चीनमध्ये उईघूर मुस्लिमांना हलाल पदार्थ खाण्याची बंदी, पुनर्शिक्षण केंद्रांनाही ठरवलं अधिकृत

फोटो स्रोत, Getty Images
हलालच्या नावाखाली धर्मनिरपेक्ष जिवनात इस्लाम ढवळाढवळ करत असल्याचं, चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
शिंजियांग या चीनमधल्या मुस्लीम बहुल प्रांतात हलाल पदार्थ खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उईघूर मुस्लीमांच्या रोजच्या जिवनात बदल घडवण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं जात आहे.
धार्मिक जहालवादी विचारांना आळा घालण्यासाठी या भागातल्या उईघूर मुस्लिमांना "पुनर्शिक्षित" (reeducation) केलं जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. यासाठी चीन सरकारनं अशा प्रशिक्षण केंद्रांना नुकतीच कायदेशीर मान्यता दिली आहे.
"हलाल पदार्थ हे धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करण्यामध्ये अडथळा असल्याचं," शिंजियांगच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
सोमवारी (8 ऑक्टोबर) शिंजियांगची राजाधानी उरुमतीचीमध्ये झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत हलाल पदार्थांविरोधात मोहिम सुरु करण्याची शपथ घेण्यात आली.
We Chat या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्थानिक सरकारनं ही माहिती दिली आहे.
'हलाल पदार्थ हे धर्मनिरपेक्ष जिवनातला अडथळा'
हलालच्या नावाखाली इस्लाम हा धर्मनिरपेक्ष जिवनात ढवळाढवळ करत असल्याचं, ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लोकांनी सगळ्या पदार्थांची चव घ्यायला पाहिजे. सर्व नागरिकांनी धर्मावर विश्वास न ठेवता मार्क्सवादी-लेनिनवादी विचार अंगिकारला पाहिजे, असं स्थानिक कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वानं स्पष्ट केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी चीनी भाषेतच संवाद साधावा असा आग्रही धरला जात आहे.
चीनमध्ये अधिकृतरित्या कोणत्याही धर्मावर बंदी नसली तरी गेल्या काही महिन्यांपासून धार्मिक स्थळांवर देखरेख वाढवण्यात आली आहे.
'जहालवादी विचारांविरोधात लढाई'
शिंजियांगमधल्या जहालवादी उईघूर मुस्लीमांविरोधात चीन सरकारनं मोहिम उघडल्याचं सांगितले जात आहे. त्यासाठी हजारो मुस्लिमांना पुर्नशिक्षण केंद्रात भरती करण्यात आलं आहे.
धार्मिक जहालवादाला आळा घालण्यासाठी या मुस्लिमांना पुन्हा शिक्षण देण्यात येत आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.

उईघूर युवक बेपत्ता होत असल्याच्या कारणांवरून चीनवर जगभरातून टीका होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या माहितीनुसार आतापर्यंत 10 लाख उईघूर मुस्लीमांना पुर्नशिक्षण केंद्रात भरती केलं गेलं आहे.
शिंजियांग प्रांतातून खऱ्या बातम्या जगासमोर येणं अवघड आहे. प्रसारमाध्यमांवर इथे बंदी घालण्यात आली आहे. बीबीसीनं अनेकवेळा या भागातून बातमी देण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच पुर्नशिक्षण केंद्राविषयी पुरावेही मिळवले आहेत.
बीबीसीच्या न्यूजनाईट कार्यक्रमात काही माजी कैद्यांची मुलाखत घेण्यात आली, ज्यांनी या भागातून कसातरी पळ काढला.
"आम्हाला तिथे झोपू द्यायचे नाहीत. आम्हाला तिथं कितीतरी तास टांगून ठेवायचे आणि मग आम्हाला मारहाण व्हायची. त्यांच्याकडे जाड रबराचे आणि लाकडाचे दांडके होते. वायरपासून त्यांनी चाबूक तयार केले होते. टोचण्यासाठी सुया होत्या."
"नखं उपटण्यासाठी प्लायलर्स होते. ही सगळी शस्त्र टेबलावर ठेवलेली असायची. कधीही त्यांचा वापर व्हायचा. मी अनेकदा लोकांना किंचाळताना ऐकलं आहे," असं ओमीर नावाच्या एका माजी कैद्यानं सांगितलं.
फेब्रुवारी 2017मध्ये 5 लोकांचा भोसकून खून करण्यात आल्यावर या भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
शिंजियांग प्रांत कुठे आहे?
हा भाग चीनच्या पश्चिम टोकाला आहे आणि हा चीनचा सगळ्यांत मोठा प्रांत आहे. या भागाच्या सीमेवर भारत, अफगाणिस्तान आणि मंगोलिया या देशांची सीमा आहे.

तिबेटसारखाच हा स्वायत्त भाग आहे. याचा अर्थ कागदोपत्री तिथं स्वतंत्र प्रशासन आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून त्यांच्यावर अनेक बंधनं आहेत.
इथली अर्थव्यवस्था शेती आणि व्यापारावर अवलंबून आहे. ऐतिहासिक Silk Route याच प्रांतातून पुढे युरोपपर्यंत जात होता. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा भाग तुलनेनं समृद्ध राहिला आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उईघूर समुदायानं काही काळाकरिता स्वंतंत्र्य घोषित केलं होतं. पण 1949मध्ये कम्युनिस्ट क्रांतीनंतर हा प्रांत चीनचा भाग बनला.
गेल्या काही दशकांत हान वंशाच्या चीनी लोकांनी शिंजियांग भागात स्थलांतर केलं आहे. त्यामुळे स्थानिक उईघूर लोकांना त्यांची संस्कृती आणि रोजगार धोक्यात आल्याचं वाटत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









