BBC Innovators - पाहा व्हीडिओ : व्हीडिओ लिंकद्वारे गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी 'सेहत कहानी'
- Author, पॉलिन मेसन
- Role, बीबीसी इनोव्हेटर्स
दगडी पायऱ्या उतरत फातिमा नावाच्या दाई आपल्या दवाखान्यापाशी पोहोचतात. "मी नऊ महिन्याची गरोदर आहे, अशात मला प्रवास करणं थोडं अडचणीचं आहे. पण मी माझ्या रुग्णांसाठी येते!" त्या सांगतात.
जगभरात गरोदरपणात होणाऱ्या मृत्यूंपैकी 99 टक्के मृत्यू रोखता येऊ शकतात, असं एक अंदाज सांगतो. फक्त गरजेच्यावेळी फातिमासारख्या प्रशिक्षित दाई किंवा एखादी डॉक्टर उपलब्ध असायला हवी.
गरोदरपणात किंवा प्रसूतीच्यावेळी निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे पाकिस्तानात दर 20 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो, असं सेंटर फॉर एक्सलंस फॉर रुरल डेव्हल्पमेंटचं म्हणणं आहे.
सेहत कहानी
फातिमा 'सेहत कहानी' संस्थेसोबत काम करतात. ही संस्था दाईंना प्रशिक्षण देते आणि त्यांना व्हीडिओ लिंकद्वारे महिला डॉक्टरांशी जोडून देते.
व्हीडिओमार्फत मिळणाऱ्या अशा डॉक्टरी सल्ल्याला सुमारे 100 रुपये लागतात. यामुळे पाकिस्तानातल्या ग्रामीण भागात महिलांना एक परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे.
फातिमा आज रुबिना मुख्तियारच्या तपासणीसाठी त्यांच्या घरी आल्या आहेत. त्या इस्लामाबादच्या उत्तरेकडे 71 किलोमीटर दूर असलेल्या मनसेहरा शहरात राहतात.
रुबिना सांगतात, "अकाली प्रसूतीमुळे माझी दोन मुलं मरण पावली आणि चार वेळा प्रसूतीच्या वेळीच दगावली. मी आता दोन महिन्याची गर्भवती आहे."
या सगळ्यानंतरही आपण जिवंत आहोत, हे भाग्यच असल्याचं रुबिना मानते.
रुबिना यापूर्वी गरोदर असताना त्यांना डोकेदुखी व्हायची, हात-पाय सुजायचे आणि प्रचंड थकवा जाणवत होता. ही 'प्री-एकलाम्पसिया'ची लक्षणं होता. 'प्री-एकलाम्पसिया'मध्ये रक्तदाब खूप वाढतो, ज्यामुळे आई तसंच बाळाच्या जीवाला धोका असतो.
इस्लामाबादेतल्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. तिची जुळी मुलं दगावली होती.

फोटो स्रोत, Alamy
"त्यांनी माझी सोनोग्राफी केली आणि मला सांगितलं की, माझी बाळं 15 दिवसांपूर्वीच गेली होती," रुबिनानं सांगितलं.
"मी बराच काळ वाट पाहत होते, मला मुलगा व्हावा... पण ही अल्लाहची मर्जी आहे,"असंही ती म्हणाली.
हे रुबीनाचं दहावं बाळंतपण आहे. पण प्रशिक्षित दाई आणि डॉक्टरच्या नियमित चाचण्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
फातिमा रुबिनाचा रक्तदाब तपासते आणि आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनद्वारे त्याची माहिती डॉक्टरांना सांगते.
डॉक्टर सांगतात की सगळं काही नॉर्मल आहे.

फोटो स्रोत, Sehat Kahani
रुबिना सांगतात की त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एक बाईनं त्यांना 'सेहत कहानी'ला संपर्क करण्याचा सल्ला दिला.
"या आधी झालेली बाळंतपणं अयशस्वी झाली. आता इथं आल्यावर असं वाटतं की मी या वेळी एका निरोगी मुलाला जन्म देईन," असं रुबिना विश्वासानं सांगते.
रुबिना तपासणी कक्षातून बाहेर आल्यावर फातिमा सांगतात, "मला त्यांचाबद्दल खूप वाईट वाटतं. अनेक अयशस्वी प्रसूतींची वेदना फक्त त्यातून गेलेल्या आईलाच कळू शकतात."
परवानगी नाही
फातिमा सांगते, "मलाही पूर्वी काम करण्याची माझ्या परिवाराकडून परवानगी नव्हती. मला इथं काम करायची परवानगी मिळाली कारण मी फक्त महिलांबरोबर काम करते. पुरुषांबरोबर काम करायची परवानगी तर नाहीच."
पाकिस्तानात महिलांना नोकरीसाठी घर सोडायला परवानगी नाही. यामुळे पाकिस्तानात अनेक महिला वैद्यकीय पदवी मिळवूनही डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करू शकत नाहीत.
आणि म्हणूनच प्रसूतीच्या वेळी प्रशिक्षित दाईच उपलब्ध होत नाहीत.
म्हणून 'सेहत कहानी'चे आभारच मानायला हवेत.

फोटो स्रोत, Sara Saeed
'सेहत कहानी'ची सुरुवात डॉ. सारा सईद आणि डॉ. इफ्फत जफर यांनी केली.
"आम्ही दोघं डॉक्टर आहोत. आम्ही पाकिस्तानातल्या सर्वोत्तम विद्यापीठातून शिकलो आहोत," डॉ. सारा सांगतात.
"लग्नानंतर पुन्हा काम सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी किंवा मुलाला जन्म देताना होणारा त्रास आम्ही अनुभवला आहे. त्यामुळे शिक्षणानंतर प्रॅक्टीस न करणाऱ्या डॉक्टरांच्या भावना आम्ही समजू शकतो, "असंही डॉ. सारा यांनी स्पष्ट केलं.
त्यांनी 2014 साली डॉक्टहर्स (DoctHers) ची स्थापना केली. त्यामुळे त्यांना व्हीडिओ लिंकद्वारे घरूनच प्रॅक्टीस करणं शक्य झालं. आणि यामुळे महिला डॉक्टरांच्या तुटवड्यावरही उपाय करता आला.
मग 2017 साली सारा आणि इफ्फत यांनी केवळ महिलांसाठी प्राथमिक आरोग्यसेवा पुरवण्यावर भर द्यायचं ठरवलं. त्यातूनच 'सेहत कहानी'ची सुरुवात झाली.
"आमच्या लक्षात आलं की असे अनेक लोक आहेत जे दवाखान्यापर्यंतही पोहोचत नाही," डॉ. सारा म्हणतात. "त्यांच्या परिवाराला त्यांचं आरोग्य महत्त्वाचं वाटत नाही किंवा घराबाहेर पडायची त्यांना परवानगी मिळत नाही."
त्यातूनच दाईची किंवा महिला आरोग्य कर्मचाऱ्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. गोळ्या आणि पिशवी घेऊन ही दाई रुग्णांच्या घरी सल्ला द्यायला जाईल, अशी ही संकल्पना होती.

तैय्यबा अन्जुम अली ही फातिमा यांची एक पेशंट आहे. तिला चार मुलं आहेत. त्यात एका नवजात बालकाचाही समावेश आहे.
"मी जेव्हा पहिल्यांदा गरोदर होते तेव्हा मला खूप वेदना होत होत्या. पण या वेळेला बरंच सोप्पं होतं," तैय्यबा म्हणते.
"घरी मुलं एकटी असल्यामुळे मला घर सोडता नव्हतं येत. त्यामुळे आता मी दाईला घरी बोलावून कोणत्याही चाचण्या करू घेऊ शकते," तैय्यबा यांनी सांगितलं.
फातिमा आई आणि बाळ दोघांना तपासतात. मग त्या तैय्यबाला त्यांच्या टॅब्लेटवर स्तनपानाविषयी एक छोटा व्हीडिओ दाखवतात.
फातिमा सांगतात, "मी छोट्या शहरात राहते. तिथं बायकांना डॉक्टरकडे जाणं फारसं महत्त्वाचं वाटत नाही. मी अशा संस्थेसाठी काम करते जी या महिलांमध्ये डॉक्टरांच्या मदतीने ही जागरुकता निर्माण करत आहे."

हे वाचलंत का?
बीबीसीच्या या प्रकल्पाला बिल आणि मेलिंडा गेट्स फाउन्डेशनकडून अर्थसहाय्य मिळालं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









