जस्टिन ट्रुडो एवढे लोकप्रिय का? कॅनडाच्या पंतप्रधानांबद्दलच्या 9 गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वंदना
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या नावे युक्रेनमध्ये बीअर बनवली जाते. तर त्यांच्या रंगबेरंगी पायमोज्यावरून फेसबुक पेज चालवल जातं. बॉक्सर, शिक्षक, नाईटक्लब बाऊन्सर, कार्टून पुस्तकातील पात्र आणि जागतिक नेते अशी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची अनेकरंगी ओळख आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. जस्टिन ट्रुडो हे कॅनडाचे तरुण पंतप्रधान भारतासह जगभरात एवढे लोकप्रिय का?
पंजाबी ठेक्यावर भांगडा करणारे, दिवाळी साजरी करणारे, मंदिर- गुरुद्वाराला भेट देणारे, आपल्या छोट्या मुलाबरोबर पंतप्रधान कार्यालयात लपाछपी खेळणारे, रंगीबेरंगी मोजे वापरणारे असे ट्रुडो यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.
"हा चिमुकला भविष्यामध्ये कॅनडाचा पंतप्रधान होणार," असं भाकित अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी अवघ्या 4 महिन्याच्या जस्टिनला पाहून वर्तवली होती. त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली 2015मध्ये. निक्सन 1972 साली कॅनडा भेटीवर आले असताना पियरे ट्रुडो (जस्टिन ट्रुडो यांचे वडील आणि कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान) यांच्यासोबत बातचीत करताना असं म्हटलं होते.
1. भांगडा डान्स करणारे पंतप्रधान!
पंजाबी पेहराव घालून भांगडा डान्स करणाऱ्या ट्रुडो यांनी तमाम भारतीयांची मन जिंकली. यूट्यूबवरच्या एका जुन्या व्हीडिओमध्ये कुर्ता आणि पायजामा घालून 'हडिप्पा' या गाण्यावर ते ताल धरताना अनेक जणांनी पाहिलं असेल. त्या वेळी ते पंतप्रधान व्हायचे होते. मात्र व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यांच्या शपथविधीनंतर.

फोटो स्रोत, Liberal Party, Canada
कॅनडामधील मंदिरं आणि गुरुद्वारामध्ये दर्शन घेताना ट्रुडो दिसतात. गेल्याच वर्षी टोरांटो येथील स्वामी नारायण मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनाला ट्रुडो उपस्थित होते.

फोटो स्रोत, Twitter
2. दिवाळीचा व्हीडिओ
दिवाळी साजरी करण्यासाठी ते एकदा गुरुद्वाऱ्याध्ये गेले होते. तसंच त्यांनी स्वतःच्या ट्विटर खात्यावरून 'दिवाळीच्या शुभेच्छा' असं ट्वीट केलं होतं आणि "वैसाखी दियां लख लख वधाईंया, वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह" असं म्हणत असतानाचा व्हीडिओ त्यांनीच यूट्यूबवर टाकला होता.

फोटो स्रोत, Twitter
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
3. मंत्रिमंडळामध्ये शीख मंत्री
'माझ्या मंत्रिमंडाळामध्ये मोदी सरकारपेक्षा जास्त शीख मंत्री आहेत', असं जस्टिन ट्रुडो एकदा अमेरिकन प्रेक्षकांशी संवाद साधताना विनोदानं म्हणाले होते.
ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळामध्ये चार शीख मंत्री आहेत. त्यामधले हरजीत सज्जन हे कॅनडाचे संरक्षण मंत्री आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
सज्जन सिंग यांच्यावर शीख स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिल्याचा आरोप केला जातो, पण त्यांनी तो फेटाळून लावला आहे.
सध्या भारतभेटीवर आलेले ट्रुडो अमृतसरच्या सुवर्ण मंदिरालाही जाणार असल्याचं समजतं.
4. ट्रुडो यांची माफी

फोटो स्रोत, Vancouver Public Library
1914 साली शीख, हिंदू आणि मुस्लीम यांनी भरलेलं जहाज कॅनडाच्या किनाऱ्यावरून माघारी पाठवलं होतं. तो प्रसंग 'कॅनडाच्या इतिहासातील कलंक होता', असं वर्णन करत ट्रुडो यांनी शीख समुदायाची माफी मागितली होतील.
23 मे 1914 रोजी हाँगकाँगमार्गे एक जपानी जहाज 376 स्थलांतरितांना घेऊन कॅनडाला पोहो चले होते. पण त्यावेळीच्या कॅनडाच्या भेदभावपूर्ण धोरणामुळं त्यांना परत पाठवलं होतं.
भारताकडं परताना ब्रिटीश सैन्यानं त्या जहाजावर केलेल्या गोळीबारामध्ये 20 प्रवाशी मृत्यू पावले होते.
5. बॉक्सर आणि धावपटू
जस्टिन ट्रुडो बॉक्सर आहेत. 2012मध्ये एका राजकीय विरोधकाबरोबर झालेल्या एका चुरशीच्या बॉक्सिंग सामन्यानं त्यांचं राजकीय नशीब पालटलं.

फोटो स्रोत, Reuters
त्याअगोदर ते एका शाळेत शिक्षक होते. मुलांना फ्रेंच आणि गणित शिकवायचे.
2016मध्ये मेक्सिको भेटीवर असताना त्यांनी मेक्सिकोचे राष्ट्रध्यक्ष पेना निएतो यांच्याबरोबर सकाळी धावताना फोटो काढले होते.

फोटो स्रोत, Marvel's
तसंच, एका कार्टून पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही ट्रुडो अवतरले होते. "Civil War II : Choosing Sides" असं त्या कार्टून बुकचं नाव आहे.
6. पायातले मोजे आणि बीअर!
युक्रेनमध्ये ट्रुडो यांच्या नावानं बीअर बनवली जाते. त्या बीअरच्या बाटलीवर त्यांचं बॉक्सिंग करतानाचं चित्र आहे आणि एक मोठा लाल रंगाचा L आहे त्यांच्या लिबरल पक्षाकडे निर्देश करतो. युक्रेनमध्ये ट्रुडोंचं प्रस्थ आहे, कारण रशियाचा विरोध करत ट्रुडो यांनी युक्रेनच समर्थन केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर रंगीबेरंगी सॉक्स आणि कपड्यांच्या स्टाईलविषयही ट्रुडो चर्चेत राहतात. जर्मनीमध्ये झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान त्यांच्या मुत्सद्देगिरीबरोबर त्यांच्या पायातले मोजेही चर्चेत राहिले.
त्यांच्या स्टायलिश रंगीबेरंगी पायमोज्यांवर चक्क एक फेसबुक पेज चालवण्यात येत आहे. युक्रेनच्या व्यापारी प्रतिनिधीनं त्यांना एकदा पायमोजे भेट दिले होते. यानंतर पंतप्रधानांना पायमोजे भेट देण्यावरून वादही निर्माण झाला होता.
7. पंतप्रधानांचा चिमुकला जेव्हा ऑफिसमध्ये येतो!
कॅनडाचे पंतप्रधान नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिले आहेत. उदाहरणार्थ, आपल्या 3 वर्षांच्या मुलाला ते एकदा पंतप्रधान कार्यालयामध्ये घेऊन आले होते. त्यावेळचे फोटो गाजले होते. हा विषय तेव्हा खूपच चर्चेत होता.

फोटो स्रोत, Justin Trudeau,
हाऊस ऑफ कॉमन्सचे अधिवेशन आटोपून ते ऑफिसमध्ये मुलाबरोबर लपाछपीचा खेळ खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
8. जस्टिन ट्रुडो अदाम बिलान!
कॅनडाच्या या पंतप्रधानांचं त्यांनी स्थलांतरितांच्या हितार्थ घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांबद्दल कौतुक होत असतं. एका सीरियन निर्वासित कुटुंबानं त्यांच्या मुलाचं नाव 'जस्टिन ट्रुडो अदाम बिलान' असं ठेवलं आहे. पंतप्रधानांनी त्या मुलाची भेटही घेतली होती. नोव्हेंबर 2015 पासून ते जानेवारी 2017 पर्यंत कॅनडामध्ये 40 हजारांहून अधिक सीरियन निर्वासित स्थलांतरित झाले आहेत.

फोटो स्रोत, Twitter
गेल्या वर्षी ट्रंप यांनी अमेरिकेमध्ये 7 मुस्लीम देशांतून येणाऱ्या निर्वासितांवर घातलेल्या बंदीचा ट्रुडो यांनी निषेध केला होता.
9. ट्रंप यांच्याबरोबरचं हस्तांदोलन
जोरानं हस्तांदोलन करण्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची ख्याती आहे. पण पंतप्रधान ट्रुडो यांनी त्यांना जसास तसं उत्तर दिलं होतं. टोरोंटो येथील गे प्राईडमध्ये सहभागी होणारे ते कॅनडाचे पहिले राष्ट्रप्रमुख ठरले.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर जस्टिन ट्रुडो यांच्यावर विविध कारणांवरून टीकाही होत आहे. ते वयानं अगदी लहान आहेत, त्यांना कामाचा अनुभव नाही, ते गर्विष्ठ आहेत असे आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून होत असतात. नुकतंच एका महिलेच्या भाषणामधील एक शब्द जाहीरपणे सुधारल्यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
46 वर्षीय ट्रुडो सध्या 17 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भारत भेटीवर आहेत. द्विपक्षीय बैठकींव्यतिरिक्त ते ताज महाल, जामा मस्जिद, सुवर्ण मंदिर आणि गुजरातमधील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








