निरो कोण होता? रोम जळत असताना तो खरंच फिडल वाजवत होता?

फोटो स्रोत, BETTMANN
"रोम जळत होतं, तेव्हा निरो फिडल वाजवत होता..."
रोमन सम्राट निरो बाबतची ही म्हण प्रसिद्ध आहे. रोममध्ये जाणीवपूर्वक आग लावण्याचा आरोप निरोवर केला जातो.
फिडल हे एक तंतुवाद्य आहे.
आपली आई, सावत्र भाऊ आणि पत्नींची हत्या घडवून आणणारा आणि दरबारातल्या किन्नरांसोबत लग्न करणारा एक क्रूर राज्यकर्ता अशी इतिहासात निरोची नोंद आहे.
वयाच्या सोळाव्या वर्षी निरो आईच्या प्रयत्नांमुळे राजगादीवर आला. साल होतं इसवी सन 54. या साम्राज्याच्या सीमा स्पेनपासून ते उत्तरेला ब्रिटन आणि पूर्वेला सीरियापर्यंत पोहोचलेल्या होत्या.
निरोची आई अग्रिपीना हिला सत्तेची लालसा होती. कटकारस्थानं करत तिने निरोला सत्ता मिळवून दिली.
अग्रिपीनाने तिचा काका सम्राट क्लॉडियसशी विवाह केला आणि त्याच्या लेकीशी निरोचं लग्न लावून दिलं. त्यामुळे निरो राजघराण्याचा सदस्य तर झालाच पण सोबतच राजाला स्वतःचा मुलगा असूनही निरो सम्राट क्लॉडियसचा उत्तराधिकारीही ठरला.
अग्रिपीनाने सम्राट क्लॉडियसला विषारी मश्रूम म्हणजे अळंबी खायला घालून ठार केलं, असं म्हटलं जातं. पण यामध्ये कितपत तथ्य आहे, हे सिद्धं होऊ शकलेलं नाही.
निरोने घडवून आणली आईची हत्या
निरोने सत्ता हाती घेतली तेव्हा त्याची आई अग्रिपीना त्याची सर्वात जवळची सल्लागार होती. अगदी रोमन नाण्यांवरही निरोसोबत तिचंही चित्र असायचं. पण सत्तेत आल्याच्या सुमारे पाच वर्षांनी निरोने शक्ती आणि स्वातंत्र्याच्या लालसेपायी आपल्या आईची हत्या घडवून आणली.

फोटो स्रोत, BETTMANN
आईच्या हत्येचा निरोचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. समुद्र किनारी होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी निरोने आईला आमंत्रित केलं. तिला जहाजाने परत पाठवताना ते जहाज बुडवण्याचा कट रचण्यात आला होता. पण यामधून ती बचावली. यानंतर निरोने आईवर बंडाचा आरोप लावत तिला तुरुंगात टाकलं आणि तिची हत्या केली.
निरोने आईची हत्या का केली?
प्राचीन रोमच्या अभ्यासक असणाऱ्या प्राध्यापक मारिया वाएक यांनी बीबीसी रेडिओच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं, "निरोच्या आईचं वागणं हुकुमशहासारखं होतं. काहींच्या म्हणण्यानुसार तिने मुलाला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. अगदी मुलासोबत लैंगिक संबंध ठेवण्यापर्यंतच्या थराला ती गेली होती."
निरो आणि त्याच्या आईमध्ये लैंगिक संबंध असल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नसले तरी निरोने पाठवलेले मारेकरी अग्रिपीनाकडे पोहोचल्यानंतर तिने आपल्या पोटाकडे बोट दाखवत जिथे निरोचं पाप मोठं होतंय, तिथेच चाकूने वार करावा, असं म्हटल्याचं मारिया सांगतात.
निरोने लहान असल्यापासून सत्तेसाठीचा संघर्ष पाहिला आणि त्याचा त्याचं व्यक्तिमत्त्वं आणि विचारसरणीवर मोठा परिणाम झाल्याचं मारिया सांगतात.
रोमन साम्राज्यात सत्तेसाठी लग्नं आणि हत्या
निरोचा जन्म झाला, त्या काळाबद्दल बोलताना मारिया वाएक सांगतात, "ही पहिल्या शतकातली गोष्ट आहे. तेव्हा रोमन साम्राज्य हे युरोपात ब्रिटनपासून ते आशियामध्ये सीरियापर्यंत पसरलेलं होतं. पण हे महाकाय साम्राज्य अस्थिर होतं आणि एक स्वतंत्र राष्ट्राध्यक्ष आणि सिनेटच्या मदतीने ते चालवलं जाई. रोमन साम्राज्याचे पहिले सम्राट ऑगस्ट्स यांनी सत्ता सांभाळणाऱ्या लोकांना समान हक्क देण्याचा विचार मांडला होता.
रोमचे पहिले सम्राट ऑगस्ट्स सीझर यांनी केलेल्या रचनेनुसार ही सत्ता पिढ्यान पिढ्या ज्युलियस क्लॉडियस सीझर कुटुंबातच राहिली असती. परिणामी सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबात अंतर्गत संघर्ष सुरू झाला. लग्नं, मुलं दत्तक घेणं, घटस्फोट, एखाद्याला देशाबाहेर काढत किंवा देशोधडीला लावून त्याचा काटा काढणं असे सगळे प्रकार सत्ता मिळवण्यासाठी सुरू झाले."
रोमन साम्राज्याचे दुसरे सम्राट टिबेरियस यांच्या सत्ताकाळात निरोच्या आजीला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. तिसऱ्या राज्याच्या शासनकाळात निरोच्या आईला देशातून बाहेर काढण्यात आलं होतं.
क्लॉडियस सम्राट असातनाच्या काळात निरोच्या आईला परत येता आलं आणि तिने नात्याने काका असणाऱ्या या सम्राटाशी लग्न करत शाही घराण्यात जागा पटकावली.

फोटो स्रोत, FOTOTECA STORICA NAZIONALE.
निरोचं व्यक्तिमत्त्वं आणि चरित्र याविषयी बीबीसी रेडिओच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या ब्रिटनच्या साऊदम्प्टन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक सुषमा मलिक यांच्यामते, रोमन साम्राज्याचे चौथे सम्राट क्लॉडियसने इसवी सन 41 ते 54 पर्यंत राज्य केलं. सत्तेच्या शेवटच्या दिवसांमध्ये क्लॉडियस त्यांच्या पत्नींवर खूप अवलंबून होते. निरोची आई अग्रिपीनाचाही यात समावेश होता.
सुषमा मलिक सांगतात, "या पत्नींमध्ये एक अतिशय बदनाम महिला म्हटल्या जाणाऱ्या मुसलीनाबद्दल इतिहासात असा उल्लेख आहे की, तिने क्लॉडियसच्या आजूबाजूला तिच्या लोकांचं जाळं विळणं होतं. तिच्याबद्दल असं म्हटलं जाई की ती सिनेटर्ससोबत शारीरिक संबंध ठेवत असे आणि तिची वासना पूर्ण करण्यासाठी तिच्या पदाचीही तिला फिकीर नव्हती. क्लॉडियसवर तिचा खूप मोठा प्रभाव होता, असं इतिहास सांगतो."
निरोच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या आजूबाजूला काही चांगले लोक होते, यामध्ये सेनेका आणि अफ्रेक्स ब्रूस नावाच्या एका प्रीफेक्टचा समावेश होता. तर सेनेका एक विचारवंत होते आणि निरोची भाषणं ते लिहायचे असं निरो आणि क्लॉडियसच्या काळाची तुलना करताना सुषमा मलिक सांगतात.
निरोने घडवली होती पत्नींची हत्या
पहिली पत्नी ऑक्टिवियाचा वैताग आल्यानंतर निरोने तिची देशातून हकालपट्टी केली आणि तिला मारण्याचे आदेश दिले. त्यानंतर निरोचं पॉपियावर प्रेम जडलं आणि त्यांनी लग्न केलं. पॉपिया गरोदर असताना एक दिवस निरोने रागाच्या भरात तिचीही हत्या केली.
निरो सत्तेवर आल्यानंतरची पहिली पाच वर्षं रोमच्या लोकांसाठीचा सुवर्णकाळ होती, असं म्हटलं जातं. प्राचीन रोममध्ये सिनेट, प्रशासकीय आणि सल्लागार पदं होती. निरोने रोमन सिनेटला अधिक अधिकार दिले. रोमन सैन्याला आपल्या बाजूला वळवत संतुष्ट ठेवलं, खेळाच्या स्पर्धांचं आयोजन करत सामान्य जनतेमध्ये लोकप्रियता मिळवली. पण सुरुवातीचं हे यश निरोच्या नंतरच्या कार्यकाळादरम्यान झालेली भीषण हिंसा आणि क्रूरता यामुळे झाकोळलं गेलं.
आपल्या वागण्यामुळे निरोची इतिहासामध्ये आणि साहित्यामध्ये एक क्रूर आणि वाईट राजा अशी नोंद झाली.
क्लॉडियसच्या काळात ज्याप्रकारे सिनेटकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं, तसं आपल्या काळात होणार नाही आणि सिनेटला महत्त्वं देण्यात येईल, असं आश्वासन निरोने आपल्या सुरुवातीच्या काळात सिनेटला दिल्याचं प्रा. सुषमा मलिक सांगतात.

फोटो स्रोत, ALBERTO PIZZOLI
प्रिटोरियन गार्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोमच्या सैन्याला वेळेवर पगार देण्याचं आश्वासनही निरोने दिलं होतं. सुरुवातीच्या त्या दिवसांमध्ये निरोने रोमबाबतचे बहुतेक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यं सिनेटला दिलं.
सिनेटच्या सदस्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीच्या कुरापती करू नयेत, असं समजवण्याचा प्रयत्नही निरोने केला.
सुरुवातीच्या काळातच सिनेटचा विश्वास जिंकण्याचा आणि आपण रोमसाठीचे आतापर्यंतचे सर्वोत्तम सम्राट ठरू असं भासवण्याचा निरोने प्रयत्न केल्याचं सुषमा सांगतात.
सोबतच निरोने रोममधल्या लोकांना खुश करण्यासाठी इसवी सन 54मध्ये युनानप्रमाणेच भव्य स्वरूपातल्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं. या खेळांदरम्यान लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सर्कससारख्या गोष्टींचंही आयोजन करण्यात आलं होतं.
निरोच्या सुरुवातीच्या काळाला रोमचं सुवर्ण युग म्हटलं जातं, याला ब्रिटनच्या सेंट जॉन्स कॉलेज युनिव्हर्सिटीचे प्रा. मॅथ्यू निकोल्स दुजोरा देतात.
आधुनिक काळाप्रमाणेच त्याकाळीही सत्ताधारी आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये लोकांना आवडतील असे निर्णय घेत पण नंतर त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांची लोकप्रियता ओसरत असे, असं प्रा. निकोल्स सांगतात.
निरोची लोकप्रियता काही प्रमाणात त्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत टिकून राहिली. निरो हे ज्युलियस क्लॉडियस राज घराण्यातले पाचवे आणि शेवटचे सम्राट होते. निरो सत्तेत आल्यावर त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या. निरोच्या हाती सत्ता आलीतेव्हा प्रशासन अस्थिर होतं. सत्तेसाठी कुटुंबात मोठा संघर्ष सुरू होता आणि कटकारस्थानं केली जात होती. याशिवाय सिनेटमधल्या अभिजात वर्गाला समाधानी ठेवणं गरजेचं होतं. काही प्रांतांच्या गव्हर्नरकडे स्वतचं सैन्य होतं. आणि सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या जनतेला क्रीडा आणि मेळाव्यांमध्ये रस होता.
निरोला या सगळ्यांना सांभाळून घेत संतुष्ट ठेवायचं होतं.
मग निरोच्या हाती जे साम्राज्य आलं होतं आणि जे साम्राज्य निरोला सोडावं लागलं, त्यात काय फरक होता?
या साम्राज्याचा भर सीमा विस्तारण्यावर होता, असं मॅथ्यू सांगतात. निरोच्या काळात या साम्राज्याचा विस्तार झाला नाही, पण इथे शांतता आणि स्थैर्य कायम ठेवणंही एक मोठं आव्हान होतं.
कोणताही नवीन विजय न मिळाल्याने हरलेल्या शत्रूकडून साम्राज्याला मिळणारा ऐवज येणं बंद झालं आणि राज्यातली परिस्थिती स्थिर ठेवणं कठीण झालं.
रोम जळत असताना निरो खरंच फिडल वाजवत होता का?
इसवी सन 64 मध्ये लागलेल्या आगीत रोम जळून भस्मसात झालं. ही आग सम्राट निरोनेच लावल्याची अफवा होती पण नंतर असं म्हटलं जाऊ लागलं, की जेव्हा रोम जळत होतं, तेव्हा निरो फिडल वाजवत होता.
पुन्हा नव्याने निर्मिती करण्यासाठी निरोनेच रोममध्ये आग लावल्याच्या दाव्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातले किमान दोन इतिहासकार दुजोरा देत असल्याचं प्रा. सुषमा मलिक सांगतात. निरोला त्याचं प्रसिद्ध 'गोल्डन हाऊस' बांधायचं होतं.
पण निरोने ही आग लावली नसल्याचं काही इतिहासकार सांगतात. कारण निरोचा महालही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.
निरोनेच शहरात आग पेटवली, ही फक्त एक अफवा असल्याचं आणखी एक इतिहासकार टेसिटस यांचं म्हणणं असल्याचं सुषमा मलिक सांगतात.
त्या म्हणतात, "निरोने खुद्द असं केलं असावं, ही गोष्ट हास्यास्पद वाटते. नंतर निरोने अतिशय चांगल्या प्रकारे हे शहर उभारलं. पुन्हा आग लागली तर इतक्या वेगाने पसरू नये म्हणून मोठे रस्ते तयार केले आणि चांगल्या बांधकामासाठी अधिक चांगली सामुग्री वापरली. मॅथ्यू यांच्यामते निरोनेच शहरात आग लावल्याचं दोन ऐतिहासिक दाखले सांगतात. शहर जळत असताना निरोने खास कपडे घालून गायला सुरुवात केल्याचं त्यांचं म्हणणं आहे."
पण मग रोम जळत असताना निरो फिडल वाजवत असल्याचं कितपत खरं आहे? मॅथ्यू यांच्यामते फिडलचा शोध सातव्या शतकात लागला होता, आणि निरोच्या काळात फिडल अस्तित्त्वात नव्हतं. पण असंही म्हटलं जातं की निरो एकप्रकारचं वाद्य वाजवत ज्याला लाया (Lyre) म्हटलं जाई.
आग लावण्याचा आरोप ख्रिश्चन समाजावर
रोममध्ये आग लावण्याचा आरोप शहरातल्या अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजावर निरोने केला.
रोममध्ये त्यावेळी ख्रिश्चन समाजाची संख्या अतिशय कमी होती, इतर लोकांना या धर्माबद्दल फारशी माहिती नव्हती आणि परिणामी त्यांच्याबद्दल द्वेषाची भावना होती. त्यामुळे सामान्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ख्रिश्चन समाजावर आरोप करणं सोपं होतं, अशी नोंद टेसिटसने करून ठेवल्याचं सुषमा मलिक सांगतात.
आग लावण्याची शिक्षा म्हणून नंतर निरोने ख्रिश्चन समाजावर अत्याचार केले. त्यांना सार्वजनिक फाशी देण्यात आली, जंगली प्राण्यांसमोर त्यांना जिवंत टाकण्यात आलं, रात्री त्यांना जिवंत जाळलं जाई आणि हे सगळं पाहण्यासाठी जनतेला गोळा केलं जाई.
निरोचा अपुरा महाल
आगीच्या या घटनेनंतर निरोने एक भव्य महाल बांधायला घेतला. असं म्हटलं जातं की यामध्ये गोल्डन रूम म्हणजे सोन्याची एक खोली होती. या खोलीतलं फर्निचर सुंदर होतं आणि खोलीत सुगंध पसरवाया यासाठी भिंतींमध्ये अत्तराचे पाईप लावण्यात आले होते.
हा महाल उभा करण्यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला, पण हा महाल कधीही बांधून पूर्ण झाला नाही.
एकीकडे शहर आगीच्या राखेतून पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना अशा प्रकारचा महाल उभाला जाण्याबद्दल लोक खुश नव्हते.
हा महाल लोकांसाठी खुला असेल आणि तिथे खेळ आणि समारंभांचं आयोजन करण्यात येईल, असंही लोकांना खुश करण्यासाठी सांगण्यात आलं होतं.
निरोला लाया (Lyre) वाद्य वाजवण्याचा आणि गाण्याचा छंद होता. निरोने रंगमंचावर अभियनही केला होता आणि एका सम्राटाला असे छंद असणं हे सिनेटच्या मते एखाद्या आदर्श रोमन नेत्याच्या प्रतिमेला धक्का लावणारं होतं. पण कोणाला काय वाटतंय, याची निरोला पर्वा नव्हती.
वर्षभराची सुटी घेऊन निरो युनानला गेला. तिथे त्याने थिएटर्समध्ये अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेतला.
असं म्हटलं जातं की निरो रंगमंचावर एखादी दुःखद कहाणी सादर करताना निरो नायिकेचा अभियन करे आणि त्यावेळी तो त्याची दुसरी पत्नी पॉपियाचा चेहरा असणारा मास्क घालत असे. तिच्या हत्येमुळे झालेलं दुःख आणि त्यासाठीची अपराधीपणाची भावना यातून निरो हे करत असल्याचं म्हटलं जातं.
नाट्यमय मत्यू
निरो 30 वर्षांचा होईपर्यंत त्याला विरोध करणाऱ्यांच्या संख्येत आणि त्याच्याबद्दलच्या नाराजीत वाढ झालेली होती. निरो हा 'जनतेचा शत्रू' असल्याचं सिनेटने सैन्याचं पाठबळ घेत जाहीर केलं. हे एकप्रकारे त्याच्या मृत्यूचं फर्मान होतं. निरो कुठेही दिसल्यास त्याला ठार करण्यात यावं, असा याचा अर्थ होता.
सैन्याचा पाठलाग चुकवणारा निरो रात्रीच्या अंधारात शहराच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या त्याच्या महालात लपला आणि तिथेच त्याने आत्महत्या केली.
असं म्हटलं जातं की, जीव देताना निरोचे शेवटचे शब्द होते 'क्वालिस आर्टिफेक्स पेरेओ' (Qualis artifex pereo) या शब्दांचं वेगवेगळ्या पद्धतींनी भाषांतर करणं शक्य असल्याने निरोला या शब्दांद्वारे नेमकं काय म्हणायचं होतं, हे सांगणं कठीण आहे. पण जाणकारांनी याचे काही अर्थ लावले आहेत.
त्यांच्यामते या शब्दांचा अर्थ 'मरतानाही मी एक कलाकार आहे', 'माझ्यासोबत एका कलाकाराचाही मृत्यू होतोय' किंवा 'माझा एखाद्या व्यापाऱ्याप्रमाणे मृत्यू होतोय' , असा अर्थ होऊ शकतो.
निरोच्या या शब्दांचा अर्थ काहीही असला तरी त्याच्या आयुष्याप्रमाणेच हे शेवटचे शब्दही नाट्यमयच होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








