You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

बिहार विधानसभा निकाल : NDAला 200 हून अधिक जागांसह स्पष्ट बहुमत, महागठबंधनला धक्का

भारतीय जनता पक्ष, जनता दल युनायटेड, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) या प्रमुख पक्षांच्या NDAनं कलांमध्ये बहुमत मिळवत महागठबंधनला धक्का दिला आहे.

थोडक्यात

  • बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
  • निकाल समोर आल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मोदींसह सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर नेत्यांचे अभिनंदन केले.
  • पंतप्रधानांनी M-Y फॉर्म्युल्याचा उल्लेख करत आता महिला आणि युवक अशी नवी ओळख या फॉर्म्युलाची झाल्याचं म्हटलं.
  • अमित शहांनी हे निकाल म्हणजे, भारताच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोदी सरकारच्या धोरणावर दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असं म्हटलं.
  • राहुल गांधीही निकाल आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं. तसंच संविधानाच्या रक्षणासाठी लढा सुरू राहील असंही त्यांनी म्हटलं.

लाईव्ह कव्हरेज

टीम बीबीसी मराठी

  1. बिहार निकालांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, 'संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार'

    राहुल गांधी यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना, निकाल आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं.

    "महागठबंधनवर विश्वास दाखवलेल्या बिहारच्या कोट्यवधी मतदारांचे मी आभार मानतो. बिहारमधील निकाल खरंच आश्चर्यकारक आहेत," असं राहुल गांधींनी म्हटलं.

    "सुरुवातीपासूनच निष्पक्ष नसलेल्या एका निवडणुकीत आम्हाला विजय मिळवता आला नाही. हा लढा संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाचा आहे.

    काँग्रेस पक्ष आणि INDIA आघाडी या निकालाचं सखोर समीक्षण करेल आणि लोकशाही वाचवण्यासाठीचे प्रयत्न आणखी प्रभावीपणे करत राहू," असंही राहुल गांधींनी म्हटलं.

  2. बिहार विधानसभा निकाल : आतापर्यंत 200 जागांचे निकाल जाहीर, भाजप सर्वात मोठा पक्ष

    बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत रात्री 8.30 पर्यंत एकूण 202 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

    निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार एनडीएला 168 जागा मिळाल्या. भाजप 9 जागी तर जदयू 17 ठिकाणी आघाडीवर आहे.

    महागठबंधनला आतापर्यंत 26 जागा मिळाल्या आहेत. राजद 5 तर काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे.

    पक्षनिहाय आकडे खालीलप्रमाणे-

    भाजप - 80

    जदयू- 67

    राजद - 20

    लोजपा - 16

    काँग्रेस - 3

    एआयएमआयएम - 5

    एचएएमएस - 4

    राष्ट्रीय लोक मोर्चा - 3

    इतर - 3

  3. बिहार निकालांवर मोदी म्हणाले,'लोगों ने गर्दा उड़ा दिया'; नवीन M-Y फॉर्म्युल्याचा उल्लेख

    बिहारच्या निवडणुकांत मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात आनंद साजरा करताना, 'बिहार के लोगों ने गर्दा उडा दिया' असं म्हटलं.

    नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात पोहोचलेले पंतप्रधान मोदी म्हणाले की, "बिहारच्या जनतेने सर्व विक्रम मोडले आहेत. मी बिहारच्या जनतेला मला प्रचंड मोठा विजय मिळवून देण्याची विनंती केली होती आणि लोकांनी ते मान्य केले. 2010 नंतरचा सर्वात मोठा जनादेश बिहारने दिला."

    "निवडणुकांदरम्यान मी वारंवार जंगल राज, कट्टा सरकारबद्दल बोलत असे. तेव्हा आरजेडीनं विरोध केला नाही पण काँग्रेसला वाईट वाटले. पण आता कट्टा सरकार परत कधीही येणार नाही," असं मोदी म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना मखान्याचा हार घालत स्वागत केलं.

    पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले की, "लोखंडाला लोखंडच कापतं. बिहारमधील काही पक्षांनी तुष्टीकरणाचा M-Y फॉर्म्युला तयार केला होता. hC आजच्या विजयाने एक नवीन सकारात्मक एम-वाय फॉर्म्युला दिला आहे. तो म्हणजे महिला आणि युवक," असं मोदी म्हणाले.

    "नितीशजींनी उत्कृष्ट नेतृत्व केलं. भाजप नेत्यांनी खूप मेहनत घेतली. एनडीए कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर उत्कृष्ट समन्वय प्रस्थापित केला," असंही मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

  4. बिहारच्या 'लाडकी बहीण' योजनेचा नितीश कुमारांना किती लाभ झाला?

    बिहारमध्ये नितीश सरकारने निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी महिलांसाठी रोख रक्कम देण्याची घोषणा केली.

    निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही दहा हजार रुपयांचा हप्ता देण्यात आला ज्यावरून ओरडही झाली. नितीश कुमारांच्या पाठीशी महिला मतदार कायमच उभ्या राहतात असं म्हटलं जातं.

    या योजनेचा नितीश यांना कितपत फायदा झाला? महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये कितपत साम्य पाहायला मिळालं? पाहा विश्लेषण

  5. बिहार विधानसभा निकाल: सायंकाळी 7 वाजेपर्यंत 101 जागांचे निकाल जाहीर, कोणाला किती जागा मिळाल्या?

    बिहार विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 127 जागांचे निकाल समोर आले आहेत. त्यात भाजपला 61, जदयूला 41 तर लोजपाला 8 जागांवर विजय मिळाला आहे.

    सायंकाळी 7 वाजेपर्यंत कल आणि विजय दोन्ही मिळून कुणाला किती जागा?भाजप - 90

    जदयू - 84

    राजद - 25

    लोजपा - 19

    काँग्रेस - 6

    एआयएमआयएम - 5

    हिंदुस्थानी अवाम मोर्चा - 5

    राष्ट्रीय लोक मोर्चा - 4

    इतर - 5

  6. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मानले मोदींसह सर्व सहकारी पक्षांचे आभार

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि एनडीएतील इतर सहकाऱ्यांचे आभार मानले.

    "2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत, राज्यातील जनतेनं प्रचंड बहुमत देऊन आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी, राज्यातील सर्व मतदारांना नमन आणि मनापासून आभार. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो," असं नितीश कुमार यांनी लिहिलं.

    "निवडणुकीत एनडीए आघाडीने पूर्ण एकता दाखवली आणि प्रचंड विजय मिळवला. या विजयाबद्दल आमचे सर्व एनडीए सहयोगी चिराग पासवान, जितन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचे आभार. तुमच्या पाठिंब्याने, बिहार आणखी प्रगती करेल आणि देशातील सर्वात विकसित राज्यांपैकी एक बनेल," असंही त्यांनी म्हटलं.

    या निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये, एनडीए पूर्ण बहुमताकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. एनडीए 202 तर महागठबंधन अवघ्या 34 जागांवर आघाडीवर आहे.

  7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन

    बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मोठ्या आघाडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर नेत्यांचे अभिनंदन केले.

    त्यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले की, "एनडीएनं राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणला. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि राज्याला नवीन उंचीवर नेण्याचा दृष्टिकोन पाहून लोकांनी आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे."

    त्यांनी पुढं लिहिलं की, "या मोठ्या विजयासाठी मी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीए कुटुंबातील सहकारी चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचे मनापासून अभिनंदन करतो."

    भाजप, जेडीयू आणि लोजपा यांचा समावेश असलेल्या एनडीएनं 200 हून अधिका जागांवर आघाडी घेतली आहे. तर आरजेडी आणि काँग्रेस यांचा समावेश असलेलं महागठबंधन 35 च्याच आसपास राहिल्याचं दिसत आहे.

  8. नितीश कुमार वि. तेजस्वी यादव, पावसातल्या सभांचा 'तो' किस्सा

    भारतीय जनता पक्ष, जनता दल युनायटेड, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) या प्रमुख पक्षांच्या NDAनं कलांमध्ये बहुमत मिळवत महागठबंधनला धक्का दिला आहे.

  9. बिहारच्या निकालांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएच्या बाजूने मोठा निकाल लागण्याचे संकेत देणारे कल समोर आले आहेत. त्यावर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    त्यांनी X वर लिहिलं की, " बिहारच्या लोकांनी ज्या आशेनं आणि आत्मविश्वासानं NDA0 ला हा जनादेश दिला आहे, त्याच आशेने आणि आत्मविश्वासाने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकार अधिक समर्पणाने त्याची पूर्तता करेल हे आश्वासन मी नागरिकांना आणि विशेषतः आमच्या माता आणि भगिनींना देतो."

    "बिहारमधील जनतेचं प्रत्येक मत हे भारताच्या सुरक्षेशी आणि साधन संपत्तीशी खेळणाऱ्या घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोदी सरकारच्या धोरणावर दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे. मतांसाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना जनतेने चोख उत्तर दिले आहे," असंही शहा म्हणाले.

    "मतदार याद्यांची पडताळणी आवश्यक आहे आणि त्याविरुद्ध राजकारणाला जागा नाही, ही संपूर्ण देशाची भावना बिहारच्या जनतेने प्रतिबिंबित केली आहे. त्यामुळं राहुल गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष आज बिहारमध्ये सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे," असंही शहा म्हणाले.

    भाजप, जेडीयू आणि लोजपा यांचा समावेश असलेलं एनडीए 203 जागांवर आघाडीवर आहे, तर आरजेडी आणि काँग्रेस यांचा समावेश असलेलं महागठबंधन फक्त 34 जागांवर आघाडीवर आहे.

  10. कांग्रेस नेते भूपेश बघेल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना दिल्या 'शुभेच्छा'

    बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये दिसलेल्या महागठबंधनच्या पिछाडीवर काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, "जे कल दिसत आहेत, त्यावरून एनडीएला तीन चतुर्थांश बहुमत दिसत आहे. याबाबत अमित शहा आधीच बोलले आहेत."

    "या सर्वासाठी एक व्यक्ती जबाबदार असेल तर ती म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं काम केलं, त्यावरून बिहार निवडणुकीत ज्ञानेश कुमार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, हे अत्यंत स्पष्ट आहे."

    कांग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी म्हटलं की, "लोकशाही धोक्यात आहे. जी परिस्थिती हरियाणानंतर महाराष्ट्रात दिसली तीच इथं दिसली. ज्याप्रकारे पैसा आणि शक्तीचा वापर करण्यात आला, त्याची कल्पनाही करता येणार नाही. निवडणूक आयोग त्यांची मदत करत आहेत.”

    “निष्पक्ष निवडणुका झाल्या नाही तर वोट चोरी होते. निवडणुकांत 1 कोटी 35 लाख महिलांच्या खात्यांमध्ये 10 हजार रुपये गेले. निवडणूक आयोगाला काय झालं आहे? राजस्थानात निवडणुकांच्या घोषणांनंतर पेन्शन मिळणं बंद झाली होती. पण इथं सगळं सुरू होतं."

  11. बिहार विधानसभा निकाल: जदयू, भाजप, आरजेडी किती जागांवर आघाडीवर?

    बिहार निवडणुकीत एनडीएनं मोठी आघाडी कायम ठेवली आहे. त्यांनी दुपारी तीनपर्यंत 206 जागांवर आघाडी घेतली.

    तर महागठबंधन त्यांच्या खूपच मागे आहे. त्यांना फक्त 30 जागांवर आघाडी आहे.

    निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत भाजप 95 जागांवर, जेडीयू 82 जागांवर, लोजपा (आरव्ही) 20 जागांवर, एआयएमआयएम 6 जागांवर आघाडीवर आहे.

    काँग्रेसला फक्त तीन जागांवर आघाडी आहे, तर राष्ट्रीय लोक मोर्चा चार जागांवर आघाडीवर आहे.

    सीपीएम आणि सीपीआय एमएल प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.

    रामगड विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचा एकमेव उमेदवार आघाडीवर आहे.

    राज्यातील 243जागांसाठी 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले.

  12. बिहार विधानसभा निकाल : महाआघाडीच्या ट्रेंडमधील पिछाडीवर काय म्हणाले राजदचे खासदार?

    बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत एनडीएच्या आघाडीवर भाष्य करताना राजद खासदार मनोज झा यांनी मतमोजणी प्रक्रिया संथ असल्याचा आरोप केला.

    निवडणूक आयोगाची वेबसाइट वेळेवर अपडेट केली जात नसल्याचंही ते म्हणाले.

    मनोज झा म्हणाले की, "सुमारे 60 ते 70 जागा खूप कमी फरकाच्या आहेत. आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तिथे परिस्थिती बदलण्याची पूर्ण शक्यता आहे."

    एनडीएच्या आघाडीबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, "भाजप आनंद साजरा करायची घाई करत आहे. सुरुवातीचे कल बदलत आणि उलटत असल्याचे आपण पाहिले आहे."

    बिहार निवडणुकीच्या कलांनुसार एनडीएला मोठा विजय मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एनडीए 198 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी फक्त 39 जागांवर पुढं आहे.

  13. बिहार विधानसभा निकाल : तेजस्वी यादव पुन्हा पिछाडीवर, 10 फेऱ्यांनंतर काय स्थिती?

    10 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे सतीश कुमार यांच्यापेक्षा 3000 मतांनी पिछाडीवर आहेत.

    या जागेवरून जनसुराज पक्षाचे चंचल कुमार कलांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

    बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यात एनडीए मोठ्या बहुमताने आघाडीवर आहे.

    भाजप, जदयू आणि लोजपा यांचा समावेश असलेल्या एनडीएला 201 जागांवर आघाडीवर आहे. राजद आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाआघाडीला फक्त ३६ जागांवर आघाडी आहे.

  14. LIVE Bihar Election Results : नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी सलग पाचव्यांदा परत येण्याच्या तयारीत

    बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं मोठ्या विजयाकडं वाटचाल केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये एनडीए 201 जागांसह आघाडीवर आहे, तर महाआघाडीला 36 जागांवर आघाडी आहे.

  15. नमस्कार, बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर आपले स्वागत आहे. आतापर्यंत बीबीसी मराठी प्रतिनिधी तुषार कुलकर्णी यांनी बिहार निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या.

    आतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बीबीसी मराठी प्रतिनिधी नितीन सुलताने तुमच्यापर्यंत महत्त्वाच्या अपडेट्स बातम्या पोहोचवणार आहे.

    बिहार निवडणुकीवर सर्वांचे लक्ष आहे. बिहार विधानसभा ही देशातील सर्वांत मोठ्या विधानसभांपैकी एक आहे.

    बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटवरील काही बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

    - बिहार विधानसभा निवडणुकीचे ताजे निकाल

  16. बिहार विधानसभा निकाल : मोठी आघाडी मिळाल्यानंतर काय म्हणाल्या मैथिली ठाकूर?

    बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं मोठ्या विजयाकडं वाटचाल केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये एनडीए 196 जागांसह आघाडीवर आहे, तर महाआघाडीला 42 जागांवर आघाडी आहे.

    अलीनगरमधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर 6800 मतांनी आघाडीवर आहेत.

    या आघाडीनंतर पीटीआयशी वृत्तसंस्थेशी बोलताना मैथिली ठाकूर म्हणाली की, "मला खूप छान वाटत आहे. मी राजकारणात प्रवेश केल्यापासून मला कधीही शंका वाटली नाही."

    "मला मतदारसंघातील लोकांकडून खूप प्रेम मिळालं. आता पुढील पाच वर्षांसाठीही मी पूर्णपणे तयार आहे."

  17. विधानसभा निवडणूक निकाल कार्टून

    बिहार विधानसभा निवडणुकांसंदर्भात समोर आलेले कल पाहता, बीबीसीचे व्यंगचित्रकार कीर्तीश भट यांनी केलेलं राजकीय पक्षांच्या स्थितीचं वर्णन.

  18. लालू प्रसाद यादव यांचे घराबाहेर शुकशुकाट, तर भाजप-जदयु कार्यालयाबाहेर मिठाईचे वाटप

    बिहार निवडणुकीत NDA ने 190 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. जनता दल युनायटेड आणि भाजपच्या कार्यालयाबाहेर आनंदाचे वातावरण आहे.

    तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानाबाहेर शुकशुकाट आहे.

    सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार, NDA 190 जागांवर आघाडीवर आहे. विभानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 122 जागांची आवश्यकता असते.

  19. 'NDAची बहुमताकडे वाटचाल म्हणजे निवडणुकीय षड्यंत्र' ; अखिलेश यादव यांची टीका

    बिहार निवडणुकीत आलेल्या कलांनुसार NDAची प्रचंड बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. यावर उत्तर प्रदेशचे विरोधी पक्ष नेते आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    NDA ची प्रचंड बहुमताकडे वाटचाल म्हणजे 'निवडणुकीय षड्यंत्र' असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू (SIR) मुळेच NDA ला बहुमत मिळतंय असं त्यांनी म्हटलं.

    "बिहारमध्ये जो SIR चा खेळ खेळण्यात आला तो तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात आम्ही होऊ देणार नाहीत, कारण या निवडणुकीय षड्यंत्राचे बिंग आता फुटले आहे," असे अखिलेश यादव यांनी म्हटले.

    अखिलेश यादव म्हणाले, की निवडणुकीतील प्रकारांवर देखरेख ठेवण्यासाठी समाजवादीचे कार्यकर्ते काम करतील.

    अखिलेश यादव यांनी या कार्यकर्त्यांसाठी 'PDA प्रहरी' असे नाव दिले आहे. हे कार्यकर्ते निवडणुकीच्या कारभारावर लक्ष ठेवतील आणि जर काही गैर प्रकार आढळला तर तक्रार नोंदवतील असे अखिलेश यांनी सांगितले होते.

    सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार, NDA 190 जागांवर आघाडीवर आहे. विभानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 122 जागांची आवश्यकता असते.

  20. तुरुंगात असलेले 'बाहुबली' अनंत सिंह मोकामातून आघाडीवर

    'बाहुबली' नेता दुलारचंद यादव यांच्या हत्येच्या आरोपात तुरुंगात असलेले 'बाहुबली' नेता अनंत सिंह हे मोकामा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. ते जनता दलाचे उमेदवार आहेत.

    निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार 9,600 मतांनी पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजदच्या उमेदवार वीणा देवी आहेत.

    तिसऱ्या क्रमांकावर जन सुराज पार्टीचे उमेदवार प्रियदर्शी पीयूष आहेत.

    निवडणूक प्रचारावेळी दुलारचंद यादव यांची हत्या झाली होती, त्या हत्येचा आरोप अनंत सिंह यांच्यावर आहे. सध्या ते तुरुंगात आहेत.

    या घटनेची सविस्तर बातमी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.