मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळं करणं राग आणणारं : मेलानिया ट्रंप

मेलानिया ट्रंप

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मेलानिया ट्रंप

अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबांवर होणाऱ्या कारवाईवर अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप यांनी टीका केली आहे.

मुलांना त्यांच्या आईवडिलांपासून तुम्ही कसं काय वेगळं ठेवू शकता, असा राग मेलानिया ट्रंप यांनी व्यक्त केला आहे. स्थलांतरितांसाठीच्या कायद्यात योग्य तो बदल करावा, अशी मागणी त्यांनी केल्याचं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

अमेरिकेत येऊ पाहाणाऱ्या स्थलांतरितांवर डोनाल्ड ट्रंप सरकारची ही कारवाई सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नुकत्याच सहा आठवड्यांच्या कालावधीत सीमेवर झालेल्या कारवाईत जवळपास दोन हजार स्थलांतरित कुटुंबं वेगळी झाली आहेत.

सीमा ओलांडून अमेरिकेत बेकायदेशीरपणे येऊ पाहाणाऱ्या प्रौढांना जेलमध्ये डांबण्यात येतं. त्यामुळे त्यांची मुलं सध्या डिटेन्शन सेंटर्समध्ये ठेवण्यात आली आहे. पालकांपासून ती विभक्त झाली आहेत. म्हणून अनेक मानवी हक्क संघटनांनी या धोरणाचा कडाडून विरोध केला आहे.

नेमकं काय घडलंय?

अमेरिकेत घुसखोरी थांबवण्याचं आश्वासन डोनाल्ड ट्रंप यांनी 2016च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिलं होतं. त्यांनी यासाठी काही धोरणं आखली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच सहा आठवड्यांसाठी एक कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाईनंतर जवळपास दोन हजार कुटुंबं विभक्त झाली आहेत.

याआधी बेकायदेशीपणे अमेरिकेत घुसू पाहाणाऱ्या लोकांविरोधात पहिल्यांदा लहानसहान कलम लावलं जायचं. पण आता प्रौढांविरुद्ध गुन्हेगारी कलमांअंतर्गत कारवाई केली जात आहे. त्यांना तुरुंगात डांबलं जात आहे.

तर त्यांच्या मुलांना वेगळ्या डिटेन्शन सेंटर्समध्ये ठेवलं जात आहे. हे सेंटर्स अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा मंत्रालयाअंतर्गत येतात, तर काही मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवण्यात येत आहे.

या कारवाईमध्ये आश्रयस्थळांवर आणि पाळणाघरांमध्ये खूप गर्दी झाली असून, या सेवांवर ताण पडत आहे.

अखेर मेलानिया यांनी या मुद्द्यावरून ट्रंप सरकारला सुनावलं आहे. दोन्ही पक्षांनी (डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स) एकत्र येत यावर काहीतरी मार्ग काढला तर स्थलांतरितांचं आयुष्य सोपं होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केल्याचं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

"आपण केवळ कायद्यांचं काटेकोरपणे पालन करणारं राष्ट्र नव्हे संवेदनशीलतेनं कारभार करणारं राष्ट्र निर्माण करायलं हवं," असं मेलानिया एका निवेदनात म्हणाल्या आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज W बुश यांच्या पत्नी लॉरा बुश यांनीही सरकारच्या या धोरणावर उघडपणे टीका केली होती.

"ही झिरो टॉलरन्स पॉलिसी अतिशय क्रूर आहे, अनैतिक आहे. मला खूप दुःख झालं आहे," असं त्यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलं होतं.

"आपल्या सरकारनं मुलांना सामानासारखं एखाद्या गोदामामध्ये डांबून नये किंवा त्यांना फक्त वाळवंटात तंबू उभारून आश्रय देऊ नये. यासाठी अधिक सखोल धोरण हवं," असं त्या पुढे म्हणतात.

"लोकांची अशी फरपट होतानांची ही दृश्यं मला दुसऱ्या महायुद्धातल्या अमेरिका-जपान द्वंद्वाची आठवण करून देतात. आणि आता सर्वांनाच माहितीये की तो अमेरिकन इतिहासातला सर्वांत लाजीरवाणा काळ होता."

दोष कुणाचा?

डेमोक्रॅट्सकडून आलेल्या एका कायद्यामुळे हे धोरण आम्हाला पत्कारावं लागलं, असं ट्रंप म्हणाले. पण कोणता कायदा, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.

आता रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रट्सबरोबर येत एक नवा कायदा तयार करावा, अशी विनंती त्यांनी शनिवारी एका ट्वीटद्वारे केली आहे.

बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाऊ पाहाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाऊ पाहाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पण, या धोरणाच्या टीकाकारांनी लक्षात आणून दिलं की मुलांना वेगळं ताब्यात घेण्याची घोषणा ट्रंप सरकारचे अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी गेल्या महिन्यात केली होती. तसंच ही कारवाई थांबवण्यासाठी संसदेची परवानगीची गरज नाही.

कायद्यातला हा मोठा बदल विधी विभागानं स्वतःहून केला आहे, असंही टीकाकार म्हणतात.

आता परिस्थिती काय?

रविवारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही खासदारांनी आश्रयस्थळांना भेट देऊन मुलांची पाहणी केली.

दरम्यान, आता संबंधित विभागाचे अधिकारी टेक्सासच्या वाळवंटात तंबूंचं शहर उभारून तिथं शेकडो मुलांची सोय करण्याचा बेत आखत आहेत. तिथं तापमान सामान्यतः 40 डिग्री सेल्सिअस असतं.

स्थानिक खासदार जोस रॉड्रिग्स यांनी हा प्रकल्प अमानवीय आणि अनैतिक असल्याचं म्हटलं आहे. "ज्यांना नैतिक जबाबदारीचं थोडंसुद्धा भान आहे, त्यांनी नक्कीच या प्रकल्पाचा निषेध केला पाहिजे," असं ते म्हणाले.

टेक्सासच्या टोर्निलो शहरात स्थानिक नागरिकांनीही अशाच एका टेंट सिटीपर्यंत मोर्चा काढला होता.

या शहरातही अशी अनेक मुलं आहेत, ज्यांच्या पालकांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. "मुलांना मुक्त करा, कुटुंबांना एकत्र करा," अशा घोषणा त्यांनी दिल्या.

मुलं पालकांपासून वेगळी होत आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुलं पालकांपासून वेगळी होत आहेत

बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाऊ पाहाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे कायमचं थांबावं, अशी मागणी सेशन्स यांनी केली आहे.

US च्या सीमा अधिकाऱ्यांनुसार, पहिल्या दोन आठवड्यातच 658 मुलं पालकांपासून वेगळी झाली होती. काही प्रकरणांमध्ये पालकांची सुटका झाल्यानंतर त्यांची मुलांबरोबर पुन्हा भेट झाली होती.

पण काही लोकांना अजूनही अनेक आठवडे आणि काही ठिकाणी तर अनेक महिन्यांसाठी आपल्या मुलाबाळांपासून वेगळं राहावं लागत आहे.

पण हा नवा कायदा स्थलांतरितांना देशात इतरत्र फिरण्यापासून थांबवू शकतो का, हे अजूनही स्पष्ट नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)