जाईबाई चौधरी : पहिल्या दलित महिला मुख्याध्यापक आणि दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या; सावित्रीच्या सोबतिणी भाग – 2
नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड गावात जन्मलेल्या जाईबाईंचा प्रवास रेल्वेस्टेशनवर सामान उचलणारी हमाल ते शिक्षिका ते दलित चळवळीतल्या कार्यकर्त्या असा झाला. अर्थातच हा प्रवास सोपा नव्हता पण त्यांनी जिद्दीने मार्गातल्या प्रत्येक अडचणीला मागे सारत मार्गक्रमणा केली.

बीबीसी पुन्हा घेऊन आलंय इतिहासातल्या काही शूरवीर, धैर्यवान महिलांच्या कथा. सावित्रीच्या सोबतिणी ही खास सीरिज त्या दलित आणि मुस्लीम महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकते ज्यांना उपेक्षितांचं जीणं मंजूर नव्हतं.

जाईबाईंनी प्राथमिक शिक्षण सामाजिक कार्यकर्ते किसन फागुजी बनसोडे यांनी सुरू केलेल्या शाळेत घेतलं. पण परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं. वयाच्या नवव्या वर्षीच त्यांचं लग्न झालं. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी नागपूर रेल्वेस्टेशनवर हमाली सुरू केली.
त्यावेळी एक मिशनरी नन सिस्टर ग्रेगरी यांनी जाईबाईंना डोक्यावर ओझं वाहून नेताना पाहिलं. जाईबाईंशी बोलल्यावर सिस्टर ग्रेगरींच्या लक्षात आलं की ही मुलगी हुशार आहे.
त्यांनी जाईबाईंच्या पुढच्या शिक्षणासाठी मदत केली. जाईबाईंचं शिक्षण पूर्ण झाल्यावर सिस्टर ग्रेगरी यांनी त्यांना मिशनरी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीही मिळवून दिली. जाईबाईंच्या मार्गातल्या अडचणींची ही सुरुवात होती.
नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर असणाऱ्या अभिलाषा राऊत म्हणतात, "जाईबाईंना वाटायचं की जशी मला शिक्षणात मदत मिळाली तशी इतर गरीब, दलित मुलींनाही मिळावी. पण एक दलित महिला शिक्षिका झालीये हे त्यावेळच्या काही लोकांना रूचलं नाही. पालकांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवणं बंद केलं. दबावामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली."
पण हा जाईबाईंच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता.
"त्यांना अतीव दुःख झालं खरं पण त्यांनी ठरवलं की मागास मुलींसाठी मी स्वतः शाळा सुरू करणार."

फोटो स्रोत, Gopalshoonya
जाईबाईंनी नागपूरमध्ये दलित आणि गरीब मुलींसाठी शाळा सुरू केली. या शाळेचं नाव होतं संत चोखामेळा गर्ल्स स्कुल. आता त्यांच्यापुढे आव्हान होतं ते मुलींना शाळेत आणायचं.
डॉ. शिल्पा चौधरी जाईबाईंच्या पणती आहेत. त्यांच्या कार्याविषयी सांगताना त्या म्हणतात, "मुलींना शाळेत आणण्यासाठी जाईबाईंनी खूप प्रयत्न केले. त्यांनी मुलींच्या शिक्षणाबदद्ल जात्यावरची गाणी लिहिली. जात्यावर दळताना त्या कॉलनीतल्या इतर बायकांसमवेत ती गाणी म्हणायच्या."
रोज मुलींनी शाळेत यावं म्हणून जाईबाई घरोघरी जायच्या. "मुली अस्वच्छ कपड्यात फिरत असल्या तर जाईबाई स्वतः मुलींच्या केसांना तेल लावून, त्यांची वेणीफणी करायच्या. म्हणायच्या की बाई तू नको घालू शाळेचा गणवेश, पण स्वच्छ कपडे घालून शाळेत ये."

फोटो स्रोत, Gopalshoonya
जाईबाईंनी स्वतःच्या सुनेलाही शिकवलं जी नंतर त्यांच्याच शाळेत शिकवायला लागली. जाईबाईंचं काम फक्त मुलींच्या शिक्षणापुरतंच मर्यादित नव्हतं.
त्यांनी दलितांचे हक्क आणि अधिकारांसाठीही काम केलं. त्यांनी दलित महिलांच्या हक्कांसाठी खूप काम केलं. पण त्यांना अनेकदा आपल्या जातीमुळे अपमानाचाही सामना करावा लागला.
"1937 साली ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सचं आयोजन झालं होतं. जाईबाई शिक्षिका होत्या, दलित कार्यकर्त्या होत्या, त्यामुळे त्यांना या सभेचं आमंत्रण होतं," दिल्लीस्थित लेखिका अनिता भारती म्हणतात.
त्या पुढे सांगतात, "जाईबाई त्यांच्या सहकारी महिलेसह यात सहभागी झाल्या. पण तिथे त्यांना भेदभावाला सामोरं जावं लागलं. जेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा जाईबाई आणि त्यांच्या मैत्रिणीला वेगळ्या ठिकाणी जेवायला वाढलं. इतर उच्चवर्णीय महिलांनी त्यांना आपल्या पंगतीला जेवायला बसवलं नाही. जाईबाईंना याचा प्रचंड राग आला. त्यांनी ठरवलं की यापुढे त्या अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत कारण या महिला त्यांचा जातीभेद सोडणार नाहीत. याच्याच विरोधात त्यांनी 1938 मध्ये दलित महिलांचं एक मोठं संमेलन भरवलं."

फोटो स्रोत, Gopalshoonya
याच कार्यक्रमात त्यांनी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी दलित महिलांच्या चळवळीची पुढची दिशा काय असावी हे ठरवलं.
ज्या शाळेचा पाया जाईबाईंनी 1922 साली रचला होता ती आता उच्च माध्यमिक शाळा झाली आहे. या शाळेचं नाव आता जाईबाई चौधरी ज्ञानपीठ शाळा असं आहे.
जाईबाईंच्या अनेक क्षेत्रातल्या पहिला महिला आहेत असं अनिता भारती म्हणतात. "जाईबाई चौधरी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध दलित कार्यकर्त्या, शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापक, पहिल्या कुली, पहिल्या दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या आहेत."
जाईबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी जे काम केलं त्यामुळे कित्येक मुलींना संधीची दार खुली झाली.
"जाईंमुळे मुलींच्या शिक्षणाला महत्त्व आलं. ज्या हजारो विद्यार्थिनी या शाळेतून शिकून गेल्या त्या प्रत्येकीत जाईचं बीज रूजवलं गेलंय. जाईंच्या विद्यार्थिनी आपल्या मुलींना कधीच कमी लेखणार नाहीत. त्या आपल्या मुलींना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगतील आणि स्वातंत्र्य देतील. हे स्वातंत्र्य जाईंनी त्याकाळी आपल्या सुनेला दिलं होतं," डॉ शिल्पा चौधरी म्हणतात.
"आज जाईंच्या विद्यार्थिनी, जाईच्या पाकळ्या, फुलं, बीज म्हणू आपण... हे शिक्षणाचं व्रत पुढे नेत आहेत."
क्रेडिट
रिपोर्टर - अनघा पाठक
शूट - प्रवीण मुधोळकर, तुषार कुलकर्णी
एडिट - दिपक जसरोटीया
प्रोड्युसर - सुशीला सिंह
इलस्ट्रेशन - गोपाल शून्य
ग्राफिक - हर्ष साहनी
हे पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)