पाकिस्तान कोक स्टुडिओ : ज्यावर भारतीय चाहते जीव ओवाळून टाकतात, कारण...

फोटो स्रोत, COKE STUDIO PAKISTAN
- Author, झोया मतीन
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
"हे गाणं भाषा, धर्म, राष्ट्रीयता, असे सर्व अडथळे तोडत थेट हृदयाला स्पर्श करतं. भारताकडून खूप खूप प्रेम."
कोक स्टुडियो पाकिस्तानच्या यू-ट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये भारतीयांकडून अशा लाखो कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या चॅनलचं हे कमेंट सेक्शन एका अर्थाने भारतीय उपखंडातील इंटरनेटचा सर्वांत हळवा कोपरा म्हणावा लागेल.
कोक स्टुडिओ पाकिस्तान हा पाकिस्तानातील सर्वांत जास्त काळ चालणारा म्युझिक शो आहे. शीतपेय उद्योगातील सर्वांत मोठ्या कोका-कोला ब्रँडची ही निर्मिती आहे.
पाकिस्तानातील काही प्रसिद्ध कलाकारांचे स्टुडिओ-रेकॉर्ड केलेले परफॉर्मन्स या कार्यक्रमात दाखवले जातात.
लोक परंपरा आणि शास्त्रीय कवितांमधून वाहत येणाऱ्या उडत्या चालीचं पॉप आणि थेट आत्म्याला स्पर्श करणाऱ्या कव्वालीपासून ते रॅपपर्यंत अनेक प्रकारचं संगीत या कोक स्टुडियोत ऐकायला मिळतं.
या शोने पाकिस्तानात सुरुवातीपासूनच घवघवीत यश मिळवलं. पण, भारतातली शोची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनाही आश्चर्य वाटलं.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशातलं वैर सर्वश्रृत आहे. या वैरामुळेच सामायिक इतिहास असूनही दोन्ही देशांमध्ये अनेकदा सांस्कृतिक देवाणघेवाणीत अडथळा निर्माण झाला आहे.
सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार शंतनू मोईत्रा बीबीसीशी बोलताना म्हणाले, "कोक स्टुडिओ पाकिस्ताननेसुद्धा भारताकडून इतकं प्रेम मिळेल, अशी कल्पना केली नव्हती. भारतामध्ये भारतातल्या कोक स्टुडियोपेक्षा पाकिस्तानातील कोक स्टुडियो अधिक लोकप्रिय झाला आणि हे यश अविश्वसनीय आहे."
दोन्ही देशांमधले संबंध तणावाचे असले तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकमेकांच्या कला आणि संस्कृती याविषयी कायमच आत्मीयता राहिली आहे.

फोटो स्रोत, youtube
गुलाम अली आणि आबिदा परवीन यांसारख्या दिग्गज पाकिस्तानी गायकांच्या रचना आजही लाखो भारतीय गुणगुणतात. तर भारतात तयार होणारे चित्रपट बघत बघत पाकिस्तानातल्या पिढ्यानपिढ्या मोठ्या झाल्या आहेत.
पाकिस्तानात बॉलीवूड चित्रपटांनी बॉक्स-ऑफिसचे रेकॉर्ड तोडले आहेत. तर पाकिस्तानातील टेलिव्हिजन मालिकांना भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत दोन्ही देशांतले कलाकार अनेकदा एकत्र काम करत. पण राजकीय शत्रुत्व सांस्कृतिक क्षेत्रात शिरलं आणि बॉलिवूडने पाकिस्तानी कलाकारांना दूर सारलं. पाकिस्ताननेही भारतीय चित्रपटांवर बंदी घातली.
कोक स्टुडिओ पाकिस्तानवरील भारतीयांचं प्रेम मात्र अजूनही टिकून आहे.
हा शो पाकिस्तानी संगीतकार रोहेल हयात यांनी लॉन्च केला होता. या शोचे 14 पैकी नऊ सीझन त्यांनी तयार केले होते.
"1980 च्या दशकात ऐन तारुण्यात मी पिंक फ्लॉइड आणि द डोअर्सच्या गाण्यांवर फिदा होतो," असं हयात सांगतात.
ते म्हणतात की ते अनेक वर्षं अशा "पाश्चिमात्य बुडबुड्यात" होते, जिथे स्थानिक संगीत ऐकणं आधुनिक किंवा सो कॉल्ड कूल मानलं जात नव्हतं.
पण राहत फतेह अली खानसारख्या प्रसिद्ध कव्वाली कलाकारासोबत निर्माता म्हणून काम करायला लागल्यावर त्यांच्या या गैरसमजाला तडे जाऊ लागले.
ते सांगतात, "आपलं संगीत किती गहीरं आहे, याची जाणीव मला झाली. हा माझ्यासाठी नव्या जाणिवेचा क्षण होता."
त्यानंतर हयात यांनी फ्यूजन आणि एक्लेक्टिझमचा प्रयोग करत संगीत क्षेत्रात नवा प्रवास सुरू केला. त्यांनी पाकिस्तानच्या पारंपरिक संगीताचा खोलात जाऊन अभ्यास सुरू केला आणि त्याला इलेक्ट्रॉनिक लँडस्केपमध्ये जोडण्याचे नवीन मार्ग तयार केले.

फोटो स्रोत, Getty Images
"आमचं पारंपरिक संगीत जगाशी जोडणं, ही त्यामागची कल्पना होती. पण सगळ्यांना रुचेल, पटेल अशा आवाजात," ते स्पष्ट करतात.
2005 साली कोका-कोलाची साथ मिळाली. कंपनीने ब्राझीलमध्ये प्रमोशनल प्रोजेक्ट म्हणून कोक स्टुडिओ राबवला होता. तीच कल्पना आम्ही पाकिस्तानात राबवली.
यात आव्हानं होती. सुरुवातीच्या काळात अनेक जण संशयाने पाहायचे आणि पहिल्या सीझनमध्ये तर केवळ "एक प्रयोग" म्हणून फक्त तीन-चार गाणीच करण्याची परवानगी मिळाल्याचं हयात सांगतात. कोक स्टुडियो पाकिस्तानचा पहिला सीझन 2008 मध्ये रिलीज झाला.
हयात सांगतात "पण, ती सगळी गाणी अत्यंत गाजली आणि दुसरा सीझन येईपर्यंत मी या कामात स्वतःला झोकून दिलं."
कोक स्टुडियो पाकिस्तान सुरू होऊन एक दशक लोटलं होतं आणि देशभरात शोचे चाहते दिवसेंदिवस वाढतच होते. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी आता स्वतःचे कोक स्टुडियो सुरू केले होते. पण, मूळ पाकिस्तानचा कोक स्टुडियो अजूनही सर्वांत लोकप्रिय आहे.
गेली अनेक वर्षं हा शो बघत असलेल्या एका भारतीय चाहत्याचं म्हणणं आहे, "प्रत्येक गाण्यात मोठा इतिहास सामावलेला असतो, गाण्याचा आत्मा असतो. पण, गाण्यात असंही काही असतं ज्यामुळे तुमची उठून नाचण्याची इच्छा होते."

फोटो स्रोत, ROHAIL HYATT
कोक स्टुडिओने पाकिस्तानचं पॉप ते कव्वालीपर्यंतचं सगळं संगीत घेतलं आणि ते एकाच व्यासपीठावर ठेवलं, असं स्ट्रिंग्स या पाकिस्तानी पॉप बँडचे प्रमुख गायक फैसल कपाडिया म्हणतात. त्यांनी या शोचे चार सीझन तयार केले आहेत.
शोचे निर्माते कायम नवनवीन कल्पना घेऊन येतात. शोचा फ्रेशनेस कायम राहण्यामागचं हेही एक महत्त्वाचं कारण आहे.
बीबीसीशी बोलताना कपाडिया सांगतात, "जेव्हा जेव्हा नवीन निर्माता आला त्याने संगीताला स्वत:चा टच दिला. प्रत्येक सीझनमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी ऐकायला मिळतं."
हयात यांनी कोक स्टुडियोला एका वेगळ्या पठडीत बसवण्यासाठी मनाला उल्हासित करणारं संगीत दिलं. तर कपाडिया यांनी भर दिला सूफी संत अमीर खुसरो यांच्या पारंपारिक कवितांवर.
या पारंपरिक कवितांना सोबत केली कपाडिया यांच्या बँडची ओळख असलेल्या पॉप रॉक संगीताने आणि जे संगीत ते लहानपणापासून ऐकत आले होते त्या शास्त्रीय चित्रपट संगीताने.
याविषयी सांगताना कपाडिया म्हणतात, "हे थोडं जेम्स बाँडच्या सिनेमांसारखं आहे. प्रत्येक वेळी अभिनेता बदलतो. थीम तीच राहते. पण चित्रपटाचा फील बदलतो."
हयात यांच्यासाठी कोक स्टुडियो म्हणजे संगीत उथळ न करता त्याचा नव्याने शोध घेणं होतं.
ते म्हणतात "ही आमची एकप्रकारे परीक्षा होती. जिथे संगीताच्या गाभ्याला फारसा धक्का न लावता पाश्चिमात्य श्रोत्यांनाही आपलंस वाटेल, असं संगीत आम्हाला तयार करायचं होतं."
या शोमध्ये अनेकदा सहभागी झालेल्या पाकिस्तानी गायिका झेब बंगश यांच्या मते कोक स्टुडियोच्या भारतातल्या लोकप्रियतेचं हेही एक कारण आहे.
त्या म्हणतात, "फ्युजन संगीत भारतीयांसाठी नवीन नाही. तुम्ही आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी पाहा. त्यांनी सतत जॅझ आणि आफ्रो-फंक बीट्स, ट्यून आणि इंटरल्यूड्स यांचा पारंपरिक संगीताशी मिलाफ केला आहे."

फोटो स्रोत, COKE STUDIO
कोक स्टुडिओनेदेखील स्थानिक, लोकसंगीत, पारंपरिक संगीत नव्या ढंगाने सादर केलं, जे पूर्वी कधीही घडलं नव्हते.
बंगश म्हणतात "हे संगीत आणि त्याला असलेली सुरेल आवाजाची साथ याने सीमेपार श्रोत्यांनाही मंत्रमुग्ध केलं."
शंतनू मोईत्रा म्हणतात की भारतात जिथे चित्रपट संगीत विशेषतः बॉलिवुड संगीताचा पगडा आहे तिथे पाकिस्तानातील कोक स्टुडियो भारतीयांसाठी एक रिफ्रेशिंग बदल आहे.
ते म्हणतात, "बॉलिवुड हे एका सच्छिद्र खडकासारखं आहे जो जे-जे काही चांगलं आहे ते घेतं आणि त्याला संगीत किंवा गीतांच्या वेगवेगळ्या शैलींत गुंफून ते आपलंसं करून घेतं."
हा एक असा उद्योग आहे जिथे नट गात असल्याचं भासवलं जातं. पडद्यावर दिसणारं चित्रण हे भारावून टाकणारं, कल्पनेच्या पलिकडंच असतं आणि प्रेमगीतंही भावनातिरेकाने भरलेली असतात.
"तर दुसरीकडे, कोक स्टुडिओ, संगीतकारांना केंद्रस्थानी ठेवतो आणि मला वाटतं की यामुळे खरोखरच फरक पडतो," असं मोईत्रा म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही लोकप्रिय होण्याची क्षमता संगीत संस्कृतीमध्ये आहे आणि हेच या शोचं सर्वांत मोठं यश आहे.
एक मित्र प्रसिद्ध पर्शियन कवी रूमीच्या कवितांचा दाखल देत गमतीने म्हणाला, हे ''चूक आणि बरोबर' या कल्पनेच्या पलिकडचं आहे.
मोइत्रा यांच्या मते यातून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सांस्कृतिक संबंध पुन्हा दृढ होतील, अशी आशादेखील निर्माण होते. ते म्हणतात, "जसा वाईट काळ होता तसाच चांगला काळही आहे आणि मला वाटतं की एकदा तसं झालं की कलाकार पुन्हा एकत्र काम करतील."

फोटो स्रोत, ZEB BANGASH VIA INSTAGRAM
सीमेपलीकडील संगीतकारही अशीच भावना व्यक्त करतात.
बंगश यांनी 2011 साली मोईत्रा आणि इतर संगीतकारांसोबत काम केलं होतं. तो "सुंदर आणि अविश्वसनीय" अनुभव असल्याचं सांगत त्या म्हणतात, "त्यांना केवळ मैत्री करायची नव्हती तर दृढ संबंध निर्माण करायचे होते."
कपाडियादेखील भारतात परत येण्याची आणि इथे परफॉर्म करण्याची वाट बघत आहेत.
"भारतीय प्रेक्षकांकडून आम्हाला मिळालेले प्रेम शब्दातीत आहे. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








