IndvsAus: मार्नस लबूशेन टीम इंडियाची डोकेदुखी ठरणार का

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अनुनभवी भारतीय गोलंदाजी आणि दोन जीवदानांचा फायदा उठवत मार्नस लबूशेनने पाचवं शतक झळकावलं. ब्रिस्बेनच्या मैदानावरचं लबूशेनचं हे दुसरं शतक आहे.
स्टीव्हन स्मिथचा शिष्य अशी प्रतिमा असलेल्या लबूशेनची कारकीर्द प्रेरणादायी अशी आहे.
ऑस्ट्रेलियात वणवा पीडितांसाठीच्या चॅरिटी मॅचनिमित्त सचिन तेंडूलकर गेला असता त्याने मार्नस लबूशेन या खेळाडूची स्तुती केली. त्याच्या खेळात मी स्वतःलाच पाहिलं अशी दाद सचिन तेंडुलकरने दिली आहे. "अॅशेस मालिका मी पाहत होतो. जोफ्रा आर्चरचा बॉल मार्नस लबूशेनच्या हेल्मेटवर जाऊन आदळला तो मी पाहिला. त्यानंतर पुढची पंधरा मिनिटं लबूशेनने ज्या पध्दतीने बॅटिंग केली ते त्याच्या अव्वल दर्जाची साक्ष देणारं होतं. त्याचं तंत्रकौशल्य, पदलालित्य अफलातून होतं. त्याला पाहताना मी मलाच पाहतोय असा भास झाला. हा विशेष प्रतिभाशाली खेळाडू याचा मला प्रत्यय आला", असं मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी म्हटलं आहे.
लबूशेनने 2019 वर्षात टेस्ट फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रन्स केल्या. अॅशेस मालिकेत स्टीव्हन स्मिथच्या जागी संधी मिळाल्यानंतर त्याने धावांची टांकसाळ उघडली. काही दिवसांपूर्वीच लबूशेनने भारताविरुध्द वनडे पदार्पण केलं होतं.
मार्नस लबूशेनचं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे उलगडून दाखवणारा हा लेख.
लोकांना गोंधळात टाकणारं आडनाव असलेल्या मार्नस लबूशेनने 2019 वर्ष गाजवलं. एका वर्षात टेस्ट रेटिंगमध्ये 108वरून लबूशेनने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत लबूशेनच्या वनडे पदार्पणाकडे चाहत्यांचं लक्ष असेल.
ही गोष्ट आहे पाच वर्षांपूर्वीची म्हणजे 2014मधली. इंडिया-ऑस्ट्रेलिया टेस्ट. ठिकाण होतं-ब्रिस्बेन. भारताचा फास्ट बॉलर वरुण आरोन खेळत होता. नॅथन लियॉन बॉलिंग करत होता. स्पिनर बॉलिंग करत असल्याने आणि टेलएंडर बॅटिंग करत असल्याने शॉर्टलेगला (बॅट्समनच्या अगदी बगलेत उभा असलेला फिल्डर) माणूस तैनात करण्यात आला.
ओव्हर चेंजदरम्यान बदली खेळाडू मैदानावर आला. त्यालाच शॉर्टलेगला उभं करण्यात आलं. वरुण आरोननं बॉल चेपायचा प्रयत्न केला मात्र बॉल त्याच्या डोक्यावर आकाशात उंचावला. शॉर्टलेगच्या त्या बदली खेळाडूने माशासारखी सुळकी मारली. तो दबा धरून बसलेला असताना, बॉल उडाला. त्याने वर उडी मारली आणि बॉल जमिनीवर पडणार त्याच्या सेकंदभर आधी साधूने हवेतून उदी काढावी तसा बॉल उचलला.
अवघ्या काही सेकंदात हा थरार घडला. टेलएंडरची विकेट असूनही त्या बदली खेळाडूने कॅचसाठी सर्वस्व झोकून दिलं. वरुण आऊट झाला आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्या बदली खेळाडूचं मनोमन कौतुक केलं. त्या प्लेयरचं नाव होतं- मार्नस लबूशेन. त्यानंतर हा प्लेयर लुप्त झाला.

फोटो स्रोत, Getty Images
कट टू. 2018 अॅशेस मालिकेचा थरार. स्टीव्हन स्मिथ अक्षरक्ष: धावांच्या राशी ओतत होता. दुसरी टेस्ट, लॉर्ड्सचं मैदान. टेस्टदरम्यान रनमशीन स्मिथ जोफ्रा आर्चरच्या घायाळ झाला. आर्चरचा भन्नाट वेगाचा बॉल स्मिथच्या मानेवर जाऊन आदळला. स्मिथची बचावाची ढाल कमी पडली आणि तो जमिनीवर पडला. सगळ्यांच्या काळजात धस्स झालं.
फिलीप ह्यूजची आठवण झाली. स्मिथ सुरक्षित होता पण त्याची स्थिती चांगली नव्हती. उपचारांसाठी त्याला पॅव्हेलियनमध्ये नेण्यात आलं. बरं वाटू लागल्याने तो नंतर बॅटिंगला आला. ९२ धावांची खेळी केली. रात्र सरली. सकाळी स्मिथला त्रास जाणवू लागला. आपण शंभर टक्के नाही हे त्याच्या लक्षात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या इनिंगपूर्वी स्मिथच्या ऐवजी काँकशन सबस्टिट्यूट म्हणून मार्नस लबूशेनचं देण्यात आलं. क्रिकेटमधला हा नवा नियम. चेंडूचा मार लागून खेळाडू जखमी झाला आणि त्याला चक्कर, बेशुद्ध किंवा गंभीर दुखापत झाली असेल तर टीमला बदली खेळाडू खेळवता येतो. पण यासाठी लाईक अ लाईक रिप्लेसमेंट असणं अनिवार्य असतं. यासाठी टीमने विनंती करावी लागते.
मॅचरेफरींनी परवानगी दिल्यानंतर हे अमलात येतं. लबूशेन नियमाप्रमाणे स्मिथचा बदली खेळाडू झाला. परंतु त्याला बॉलिंग करता येणार नव्हती.
दुसऱ्या इनिंगमध्ये उस्मान ख्वाजा झटपट माघारी परतला आणि लबूशेन खेळायला उतरला. जोफ्रा आर्चरचा पहिला बॉल तुफान वेगाने त्याच्या डोक्यावरून गेला. दुसरा बॉल थेट हेल्मेटवर जाऊन आदळला.
प्रचंड आघात हेल्मेट ग्रिलला जाणवला. स्मिथला बॉल लागला म्हणून लबूशेनला पाठवलं. त्यालाही बॉल लागला. मेडिकल टीमने तपासलं. प्रचंड वेगाने आदळलेल्या बॉलने लबूशेन लालबुंद झाला होता.
त्याच्या चेहऱ्याच्या शिऱा ताणल्या गेल्या होत्या. मार जोरदार होता पण सीरियस नव्हतं. हेल्मेट बदलून लबूशेन खेळायला तयार झाला. डेब्यू केल्यापासून खणखणीत म्हणता येईल असं त्याने काही केलं नव्हतं. ही संधी मिळाली तीही बदली खेळाडू म्हणून.
आता सिद्ध केलं नाही तर हकालपट्टी निश्चित याची जाणीव असलेल्या लबूशेनने त्या क्षणापासून धावांची टांकसाळ उघडली. त्या इनिंगपासून त्याच्या रन्स आहेत- 59, 74, 80, 67, 11, 48, 14, 185, 162, 143, 50, 63, 19, 215, 59.

फोटो स्रोत, Getty Images
अॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या टीममध्ये रंगणारी स्पर्धा. वर्ल्डकपइतकंच अॅशेस जिंकणं प्रतिष्ठेचं मानलं जातं.
क्रिकेटविश्वातली हे कडवं द्वंद म्हणजे जगभरातल्या क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी असते. एकेका विकेटसाठी, कॅचसाठी, धावेसाठी चुरशीचा मुकाबला होतो. अॅशेसदरम्यान जोरदार वाक्युद्धही अनुभवायला मिळतं.
यंदाची अॅशेस मालिका इंग्लंडमध्ये झाली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला त्यांच्या मायभूमीत नमवण्याची किमया केली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला रनमशीन स्टीव्हन स्मिथ.

फोटो स्रोत, Getty Images
स्मिथने प्रत्येक इनिंगमध्ये धावांच्या राशी ओतत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. सीरिजमधल्या एका निर्णायक क्षणी स्मिथ दुखापतग्रस्त झाला.
त्याची जागा लबूशेनने घेतली. एका कर्त्या प्लेयरची जागा घेणं आणि तेही मॅचदरम्यान अवघडच पण लबूशेनने हे शिवधनुष्य स्वीकारलं आणि पेललंदेखील. इंग्रजीत 'अंडरस्टडी' नावाची टर्म आहे.
आपल्या शब्दात सांगायचं तर शागीर्द याअर्थी. लबूशेनला स्टीव्हन स्मिथचा अंडरस्टडी म्हटलं जातं. सरावादरम्यान, प्रवासात, खातापिताना स्मिथ-लबूशेन जोडी एकत्र असते. अखंड धावा करण्याचा वसा लबूशेनने स्मिथकडूनच घेतला.
नशीब बघा, स्मिथला बॉल लागला म्हणून लबूशेनला संधी मिळाली. तो एवढं चांगला खेळला की स्मिथ संघात परतल्यानंतरही त्याला काढण्यात आलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्लंडमध्ये बॉल स्विंग होतो, ढगाळ वातावरण असतं. तिथे खेळताना भंबेरी उडण्याचीच शक्यता जास्त असते. पण लबूशेनने आपलं तंत्रकौशल्य उत्तम असल्याचं दाखवून दिलं. यामागचं कारणही बदली म्हणून मिळालेल्या संधीत आहे.
यंदाच्या वर्षी इंग्लड काऊंटी संघ ग्लॅमॉर्गनसाठी ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श खेळत होता. शॉनला दुखापत झाली. त्याला इंज्युरी कव्हर म्हणून ग्लॅमॉर्गनने लबूशेनला कॉन्ट्रॅक्ट दिलं. बदली खेळाडू म्हणून संधी मिळतेय याचा विचार न करता लबूशेनने हंगामात हजार धावा फटकावून काढल्या. ग्लॅमॉर्गनला खंबीर बॅट्समन मिळाला, लबूशेनचा इंग्लंडमध्ये खेळण्याचा सराव झाला.
संधी कुठे, केव्हा आणि कधी दार ठोठावेल सांगता येत नाही. रिप्लेसमेंट, बदली, पर्यायी, लाईक-अ-लाईक अशा टॅगअंतर्गतही संधी दडलेली असू शकते. हमरस्त्याने येणारी संधी म्हणजेच काहीतरी भारी हा समज गैरसमज असल्याचं लबूशेनने कामातून सिद्ध केलं. ऑड स्वरुपात समोर आलेल्या संधीसाठी सर्वस्व पणाला लावून त्या संधीचं सोनं कसं करावं याचा वस्तुपाठ लबूशेनने घालून दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्वत:ची ओळख निर्माण करण्याची लबूशेनची ही धडपड आताची नाही. त्याचं नाव गोंधळात टाकणारं. इंग्रजीत ते Marnus Labuschagne असं लिहितात. त्याच्या नावाचा उच्चार कसा करायचा यावरून सोशल मीडियात अनेक मीम्स तयार झालेत.
खुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 'how to pronounce Marnus Labuschange' असा एक गंमतीदार व्हीडिओ तयार केला आहे. त्याच्या टीममेट्सना आता कसा उच्चार करायचं कळलंय परंतु प्रतिस्पर्ध्यांना अजूनही उमगलेलं नाही. प्रत्येकजण आपापल्या संदर्भ-आकलनानुसार त्याचं नाव उच्चारतात.
लबूशेनचा जन्म आफ्रिकेतला. क्लेर्स्कड्रॉप भागात तो लहानाचा मोठा झाला. आफ्रिकाना ही त्याची मातृभाषा. त्याचे वडील खाण उद्योगात काम करायचे. लबूशेन दहा वर्षांचा असताना कुटुंबासह त्यांनी ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केलं. क्वीन्सलँडमध्ये ते सगळे राहू लागले.
इंग्रजी येत नसल्याने काही कळायचं अशी परिस्थिती बरेच दिवस होती. २००५ची अॅशेस मालिका पाहून लबूशेनने क्रिकेटमध्येच करिअर करायचं ठरवलं. पण ऑस्ट्रेलियासारख्या ठोस स्पोर्ट्स कल्चर असणाऱ्या देशात तो सोपं नव्हतं. प्रामुख्याने बॅट्समन जो कामचलाऊ बॉलिंग करू शकतो हे लबूशेनचं गुणवैशिष्ट्य. क्वीन्सलँड अकादमीच्या माध्यमातून त्याने स्वत:ला घडवलं.

फोटो स्रोत, Getty Images
क्रिकेटपटू म्हणून घडत असताना 2009 मध्ये अॅशेस मालिकेदरम्यान ब्रिस्बेन टेस्टमध्ये लबूशेनने हॉटस्पॉट कॅमेरा ऑपरेटर म्हणून काम केलं. 'हॉट स्पॉट' हे क्रिकेटमधलं तंत्रज्ञान आहे. बॅट्समनची बॅट, ग्लोव्ह्ज, पॅड यांच्यापैकी कशाचा बॉलला संपर्क झाला आहे की नाही हे ठरवण्यासाठी इन्फ्रारेड इमेजिंग सिस्टम वापरली जाते त्याचं नाव 'हॉट स्पॉट'.
या यंत्रणेसाठी मैदानात अनेक कॅमेरे बसवले जातात. त्यापैकी एका कॅमेरा ऑपरेट करण्याची जबाबदारी लबूशेनने पार पाडली. या कामासाठी क्रिकेट आणि टेक्नॉलॉजी या दोन्हीचं ज्ञान आवश्यक होतं.
या कामादरम्यान लबूशेनने ऑस्ट्रेलियाच्या पीटर सिडलने घेतलेल्या हॅट्ट्रिकचा आनंदही लुटला. या कामासाठी त्याला दिवसाला 90 डॉलर्स मिळायचे. तरुण कार्यकर्त्यासाठी ही रक्कम मोठी होती. त्याने तेही काम चोखपणे केलं. क्रिकेटपटू म्हणून वाटचाल सुरूच राहिली.

फोटो स्रोत, Getty Images
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये फार ऐतिहासिक कामगिरी नसतानाही लबूशेनला 2018मध्ये पाकिस्तानविरुद्ध दुबईत पदार्पणाची संधी देण्यात आली. पहिल्या डावात लबूशेनला भोपळाही फोडता आला नाही. मात्र दुसऱ्या मॅचमध्ये पाच विकेट्स घेत उपयुक्तता सिद्ध केली.
यंदाच्या वर्षात सातत्याने रन्स केल्यामुळे लबूशेन आता ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीममध्ये पक्का झाला आहे. कामगिरीच्या बळावर त्याने उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांचा परतीचा मार्ग बंद केला आहे. यंदाच्या वर्षात टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत लबूशेन पहिल्या क्रमांकावर आहे.
फॅब्युलस फोर म्हणजे स्टीव्हन स्मिथ, विराट कोहली, केन विल्यमसन, जो रूट या मंडळींना लबूशेनने मागं टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. सलग तीन इनिंग्जमध्ये तीन शतकांच्या दुर्मिळ विक्रमाची क्रिकेटवर्तुळात चर्चा आहे.
टेस्टमध्ये सातत्याने धावा केल्यामुळे लबूशेनची भारत दौऱ्यासाठीच्या वनडे संघात निवड झाली आहे. सगळं जुळून आलं तर लबूशेन भारतात वनडे पदार्पण करू शकतो. ग्लॅमॉर्गन काऊंटीने त्याला दोन वर्षांकरता कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे आणि ही संधी बदली खेळाडू म्हणून दिली नाहीये हे महत्त्वाचं.

फोटो स्रोत, Getty Images
च्युइंग गम चघळून त्याचा फुगा तोंडाबाहेर फुगवणाऱ्या मुलांची प्रतिमा जनरली चांगली नसते. मॅरेथॉन इनिंग्ज रचताना लबूशेन सतत च्युइंग गम चघळत असतो. त्याचा फुगाही काढून दाखवतो. एकाग्रचित्त राहण्यासाठी हे करतो.
मोठ्या खेळीदरम्यान विरंगुळा म्हणूनही हे बरं काम करतं असं लबूशेनचं म्हणणं आहे. रिप्लेसमेंट म्हणून मिळालेल्या संधीतून परमनंट होण्याची किमया लबूशेनने करून दाखवली आहे. संधीच मिळत नाही अशी किरकिर करणाऱ्या तुम्हाआम्हासाठी लबूशेनचा केसस्टडी फॉलो करण्यासाठी उत्तम आहे. आता ते च्युइंग गम चघळत करायचं की नाही याचा निर्णय तुमचा!

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








