कृष्णम्माल जगन्नाथन: भूमिहीनांना हक्काची जमीन मिळावी म्हणून आंदोलन करणारी दलित महिला #सावित्रीच्यासोबतिणी भाग–2
तामिळनाडूत जन्मलेल्या कृष्णम्माल जगन्नाथन त्यांच्या भूदान आंदोलनातल्या योगदानासाठी संपूर्ण देशात ओळखल्या जातात.
कृष्णम्माल जगन्नाथन एक अशा दलित महिला आहेत ज्यांनी भूमिहीनांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी म्हणून आंदोलन केलं.

बीबीसी पुन्हा घेऊन आलंय इतिहासातल्या काही शूरवीर, धैर्यवान महिलांच्या कथा. सावित्रीच्या सोबतिणी ही खास सीरिज त्या दलित आणि मुस्लीम महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकते ज्यांना उपेक्षितांचं जीणं मंजूर नव्हतं.

कृष्णम्माल यांचा जन्म तामिळनाडूच्या दिन्डक्कलमध्ये झाला. त्या गांधी विचारसरणी आणि आपल्याने आईने गरिबीविरोधात केलेल्या लढाईमुळे प्रभावित झाल्या होत्या. गरिबांना हक्काची जमीन मिळवून देण्याच्या त्यांच्या आंदोलनाची प्रेरणा त्यांनी इथूनच घेतली.
त्या सन 1950 मध्ये स्वातंत्र्यसैनिक विनोबा भावेंच्या भूदान चळवळीशी जोडल्या गेल्या. जमीनदारांनी आपल्या वाटेची काही जमीन गरीब भूमिहीन शेतकऱ्यांना द्यावी म्हणून त्यांनी मोहीम चालवली.
जमिनीची नोंदणी महिलांच्या नावे व्हावी, यासाठी झालेल्या आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलं.
भूदान आंदोलन म्हणजे रक्ताचा थेंबही न सांडता चालवली गेलेली जमिनीविषयक धोरणांची चळवळ असं म्हटलं जातं. याची सुरुवात महात्मा गांधीच्या विचारसरणीने प्रेरित असणाऱ्या विनोबा भावेंनी 1951 साली तेलंगाणातल्या पोचमपल्ली इथून केली होती.
या आंदोलनाचा हेतू जमीनदारांनी स्वेच्छेने आपल्या जमिनीतला काही हिस्सा गरिबांना द्यावा हा होता.
त्या दिवसांविषयी सांगताना कृष्णम्माल म्हणतात, "मी विनोबा भावेंच्या बिहारमधल्या पदयात्रेत वर्षभर सहभागी झाले होते. मग त्यांनी सांगितलं की जगन्नाथन एकटे आहेत, तू त्यांच्याबरोबर काम कर. यानंतर आम्ही तिरुवल्लूर जिल्ह्यामार्गे कांजीवरमला गेलो. कांजीवरमच्या रस्त्यात असताना आम्हाला टी. आर. रामचंद्रांनी त्यांची 100 एकर जमीन दान केली."
कृष्णम्माल यांचे पती जगन्नाथन आणि विनोबा भावेंच्या सहकार्यामुळे त्यांनी अनेक भूमिहीन लोकांना जमीनदारांकडून मोफत किंवा अत्यल्प किंमतीत जमीन मिळवून दिली.
पण त्यांच्या कामात अडचणी आल्याच नाही असं नाही. अनेकदा त्यांना जमीनदारांच्या क्षोभाचा सामना करावा लागला पण कृष्णम्माल कधी मागे हटल्या नाहीत.

फोटो स्रोत, Krishnammal Jagannathan
ज्या गावात त्या आंदोलन करायच्या तिथेच राहायच्या. शांततेच्या मार्गाने चर्चा करायच्या, पदयात्रा काढायच्या आणि श्रीमंतांनी गरिबांची मदत करावी म्हणून त्यांची मनधरणी करायच्या. पण जमीनदारांनी त्यांना सहकार्य केलं असंही नाही.
कृष्णमाल म्हणतात, "जमीनदार आम्हाला भेटू इच्छित नव्हते. एकदिवस ते सगळे नागापट्टमच्या मंगल कार्यालयात बसले होते. त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की मी त्यांच्या गावात रोज जायचं नाही. मला म्हणाले गावापासून लांब राहा. त्यांनी असंही म्हटलं की, मी जर त्यांच्यापैकी कोणाच्याही गावात दिसले तर परिणाम वाईट होतील. मी त्यांना काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. तिथून निघून गेले आणि माझं काम सुरू ठेवलं."
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही कृष्णम्माल कामाचं कौतुक केलं होतं आणि संसदेत म्हटलं होतं की भूदान आंदोलनाअंतर्गत गरिबांना 30 हजार एकर जमीन दिली गेलीये.
सन 1968 मध्ये तामिळनाडूच्या कीलवेनमणीमध्ये एक घटना घडली. हे एक छोटसं गाव होतं.
इथे शेतात काम करणाऱ्या 40 हून जास्त शेतमजुरांना जिवंत जाळलं होतं. या शेतमजुरांनी आपली मजुरी वाढवण्याची मागणी केली होती. या घटनेनंतर कृष्णम्माल तातडीने कीलवेनमणीला गेल्या. राज्य सरकारची मदत घेऊन तिथल्या पीडितांना नुकसानभरपाई म्हणून जमीनदारांकडून जमिनी मिळवून दिल्या. त्यांच्या मुलांसाठी रात्रशाळा सुरू केल्या.

फोटो स्रोत, Krishnammal Jagannathan
गांधी संग्रहालयाचे सचिव के एम नटराजन त्या घटनेनंतर कृष्णम्माल यांनी काय केलं हे सांगतात. "त्या तंजावरच्या कीलवेनमणी गावात गेल्या, जिथे 42 दलित शेतमजुरांना जिवंत जाळलं होतं. त्यांनी तिथल्या लोकांना संघटित केलं आणि प्रत्येक कुटुंबाला 1 एकर जमीन दिली. त्यांच्या मेहनतीने कुटुंबांना आणखी 2-3 एकर जमीन मिळू शकली. त्यांनी बँकांशी चर्चा केली ज्यामुळे 15,000 कुटुंबांना 15,000 एकर जमीन मिळू शकली. या जमिनींची नोंदणी महिलांच्या नावाने केली गेली. म्हणूनच पूर्व तंजावर जिल्ह्यात कृष्णम्माल यांना 'अम्मा' या नावानेही ओळखलं जातं."
कृष्णम्माल यांचं काम फक्त दक्षिणेपुरतंच मर्यादित नव्हतं. त्यांनी बिहारमधल्या लोकांनाही जमिनी मिळवून देण्याचं काम केलं.
"आजही तुम्ही बिहारमध्ये गेलात तर तुम्हाला अनेक लोक सांगतील की आम्ही बोधगया आंदोलनात सहभागी झालो होतो," गांधी विचारक पी व्ही राजगोपाल म्हणतात.
"बोधगया आंदोलन काय होतं? मठच्या विरोधात गरिबांनी केलेलं आंदोलन. त्याचं नेतृत्त्व जगन्नाथन आणि कृष्णम्माल यांनी केलं होतं.
तामिळनाडूसारख्या राज्यातल्या उठून ते बिहारसारख्या हिंदीभाषिक राज्यात गेले. तिथल्या लोकांना संघटित करणं, आंदोलनाच्या माध्यमातून जमीन मिळून देणं हे अवघड काम त्यांनी पार पाडलं. आज हजारो गरीब लोकांकडे, मुसहर समाजाच्या लोकांकडे स्वतःच्या जमिनी आहेत ते कृष्णम्माल आणि जगन्नाथन यांच्या प्रयत्नांमुळेच."

फोटो स्रोत, Krishnammal Jagannathan
यानंतर 5 वर्षांनी 1981 मध्ये लँड फॉर टिलर्स फ्रीडम नावाची संस्था स्थापन केली गेली. या संस्थेचा उद्देश गरिबांना कमी दरात जमीन मिळवण्यासाठी मदत करणं आणि त्यांचं जीवनमान उंचावणं हा होतं. आता या संस्थेचं देश-परदेशात नाव झालं आहे. बाहेरूनही अनेक लोक इथे येत आहेत. अमेरिकन लेखक डेव्हिड एलबर्ट यांनी 2 वर्षं कृष्णम्माल आणि या संस्थेसोबत काम केलं आहे.
डेव्हिड एच एलबर्ट कृष्णम्माल यांच्याविषयी आठवणी सांगतात. "कृष्णम्माल मला पांढऱ्या खादीचे कपडे घालायला लावायच्या. माझी हीच भूमिका होती. त्या मला सरकारी अधिकारी, राजकीय नेते आणि जमीनदारांना भेटायला न्यायच्या. माझं काम अगदीच सोपं होतं. तिथे जायचं, तीन शब्द तामिळमध्ये बोलायचे, कॉफी प्यायची आणि काहीही न बोलता बसून राहायचं. यामुळे एक फायदा झाला की सरकारी अधिकारी लाच घ्यायचे नाहीत. मी भ्रष्टाचाराच्या विरोधातलं एक हत्यार होतो आणि मी त्यांच्यासाठी लकी होतो."
कृष्णम्माल यांनी जमीन सुधारणा आणि उपजीविकेचा अधिकार या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यात पद्मश्री पुरस्काराचाही समावेश होतो.

फोटो स्रोत, Krishnammal Jagannathan
आज कृष्णम्माल 94 वर्षांच्या आहेत. त्या आता लवकर थकतात पण गरिबांना हक्काची जमीन मिळवून देण्याच्या त्यांच्या मोहिमेत अजूनही खंड पडलेला नाही. सध्या त्या भूमिहीन लोकांना 10,000 घरं मिळवून देण्याच्या ड्रीम प्रोजेक्टवर काम करत आहेत.
रिपोर्टर - प्रमिला कृष्णन
निर्मिती - अपर्णा राममूर्ती, सुशीला सिंह
शूट - मदन प्रसाद
एडिट - जेरीन सॅम्युअल, दिपक जसरोटीया
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)