भाजपचं 'मिशन बारामती': बारामतीमध्ये पवारांना निर्मला सीतारमण आव्हान देऊ शकतील?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
"2019 च्या निवडणुकांमध्ये अमेठीमधील गांधी कुटुंबाची मक्तेदारी राहुल गांधींच्या पराभवाने संपुष्टात आली. जर आम्ही हे अमेठीत करु शकतो तर हे बारामतीमध्येही आम्ही करु शकतो."
भाजपचे नेते राम शिंदे यांनी केलेलं हे विधान चर्चेत आहे.
सोमवारी (19 सप्टेंबर) भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे यांनी पुण्यातल्या शहर भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली.
राम शिंदे हे बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आहेत. या पत्रकार परिषदेत राम शिंदेंनी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती तर दिली. पण याचसोबत त्यांनी अमेठीप्रमाणे बारामतीतही लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजून लागेल असं विधानही केलं.
पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग भाजपनं आतापासूनच फुंकलं आहे.
त्यासाठीचे प्रयत्नांनाही त्यांनी सुरुवात केली आहे. फक्त बारामती मतदारसंघच नाही तर, देशातले भाजपचा विजय न झालेले 144 मतदारसंघांत भाजपने काम सुरु केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातले 16 मतदारसंघ आहेत.
या यादीमध्ये अर्थातच पवारांचा गड असलेला बारामती मतदारसंघही आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. पण भाजपने 144 इतर मतदारसंघात काम सुरू केलं असलं तरीही त्यांच्या 'मिशन बारामतीची' चर्चा होणं स्वाभाविकच आहे.
भाजपचं 'मिशन बारामती'
निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याच्या आधी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही नुकताच दोन दिवसांचा बारामती दौरा केला.
त्यावेळी त्यांनीही '2024 मध्ये बारामतीमध्ये घड्याळ थांबेल' असं विधान करुन राष्ट्रवादीला इशारा दिला. 2019 मध्ये जे अमेठीत भाजपला करणं शक्य झालं ते 2024 मध्ये बारामतीत करण्याचं भाजपचं ध्येय आहे. ते साध्य करणं भाजपला शक्य आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
"हे प्रयत्न आताच होत आहेत असं नाही. मागच्या वेळेस नरेंद्र मोदीसुद्धा आले होते. 2019 च्या प्रचारामध्ये अमित शाहसुद्धा आले होते. 2014 मध्ये भाजपची लाट होती. त्यात सुप्रिया सुळेंचं मताधिक्य 70 हजारांवरच आलं पूर्वी ते 3-4 लाखांपर्यंत असायचं. त्यानंतर सुप्रियाने मेहनत घेतली आणि 2019 मध्ये ती मार्जिन दीड लाखापर्यंत वाढवली. भाजप जिंकण्याच्या जवळ गेला. पण हरवू नाही शकला. आता असा आत्मविश्वास असण्याची शक्यता आहे की दीड लाखांपर्यंत मताधिक्य खाली आणलंच तर जिंकणंही शक्य आहे. त्यामागे कारण असं आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातले काही विधानसभा मतदारसंघ हे आधीच भाजपच्या ताब्यात आहेत.
ज्यामध्ये दौंड, खडकवासला (शहरी मतदारसंघ) भाजपकडे आहे. पुरंदरमध्ये तेव्हा शिवसेनेच्या विजय शिवतारेंचा निसटत पराभव झाला होता. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील भाजपसोबत आहे. त्यामुळे 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात भाजपची पकड आहे. हे फक्त काही बारामती मध्येच सुरु नाहीये तर भाजपची देशभर ही मोहीम सुरु आहे. त्या अंतर्गत निर्मला सीतारमण येत आहेत आणि भाजप प्रयत्न करतंय," असं हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राचे पुणे ब्यूरो चिफ डॉ. योगेश जोशी यांनी सांगितलं.
बारामतीच का?
2009 पासून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्याआधी शरद पवारांनी बारामतीचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं.
बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातल्या दोनमध्ये राष्ट्रवादीचे, दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तर दोन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
2009 साली सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014 ची निवडणूक मोदी लाटेत पार पडली आणि सुप्रिया सुळेंविरोधात रासपच्या महादेव जानकरांचं आव्हान होतं. ही लढत मात्र सहज झाली नाही. फक्त 69,719 मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय झाला. 2019 च्या निवडणुकीत भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत 1 लाख 55 हजार मतांनी सुळे विजयी झाल्या.
कोणताही मतदारसंघ जिंकणं अशक्य नाही हेच धोरण भाजपने अवलंबल्याचं दिसतंय.
"बारामती तर आहेच, पण बारामती बरोबरच त्यांनी देशातले बरेच मोठे मतदारसंघ सिलेक्ट केले आहेत. जे मतदारसंघ त्यांच्याकडे सध्या नाहीत त्यावर फोकस करायचा असं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामध्ये बारामतीपण आहे. पुण्यातल्या शिरुर मतदारसंघातही त्यांनी काम सुरु केलंय. मध्ये एक केंद्रीय मंत्री शिरुरमधेही येऊन गेल्या. बारामतीवर थोडं जास्त लक्ष केंद्रीत केलंय असं म्हणता येईल. पण यामध्ये फक्त बारामती मतदारसंघच आहे असं नाही," असं दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी यांनी सांगितलं.
शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. इतर मतदारसंघातल्या निकालापेक्षा बारामतीमधला निकाल महत्त्वपूर्ण का ठरतो?

फोटो स्रोत, Getty Images
"पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीसाठी बारामती महत्त्वाची आहे. गेल्या अनेक दशकांपासून पवार कुटुंबीय बारामतीचे लोकप्रतिनिधी आहेत. बारामती शहर आणि त्यातला विकासासाठी शरद पवारांना विकासाचं उदाहरण देण्यासाठी खूप मदत होते. त्यांनी बऱ्याच अंशी विकास केलेलाही आहे. जर बारामतीमध्ये राष्ट्रवादीला हरवलं किंवा खूप जवळची लढत झाली तर राष्ट्रवादीच्या मुळांवरच आघात केल्यासारखा होतो. इथे आघात झाला की शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंच्या राजकारणावर त्याचा थेट परिणाम होणार," असं हिंदुस्थान टाईम्सचे पुणे ब्यूरो चिफ योगेश जोशी यांनी सांगितलं.
अमेठीची पुनरावृत्ती होणार?
संपूर्ण देशभरात सुरु केलेल्या मोहिमेनुसार भाजपने बारामतीमध्येही काम सुरु केलं आहे. महत्त्वाच्या नेत्यांच्या सातत्याने इकडे दौरे होतील. पक्ष संघटनेचा आढावा घेतला जाईल आणि लोकांच्या अपेक्षा आणि विकासाचा आढावा घेतला जाईल असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.
भाजपच्या 'मिशन बारामती' बद्दल शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारल्यावर त्यांनी सांगतिलं की, बारामतीला भेट देण्यासाठी कुणाला ना नाहीये. निर्मला सीतारमण येणार आहेत तर त्यांचं स्वागत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण ज्याप्रकारे राहुल गांधींकडून अमेठी भाजपनं घेतली त्याची पुनरावृत्ती बारामतीमध्ये करणं शक्य आहे का?
यावर योगेश जोशी सांगतात की, "अमेठीमधून गांधी परिवार निवडून येत होता आणि त्याला ते गृहित धरत होते. त्यांनी फार काही तिथे केलेलं नाहीये. विशेषतः पुढच्या पिढ्यांनी. तसं बारामतीचं नाहीये. बारामती शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ताब्यात ठेवली आहे.
तिथे बऱ्यापैकी ते काहीतरी करत असतात. अमेठीमध्ये 2014 नंतर स्मृती इराणी सतत जात होत्या आणि त्यांनी त्या मतदारसंघात पाय रोवण्यासाठी मशागत गेली. आता निर्मला सीतारमण भाजप पक्ष म्हणून येत आहेत. त्या काही स्वतः तिथून लढणार नाहीत. त्यामुळे पुढे काय होईल हे बघावं लागेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








