Princess Haya: दुबईच्या पंतप्रधानांनी दिला राजकुमारीला घटस्फोट, पोटगीत द्यावे लागले 55 अब्ज रुपये

फोटो स्रोत, Reuters
- Author, फ्रँक गार्डनर
- Role, बीबीसीचे सुरक्षाविषय प्रतिनिधी
दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल-मख्तून आणि प्रिन्सेस हया बिंत अल-हुसेन यांच्यातील घटस्फोट हा ब्रिटिशांच्या कायद्याच्या इतिहासातील सर्वांत मोठी पोटगीची रक्कम म्हणून या घटस्फोटाची नोंद झाली आहे.
या घटस्फोटानुसार दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल-मख्तून यांना प्रिन्सेस हया बिंत अल-हुसेन यांना 55 अब्जांहून अधिक रुपये पोटगीच्या रुपात द्यावे लागणार आहेत.
यूकेतील उच्च न्यायालयानं मंगळवारी (21 डिसेंबर) या घटस्फोटाचा सोक्षमोक्ष लावला. 47 वर्षीय प्रिन्सेस हया बिंत अल-हुसेन या जॉर्डनचे माजी राजे हुसेन यांच्या कन्या आहेत.
प्रिन्सेस हया बिंत अल-हुसेन या शेख मोहम्मद बिन रशीद अल-मख्तून यांच्या सहा पत्नींपैकी सर्वांत लहान होत्या. शेख मोहम्मद बिन रशीद अल-मख्तून हे दुबईचे राजे आहेत. तसंच, यूएईचे पंतप्रधानही आहेत.
या पोटगीत प्रिंसेस हया यांना लाखो पाऊंड किंमतच्या दोन संपत्तींच्या देखरेखींसाठीही पैसे देण्यात आले. यातली एक संपत्ती लंडनच्या केन्स्टन पॅलेसच्या शेजारील संपत्ती आणि दुसरी संपत्ती म्हणजे सुरीमधील एघम.
यात एवढ्याच गोष्टींचा समावेश नाहीय. तर 'सुरक्षित आर्थिक तरतुदी'सह नर्ससाठी राहण्या-खाण्याचा खर्च, सुट्ट्यांसाठीचे पैसे, पगार, तसंच कुटुंबासाठी गाड्या, पाळीव प्राण्यांच्या देखभालीचा खर्च इत्यादी गोष्टींचा पोटगीच्या पैशात समावेश आहे.
प्रिंसेस हया यांना 14 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा आहे. या दोघांसाठी सुरक्षित पैसा म्हणून प्रत्येकी 5.6 मिलियन पाऊंड देण्यात आलाय.
'जीवाला धोका'
मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईनं मध्य-पूर्वेतील राजघराण्यात एरवी समोर येणाऱ्या घडामोडी समोर आणल्या.
प्रिंसेस हया या त्यांच्या दोन्ही मुलांसोबत 2019 सालीच दुबईतून ब्रिटनमध्ये गेल्या होत्या. आपल्या जीवाला धोका असल्याचं कारण त्यांनी त्यावेळी दिलं होतं.
विशेषत: शेख मोहम्मद यांनी त्यांच्या शेखा लतिफा आणि शेखा शमसा या दोन मुलींचं अपहरण करून दुबईत नेल्याच्या घटनेनंतर प्रिंसेस हया अधिक घाबरल्या होत्या.

फोटो स्रोत, Reuters
शेख मोहम्मद हे आता 72 वर्षांचे आहेत. घोडे-शर्यतीच्या क्षेत्रातही ते नावाजलेले आहेत. त्यांनी मुलींच्या अपहरणाचे आरोप फेटाळले होते. 2020 मध्ये हायकोर्टानं मात्र शेख मोहम्मद यांनी मुलींचं अपहरण केल्याची शक्यता वर्तवलीही होती.
शेख मोहम्मद यांनी 'You lived, You Died' अशी एक कविता लिहिली होती. प्रिंसेसचे माजी ब्रिटिश लष्करी सुरक्षारक्षासोबत संबंध असल्याचं कळल्यानंतर प्रिंसेसला धमकी म्हणून या कवितेकडे पाहिलं गेलं.
ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्यानंतरही प्रिंसेसला धमक्या मिळत होत्या. 'आम्ही कुठेही पोहोचू शकतो' असे त्या धमक्यांचे संदेश असत. त्यानंतर मुलांच्या काळजीपोटी प्रिंसेसनं बराच खर्च केला. तिला भीती सतावत असे की, शेख मोहम्मद मुलांचं अपहरण करून त्यांना दुबईत घेऊन जाईल.
प्रिंसेस हया, त्यांचे सुरक्षारक्षक आणि कायदेशीर टीम यांचे फोन बेकायदेशीरपणे हॅक केल्याचा ठपका शेख मोहम्मद यांच्यावर हायकोर्टानं याच वर्षी ठेवला होता. इस्रायली कंपनीच्या पेगासस सॉफ्टवेअरच्या आधारे हे हॅकिंग करण्यात आलं होतं.
शेख मोहम्मद यांनी मात्र हे सर्व आरोप नाकारले होते. कुठल्याही पद्धतीचं हॅकिंग किंवा लक्ष ठेवण्याचं काम आपण केलं नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
मात्र, यूकेतील हायकोर्टाच्या कुटुंब विभागाच्या अध्यक्षांना शेख मोहम्मद यांच्या बाजूत विसंगती आढळली होती.

फोटो स्रोत, Reuters
आता घटस्फोटाच्या निकालात न्या. मूर यांनी म्हटलंय की, "प्रिन्सेस आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना यूकेत उत्तम सुरक्षा मिळणं आवश्यक आहे. आणि हा धोका काही दुसऱ्या कुणाचा नाही, तर या मुलांच्या वडिलांकडूनच आहे."
या घटस्फोटादरम्यान काही रक्कम या तिघांच्या सुरक्षेसाठीही देण्याचंही ठरवण्यात आलंय.
यूकेतील हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले, "माझ्या अखत्यारित जे शक्य ते करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पूर्णपणे असामान्य होतं."
या सुनावणीदरम्यान प्रिन्सेस हया यांच्या अलिशान जीवनशैलीवरही टीका करण्यात आली. त्यांच्या 9 वर्षांच्या मुलाला तीन महागड्या कार भेट देण्यात आल्याची गोष्टीचाही सुनावणीदरम्यान उल्लेख करण्यात आला.
जी कविता प्रिन्सेस हया यांना धमकीच्या रूपात पाहिली जात होती, ती कविता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून काढूनही टाकली जाणार आहे. प्रिन्सेस हया यांना नुकसान पोहोचवण्याचा आपला हेतू नसल्याचंही शेख मोहम्मद म्हणाले.
कोण आहेत हया बिन अल् हुसैन?
युवराज्ञी हया यांचा जन्म 1974 साली झाला. जॉर्डनचे माजी राजे हुसैन हे त्यांचे वडील आणि महाराणी अलिया अल् हुसैन या त्यांच्या आई. हया केवळ तीन वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. जॉर्डनचे सध्याचे राजे अब्दुल्ला (दुसरे) हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत.
युवराज्ञींच्या बालपणातला बहुतांश काळ युनायटेड किंग्डममध्ये गेला आहे. ब्रिस्टॉलमध्ये बॅडमिंटन स्कूल आणि डोर्सेट येथील ब्रेस्टन स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं.

फोटो स्रोत, Getty Images
नेमबाजी, फाल्कन पक्षी (ससाणे) उडवण्यांबरोबर आपल्याला मोठ्या अवजड वाहनांची आवड आहे, असं त्यांनी एका मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. जॉर्डनमध्ये अवजड वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या आपण एकमेव महिला असल्याचा त्यांचा दावा होता.
लहानपणी त्यांना घोडेस्वारीचा छंद लागला. वयाच्या विशीतच त्या कुशल घोडेस्वार झाल्या. 2000 साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जॉर्डनचं नेतृत्व केलं होतं.
10 एप्रिल 2004 रोजी तीस वर्षांच्या हया यांचा शेख मोहम्मद यांच्याशी विवाह झाला. शेख मोहम्मद संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि दुबईचे शासक आहेत.
लग्नाच्या त्यावेळेस त्यांचे वय 53 होतं आणि प्रिन्सेस हया त्यांची सहावी पत्नी आहेत. वेगवेगळ्या विवाहांमधून त्यांना 23 मुले झाली आहेत असं सांगण्यात येतं.
अम्मानमधल्या एका सोहळ्यात शेख मोहम्मद आणि हया विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर शेख मोह्ममद यांच्याबरोबरच्या जीवनावर हया यांनी अनेकदा मत व्यक्त केलं होतं. तसंच आपलं कौटुंबिक जीवन उत्तम असल्याचं चित्र त्यांनी रंगवलं होतं.
"त्यांचं कर्तृत्व पाहून मला दररोज नवा आश्चर्याचा धक्का बसतो. ते माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते", असं एमिरेट्स वूमन मासिकाला 2016 साली दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
परंतु सारं काही आलबेल नसल्याचं गेल्या वर्षी दिसून आलं. गेल्या वर्षी शेख मोहम्मद यांची मुलगी शेखा लतिफा पळून गेल्यावर त्याकडे सर्वांचं लक्ष गेलं. आपल्याला कोणतंही स्वातंत्र्य नाही आणि आपला छळ होत असल्याचं तिनं एका व्हीडिओमधून सर्वांना सांगितलं होतं.
सहा महिन्यानंतर युवराज्ञी हया यांनी लतिफाच्या पलायनाच्या प्रयत्नाबद्दल आपल्याला अनेक धक्कादायक गोष्टी दिसल्या आणि आपल्यावर पतीच्या कुटुंबाकडून दबाव येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर दुबईमध्ये सुरक्षित वाटेनासं झालं आणि इंग्लंडमध्ये जाण्याआधी त्या जर्मनीला पळाल्या असं सांगण्यात येतं.
त्यांच्या सध्याच्या नात्याबद्दल शेख मोहम्मद यांनी काहीही स्पष्ट केलेलं नाही. 10 जून रोजी त्यांनी इन्स्टाग्रामवर एका अनोळखी महिलेचा फोटो प्रसिद्ध करून त्यामध्ये 'फसवणूक आणि विश्वासघात' असं लिहिलं आहे.
युवराज्ञी हया सध्या केन्सिंग्टन पॅलेस गार्डन्सममध्ये 8.5 कोटी पौंड किंमतीच्या घरात राहात आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








