टोकियो ऑलिम्पिकची डायरी - ऑलिम्पिकने दिलेली शिकवण

फोटो स्रोत, JAVIER SORIANO
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
काही क्षण असे असतात, की जे आयुष्यभरासाठी मनात कोरले जातात. त्यांच्या आठवणींचा सुगंध बराच काळ दरवळत राहतो. प्रत्येक वेळी ती आठवण तुम्हाला मागे घेऊन जाते आणि तरीही सगळं अविश्वसनीय वाटतं.
कधी एखाद्या परीकथेसारखं. कधी एखाद्या कवितेसारखं. कधी स्वप्नातून जमिनीवर आणणाऱ्या पाठ्यपुस्तकासारखं. हे खेळाचं जग आहे. इथे सेकंदाच्या शंभराव्या भागाचाही हिशोब लागतो. एखाद्या अंशानंही यश-अपयशाची दिशा ठरते. आकडेवारीची गणितं पदकांचा रंग ठरवतात.
पण एक क्षण असाही येतो, जेव्हा आकडेवारी मागे पडते आणि पदकांचा रंग बाजूला राहतो. महत्त्वाचा ठरतो तो फक्त असा क्षण, जेव्हा माणसानं असाध्य वाटणारं एक शिखर सर केलं असतं. त्या शिखराची उंचीही मोजावीशी वाटत नाही.
टोकियो 2020 ऑलिम्पिक असंच होतं. इथे भारतानं जिंकलेलं आणि भारताच्या हातून निसटलेलं प्रत्येक पदक असंच होतं.
तसं तर हे ऑलिम्पिक होऊ शकलं, याचंही आश्चर्य वाटतंच. माणूस मनात आणलं तर काय करू शकतो, याचं प्रतीक म्हणून या ऑलिम्पिककडे पाहिलं जाईल. माणसानं काय साधलं, आणि माणसाला त्याची काय किंमत मोजावी लागली, याची दखल इतिहास घेईल. पण आत्ता या क्षणी या ऑलिंपिकनं शिकवलेल्या काही गोष्टी मांडाव्याशा वाटतात.
नीरज चोप्रानं उघडलेला नवा दरवाजा
अॅथलेटिक्समध्ये भारत ऑलिम्पिक पदक जिंकू शकतो, हे आजवर केवळ स्वप्नातच घडू शकतं असं वाटायचं. पण नीरज चोप्रानं ते स्वप्न सत्यात आणलं. त्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होतानाच मला हेही जाणवलं, की हा क्षण भारतीय ॲथलेटिक्ससाठी नवी पहाट ठरू शकतो.
पण पदकांपेक्षाही मला महत्त्वाचा वाटतो तो वेगवेगळ्या खेळांमध्ये भारतानं नोंदवलेला सहभाग. तुम्ही भारतीय सगळीकडे खेळता आहात, असं माझे दुसऱ्या देशातले सहकारी कौतुकानं सांगत होते.

फोटो स्रोत, BEN STANSALL
वेटलिफ्टिंग, कुस्ती, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, अॅथलेटिक्समध्ये पदकं जमा करतानाच भारताच्या खेळाडूंनी तलवारबाजी, गोल्फ, अश्वारोहण, सेलिंग, यॉटिंग अशा खेळांतही सहभाग घेतला.
खेळात सहभाग घेणं, हेही किती महत्त्वाचं असतं, याची जाणीव इथे आल्यावर नव्यानं झाली.
इच्छाशक्तीचं यश
ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये खेळाडूंच्या सुधारलेल्या कामगिरीचं श्रेय अनेकजण टोकियोतल्या अत्याधुनिक ट्रॅकला देतायत. पण केवळ चांगल्या ट्रॅकवर धावलात किंवा चांगले शूज वापरले किंवा चांगली बॅट-रॅकेट-गन वापरली म्हणजे यश मिळेलच अशी काही गॅरंटी एरवीही नसते.

फोटो स्रोत, Tim Clayton - Corbis
मग टोकियोमध्ये असं काय वेगळं झालं, की अनेक देशांच्या खेळाडूंची कामगिरी उंचावल्यासारखी वाटली?
मला वाटतं, यामागचं कारण गेल्या वर्ष दीड वर्षातल्या परिस्थितीत दडलं आहे.
कोव्हिडच्या जागतिक साथीमुळे खेळाच्या वेळापत्रकावर खेळाडूंच्या सरावावर परिणाम झाला होता. अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. अनेक खेळाडूंना तर महिनोनमहिने घरात बसून काढावे लागले.
अशा सक्तीच्या विश्रांतीमुळे एकतर इच्छाशक्ती कमी होते किंवा प्रचंड वाढते. काहीतरी करून दाखण्याची प्रेरणा जागी होते.
मानसिक आरोग्याचं महत्त्व
कोव्हिडच्या जागतिक साथीमुळे आणखी एक गोष्ट बदलली आहे. आपल्यापैकी अनेकांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मानसिक ताणाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सहानुभूतीची, समजून घेण्याची भावनाही वाढली असावी, असं जाणवतं.
त्यामुळेच अनेकजण मोकळेपणानं मानसिक आरोग्याविषयी बोलू शकतायत. टोकियोमध्ये याची सुरुवात सिमोन बाईल्सनं करून दिली. तिनं ऑलिम्पिक पदकापेक्षा मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेणं, हा खेळांच्या दुनियेसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे असं अनेकांना वाटतं.
खेळाडूही शेवटी माणसंच असतात, ही जाणीव त्यातून होते.
नियम पाळण्यानं फरक पडतो
आता जपानमध्ये कोव्हिडच्या रुग्णांची संख्या कधी नाही एवढ्या वेगानं वाढते आहे. पण ऑलिम्पिकच्या बबलमध्ये (ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेलेल सगळेजण) अजूनतरी मोठी साथ पसरलेली दिसलेली नाही.
खरतर ऑलिम्पिक बबल टिकेल की फुटेल, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती. कारण एवढे कडक नियम पाळले कसे जातील आणि त्यावर नजर कशी ठेवली जाईल? पण जपाननं ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे.
इथे आलेल्यांची जवळपास दररोज कोव्हिड टेस्ट केली जाते आहे, सगळीकडे मास्क बंधनकारक आहे आणि निर्धारित जागा सोडून बाहेर भटकण्यास अजूनही मनाई आहे. मुख्य म्हणजे मोठ्या संख्येनं लोक हे नियम पाळताना दिसत आहेत.
हाच पोस्ट-कोव्हिड काळातल्या न्यू-नॉर्मल जगण्याचाही मंत्र आहे.
जपान सरकारनं या खेळांचा प्रसार रिकन्स्ट्रक्शन गेम्स म्हणजे पुनर्निर्मितीचं प्रतीक असलेले खेळ म्हणून केला होता. 2011 च्या त्सुनामीनंतर उद्ध्वस्त झालेल्या जपानला या खेळातून आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रदर्शन करायचं होतं.
मग कोव्हिडची साथ आली, आणि चित्र बदलून गेलं. खेळांना विरोध झाला, पण खेळ सुरू झाल्यावर मात्र लोकांना त्याविषयी बरीच उत्सुकता असल्याचंही दिसून आलं. इतकं की ऑलिंपिक रिंगसमोर फोटो काढण्यासाठी जवळपास दररोजच दिवसभर मोठ्या रांगा लागायच्या.
ही उत्सुकता अजून संपलेली नाही. ऑलिम्पिक संपलं असलं तरी काही दिवसांतच जपानमध्ये पॅरालिंपिकचं आयोजन होणार आहे.
तोवर मी भारतात परतले असेन. पण शक्य झालं तर इथे आहे तोवर तुमच्याशी संवाद साधत राहीन. सायोनारा…!
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








