण घेईल? त्यांना माहीत आहे की, संघाच्या अपेक्षा काय आहेत आणि कुठे मर्यादा ओलांडायची नाही."

त्यांच्या मते आरएसएसची समन्वयकाची भूमिका आहे.

त्यांनी सांगितलं की, "प्रत्येक बैठकीत संघ हा संदेश देतो की, भाजप सरकारला संघाकडून कोणतीही अडचण येऊ नये आणि हे सरकार चाललं पाहिजे. संघाचं धोरण असं आहे की, भाजपला उघडपणे कोणताही इशारा द्यायचा नाही, आव्हान द्यायचं नाही."

दरवर्षी विजयादशमीनिमित्त संघ प्रमुख नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात मार्गदर्शन करतात.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC

फोटो कॅप्शन, दरवर्षी विजयादशमीनिमित्त संघ प्रमुख नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात मार्गदर्शन करतात.

दुसरीकडे, निलांजन मुखोपाध्याय म्हणतात, ''माझ्या मते मोहन भागवतांनी ठरवलं आहे की, भाजप आणि संघात ज्या काही गोष्टी आहेत त्या सोडवण्यासाठी हा मंच योग्य नाही. भाजप आणि मोदी सरकारने त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल आरएसएसला कोणतीही अडचण नाही.''

त्यांच्या मते, "तीन वादग्रस्त मुद्द्यांपेक्षा ते खूप पुढे गेले आहेत. राम मंदिर बांधलं गेलं आहे, कलम 370 रद्द केलं गेलं आहे आणि समान नागरी संहिता विविध राज्यांमध्ये सुरू झाली आहे."

मुखोपाध्याय म्हणतात, "आरएसएसची वैचारिक उद्दिष्टं सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या प्रमाणात राबवली आहेत आणि पूर्णही केली आहेत. तरीही आरएसएस आणि भाजपमध्ये एक प्रकारचं अंतर कायम आहे."

"मागील लोकसभा निवडणुकांमध्ये आरएसएस पूर्वीइतकी सक्रिय दिसली नव्हती. त्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही. आणि आपण सर्वांनी हा निष्कर्ष काढला की, यामागचं एक कारण म्हणजे आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत कमी रस दाखवला होता."

संग्रहित फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संग्रहित फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुखोपाध्याय आठवण करून देतात की, 'जेपी नड्डा यांनी भाजपला आता आरएसएसची गरज नसल्याचं म्हटलं होतं. पण आरएसएसने दाखवून दिलं की, कोणाला कोणाची गरज आहे. भाजप अजूनही निवडणुकीच्या राजकारणात आत्मनिर्भर नाही. त्यांना आरएसएसच्या मदतीची गरज आहे."

"पण मोहन भागवत याबद्दल काहीही बोलले नाही, अगदी अप्रत्यक्षपणेही नाही. पूर्वीच्या अनेक भाषणांमध्ये त्यांनी मोदींवर टीका केली होती. आता काहीही ते बोलले नाहीत. त्यामुळे जुने मुद्दे तसेच राहिले आहेत."

संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संघ प्रमुख आपल्या भाषणात मागे वळून पाहतील, अशी मुखोपाध्याय यांना अपेक्षा होती.

ते म्हणतात, "माझी अपेक्षा होती की या भाषणात काही जुने विचार पुन्हा ऐकायला मिळतील. काही विचार मागे ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. उदाहरणार्थ त्यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं की, गोळवलकरांची लेखणी एका विशिष्ट ऐतिहासिक संदर्भात लिहिली गेली होती. आता त्याची प्रासंगिकता कमी झाली आहे."

"म्हणून मला अशी आशा होती की, यावेळी विजयादशमीच्या भाषणातून काही ठोस मुद्दे समोर येतील. पण तसं झालं नाही. त्यांनी आधीच सांगितलेल्या गोष्टीच पुन्हा सांगितल्या."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.