फुटबॉल वर्ल्ड कपची ट्रॉफी विजेत्या संघाला मिळते का?

फोटो स्रोत, Getty Images
फुटबॉल वर्ल्ड कप म्हणजे जगातील सर्वाधिक देशांतर्फे खेळल्या जाणाऱ्या खेळाचा कुंभमेळा. विश्वविजेतेपद पटकावण्याचं अनेक देशांचं स्वप्न असतं. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या लागते.
विश्वविजेतेपदावर नाव कोरणं हे अर्थातच प्रचंड मोठं आव्हान आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विजेत्या संघाला झळाळता करंडक प्रदान करण्यात येतो. विजेत्या संघाला खराखुरा करंडक आपल्याकडेच ठेवता येत असेल असं तुम्हाला वाटत असेल. पण याचं उत्तर नाही असं आहे.
मग विश्वविजेत्या संघाला काय मिळतं? खरा करंडक कुठे असतो? याची उत्तरं समजून घेऊया.
विश्वविजेत्या संघाला झळाळता करंडक मिळतो तो खरा असतो पण तो मायदेशी नेता येत नाही. जगातील सगळ्यात मोठ्या स्पर्धेच्या करंडकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विजेत्या संघाला करंडक न देण्याचा निर्णय फिफाने घेतला.
विजयाचा जल्लोष झाल्यानंतर मायदेशी परतताना विजयी संघाला कांस्याचा पण सोन्याचा मुलामा दिलेला करंडक देण्यात येतो. तो दिसायला मूळ करंडकासारखा दिसतो पण प्रत्यक्षात वेगळा दिसतो. खऱ्या करंडकावर विजयी संघाचं नाव कोरण्यात येतं.
1974 पूर्वी विजयी संघाला खराखुरा करंडक तीन वर्ष मायदेशी ठेवण्याचा नियम फिफाने केला होता. विजयी करंडकाचं औपचारिक नाव ज्युलेस रमिटे वर्ल्डकप ट्रॉफी असं आहे. 1970 मध्ये ब्राझीलला हा करंडक ठेवण्याची अनुमती देण्यात आली. पण आता विजयी संघाला खरा करंडक मिळत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
जुन्या काळी खराखुरा करंडक विशेषत: ज्युलेस रिमेट करंडक फुटबॉल संघटनांना देण्यात असे. पण आता मात्र प्रतिकृती देण्यात येते. या महत्त्वपूर्ण करंडकाची प्रतिष्ठा आणि सुरक्षा लक्षात घेऊन फिफाने धोरणात बदल केला. याला निमित्तही तसंच झालं कारण हा करंडक चोरीलाही गेला होता.
एकदा इंग्लंडमध्ये आणि नंतर एकदा ब्राझीलमध्ये हा करंडक चोरीला गेला होता. नशिबाने तो गवसला. पण याप्रकरणानंतर फिफाने जेत्या संघाला खराखुरा करंडक न देण्याचा निर्णय घेतला.
फिफाचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधल्या झुरित्च येथे आहे. याच मुख्यालयात फुटबॉल वर्ल्ड कपचा खराखुरा करंडक ठेवण्यात येतो. तिथेही अतिशय कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत हा करंडक ठेवण्यात येतो.
24 तास या करंडकाभोवती सुरक्षारक्षकांचा वेढा असतो. हा करंडक चोरीला जाऊ नये, गहाळ होऊ नये, त्याचं नुकसान-झीज होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येते. काही विशिष्ट प्रसंगीच खराखुरा करंडक बाहेर काढला जातो.
वर्ल्डकप फायनल्सचा ड्रॉ, वर्ल्डकपची पहिली आणि शेवटची अर्थात फायनलची लढत, फिफा वर्ल्डकप ट्रॉफी टूर या प्रसंगीच खराखुरा करंडक लोकांसमोर येतो.
फुटबॉलविश्वात क्लब अर्थात लीग स्पर्धा प्रचंड लोकप्रिय आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग, बुंडेसलिगा, ला लिगा, सीरी ए यासह असंख्य लीग्स जगभर खेळवल्या जातात. या स्पर्धांचं प्रचंड मोठं अर्थकारणही आहे. हंगामाअखेर विजेत्या संघाला खराखुरा करंडक देण्यात येतो पण त्यांनाही तो आपल्याकडे ठेवता येत नाही.
युएफाकडे चॅम्पियन्स लीगची ट्रॉफी आहे. इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेसाठी दोन खरेखुरे करंडक तयार करण्यात आले आहेत. विजेत्या संघाला एक करंडक पुढचा हंगाम सुरू होईपर्यंत आपल्याकडे ठेवता येतो. दुसरा करंडक लीगकर्त्यांकडे राहतो.

फोटो स्रोत, Getty Images
एफए कप स्पर्धेच्या विजेत्या संघाला खराखुरा करंडक देण्यात येतो. मार्च महिन्यानंतर तो करंडक लीगकर्त्यांकडे परत येतो. बहुतांश लीगमध्ये विजेत्या संघाला मूळ करंडकासारखी दिसणारी प्रतिकृती प्रदान करण्यात येते.
फुटबॉल वर्ल्डकपची सुरुवात 1930 मध्ये झाली. विजेत्या संघाला जो करंडक देण्यात आला त्याचं नाव जुल्स रिमेट ट्रॉफी देण्यात आली. 1970 पर्यंत विजेत्या संघाला जूल्स रिमेट ट्रॉफीच देण्यात येत होती. त्यानंतर ट्रॉफीचं नूतनीकरण करण्यात आलं. इटलीचे सिल्व्हिओ गजानिया यांनी नव्या ट्रॉफीचं डिझाईन केलं.
या करंडकाचं वजन जवळपास 6.175 किलो एवढं आहे. ही ट्रॉफी तयार करण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा उपयोग करण्यात आला आहे.
ट्रॉफीची लांबी 36.8 सेंटीमीटर एवढी आहे तर व्यास 13 सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या खालच्या भागावर मॅलाकाइट स्टोनचे दोन स्तरीय आवरण देण्यात आलं आहे. 1994 साली ट्रॉफीत थोडा बदल झाला आणि विजेत्या संघाचं नाव खाली कोरण्यात येऊ लागलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








