तैमूरच्या सैनिकांनी जेव्हा दिल्लीत कापलेल्या मुंडक्यांचा मीनारच रचला होता...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी तैमूर लंगचे 90,000 सैनिक समरकंदमध्ये एकत्र जमले होते, तेव्हा ते एकाच ठिकाणी जमा झाल्यानं शहरात सगळीकडं धूळच धूळ पसरली होती. दिल्ली हे समरकंदच्या दक्षिण-पूर्वेला सुमारे 1000 मैल अंतरावर होतं.
दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कदाचित जगातला सर्वात कठीण मार्ग होता. तो हिंदकुश पर्वत रांगातून जात होता. या पर्वताच्या आसपास असे लोक राहत होते, ज्यांना झुकवणं 'अलेक्झांडर द ग्रेट'लाही शक्य झालं नव्हतं.
या मार्गात अनेक नद्या, खडतर रस्ते आणि वाळवंट होते. त्यामुळं दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणखी कठीण व्हायचा. हे सर्व पार केलं तरी, तैमूरच्या सैन्याचा सामना होणार होता तो महाकाय हत्तींशी. तैमूरच्या सैन्यानं असे हत्ती कधी पाहिले नव्हते. त्यांच्याबाबत बरंच ऐकलेलं मात्र होतं. एकदा त्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली की, ते फक्त घरं किंवा झाडंच उध्वस्त करत नव्हते, तर समोरच्या मोठमोठ्या भिंतीही जमीनदोस्त करायचे. त्यांच्या सोंडींमध्ये एवढी शक्ती होती, की त्यात लपेटून कोणत्याही सैनिकाला खाली फेकून ते पायानं चिरडू शकत होते.
दिल्लीच्या अशांतीने दिले तैमूरला आमंत्रण
त्याकाळी दिल्लीतील परिस्थिती ठीक नव्हती. सन 1338 मध्ये फिरोझ शाह तुघलक यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारत बंगाल, काश्मीर आणि दख्खन अशा भागांत विभागला गेला होता.
"फिरोझच्या मृत्यूच्यानंतर दहा वर्षांतच एकापाठोपाठ एक दिल्लीमध्ये पाच बादशाह, त्यांचे नातू आणि त्यांच्या लहान मुलानं राज्य केलं होतं. दिल्लीतील अंतर्गत स्थिती अशी होती, जणू एकप्रकारे बाहेरच्या आक्रमकाला त्यामुळं हल्ल्याचं निमंत्रण मिळत होतं," असं प्रसिद्ध इतिहासकार सर जॉर्ज डनबर यांनी 'द हिस्ट्री ऑफ इंडिया' या पुस्तकात लिहिलंय.

फोटो स्रोत, Getty Images
समरकंदच्या बाहेर पडताच सैनिकांना चढ असलेल्या मार्गाचा सामना करावा लागला. 90,000 सैनिक आणि त्यापेक्षा दुप्पट घोडे हे सर्व, जगाचं छत समजल्या जाणाऱ्या भागात कसे न्यायचे, हे सर्वात मोठं आव्हान तैमूरसमोर होतं.
"तैमूरच्या सैन्याला विविध प्रकारच्या भागांतून प्रवास करायचा होता. त्याठिकाणचं हवामानही सारखं नव्हतं. नेतृत्व क्षमतेमध्ये तैमूरपेक्षा कमी असलेल्या कुणालाही, पूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी हे पुरेसं होतं," असं जस्टिन मरोजी यांनी त्यांच्या 'टॅमरलेन, सॉर्ड ऑफ इस्लाम, कॉन्करर ऑफ द वर्ल्ड' मध्ये लिहिलं आहे.
"समरकंदपासून दिल्लीदरम्यान बर्फाच्छदीत डोंगरकडे, गर्मीमुळं अंग पोळून काढणारे वाळवंट आणि ओसाड जमीन असलेला अशा मोठा भाग होता, जिथं सैनिकांना खाण्यासाठी एक दाणाही उगवणं शक्य नव्हतं."
"तैमूरच्या सैनिकांची सगळी रसद सुमारे दीड कोटी घोड्यांच्या पाठीवर लादलेली होती. या मोहीमेच्या 600 वर्षांनंतर आजही, या भागातून प्रवास करणारे टॅक्सी ड्रायव्हर या बर्फाळ प्रदेशाच्या खराब हवामानाची तक्रार केल्याशिवाय राहत नाहीत."
लोनीजवळ तैमूरने लावली छावणी
तैमूरच्या सैनिकांनी तशी अनेक लहान मोठी युद्धं जिंकली होती. पण त्यांना अशा परिस्थितीत पुढं कसं सरकावं याचा अनुभव नव्हता. मार्ग एवढा धोकादायक होता की, अनेक घोड्यांचा पाय घसरून मृत्यू झाला होता. या प्रवासात असाही काळ आला होता, जेव्हा अनेक युद्ध जिंकलेल्या तैमूरला घोड्यावरून उतरून सामान्य शिपायासारखं पायी चालावं लागलं होतं.
त्याचं अनुसरण करून सर्व सैनिकही पायी चालू लागले होते. ऑगस्ट उजाडेपर्यंत तैमूरचं सैन्य काबूलपर्यंत पोहोचलं होतं. ऑक्टोबरमध्ये तैमूर सतलज नदीवर जाऊन थांबला. त्याठिकाणी सारंग खानानं त्याला अडवलं पण तैमूरनं त्यांना पराभूत केलं. दिल्लीला पोहोचण्यापूर्वी मार्गात तैमूरनं सुमारे एक लाख हिंदूंना कैदी बनवलं. दिल्लीच्या जवळ पोहोचल्यानंतर तैमूरनं लोनीमध्ये छावणी टाकली. यमुना नदीजवळच्या एका टेकडीवरून त्यानं परिस्थितीचा अंदाज घेतला होता.

फोटो स्रोत, HARPER PERENNIAL
त्यावेळी अंतर्गत कलहामुळं दिल्लीची शक्ती अगदीच क्षीण झालेली होती. तसं असलं तरी, त्यांचे दहा हजार घोडेस्वार, 25 ते 40 हजार सैनिक आणि 120 हत्ती तैमूरच्या लष्कराचा सामना करायला सज्ज होते.
"तैमूरच्या 700 सैनिकांच्या आघाडीच्या पथकावर मल्लू खानच्या सैनिकांनी हल्ला केला, त्यावेळी तैमूर आणि दिल्लीच्या सैनिकांमध्ये पहिला संघर्ष झाला होता. त्यावेळी दिल्लीवर सुल्तान मोहम्मद शाह यांचं राज्य होतं, पण प्रत्यक्षात कारभारावर मल्लू खानचं नियंत्रण होतं," असं जस्टीन मरोजी यांनी लिहिलंय.
सोबत असलेल्या एक लाख कैद्यांना मारण्याचा आदेश
मल्लू खानानं हल्ला केला तर सोबत असलेले एक लाख हिंदू बंदी त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या समर्थनार्थ उभे राहतील, अशी भीती तैमूरला होती.
"तैमूरला या कैद्यांच्या बंडखोरीची एवढी भीती होती की, त्यानं त्याच ठिकाणी कैद्यांना ठार मारण्याचे आदेश दिले. तैमूरबरोबर चालणाऱ्या धार्मिक मौलानांनाही, या कैद्यांची हत्या करण्याच्या कामावर लावण्यात आलं," असं जस्टीन मरोजी लिहितात.
''मानवतेच्या इतिहासात अशा प्रकारच्या क्रौर्याचं दुसरं उदाहरण सापडत नाही," असं नंतर सर डेवीड प्राइस यांनी त्यांच्या 'मेमॉअर्स ऑफ द प्रिंसिपल इव्हेंट्स ऑफ मोहमदन हिस्ट्री'मध्ये लिहिलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी तैमूरला आणखी एक चिंता सतावत होती.
त्यानं 'मुलफिझत तिमूरी' मध्ये याबाबत लिहिलंय. "माझी सर्वात मोठी चिंता होती, भारतातील शक्तीशाली हत्ती. आम्ही समरकंदमध्ये त्यांच्याबाबत अनेक कथा ऐकल्या होत्या आणि पहिल्या संघर्षातच आम्ही ते काय करू शकतात हे अनुभवलं होतं. त्यांच्या चारही बाजुंनी चिलखतीसारखं कवच असायचं आणि त्यांच्या पाठिवर मशाल फेकणारे, तिरंदाज आणि महावत बसलेले असतात. अशा अफवा होत्या की, हत्तीच्या बाहेरच्या दातांना विष लावलेलं असायचं, ते दात ते लोकांच्या पोटात खुपसायचे. त्यांच्यावर बाण आणि भाल्यांचा काही परिणाम होत नव्हता," असंही त्यानं लिहिलंय.
सुरुवातीपासूनच वरचढ ठरले तैमूरचे सैन्य
या सर्व परिस्थितीत हत्तींचा सामना करण्यासाठी अचूक योजना तयार करण्याची गरज होती. तैमूरनं सैनिकांना खोल खड्डे तयार करायला सांगितलं. त्यानंतर त्या खड्ड्यांसमोर बैलांच्या गळ्यात आणि पायावर चामड्याचे पट्टे बांधून त्यांना उभं केलं. तसंच उंटांच्या पाठीवर लाकडं आणि वाळलेलं गवत बांधलं आणि त्यांनाही एकत्रित बांधलं. त्यानंतर तिरंदाजांना महावतांवर निशाणा लावून त्यांना ठार करण्यास सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
17 डिसेंबर 1398 ला मल्लू खान आणि सुल्तान महमूद यांचं सैन्य तैमूरबरोबर लढाईसाठी दिल्ली गेटच्या बाहेर पडलं. त्यांनी हत्तींना मध्यभागी ठेवलं होतं. त्यांच्यावर शस्त्रधारी सैनिक सवार होते. तैमूर एक उंच टेकडीवर होता. तिथून त्याला युद्धाचं पूर्ण चित्र दिसत होतं. युद्ध सुरू होण्याच्या काही काळापूर्वी तैमूरनं घोड्यावरून उतरून विजयासाठी प्रार्थना केली. युद्ध सुरू होताच, तैमूरच्या तिरंदाजांनी मल्लू खानाच्या लष्कराच्या उजव्या भागाला लक्ष्य केलं.
मल्लू खाननं त्याला प्रत्युत्तर देत, डाव्या बाजुच्या सैनिकांद्वारे तैमूरच्या उजव्या बाजुच्या सैनिकांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. पण तैमूरच्या सैनिकांनी मल्लू खानच्या बाजूनं चालणाऱ्या सैनिकांवर हल्ला करत त्यांनाच संपवायला सुरुवात केली.
ऊंटांच्या पाठिवरील वाळलेल्या गवताला लावली आग
त्याचवेळी हत्तींमुळं एका भागात तैमूरच्या सैनिकांमध्ये गदारोळ निर्माण झाल्याचं त्यानं पाहिलं. पण त्यासाठी त्याची योजना आधीच तयार होती. आता ती अंमलात आणायची वेळ झाली होती. त्यानं सैनिकांना लाकडं आणि वाळलेलं गवत लादलेल्या उंटांना समोर करण्याचे आदेश दिले. हत्ती समोर येताच त्यांनी गवत आणि लाकडाला आग लावली.

फोटो स्रोत, Getty Images
जस्टीन मरोजींच्या पुस्तकानुसार, "अचानक पाठीवर धगधगती आग असलेले उंट हत्तींच्या समोर आले. त्यामुळं हत्ती घाबरले आणि त्यांच्याच सैनिकांच्या दिशेनं वळाले. त्यांनी स्वतःच्याच सैनिकांना चिरडायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे, मल्लू खान यांच्या सैनिकांमध्ये धावपळ उडाली. इतिहासकार ख्वानदामीर यांनी त्यांच्या 'हबीब-उस-सियार' पुस्तकात, अचानक युद्धाच्या रणांगणात झाडावरून नारळ पडावे तसे भारतीय सैनिकांचे शीर दिसू लागले, असं म्हटलंय."
"उजव्या बाजूनं तैमूरचा सरदार पीर मोहम्मदनं त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना दिल्लीच्या भिंतीपलीकडे पळवून लावलं. यादरम्यान, खलील या तैमूरच्या 15 वर्षांच्या नातवानं एका हत्तीला त्यावरील सैनिकांसह पकडलं आणि आजोबांसमोर सादर केलं."
तैमूरचे हात आणि पाय झाले जखमी
त्याचवेळी तैमूर युद्धाचं नेतृत्व कुर्रा खान याच्याकडं सोपवून स्वतः युद्धात उतरला.
"मी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हाती कुऱ्हाड घेतली. तलवार आणि कुऱ्हाडीनं वार करत मी निघालो. दोन हत्तींच्या सोंडी कापल्या आणि त्यामुळं ते हत्ती खाली कोसळले आणि त्यावरील सैनिकही खाली पडले. त्याचवेळी शहरातून निघालेल्या मोठ्या मिशा असलेल्या हिंदी सैनिकांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला," असं तैमूरनं त्याच्या आत्मचरित्रात लिहिलंय.

फोटो स्रोत, Getty Images
"माझे दोन्ही हात एवढ्या वेगानं वार करत होते की, मलाच माझी शक्ती आणि चपळता याचं कौतुक वाटत होतं. मोठ्या मिशा असलेले शिपाई आमच्यासमोर एकापाठोपाठ खाली कोसळत होते. त्यामुळं आम्ही हळूहळू, शहराच्या दरवाजाजवळ पोहोचत होतो." त्याचदरम्यान तैमूर पुन्हा घोड्यावर स्वार झाला. त्यानंतर तो मोकळ्या मैदानात आला त्यावेळी त्याच्या हातातून घोड्याची लगाम निसटली.
"मी आश्चर्यानं मशालीच्या उजेडात हात पाहिला, तर माझा हात रक्तबंबाळ झालेला होता. स्वतःकडं पाहिलं तर संपूर्ण कपडे रक्तानं पूर्णपणे माखलेले होते. जणू मला रक्ताच्या तलावात फेकून बाहेर काढलेलं असावं, असं मला वाटलं. लक्षपूर्वक पाहिलं तर, माझी दोन्ही मनगटं जखमी झाली होती. तसंच माझ्या दोन्ही पायांवर पाचठिकाणी घाव होते," असं तैमूरनं आत्मचरित्रात लिहिलंय.
उर्वरित हत्तींनी तैमूरसमोर शीर झुकवलं
तोपर्यंत तैमूरच्या सैनिकांनी दिल्लीत प्रवेश केला होता. त्यानंतर एका दिवसानं तैमूरनं एखाद्या विजेत्याप्रमाणं दिल्लीत प्रवेश केला. दिल्लीच्या सीमेत एक तंबू बांधून त्यानं घाईघाईत दरबाराची स्थापना केली. सुल्तान महमूदच्या दरबारातील लोक आणि दिल्लीतील उच्चभ्रू लोकांना त्या दरबारासमोरून ये-जा करायला लावलं जात होतं. दिल्लीवर तैमूर लंगनं पूर्णपणे ताबा मिळवल्याचं ते प्रतीक होतं.

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीचे सुल्तान मेहमूद आणि मल्लू खान त्यांच्या सैनिकांना आक्रमणकर्ते दया करतील या भरवशावर सोडून मैदानातून पळून गेले.
"त्यानंतर एका पाठोपाठ उर्वरित 100 हत्तींना तैमूरच्या समोर आणण्यात आलं. त्यांनी गुडघे टेकून आणि सोंड वर उचलून दिल्लीच्या या नव्या मालकाला सलामी दिली. हे हत्ती तबरीज, शिराज, अर्झिनजान आणि शिरवानच्या राजकुमारांना भेट म्हणून पाठवण्याचा निर्णय तैमूरनं घेतला. तसंच दिल्लीवर तैमूरनं विजय मिळवल्याची बातमी पसरण्यासाठी त्यानं दूतही पाठवले," असं जस्टीन मरोजी यांनी लिहिलं आहे.
सैनिकांनी दिल्लीत केला नरसंहार
युद्ध संपल्यानंतर तैमूरनं ज्यासाठी दिल्लीवर हल्ला केला होता, त्यावर लक्ष केंद्रीत केलं. दिल्लीचा खजाना किती मोठा आहे, याचा अंदाज घ्यायला त्यानं सुरुवात केली. त्यातून लुटून काय नेता येईल, याचा विचार तो करत होता. त्याच्या सैनिकांनी घरोघरी जात लोकांना, किती दंड द्यावा लागेल हे सांगायला सुरुवात केली.
काही सैनिक सहकाऱ्यांसाठी शहरात धान्याची लूटपाट करू लागले. शराफुद्दीन अली याझदी यांच्या मते, त्यावेळी तैमूरचे सुमारे 15,000 सैनिक दिल्लीच्या आत शिरले होते. तेव्हा सैनिक आणि दिल्लीतील नागरिकांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली.

फोटो स्रोत, Getty Images
"हिंदुंनी त्यांच्या महिलांच्या अब्रूशी खेळ सुरू असल्याचं आणि संपत्ती लुटली जात असल्याचं पाहिलं तेव्हा त्यांनी दारं बंद करून घेत स्वतःच्याच घरांना आगी लावल्या. एवढंच नाही तर, पत्नी मुलांची हत्या करून अनेकजण तैमूरच्या सैन्यावर तुटून पडले. त्यानंतर दिल्लीत असा काही नरसंहार पाहायला मिळाला की, रस्त्यांवर मृतदेहांचे खच पडलेले होते. तैमूरचं संपूर्ण सैन्य दिल्लीत घुसलं. काही वेळातच दिल्लीच्या लोकांनी शस्त्र टाकली," असं मोहम्मद कासीम फेरिश्ता यांनी त्यांच्या 'हिस्ट्री ऑफ द राइज ऑफ मोहमदन पॉवर इन इंडिया' मध्ये लिहिलंय.
दिल्लीतील कत्ल-ए-आम
मंगोलांनी दिल्लीकरांना पुरानी दिल्लीपर्यंत मागे ढकलून लावलं. नागरिकांनी त्याठिकाणी एका मशिदीच्या आवारात आश्रय घेतला. "तैमूरच्या 500 सैनिक आणि दोन सरदारांनी मशिदीवर हल्ला करत तिथं शरण घेतलेल्या, लोकांना ठार केलं. त्यांच्या कापलेल्या शिरांचा एक मिनार तयार केला आणि शरीरं गरूड, कावळ्यांना खाण्यासाठी सोडून दिली. सलग तीन दिवस अशाप्रकारे नरसंहार सुरू होता," असं जस्टीन मरोजींनी लिहिलंय.

फोटो स्रोत, ATLANTIC PUBLISHERS AND DISTRIBUTORS (P) LTD
गियाथ अद्दीन अली यांनी 'डायरी ऑफ तैमूर्स कॅम्पेन इन इंडिया' या पुस्तकात त्या काळातील घटनांवर प्रकाश टाण्याचा प्रयत्न केलाय. "तातार सैनिक दिल्लीकरांवर अशा प्रकारे हल्ला करत होते, जणू लांडगे बकरीवर हल्ला करत असावेत."
त्याचा परिणाम म्हणजे, संपत्ती, हिरे-जवाहिर यासाठी प्रसिद्ध असलेली दिल्ली धगधगत्या नरकासमान बनली. दिल्लीच्या प्रत्येक कोपऱ्यात मृतदेह सडल्याची दुर्गंधी पसरली होती.
शामियान्यात आराम करणाऱ्या तैमूर लंगला मात्र दिल्लीत सुरू असलेल्या या नरसंहाराची कल्पनाही नव्हती. तैमूरचे सरदार दिल्लीच्या लोकांवर अत्याचार करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांचे सहकारी तैमूरला याबाबत सांगण्याचं धैर्य करू शकले नाहीत. काही अभ्यासकांच्या मते, तैमूरला या नरसंहाराबाबत काहीच माहिती नव्हतं. त्याचं सैन्य शिस्तीसाठी प्रसिद्ध होतं. आदेशाशिवाय ते अशाप्रकारे लूटमार आणि हिंसाचार करू शकत नव्हते.
राज्य करण्यात रस नव्हता
लूटमार करण्याचा आदेश मिळाला असो वा नसो, पण तैमूरचं सैन्य दिल्लीतील श्रीमंतीनं आवाक झालं होतं, हे नक्की. याझदींच्या मते, 'सगळीकडं सोनं, चांदी, दागिने, मोती, मौल्यवान रत्नं, नाणी आणि महागडे कपडे होते. त्याशिवाय दिल्लीचे नागरिक होते. त्यांच्याकडून तैमूरचे सैनिक हवं ते काम करून घेत होते. तैमूरचं सैन्य परत जाण्यासाठी दिल्लीतून निघालं तेव्हा प्रत्येक सैनिकामागे सरासरी 150 सामान्य लोक चालत होते.'

फोटो स्रोत, Getty Images
तैमूर दिल्लीत फक्त दोन आठवडे राहिला. यादरम्यान त्यानं स्थानिक शहजाद्यांची शरणागती आणि भेटी स्वीकारल्या. दिल्लीतील अनेक हस्तशिल्प कलाकारांना तो हातात बेड्या ठोकून त्यांच्याबरोबर समरकंदला घेऊन गेला. जाण्यापूर्वी तैमूर लंगनं खिज्र खान याला सध्याचा पंजाब आणि सिंध भागाचा गव्हर्नर नियुक्त केलं. दिल्लीत त्यानं मुद्दाम शासक नियुक्त केला नाही. त्याठिकाणच्या गादीसाठी उर्वरित शहजाद्यांमध्ये अनेक वर्षे संघर्ष सुरुच राहिला.
काही काळानंतर मल्लू खान सुल्तान शाहदेखील परतला आणि या संघर्षात सहभागी झाली. तैमूरला राज्य चालवण्यात कधीच रस नव्हता. त्याला केवळ राज्यांवर विजय मिळवायचं वेड होतं. त्यासाठी अनेक इतिहासकारांनी त्याच्यावर टीकाही केली होती.
दिल्लीतून लुटलेल्या सामानासह तैमूरच्या सैन्यानं जेव्हा परतीचा प्रवास सुरू केला, तेव्हा त्याच्याकडं एवढं साहित्य होतं की, त्याला एका दिवसात केवळ चार मैलांचच अंतर पार करता येत होतं. परततानाही रस्त्यात तैमूरला लहान-मोठी 20 युद्धं करावी लागली. त्यातही त्यानं शक्य तशी लूटमार केली.
धक्क्यातून सावरण्यासाठी लागली 100 वर्षे
काश्मीरपर्यंत पोहोचता-पोहोचता तैमूरच्या हातावर फोड आले होते. काबूल पार करेपर्यंत त्याचे दोन्ही हात आणि पायांना फोड आले होते. त्याची अवस्था एवढी गंभीर होती की, त्याला घोड्यावरही बसता येत नव्हतं.
हिंदुकुश पर्वतांवरील प्रवास त्यानं एका घोड्याच्या बछड्याच्या पाठीवर बसून केला. हा मार्ग एवढ्या वळणांचा होता की, शाही ताफ्याला एका दिवसात एक नदी 48 वेळा ओलांडावी लागली होती.

फोटो स्रोत, Getty Images
समरकंदमध्ये प्रवेशापूर्वी तैमूरनं वडिलांच्या कबरीवर डोकं टेकलं. दुसरीकडं समरकंदपासून 1000 मैल अंतरावर असलेली दिल्ली मात्र भग्न झाली होती तिथं उरले होते केवळ अवशेष.
भारतातील सुल्तानांनी पिढ्यानपिढ्या जमवलेली प्रचंड संपत्ती काही दिवसांतच त्यांच्या हातून गेली. एवढंच नाही तर धान्यांची भरलेली कोठारं आणि उभं पिकही नष्ट झालं. दिल्ली पूर्णपणे उध्वस्त झाली. तिथं शिल्लक असलेले लोक उपासमारीनं मरू लागले. सुमारे दोन महिने तर पक्षीदेखील दिल्लीकडे फिरकले नव्हते.
या धक्क्यातून सावरण्यासाठी दिल्लीला 100 वर्षांचा कालावधी लागला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








