डायबेटिसचं औषध विषापासून तयार होतं, तुम्हाला माहिती आहे?

कोमोडो ड्रॅगन

फोटो स्रोत, NHM

फोटो कॅप्शन, कोमोडो ड्रॅगनचं विष रक्तदाब कमी करतं.
    • Author, जोनाथन अॅमॉस
    • Role, विज्ञान प्रतिनिधी

तुमच्या कल्पनेतला सर्वात विषारी प्राणी कोणता आहे? जगात असे काही साप आहेत की ज्यांच्या एका दंशात लाखो उंदरांना मारण्याची क्षमता आहे.

पण याच विषाचा वापर औषधांच्या निर्मितीतही झाला आहे.

लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये काही दिवसांपूर्वी विषारी प्राण्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.

जर तुम्हाला कोळी, साप, मुंग्या, माश्या आणि विंचू अशा प्राण्यांचा तिटकारा असेल तर हे प्रदर्शन भावणारं नाही.

मात्र, उत्क्रांती आणि गेली 50 लाख वर्षं आपल्यावर प्रभाव टाकणाऱ्या या जैवरसायनशास्त्राबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन लक्षवेधी ठरलं.

पण खरं सांगायचं तर, आपण या प्राण्यांपासून दूर जाऊच शकतं नाही.

असं म्हटलं जात की, तुम्ही उंदरापासून कधीच 6 फूटांपेक्षा लांब नसता आणि हे विषारी प्राणी आणि त्यांच्या विषाच्या बाबतीतही तितकंच खरं आहे.

गिला मॉन्स्टर

फोटो स्रोत, NHM

फोटो कॅप्शन, गिला मॉन्स्टर या घोरपडीच्या विषापासून मधुमेहावर औषध निर्माण करण्यात आलं आहे.

चला तर मग सामना करू या विषारी भीतीचा

"तुम्ही फळ खाता, पण त्याचं परागीभवन मधमाशांनी केलेलं असतं आणि त्या विषारी असतात," नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील विष उत्क्रांतीचे तज्ज्ञ डॉ. रोनॉल्ड जेन्नर सांगतात.

"अंजिराचं परागीभवन परजीवी माश्यांपासून होतं. जर तुम्ही ऑक्टोपस आणि स्क्वीड खात असाल तर तेही विषारी असतात," असं ते म्हणाले.

"सौदर्यप्रसाधनांमध्येही विषाचा वापर केलेला असतो. स्नायूंना ढिलं करणाऱ्या सापाच्या विषाच्या कृत्रिम प्रकाराचा वापर फेसमास्कमध्ये केलेला असतो," ते म्हणाले.

विषाचा असाही वापर

"तुम्हाला माहीत नसेल पण मधुमेहातील औषधं बऱ्याचवेळा एखाद्या विषाची कृत्रिम आवृत्ती असते,"जेन्नर सांगतात.

"रेड वाईनच्या क्लॅरिफिकेशन प्रक्रियेसाठी विषारी कॅटफिशच्या पोटातील स्विम ब्लॅडरचा वापर केला जातो. हे लेबलवर कुठंही लिहिलेलं नसतं, पण विष आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात,"

ब्लडवर्म

फोटो स्रोत, NHM

फोटो कॅप्शन, ब्लडवर्म

"खरंतरं विषाशिवाय आपलं आयुष्य खडतर बनलं असतं. कॉटनच्या कपड्यांचाच विचार करा. आपण मोठ्याप्रमाणावर कापसाची शेती करू शकतो, यामागे परोपजीवी माशांचं मोठं योगदान आहे. पानांतील द्रव्य शोषणाऱ्या किटकांना या माशा शोषून घेतात. अन्यथा सारं पीक या कीटकांच्या भक्ष्यस्थानी पडलं असतं," अशी माहिती ते पुढे देतात.

या प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या विषारी दैत्यांना पाहता येतं. सुदैवानं ते सर्व मृत असून ते काचेच्या पलीकडं, जतन करून ठेवणाऱ्या द्रव्यांत आहेत. म्हणूनच आपण अगदी जवळून त्यांना पाहू शकता.

व्हँपायर बॅट

फोटो स्रोत, NHM

फोटो कॅप्शन, व्हँपायर बॅट हे वटवाघूळ चावलं, तर त्याच्या विषामुळं रक्त गोठणं बंद होतं.

प्राण्यातील विष हे एक प्रकारचं प्रोटिन असतं. हे विष जखमेतून सोडल जातं. त्यासाठीची या प्राण्यांची स्वतंत्र यंत्रणा असते.

यात नखं, दात, डंक, सुळे यांचा समावेश आहे. एक प्रकारचा सलॅमॅंडर त्याच्या बरगड्यांमधून विष सोडतो, हे सांगितलं तर पटणार नाही.

रोनाल्ड हे 'बल्डवर्म' या प्रकारच्या किड्यावर काम करतात. याला हॅलोवीनच्या मास्क असलेला किडाही म्हणतात.

यात न्यूरोटॉक्सिन प्रकाराचं विष असतं.

याच्या विषाचा उपयोग जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये चेतापेशींतल्या संदेशाची देवाणघेवाण कशी होते, हे अभ्यासण्यासाठी होतो.

ब्लडवर्म जेव्हा कठीण कवचाच्या जलचर प्राण्यावर हल्ला करतो, तेव्हा त्या प्राण्यांमध्ये स्पॅस्टिक प्रकारचा पक्षाघात होतो.

पण विशेष म्हणजे हा परिणाम तात्पुरत्या स्वरुपाचा असतो, असं त्यांनी सांगितलं.

व्हीडिओ कॅप्शन, पीसीओडी डायबेटीसचं कारण ठरू शकतो का?

संशोधकांनी या विषाचं विभाजन केलं आहे. मेंदूचं संदेशवहन सुरू करणारा या विषातील घटक स्वतंत्र करता आला आहे.

पेशींच्या कल्चरवर त्याचा वापर करून संदेशवहनाची प्रक्रिया समजून घेतली जात आहे.

यावर्षी पहिल्यांदाच या प्रोटिनचा मोल्येक्युल म्हणजे रेणू समजून घेता आला आहे. यासारखं निर्सगात काहीही नाही, असं ते म्हणाले.

वेल्वेट अॅंट

फोटो स्रोत, NHM

फोटो कॅप्शन, वेल्वेट अॅंट ही एक प्रकारची माशी आहे.

काही विषांमध्ये रक्त गोठवण्याची ताकद असते. त्यामुळं ज्यावर हल्ला झाला आहे, त्याचं रक्त गोठतं आणि या झटक्यानं तत्काळ मृत्यू येतो.

काही विषांचे प्रकार अगदी विरुद्ध पद्धतीनं काम करतात.

व्हॅंपायर बॅटस या वटवाघळांचं विष या प्रकारचं असतं. त्यामुळे रक्त गोठणं बंद होतं आणि जखमेतून ते अखंडपणे रक्त शोषू शकतात.

हे जरी भयानक वाटत असलं तरी यांचा औषधांमध्ये मोठा उपयोग होतो.

याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे ब्राझिलियन पिट व्हायपर या सापाचं देता येईल.

या सापाच्या विषामुळे रक्तदाब वेगानं खाली येतो. त्यामुळं हा साप चावलेला मनुष्य काही क्षणांतच कोसळतो.

व्हीडिओ कॅप्शन, तुमचं आयुष्य तर वाढलंय पण या आजारांचा धोकाही

या विषामुळे शास्त्रज्ञांना पहिल्या अॅन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइमचा शोध लागला. त्यामुळे माणसांतील उच्च रक्तदाबावर उपचाराचा शोध लावता आला.

इजिप्शियन कोब्रा

फोटो स्रोत, NHM

फोटो कॅप्शन, इजिप्शियन कोब्रा

तर गिला मॉन्स्टर या घोरपडीच्या चाव्यामुळे जे विष शरिरात जातं त्यात असलेल्या पेप्टाईडमुळे ग्लुकोजचं नियंत्रण होतं.

इक्सेनाटाईड या नावाच्या मोलेक्यूलच्या सहाय्यानं अस्ट्राझेनेका वितरित करत असलेल्या औषधांचा उपयोग टाईप 2 प्रकारच्या मधुमेहावर उपचार करताना केला जातो. याचं मूल्य लक्षावधी डॉलरमध्ये आहे.

सर्वाधिक विषारी कोण?

तुमच्या संग्रहातील सर्वात विषारी प्राणी कोणता, असा प्रश्न त्यांना अनेकजण विचारतात.

पण याचं उत्तर कठीण असल्याचं ते सांगतात. हे एक प्रकाराचं रासायनिक युद्ध असतं.

एक प्रकारच्या भक्ष्यांवर चालणारं विष दुसऱ्या भक्ष्यांवर प्रभावी ठरेलच असं नाही.

पण रोनाल्ड यांच्या मनात खास जागा आहे ती किनारी टाईपन सापासाठी.

ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनारपट्टीच्या भागात आणि पापुआ न्यू गीनीमध्ये हा साप आढळतो.

विषशास्त्रात संशोधक विषाची शक्ती मोजण्यासाठी 'मेडियन लिथल डोस' हे मापक वापरतात.

रोनाल्ड म्हणतात, हा साप पूर्ण क्षमतेनं चावल्यानंतर जे विष निर्माण होतं, ते 33 लाखांपैकी निम्म्या उंदरांना मारू शकतो. हे फारच भयानक आहे, असं ते म्हणाले.

विषाची 'डिलिव्हरी' निर्सगात स्वतंत्रपणे उत्क्रांत झाली आहे.

जवळपास 2 लाख प्राण्यांच्या जातीमध्ये ही क्षमता विकसित झाली आहे.

विषारी पिकॉक स्पायडर

फोटो स्रोत, NHM

फोटो कॅप्शन, विषारी पिकॉक स्पायडर

यातून विषाचं महत्त्व अधोरेखित होतं. जवळपास सर्वच प्राण्यांमध्ये ही क्षमता विकसित होण्यासाठीचे जीन्स असू शकतात.

रोनाल्ड म्हणतात, "आपण माणसालाही विषारी बनवू शकतो. त्यासाठी सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आणि जवळपास 20 लाख वर्ष लागू शकतील. ही सुरुवात करण्यासाठी माणसाची लाळ चांगली जागा ठरेल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)