पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा, मुलगी मरियम यांना 7 वर्षं तुरुंगवास

फोटो स्रोत, Sean Gallup
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना कोर्टानं दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
नवाझ यांना 10 वर्षांची तर मरियम यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लामाबादच्या भ्रष्टाचार विरोधी कोर्टाचे न्यायाधीश महमूद बशीर यांच्या न्यायालयात साडेनऊ महिने या भ्रष्टाचाराच्या खटल्याची सुनावणी सुरू होती.
कोर्टानं मरियम यांना वीस लाख पाउंड म्हणजेच पावणे दोन कोटी रुपयांचा दंड सुद्धा सुनावला आहे.
नवाझ शरीफ यांच्या या खटल्याची सुनावणी 3 जुलैला पूर्ण झाली होती आणि कोर्टानं निकाल राखून ठेवला होता.

फोटो स्रोत, Getty Images/Captain Safdar
नवाझ शरीफ यांच्या PMLN या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन सुरू केलं आहे.
या खटल्यात नवाझ यांच्यासह मुलगी मरियम नवाझ, हसन नवाझ, हसीन नवाझ आणि कॅप्टन शफदर यांच्याविरोधात आरोप होते.
कोर्टाच्या निर्णयानंतर मरियम नवाझ यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्या लाहौर एनए-127 मधून नॅशनल असेंब्लीची जागा लढवत होत्या.
25 जुलैच्या निवडणुकांवर परिणाम?
पाकिस्तानमध्ये सध्या नवाझ शरीफ यांच्या PMLN या पक्षाची सत्ता आहे. पण गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं नवाझ शरीफ यांना पनामा पेपर्स प्रकरणानंतर अपात्र ठरवलं. त्यामुळे शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा आणि पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
ते ही निवडणूकही लढवू शकणार नाहीयेत. गेल्या निवडणुकांमध्ये या पक्षानं नॅशनल असेंब्लीत 342 पैकी 178 जागा मिळवल्या होत्या. चार छोट्या पक्षांसोबत त्यांनी बहुमताचा आकडा गाठला. PMLNचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जोर आहे. तिथं त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीच्या (म्हणजे लोकसभेच्या) निवडणुका 25 जुलैला होणार आहेत. मतदानाच्या अडीच आठवडे आधी हा निकाल आला आहे.
कोर्टाच्या या निर्णयानंतर मरियम यांनी ट्वीट करून आपले काका शाबाज शरीफ यांना धीर दिला आहे. "तुम्ही घाबरु नका, तुम्ही झुकू नका, तुमच्या आयुष्यात कायम पाकिस्तानला प्रथम स्थान द्या. लोक तुमच्या बरोबर आहेत. विजय तुमचाच होईल," असं त्यांनी लिहिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शरीफ यांच्या पक्षाते नेते तारीक फजल चौधरी यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितलं,"या निर्णयाविरोधात जी काही कायदेशीर लढाई शक्य आहे ती दिली जाईल." मुस्लीम लीग (नवाझ) च्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
शरीफ खटला : आत्तापर्यंत काय घडलं?
28 जुलै 2017 - भ्रष्टाचार आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणी पाकिस्तानी सुप्रीम कोर्टानं नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावर राहण्यास अयोग्य ठरवलं. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
8 सप्टेंबर 2017 - सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर National Accountability Bureauनं नवाझ शरीफ यांच्यासह त्यांचे दोन मुलगे हसन आणि हुसैन, मुलगी मरियम आणि जावई सफदर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी खटला दाखल केला.
19 ऑक्टोबर 2017 - नवाझ शरीफ, मरियम आणि सफरदर यांना कोर्टानं दोषी ठरवलं. दोषी ठरवण्यास स्थगिती देण्याची मागणी करणारी त्यांची याचिका कोर्टानं फेटाळून लावली.
4 डिसेंबर 2017 - कोर्टानं शरीफ यांचे दोन्ही मुलगे हसन आणि हुसैन यांना फरार घोषित केलं.
23 मे 2018 - नवाझ शरीफ यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण
24 मे 2018 - मरियम यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण. लंडनमध्ये फ्लॅट असल्याचे आरोप मरियम यांनी अमान्य केले. तसंच नेल्सन आणि नेसकॉल नावाच्या ऑफशोअर कंपन्यांशी संबंध नसल्याचं म्हटलं. फक्त नवाझ शरीफ यांची मुलगी आहे म्हणून या केसमध्ये गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
11 जून 2018 - ख्वाजा हरीस यांनी नवाझ शरीफ यांच वकिलपत्र मागे घेतलं.
20 जून 2018 - ख्वाजा हरीस यांनी शेवटच्या सुनावणी दरम्यान शरीफ यांची बाजू मांडतांना त्यांच्याकडे लंडनमध्ये कुठलेही प्लॅट्स नसल्याचं ठासून सांगितलं.
28 जून 2018 - नजाझ शरीफ यांच्या बाजूनं प्रतिवाद पूर्ण
3 जुलै 2018 - National Accountability Bureau कोर्टात सुनावणी पूर्ण. कोर्टानं त्यांचा निकाल राखून ठेवला.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








