'अॅमेझॉन'च्या या सुपरमार्केटमध्ये बिलिंग काउंटरच नाही!

अॅमेझॉन गो स्टोअर

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अॅमेझॉन गो स्टोअर
    • Author, ख्रिस जॉनस्टन
    • Role, बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज

घरगुती आणि दैनंदिन वस्तूंच्या खरेदीची कल्पना पूर्णतः बदलवून टाकणारं क्रांतिकारी तंत्रज्ञान रविवारी जगासमोर आलं, जेव्हा 'अॅमेझॉन'चं पहिलं सुपरमार्केट अमेरिकेत सुरू झालं.

हे पहिलं असं सुपरमार्केट आहे, ज्यात कुठेही बिलींग काऊंटर नाही, चेकआऊट नाही. ग्राहकांनी आवडेल ती वस्तू ठेवलेल्या रकान्यांमधून उचलायची आणि दुकानातून बाहेर पडायचं.

अरे व्वा! मग पैसे कोण घेणार? अर्थातच एक स्वयंचलित यंत्रणा.

स्टोअरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला 'अॅमेझॉन गो' स्मार्टफोन अॅप स्कॅन करावं लागतं. स्टोअरमध्ये कॅमेऱ्यांचं एक जाळं पसरलं आहे, जे क्षणोक्षणी प्रत्येक ग्राहकावर नजर ठेवून असेल. तुम्ही काय उचलता आणि घेऊन निघता, सगळं या कॅमेऱ्यांमधून एका यंत्रणेला कळतं.

प्रत्येक कपाटातून तुम्ही एखादी वस्तू उचलली की त्या फळीवर लावण्यात आलेलं सेन्सर त्याची नोंद घेतं आणि तुमच्या अॅमेझॉन यादीत त्याला जमा करतं. जर ती वस्तू तुम्ही परत जागच्या जागी ठेवली तर ती यादीतून वजा होते.

मग खरेदी झाल्यानंतर स्टोअरमधून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या क्रेडीट कार्डमधून एकूण बिलची रक्कम वळती झालेली असते.

डिसेंबर 2016 मध्ये सिअॅटलमधलं हे स्टोअर अॅमेझॉनच्याच कर्मचाऱ्यांसाठी प्रथम उघडण्यात आलं होतं. 'अॅमेझॉन गो'च्या स्टाफने वर्षभर याची चाचणी केली आणि अखेर हे ग्राहकांसाठीही उघडण्यात आलं.

अॅमेझॉन गो स्टोअर

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अॅमेझॉन गो स्टोअर

पण एकाच अंगकाठीच्या ग्राहकांना ओळखताना काही अडचणी येत होत्या. त्यात पुन्हा लहान मुलं इकडून तिकडं वस्तू घेऊन जाताना चुकीच्या कपाटांमध्ये त्या वस्तू ठेऊन देत होते, अशा काही अडचणी सुरुवातीला आल्याचं 'अॅमेझॉन'च्या सूत्रांनी सांगितलं.

स्टोअरने चाचणी टप्प्यात चांगली कामगिरी केल्याचं 'अॅमेझॉन गो'च्या प्रमुख जाना पेरिनी यांनी सांगितलं. "हे तंत्रज्ञान याआधी अस्तित्वात नव्हतं. कॉम्प्यूटरची नजर आणि मशीन लर्निंगमधलं हे सर्वांत अद्ययावत तंत्रज्ञान आहे," असं त्या म्हणाल्या.

भविष्यात आणखी 'अॅमेझॉन गो' स्टोअर सुरू होतील असंही कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं. गेल्या वर्षी 13.7 बिलियन डॉलर देऊन विकत घेतलेल्या Whole Food या चेनशिवाय हे स्टोअर वेगळे असतील, हे 'अॅमेझॉन'नं अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

पण विक्रेत्यांना हे माहीत आहे की एखाद्या ग्राहकाला जेवढं लवकर खरेदी करता येईल, तेवढं त्यांचं त्या दुकानात परत येण्याचं प्रमाण वाढेल. आणि या तंत्रज्ञानामुळे सुपरमार्केटमध्ये नकोशा वाटणाऱ्या भल्या मोठ्या रांगांपासून ग्राहकांना सुटका मिळेल, म्हणून कुठलाही विक्रेत्याला इतरांवर मात करता येईल.

अॅमेझॉन बुक स्टोअर
फोटो कॅप्शन, अॅमेझॉन बुक स्टोअर

सिअॅटलचं स्टोअर हे 'अॅमेझॉन'साठी काही पहिलं पाऊल नाही. 2015 मध्ये कंपनीने सिअॅटलमध्येच एक बुक स्टोअर सुरू केलं होतं. न्यूयॉर्कमध्ये गतवर्षी सुरू झालेल्या स्टोअरसह अमेरिकेत आता असे 12 स्टोअर झाले आहेत. याशिवाय डझनभर छोटेमोठे आऊटलेट्सही आहेत.

ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालात 'अमेझॉन'च्या स्टोअर्समध्ये त्यांना 1.28 बिलियन डॉलर इतकं उत्पन्न मिळालं.

स्टोअर्स हे सध्या तरी त्यांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन नसलं तरी विश्लेषकांच्या मते अमेझॉन त्यांच्या प्राईम सेवेची मेंबरशिप वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. प्राईम मेंबर बुकस्टोरमधली पुस्तकं ऑनलाईन सवलतीच्या दरात घेतात तर जे मेंबर नाहीत त्यांना कव्हर प्राईजने घ्यावं लागतं .

'अॅमेझॉन'चे मुख्य वित्तीय अधिकारी ब्रायन ओल्सावस्की यांनी त्यांच्या स्पर्धकांना त्यांचे जास्तीत जास्त स्टोअर्स उघडण्याचा इशारा दिला आहे. याबद्दलच्या नियोजनाबाबत येत्या काळात वाढ होणार असल्याचंही त्यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितलं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)