मराठवाडा मुक्तिदिन: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्यासाठी स्वातंत्र्याआधी आणि नंतर कसे झटले?

- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मी शिकल्यामुळे माझ्या डिग्रीवर स्वामी रामानंदांचे नाव आहे. त्यांचा पुतळा मी कितीतरी वेळा पाहिला असेल. त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे म्हटल्यावर हा कुणीतरी मोठा माणूस असावा असं मला वाटायचं पण पण त्यांचं मोठेपण नेमकं कशात आहे हे माहीत नव्हतं.
बऱ्याचदा असं होतं की एखादं नाव आपण खूप वेळा ऐकतो पण त्याच्याविषयी आपल्याला किती माहिती असते. त्यांचं आत्मचरित्र माझ्या हाती पडलं. ते वाचल्यावर अनेक दिवसांपासून डोक्यात असलेलं कोडं सुटावं तसं मला झालं.
17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिदिन आहे. जसं संपूर्ण भारतात 15 ऑगस्ट रोजी वातावरण असतं, अगदी तसंच वातावरण तुम्हाला या दिवशी मराठवाड्यात पाहायला मिळतं.
मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हटलं तर प्रामुख्याने नाव येतं ते स्वामी रामानंद तीर्थ यांचं. भारत स्वतंत्र झाला तरी एक मोठा भूभाग असलेला प्रदेश पराधीनच होता. त्या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागला आणि त्या लढ्याचे नेतृत्व स्वामीजींनी केले. स्वातंत्र्यानंतरही ते मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते झटले आणि आपले सर्व आयुष्य त्यांनी त्यासाठीच वेचले.
15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी संपूर्ण भारतातील लोक तिरंगा हातात घेऊन आपला आनंद साजरा करत होते पण हैदराबाद संस्थानात मात्र भारताचा ध्वज हाती घेणाऱ्यांना बेड्या ठोकल्या जात होत्या. स्वामी रामानंदांना देखील भारताच्या स्वातंत्र्यदिनी अटक झाली होती.
'भारताचा नियतीशी करार झाला आहे आणि त्यानुसार आपण आपलं भाग्य लिहिणार आहोत' असं नेहरूंनी 15 ऑगस्ट 1947 ला रात्री बारा वाजता जाहीर केलं होतं पण भारताचा अंदाजे सव्वा दोन लाख स्क्वेअर किमी भाग अद्याप पारतंत्र्यात होता.
इतकंच नाही तर इंग्रजांनाही लाजवेल अशा जुलमाखाली होता. त्या जुलमाविरोधात एक संन्याशी आपले दंड थोपटून उभा होता. ज्या दिवशी त्यांना अटक झाली त्यावेळेपर्यंत ते हैदराबाद संस्थानच्या जनतेचे सर्वांत लोकप्रिय नेते झाले होते पण तिथपर्यंत येण्यासाठी आणि नंतरही त्यांना अनेक अडचणींचे डोंगर पार करावे लागले होते.
टिळकांना पाहण्यासाठी छड्या खाल्या
3 ऑक्टोबर 1903 ला विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे भवानराव खेडगीकर यांच्या घरात व्यंकटेशचा म्हणजेच स्वामीजींचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधारण पण त्यांना शिक्षणाची आवड होती. भवानराव खेडगीकर यांनी संन्यास स्वीकारला होता. पण त्यांच्या गुरूने आज्ञा केली की परत संसार कर. हा संदर्भ येवढ्यासाठीच की स्वामीजींनी लहानपणापासूनच संन्यासाचं आकर्षण होतं.

फोटो स्रोत, PIB
मला ही विरक्ती वडिलांकडूनच आली असं ते म्हणत. गावात एखादा संन्यासी आला की त्याच्याकडे ते पाहत असत. एकदा तर त्यांनी संन्याशालाच विचारलं की मला संन्यास द्या. त्या संन्याशाला नक्की हसू आले असणार. ज्या वयात खेळायचं बागडायचं त्या वयात या मुलाला संन्यास का घ्यावा वाटतो असं त्यांच्या मनात आलं असणार.
प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते सोलापूरला आले. एका हॉस्टेलमध्ये राहून वाढप्याचं काम करून त्यांनी आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन पेटलं होतं. लोकमान्य टिळकांचं त्यांना खूप आकर्षण वाटे. एकदा लोकमान्य टिळक सोलापुरात येणार होते. शिक्षकांनी बजावून ठेवलं की कुणीही त्यांना बघायला जायचं नाही. त्यांना बघायला गेलं की शिक्षा होईल.
शिक्षकांचा हा आदेश झुगारून ते टिळकांना पाहायला गेले. अर्थात त्यांना शिक्षा झाली पण त्याचा त्यांना पश्चाताप नाही झाली. पुढे गांधीजी सोलापुरात येणार होते. त्यांना पाहण्यासाठी स्वामीजी गेले. गांधीजींना पाहून ते भारावले. गांधीजी उभे होते. त्यांनी त्यांचे पाय धरले. गांधीजींनी आशीर्वाद दिला आणि देशासाठी काही करा असं ते म्हटले. ही घटना माझ्या हृदयावर कोरून ठेवल्या गेली आहे असं स्वामीजी म्हणतात.
पुढे अंमळनेरला पदवीच्या शिक्षणासाठी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. महाविद्यालयीन काळातच त्यांनी स्वामी विवेकानंदांबद्दल तसेच अध्यात्मिक नेत्यांबद्दल भरपूर वाचलं.
कामगार नेते ते 'बंडखोरां'च्या शाळेचे मुख्याध्यापक
समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचण्याचा निर्णय त्यांनी याच काळात घेतला. तशी संधी त्यांना मिळाली देखील. ना. म. जोशी हे कामगारांचे ख्यातनाम नेते होते. त्यांना एका खासगी सचिवाची आवश्यकता होती. पण त्यांनी पाहिजेत अशी जाहिरात न देता एक अट ठेवली होती. इच्छुक उमेदवाराने आपला प्रबंध पाठवावा. स्वामीजींचा प्रबंध त्यांना पसंत पडला. स्वामीजी त्यांच्याकडे गेले आणि कामगारांचे प्रश्न सोडवू लागले.

सर्वकाही सुरळीत असताना त्यांना पक्षाघात झाला. त्यामुळे त्यांचा एक पाय अधू झाला. जोशी यांच्यासोबत काम करायचं म्हणजे दगदग तर होणारच होती. पूर्ण राज्यभर ते दौरे करत असत. स्वामीजींनी ही गोष्ट बोलून दाखवली. ते म्हणाले तुम्ही एका जागी बसून काम करा. सोलापूर गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवा. त्याप्रमाणे ते सोलापूरला आले.
तुळजापूर तालुक्यात हिप्परगा येथे अनंतराव कुलकर्णी यांनी एक शाळा काढली होती. पुढे ही शाळा मुक्तिलढ्याचं एक केंद्र बनली. कुलकर्णी यांना स्वामीजीविषयी समजलं. ते स्वामीजीकडे गेले आणि त्यांना म्हणाले आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व्हा. मुलांवर संस्कार करण्यासाठी तुमची गरज आहे.
स्वामीजी त्यांच्यासोबत हिप्परग्याला गेले. कुलकर्णी स्वामीजींच्या नावाने दरमहा 50 रुपये बॅंकेत टाकत पण स्वामीजींनी त्या पैशांना कधीच हात लावला नाही. त्यांची विरक्त वृत्ती दिवसेंदिवस वाढत होती. शेवटी त्यांनी रीतसर संन्यास घेतला आणि व्यंकटेश खेडगीकरचे ते स्वामी रामानंद तीर्थ बनले.
निजामाच्या राज्यात ज्या राष्ट्रीय शाळा होत्या त्यांना निजाम सरकार बागी मदरसा म्हणजेच बंडखोरांच्या शाळा असे म्हणत. स्वामीजी तशाच शाळेचे मुख्याध्यापक होते.
स्वातंत्र्यलढ्यात उडी
काही वर्षानंतर त्यांनी हिप्परगा सोडलं आणि अंबाजोगाई येथे योगेश्वरी विद्यालयाची स्थापना केली. ही शाळा म्हणजे अक्षरशः सुरुवातीपासून त्यांना उभी करावी लागली.
विद्यार्थी आणण्यापासून ते परवानगी आणण्यापर्यंत सगळी कामे त्यांना करावी लागली. बाबासाहेब परांजपे यांची त्यांना या कार्यात साथ मिळाली. अंबाजोगाईच्या शाळेला परवानगी नव्हती ती मिळवण्यासाठी त्यांना हैदराबादला सतत जावं यावं लागलं.

परवानगीसाठी अनेक युक्तिवाद आणि मुत्सद्देगिरी त्यांना करावी लागली. निजामाला त्यांना परवानगी द्यायची नव्हती पण ते अडून बसल्यामुळे शेवटी त्यांना परवानगी देणं भाग पडलं.
इथं परवानगी मिळण्यापेक्षा एक मोठा फायदा झाला होता तो म्हणजे या निमित्ताने स्वामीजींच्या हैदराबादच्या मोठ्या नेत्यांच्या ओळखी झाल्या आणि स्वामीजींची कार्यपद्धती पाहून ते भारावून गेले ज्याचा उपयोग पुढे स्वातंत्र्य लढ्यासाठी झाला.
हे सर्व करत असताना त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचा विचार घोळत होता. पण त्यासाठी योग्य संधी सापडत नव्हती. 1937 साली परतूर येथे स्वातंत्र्याची आस असणाऱ्या लोकांचं संमेलन भरलं. या संमेलनाला महाराष्ट्र परिषद असं म्हटलं गेलं.
याच ठिकाणी पहिल्यांदा त्यांची ओळख गोविंदभाई श्रॉफ यांच्याशी झाली. दुसऱ्याच वर्षी लातूर येथे महाराष्ट्र परिषदेचं अधिवेशन झालं. त्यामध्ये ते सरचिटणीस झाले. स्वामीजींनी पूर्णवेळ राजकारणात येऊन संघटनेचं काम करावं अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली.
राजकारणात प्रवेश
देशात काँग्रेसची स्थापना होऊन वर्षं उलटली होती. पण हैदराबाद संस्थानमध्ये काँग्रेसला परवानगी नव्हती. स्टेट काँग्रेसच्या स्थापनेसाठी सत्याग्रह करावा अशी योजना आखण्यात आली. त्या योजनेनुसार कोण केव्हा सत्याग्रह करेल ते ठरलं.
पहिल्या तुकडीत सत्याग्रह करण्यासाठी गोविंदराव नानल यांची निवड करण्यात आली. 1938मध्ये त्यांनी त्यांच्या साथीदारांसह हैदराबादच्या सुलतान बाजारात एक सभा घेतली आणि त्यात घोषित केलं स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आहे आणि मी तिचा अध्यक्ष आहे. नानल यांना अटक करण्यात आली.
त्यानंतर तीन दिवसांनी स्वामीजींनी दुसऱ्या तुकडीमध्ये सत्याग्रह केला. त्यांना देखील अटक झाली. त्यांना चंचलगुडा तुरुंगात पाठवण्यात आलं. तिथं देखील त्यांनी इतर राजकीय कैद्यांना जमवून घोषणा देणं, वंदे मातरम् म्हणणं इत्यादी गोष्टी सुरू ठेवल्या. तुरुंगामध्ये वंदे मातरम् म्हणण्यास बंदी होती.
त्यांच्या बाजूच्या खोलीमध्ये एक कैदी होते. ते सतत वंदे मातरम् म्हणत त्यामुळे त्यांना फटक्यांची शिक्षा झाली. प्रत्येक फटक्याला ते पुन्हा वंदे मातरम् म्हणत. 14 फटक्यानंतर त्यांची शुद्ध गेली. त्या कैद्याविषयी आपल्या मनात नितांत आदर उत्पन्न झाल्याचं स्वामीजी त्यांच्या आठवणींच्या पुस्तकात म्हणतात. त्या कैद्याचं नाव रामचंद्र होतं. पुढे लोक त्यांना 'वंदे मातरम रामचंद्र' म्हणून ओळखू लागले.
गांधींजींकडून घेतला महत्त्वपूर्ण धडा
1939 मध्ये स्वामीजींना सोडण्यात आलं. ते गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्रामला गेले. गांधीजींना भेटल्यावर त्यांनी सांगितले अनेक राजकीय बंदीवान तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी उपोषणाची परवानगी मला द्यावी. गांधीजींनी ती परवानगी नाकारली. कारण उपोषण केव्हा करायचं याविषयी गांधीजींची काही तत्त्वं होती. त्या तत्त्वात ती गोष्ट बसत नसेल तर ते परवानगी नाकारत असत.

फोटो स्रोत, Getty Images
गांधीजींनी त्यांना विचारलं की 'तुम्ही अहिंसा हे तत्त्व जीवननिष्ठा म्हणून स्वीकारलं आहे का? कोणत्याही परिस्थितीमध्ये अहिंसा त्यागणार नाहीत इतकी या तत्त्वावर तुमची अढळ श्रद्धा आहे का? तुम्ही एकटे पडलात कुणीही तुमच्या मदतीला केव्हाही आलं नाही तरी तुम्ही याच तत्त्वावर कायम राहताल का?'
स्वामीजी सांगतात की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी रात्रीचा वेळ दिला होता. संन्यास घेताना देखील मनात इतकी उलथापालथ झाली नाही तितकी यावेळी झाली.
दुसऱ्या दिवशी ते गांधीजींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की 'मी अहिंसेला अद्याप राजकीय धोरण समजत होतो' पण आता मी या तत्त्वाचा जीवननिष्ठा म्हणून स्वीकार केला आहे. असं म्हणून ते गांधीजींच्या पाया पडलो.
अहिंसा ही जीवननिष्ठा असावी, सामाजिक किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ते एक आयुध असावे या मताचे गांधीजी नव्हते म्हणूनच त्यांनी स्वामीजींना ही समज दिली.
गांधीजींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आणखी काही दिवस माझ्याजवळ थांबा असं सांगितलं. या काळात गांधीजींचा सहवास लाभला. त्याच बरोबर त्यांची कार्यपद्धती समजली. आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली असं स्वामीजी नमूद करतात.
सेवाग्रामहून आल्यावर वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी निजाम सरकारला पत्र लिहिलं आणि सांगितलं की स्टेट काँग्रेसला परवानगी द्या. जबाबदार राज्यपद्धती हवी आहे असं देखील ते म्हणाले.
त्याचा परिणाम असा झाला की त्यांना पुन्हा उचलून तुरुंगात टाकण्यात आलं. पहिल्या वेळी स्वामीजी जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांच्या राजकीय हालचाली सुरूच होत्या. पण यावेळी मात्र त्यांनी जास्तीत जास्त वेळ आध्यात्मिक उन्नतीसाठी वापरला.
स्वामीजी बाहेर आले आणि पुन्हा गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्रामला गेले. गांधीजींनी त्यांना सांगितली की आता आपण एक देशव्यापी आंदोलन करणार आहोत. आणि हैदराबाद संस्थान देखील त्या आंदोलनाचा एक भाग असेल.
1942 ला चले जाव आंदोलन सुरू झालं. या आंदोलनामुळे जसा संपूर्ण देश ढवळून निघाला त्याचप्रमाणे हैदराबाद संस्थान देखील पेटून उठलं. अनेक मोठ्या नेत्यांची धरपकड सुरू झाली. स्वामीजींना पुन्हा अटक झाली आणि त्यांना 1943ला सोडण्यात आलं.
रझाकारांच्या अत्याचाराविरोधात संघर्ष
दरम्यान, निजामाच्या पाठिंब्याने तयार झालेल्या इत्तेहाद संघटनेची मूळं घट्ट रोवायला सुरुवात झाली. अनंत भालेरावांनी इत्तेहादचा उल्लेख जालीम विषवल्ली असा केला आहे.
रझाकारांचे अत्याचार वाढत गेले तसा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी गोविंदभाई आणि बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वात तरुणांचे गट तयार करण्यात आले. गोविंदभाईंचं व्यक्तिमत्व तर तरुणांना भुरळ घालणारं होतं.

त्यांच्या एका शब्दावर तरुण काहीही करायला तयार असत. हे तरुणाचे गट गावात गस्त घालत, संरक्षण देत, रझाकारांविरोधात लढत.
रझाकारांविरोधात पोलीस चकार शब्द काढत नसत. त्यांच्या डोळ्यादेखत हे अत्याचार चालत त्यामुळे लोकांना या तरुणांचाच आधार होता. हैदराबादच्या लढ्याचं स्वरूप पाहता महात्मा गांधींनी स्वातंत्र्यसैनिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली होती.

क्रांतिकारकांना शस्त्र पुरवणं त्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणं ही सर्व कामे बाबासाहेब परांजपे यांच्याकडे होते. बाबासाहेब परांजपे बॉम्ब बनवत असत. बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देखील त्यांनी इतर तरुणांना दिलं होतं.
सर्व आघाड्यांवर लोक निजामाविरोधात उठले होते. गावातल्या पाटील-कुलकर्ण्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. लोक निषेध म्हणून निजाम सरकारनं लावलेली शिंदीची झाडं तोडू लागली. ही शिंदीची झाडं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जाच असत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर ही झाडं लावली जात. त्याची देखभाल शेतकऱ्यांना करावी लागत असे आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे सरकारचं असे. अशी 22,000 झाडं या काळात तोडण्यात आली.
एक मोठे कार्यकर्ते होते त्यांचं नाव गोविंद पानसरे. त्यांची रझाकारांनी हत्या केली. त्या हत्येचा बदला स्वातंत्र्यसैनिकांनी घेतला.
उमरी येथे स्वातंत्र्यसैनिकांनी बॅंक लुटली. त्या लुटीचे पैसे काँग्रेसकडे जमा करण्यात आले. असं हे स्वातंत्र्य आंदोलन संस्थानात वणव्यासारखं पेटलं होतं. या दरोड्यात अनंत भालेराव यांनी देखील सहभाग घेतला होता. पुढे अनंत भालेराव हे दै. मराठवाडाचे संपादक झाले. स्वातंत्र्यापूर्वी बंदूक घेऊन आणि स्वातंत्र्यानंतर लेखणी घेऊन त्यांनी देशसेवा केली.
निजामाच्या डावपेचांना संघटना बांधणीतून प्रत्युत्तर
1943ला स्वामीजी बाहेर आले तरी काँग्रेसवरील बंदी काही उठली नव्हती. पण संघटना नाही म्हणून स्वामीजी चूप बसणाऱ्यांपैकी नव्हते. मराठवाडा, तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमध्ये त्यांनी प्रांतिक परिषदांच्या माध्यमातून संघटना बांधण्याचं काम केलं होतं.
स्वामीजींना मराठी, तेलुगू, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी या पाच भाषा येत. त्यामुळे त्या-त्या प्रांतातील व्यक्तीला ते आपल्या पैकीच वाटत. उर्दू आणि इंग्रजीवर प्रभुत्व असण्याचा त्यांना फायदा वाटाघाटी वेळी झाला. अतिशय नम्रपणे, मुद्देसुदपणे ते आपली भूमिका ठामपणे मांडू शकत.

ज्या निजामाविरोधात ते राजकारण करत होते तो देखील काही साधा-सुधा नव्हता. आपली सत्ता टिकवण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला तो जाऊ शकत होता. रझाकारांनी केलेल्या कृत्यांसाठी कासिम रिझवी जबाबदार होता. त्याचा त्यावेळी खूप मोठा दबदबा होता. पण स्वामीजी त्यांच्या आठवणींच्या पुस्तकात म्हणतात की 'कासिम रिझवी हा सामान्य क्षमतेचा माणूस होता. त्याला निजामाचं पाठबळ होतं. स्वतःचं राज्य टिकवण्यासाठी निजामानं त्याचा वापर केला.'
निजाम उस्मान अली इतका धूर्त होता की इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे त्याने मंत्रिमंडळ तर निर्माण केलं होतं पण कुणालाच कोणत्या विभागाची पूर्ण माहिती होऊ नये म्हणून तो सतत त्यांचे विभाग बदलत असे. स्वतःच्याच पंतप्रधानांविरोधात कट कारस्थान करत असे.
निजामाला आधी सार्वभौम राज्य हवं होतं ते जमलं नाही तर पाकिस्तानमध्ये त्याला जायचं होतं आणि ते जमलं नाही म्हणून तो भारत सरकारसमोर झुकला. पण शेवटपर्यंत त्याचा सत्तेचा मोह सुटला नाही.
कुणावरच विश्वास ठेवायचा नाही आणि सतत असुरक्षित राहणं यामुळे तो एकाकी होता. असुरक्षिततेच्याच भावनेतून त्याने स्टेट काँग्रेसची बंदी उठवली नव्हती. पण स्वामीजी आणि सहकाऱ्यांच्या मुत्सद्देगिरीसमोर त्याला हात टेकवावे लागले आणि जुलै 1946 म्हणजेच आठ वर्षानंतर बंदी उठली.
स्वामीजींनी प्रांतिक परिषदांच्या माध्यमातून संघटना मजबूत केलीच होती. त्या परिषदांना काँग्रेसमध्ये सामील करून घेण्यात आलं. अर्थात हे तितकं सहज नव्हतं कारण तेलंगणात कम्युनिस्टांची चळवळ सुरू झाली होती आणि प्रांतिक परिषदांमध्ये त्यांचेही प्रतिनिधी होतेच. त्याच बरोबर मवाळ गटाचेही प्रतिनिधी होतेच. जबाबदार राज्यपद्धती आणि भारतात सामिलीकरण या दोन मागण्या काँग्रेसच्या माध्यमातून लावून धरल्या जात.
स्वातंत्र्यदिनी तुरुंगवास
जसं जसं भारताचं स्वातंत्र्य जवळ येऊ लागलं तसं निजामाचे डावपेच आणखी तीव्र झाले. देशातले बहुतेक संस्थानिक भारतात सामील झाले होते. या संस्थानिकांचं एक मंडळ होतं. त्या मंडळाला नरेंद्र मंडळ म्हणत.
निजाम स्वतःला त्यांच्यापैकी एक मानत नसे. आपण भारत सरकार किंवा ब्रिटन प्रमाणे सार्वभौम राहू अशी त्याची कल्पना होती. माउंटबॅटनने सांगितलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत किंवा पाकिस्तानमध्ये संस्थानिक राहू शकतील पण त्यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा. निजामाच्या डोक्यात मात्र सार्वभौम राज्याचं स्वप्न होतं. आपलं ईप्सित साध्य व्हावं म्हणून त्याची वाट पाहण्याची देखील तयारी होती.
इकडे भारत स्वतंत्र होणार म्हणून निजामाची चलबिचल होऊ लागली होती आणि भारताचं स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची तयारी स्वामीजींची जय्यत तयारी सुरू होती.
7 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी हैदराबादमध्ये भारतीय एकता दिवस साजरा केला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. पंडित नेहरूंनी दिलेला ध्वज स्वामीजींनी फडकावला. त्यावेळी त्यांनी भाषण दिले. या ध्वजाची शान राखता राखता मरण आलं तर त्याहून मंगलदायी आणखी काय असणार. भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे आता हैदराबाद संस्थानाचं स्वातंत्र्य जवळ आलं आहे असंच त्यांनी सूचित केलं.
निजामाने त्यांना त्याच दिवशी तुरुंगात टाकलं. बाहेरची परिस्थिती कशी आहे याच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत असत. काही दिवस तुरुंगात काढल्यावर त्यांच्या कानावर गोष्ट आली की ती म्हणजे भारत सरकारने निजामासोबत जैसे थे करार केला आहे. या करारानंतर स्वामीजींची दुसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली.
स्वामीजींनी या कराराचा निषेध केला. मुळात असा करार भारत सरकारला करायची गरजच काय असा प्रश्न त्यांनी विचारला. या करारानंतर निजामाने नावापुरते 20 सत्याग्रही सोडले आहेत पण अद्याप तुरुंगात असलेल्या 20,000 सत्याग्रहींचं काय असा प्रश्न त्यांनी विचारला.
तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी राज्याच्या सीमावर्ती भागात दौरे केले. याच काळात ते मद्रासला जाऊन आले, गांधीजींना भेटून आले, सरदार वल्लभ पटेलांना भेटून आले. गांधीजींशी त्यांची ही भेट शेवटची ठरली. ते 26 जानेवारी 1948 ला संस्थानात आले. त्यांना आल्या आल्या अटक करण्यात आली. त्यांना गुलबर्गा तुरुंगात टाकण्यात आलं. अटकेच्या चार दिवसानंतर गांधीजींची हत्या झाली हे वृत्त त्यांच्या कानी पडलं.
पोलीस अॅक्शननंतर निजाम वठणीवर आला
ते तुरुंगात असताना त्यांच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष दिगंबरराव बिंदू हे वाटाघाटी करत असत. स्वामीजींनी तयार केलेली फौज आता आक्रमक बनली होती. तुरुंगात आणि बाहेर असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्थिती करेंगे या मरेंगे अशीच होती. रझाकाराच्या अत्याचारांना सीमा उरली नव्हती.
शेवटी, भारत सरकारनं पोलीस अॅक्शन घेण्याचं ठरवलं. 13 सप्टेंबर रोजी भारतीय सैन्य संस्थानात आलं आणि 17 सप्टेंबर रोजी निजामाच्या सैन्यानं, रझाकारांनी त्यांच्यासमोर नांगी टाकली.
ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी बीबीसी मराठीसाठी लिहिलेल्या लेखात पोलीस कारवाईचे वर्णन केले आहे.
कारवाईचा मुहूर्त ठरला 13 सप्टेंबर 1948 म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी! साधारण 10 दिवसात कारवाई संपेल असा भारतीय लष्कराचा अंदाज होता. प्रत्यक्षात साडे तीन दिवसातच हैदराबाद संस्थानातील सर्व महत्वाच्या केंद्रांवर भारतीय लष्करानं ताबा मिळवला.

फोटो स्रोत, Getty Images
मेजर जनरल जे. एन. चौधरी, ले.जनरल इ. एम. गोदार्द यांनी या कारवाईची आखणी केली होती. 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच्या या कारवाईचे नाव 'ऑपरेशन पोलो' असं ठरलं होतं, पण पुढे ही कारवाई 'पोलीस अॅक्शन' म्हणून ओळखली गेली.
या कारवाईसाठी भारतीय लष्करचे साधारण 36,000 जवान होते. आर्म्ड ब्रिगेड, स्मॅश फोर्स, स्ट्राइक फोर्स, मोर्टर बटालियन, गुरखा रायफल्स, पंजाब रेजिमेंट्स तर होतेच शिवाय हवाई हल्ल्यासाठी HawkarTemptest Bombers ही होते.
या कारवाई दरम्यान संस्थानातल्या जनतेनं लष्कराला सहकार्य केलं. 13 सप्टेंबरला सोलापूर मार्गातून मेजर जनरल चौधरी प्रथम घुसले. सर्वप्रथम नळदुर्ग किल्ल्यासाठी कारवाई घडली. किल्ला ताब्यात आला. तेथून चौधरी जळकोट-तुळजापूर-लोहारा, होस्पेट-तुंगभद्रापर्यंत पोहोचले.
मेजर जनरल ए. ए. रुद्रा विजयवाड्यातून थेट ठाणी काबीज करत निघाले. 14 सप्टेंबरला मेजर जनरल डी. एस. ब्रार औरंगाबादेतून जालना -परभणी-लातूर-जहिराबाद करत पुढे गेले. तिकडे एका तुकडीनं बीदर ताब्यात घेऊन 16 सप्टेंबरला थेट हैदराबाद गाठलं.
ठिकठिकाणी लोक सैन्याचं स्वागत करत होते. इकडे स्वामीजींनी स्थापन केलेली कृती समिती आदिलाबाद, धर्माबाद, विजापूर, नांदेड तसंच विदर्भाच्या आणि नगर-औरंगाबाद सीमेलगतची अनेक गावे 'स्वतंत्र' झाल्याचं जाहीर करत सुटली.
भारतीय लष्करासमोर निजाम आणि कासिम रिझवी टिकले नाहीत. 17 सप्टेंबर 1948 ला निजामानं शरणागती पत्करली. कासिम रिझवी याला अटक झाली. लायक अलि मंत्रिमंडळाचे प्रमुख होते ते पळूनच गेले. 4 दिवस 13 तास चाललेल्या या कारवाईत भारतीय लष्कराचे 32 जवान शहीद झाले तर 97 जखमी झाले.
17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान मुक्त झालं. त्यानंतर स्वामीजींना सोडण्यात आलं.
स्वातंत्र्य मिळालं पुढे काय?
तुरुंगातून सुटल्यानंतर स्वामीजींसमोर अनेक प्रश्न होते. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचा म्हणजे राज्याची घडी नीट बसवणं, हिंदू-मुस्लीम दंगे उसळू न देणं, संस्थानातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे ही ध्येयं त्यांच्यासमोर होती. त्यासाठी ते प्रयत्नरत राहिले.
स्वातंत्र्यानंतर धार्मिक दंगली उसळू नये म्हणून स्वामीजींनी दंगली उसळू नये याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली होती. ते आपल्या पुस्तकात म्हणतात "परिस्थितीवश इथल्या मुस्लीम बांधवांना आमच्याबरोबर निजामाविरोधात लढता आलं नसेल पण संस्थानातले बहुसंख्य मुस्लीम हे आमच्या विचारसरणीला अनुकूल होते." स्वामीजींच्या या विचारांचा प्रभाव बहुसंख्य नेत्यांवर असल्यामुळे संस्थानात हिंदू-मुस्लीम सलोखा निर्माण झाला.
पोलीस अॅक्शननंतर कासीम रिझवीला अटक करण्यात आली. काही महिने तुरुंगात राहून तो पाकिस्तानला गेला. निजामाने असं दाखवलं की जे काही अत्याचार झाले ते कासीम रिझवीच्या रझाकारांनी केले आपलं त्यावर काही नियंत्रण नाही. निजामानं शरणागती पत्करली पण त्याला शिक्षा झाली नाही तर त्याला तनखा देण्यात आली.
राजकीय निवृत्ती
मवाळ गटाने पुन्हा आपले डोके वर काढून राजकारण करायला सुरुवात केली. एकही दिवस तुरुंगवास न भोगलेले नेते पुढे मंत्री झाले. याच लोकांनी स्वामीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कट कारस्थानांनी अनेकांची मनं विटली आणि त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.
स्वतंत्र भारतात स्वामीजींनी दोनदा निवडणूक लढवली. एकदा ते गुलबर्गा आणि एकदा औरंगाबाद येथून लोकसभेवर निवडून गेले. दुसरी टर्म पूर्ण झाल्यावर ते पंडित नेहरूंपाशी गेले आणि राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा जाहीर केली. नेहरूंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि भूदान चळवळ
राज्यांची भाषावार पुनर्रचना व्हावी असं स्वामीजींना वाटे. हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा या महाराष्ट्रात यावा म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले.
स्वामीजी सरंजामशाहीच्या विरोधी होते. पण सरंजामाविरोधात सशस्त्र उठाव नको असे त्यांना वाटे. तेलंगणा आणि आंध्रमधील शेतकऱ्यांनी शस्त्रे खाली टाकावी म्हणून त्यांनी या भागाचे दौरे केले. पुढे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीत ते सहभागी झाले.
वय वाढू लागलं होतं प्रवासाचा ताण असह्य होऊ लागला त्यामुळे त्यांनी स्वतःला शैक्षणिक कार्याला वाहून घेतलं. 1971 मध्ये ते आजारी पडले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालीच नाही. त्यांना अंबाजोगाई येथून हलवण्यात आलं आणि हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 22 जानेवारी 1972 ला त्यांचं निधन झालं.
नेत्यांचे नेते
स्वामीजींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात तसेच नंतरही अनेक नेते घडवले. गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, आ. कृ. वाघमारे (दै. मराठवाडाचे संस्थापक), अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू यादी बरीच मोठी आहे.
भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे देखील त्यांचेच शिष्य आहेत. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या विनंतीवरूनच अनंत भालेराव यांनी स्वामीजींचे चरित्र लिहिले होते.
नरहर कुरुंदकरांना देखील त्यांनीच पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं होतं.
स्वामीजी हे उत्तम नेते होते यात शंकाच नाही पण त्याच बरोबर त्यांनी नवं नेतृत्व समोर यावं म्हणून देखील काम केलं आहे. त्यांना घडवलेल्या लोकांची नावं जरी पाहिली तरी आपल्याला त्यांचं मोठेपण कळू शकतं.
त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे मराठवाडा स्वतंत्र तर झालाच त्याचबरोबर मराठवाड्याच्या विकासाचा ध्यास घेणारी पिढी देखील स्वामीजींनी बनवली.
(मेमोयर्स ऑफ हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल - स्वामी रामानंद तीर्थ, स्वामी रामानंदांचे चरित्र- अनंत भालेराव, हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा - अनंत भालेराव, कर्मयोगी संन्यासी - न्या. नरेंद्र चपळगावर)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








