पाकिस्तान: शाहरुख खानची बहीण त्याला निवडणूक प्रचाराला बोलवणार नाही कारण...

फोटो स्रोत, झाहीद इमादुल्ला
- Author, इझारुल्ला
- Role, बीबीसी प्रतिनिधी, पेशावर
बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान याचं काही नातेवाईक आजही पाकिस्तानात आहेत. आणि त्याची बहीण नूर जहाँ आता तिथल्या निवडणूक रिंगणात उतरली आहे.
पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतात वसलेल्या पेशावर शहरातल्या किस्सा ख्वानी बाजार भागात प्रवेश केला की चिंचोळे रस्ते आणि लाकडाची जुनी घरं तुमचं स्वागत करतात. याच घरांच्या रांगेत एक केशरी रंगाचं छोटंसं घर आहे, जिथे नूर जहाँ आपल्या मुलांसह राहतात. त्यांचा भाऊ म्हणजे बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरूख खान.
पाकिस्तानात महिनाभरात निवडणुका होणार आहेत. खैबर पख्तुनवा प्रदेशातल्या PK77 मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांनी भरलेला निवडणूक अर्ज आयोगानं स्वीकारला आहे.

फोटो स्रोत, नूर जहाँ
विजयाबद्दल आशावादी असल्याचं नूर यांनी बीबीसीला सांगितलं.
शाहरूख खान पाकिस्तानातही प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र निवडणुकीसाठी शाहरुखला प्रचारात बोलवणार नाही असं नूर सांगतात.
"मला शांततेत प्रचार करायचा आहे. शाहरुखला प्रचारासाठी बोलावलं तर अडचणी निर्माण होऊ शकतात. माझ्या निवडणुकीसाठी मीच प्रचार करेन. परिसरातल्या लोकांच्या मदतीने मी मतं मागेन," असं नूर यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, नूर जहाँ
"महिलांचे प्रश्न विशेषत: घरगुती हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी काम करण्याचा प्रयत्न आहे. त्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
त्या पुढे म्हणतात, "महिलांना वारसा हक्कांपासून रोखणाऱ्यांविरोधात कठोर कायदा निर्माण करण्याचा मानस आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना निवडणूक लढवण्याच्या संधी अभावानेच मिळतात. या भेदभावामुळेच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला."
"मी निवडणूक लढवली नाही तर कोण पुढे होऊन निवडणूक लढवेल?" असा सवाल नूर करतात. त्यामुळे मला पुढाकार घेणं क्रमप्राप्त होतं, असं त्या म्हणतात.
शाहरुख खानच्या भेटीसंदर्भातही त्यांनी माहिती दिली. 1997 आणि 2011 मध्ये त्या भारतात आल्या होत्या, त्यावेळी शाहरुखची भेट झाली होती. पेशावरला येऊन भेटण्याची इच्छा शाहरूखनं व्यक्त केली होती.

फोटो स्रोत, नूर जहाँ
"1946 मध्ये फाळणीपूर्वी माझे तीन काका या भागात होते. यापैकी शाहरुखच्या वडिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. इतर सगळे पेशावरमध्येच राहिले," असं त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








