प्रेस रिव्ह्यू: 'बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला फायदा नाही'

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

शरद पवारांची बुलेट ट्रेनवर टीका आणि नारायण राणे यांची अमित शहांसोबत भेट, अशा महत्त्वाच्या बातम्या आज प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रांमध्ये आहे.

सविस्तर बातम्या खालीलप्रमाणे...

'बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काही फायदा नाही'

अहमदाबाद ते मुंबई धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा निर्णय अविचारी असून तिचा महाराष्ट्राला काहीही फायदा होणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार पवार म्हणाले, "बुलेट ट्रेनपेक्षाही मोठा निधी रेल्वेची सध्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी, चंद्रपूर-मुंबई रेल्वेसाठी किंवा पाटबंधाऱ्यांसाठी वापरला असता तर ते अधिक फायद्याचं ठरलं असतं."

भाजपची कर्जमाफी म्हणजे 'लबाडाचं आवताण आहे', अशी टीकाही पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलताना केली.

'जेटलीजी, बुलेट ट्रेनला हिंदीत काय म्हणतात?'

अरुण जेटली

फोटो स्रोत, Getty Images

एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळं कार्यक्रमाला वेगळीच कलाटणी मिळाली.

'द इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार रविवारी कार्यक्रम सुरू असताना एका व्यक्तीनं विचारलं, "जेटलीजी, बुलेट ट्रेनला हिंदीत काय म्हणतात? हिंदी बोलताना इंग्रजी शब्दांचा मध्ये-मध्ये उपयोग करू नका."

या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे जेटलींना कळलंच नाही. "कृपया, गंभीर व्हा" इतकंच ते म्हणाले. "हा गंभीर विषय आहे," असं जेटली म्हणाले.

मात्र आपला प्रश्न गंभीर होता, असं त्या अज्ञात व्यक्तीनं नंतर सांगितलं.

'भारताचं म्हणून दाखवलं गाजा पट्ट्यातलं चित्र'

मलिहा लोधी

फोटो स्रोत, Twitter/Getty

फोटो कॅप्शन, सुषमा स्वराज यांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या प्रतिनिधी लोधी यांनी केली चूक

"भारतीय सैन्यातर्फे काश्मिर खोऱ्यात पेलेट गनचा वापर होतो. त्याचा हा पुरावा आहे," असं म्हणत पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत एका जखमी महिलेचं छायाचित्र दाखवलं. मात्र ते चित्र भारताचं नव्हतं.

पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी भारताविरुद्ध दाखवलेला पुरावा गाजा पट्ट्यातील एका जखमी तरुणीचं चित्र होतं. लोधी यांनी भारताला "दहशतवाद्यांची जननी" असं देखील म्हटलं.

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत शनिवारी बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं होतं की, "आम्ही आयआयटी आणि आयआयएमची स्थापना केली तुम्ही दहशतवादी गटांची स्थापना केली."

त्यांना प्रत्युत्तर देताना लोधी यांनी चूक केली आणि त्याची सर्वत्र चर्चा झाली.

त्यांनी दाखवलेलं छायाचित्र हे जेरुसलम येथील पत्रकार हैदी लिव्हाइन यांनी 2014 मध्ये काढलं होतं. हे छायाचित्र द गार्डियन या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं होतं, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

नारायण राणे अमित शाह यांना भेटणार?

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसला रामराम केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे सध्या आपले राजकीय पर्याय चाचपून पाहत आहेत. आज ते दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतील, अशी चर्चा आहे, असं वृत्त दिव्य मराठीनं दिलं आहे.

दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होईल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)