ब्रेक्झिटच्या मसुद्यावर पुन्हा वाटाघाटी नाही, युरोपीय नेत्यांनी शक्यता फेटाळल्या

फोटो स्रोत, EPA
ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा देतील का अशी चर्चा युरोपच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. थेरेसा मे यांनी ती शक्यता फेटाळून लावत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आपण ब्रेक्झिट करार पूर्णत्वास नेईपर्यंत पदावर कायम राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
त्याचवेळी मंत्री मायकेल गोव्ह यांनी ब्रेक्झिट खात्याचा पदभार स्वीकारण्यास नकार दिल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गुरुवारी त्यांनी संसदेमध्ये खासदारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर बाहेर येऊन पत्रकारांशी बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, "मी जो मार्ग निवडला आहे तो देश आणि इथल्या लोकांसाठी योग्य आहे."
युरोपीय देशांमध्ये याबाबत सहमती होऊन हा करार संसदेत लवकर मांडला जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
गुरुवारी ब्रिटिश कॅबिनेटमध्ये ब्रेक्झिटवर चर्चा झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले. तसंच थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याची चर्चा सुद्धा सुरू झाली होती.
ब्रेक्झिट सेक्रेटरी डॉमिनिक राब आणि पेन्शन सेक्रेटरी इस्थर मॅक्वे यांच्यासह दोन तरुण मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तसंच जेकब रीस-मॉग यांनी थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी पक्षाच्या टोरी बॅकबेंचर समितीचे अध्यक्ष सर ग्रॅहम ब्रॅडी यांना पत्र लिहिलं आहे.
थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळातल्या 48 किंवा त्या पेक्षा मंत्र्यांनी या समितीला पत्रं लिहिली तर त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो, पण या समितीकडे अजून तेवढी पत्रं आलेली नाहीत.

फोटो स्रोत, PA
देशाच्या हितासाठी ब्रेक्झिट - मे
"या करारामुळे काही लोक खूश आहेत, तर काही जण नाराज. लोकांनी ज्या निर्णयाची निवड केली होती तो हाच आहे आणि हा निर्णय देशाच्या हिताचा आहे," असं थेरेसा मे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
"गुरुवारी कॅबिनेटमध्ये अनेकांनी या कराराच्या मसुद्याला पाठिंबा दिला आहे, तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिला तर हा करार यशस्वी होईल," असं सामान्य लोांना लोकांना उद्देशून त्या बोलल्या.
त्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. "नेतृत्वाला कठोर निर्णय घ्यावेच लागतात, ब्रिटनच्या लोकांनी ज्या निर्णयाची निवड केली आहे, तो पुढे घेऊन जाणं माझं काम आहे," असं उत्तर त्यांनी त्यावर दिलं आहे.

फोटो स्रोत, AFP/Getty Images
'आता मागे फिरणे नाही'
तिकडे युरोपीय देशांनी या कराराच्या मसुद्यावर ब्रिटनशी पुन्हा चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसंच यूकेमधली सध्याची रजकीय स्थिती पाहता हा करार न होण्याची भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.
जर्मनीच्या चॅन्सलर एंगला मर्केल यांनी पुन्हा नवी चर्चा सुरू करण्याची कुठलीही शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
तर फ्रान्सचे पंतप्रधान एडुआर्डो फिलिप यांनी हा करार न होण्याच्या शक्यतेसाठी सुद्धा आपण तयार राहायला पाहिजे असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रेक्झिटच्या या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी युरोपीय युनियननं बैठक बोलावली आहे, जेणेकरून 25 नोव्हेंबरपर्यंत त्यावर निर्णय घेता येईल.
ब्रेक्झिटबाबत युरोपीय युनियनचे मुख्य मध्यस्थ मायकल बार्नियर यांच म्हणणं आहे की, "दोन्ही पक्षांना याविषयावर खूप मोठा पल्ला गाठायचा आहे."
"हा मसुदा निष्पक्ष आणि संतुलित आहे, तसंच त्यात ब्रिटनच्या गरजांचा विचार करण्यात आला आहे, एका महत्त्वाकांक्षी नव्या भागीदारीसाठी आम्ही तयार आहोत," असंही ते पुढे म्हणाले आहेत.

फोटो स्रोत, AFP/Getty Images
युरोपीय संसदेतले ब्रेक्झिट प्रमुख गी वर्होफ्स्टाट यांच्या मते "दोन वर्षांच्या गहन चर्चेनंतर या मसुदा तयार झाला आहे, आम्हाला विश्वास आहे की ब्रिटिश नेते यावर चर्चा करून सहमती दर्शवतील, नव्यानं सुरुवात करण्याची ही वेळ नाही."
ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबेस्टियन कुर्झ यांनी मात्र, मी याबाबत आशावादी असल्याचं म्हंटलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








