नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 9 वर्षं पूर्ण, खटला सुरु व्हायला 8 वर्षं का लागली?

डॉ. नरेंद्र दाभोळकर

फोटो स्रोत, facebook

बरोबर नऊ वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना पुण्यात घडली. 20 ऑगस्ट 2013 या दिवसाची सुरुवातच अत्यंत धक्कादायक घटनेनं झाली होती.

पुण्यातल्या मध्यवस्तीतल्या, बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्याच बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

यानंतर डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा तपास होऊन खटला सुरु व्हायला 2021 साल उजाडावं लागलं.

सप्टेंबर 2021 मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने 5 आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि हा खटला सुरु झाला. सध्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेणं सुरु आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल कधी लागेल हे सांगणं अवघड आहे.

पण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भातले काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. यातला सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की डॉ. दाभोलकर आणि त्यांच्यानंतर झालेल्या गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचे मुख्य सुत्रधार कोण आहेत आणि त्यांच्यापर्यंत तपास यंत्रणा कधी पोहोचणार?

सुरुवातीच्या काही वर्षांत तर फक्त तपास वेगवेगळ्या दिशेनं भरकटतानाच दिसून आला. कधी तपासाचा छडा लागल्याचा दावा केला गेला, तर कधी आढळलेल्या धाग्यादोऱ्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं लक्षात आलं.

पुणे पोलिस आधी तपास करत होते. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशावरून जून 2014 मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हातात आला.

त्यांनतर 15 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित झाले. या पाच जणांमध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचा समावेश आहे.

तावडे, अंदुरे, काळस्कर आणि भावे यांच्यावर न्यायालयाने भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), 34 नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले.

पुनाळेकरांविरोधात आयपीसी कलम 201 (पुरावे नष्ट करणे किंवा खोट्या सूचना देणे) अंतर्गत आरोप निश्चित केला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर

फोटो स्रोत, Getty Images

"2015 साली पानसरेसरांवर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर कलबुर्गी आणि 2017 साली गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. गौरी लंकेश यांच्या केसमध्ये परशुराम वाघमारे नावाच्या शूटरला अटक झाली. त्याच्याकडून जी माहीती मिळाली त्यावरुन 2018 साली नालासोपाऱ्यात वैभव राऊत याच्याकडे शस्त्रसाठा सापडला.

त्याचा तपास करताना शरद कळस्करपर्यंत महाराष्ट्र एटीएस पोहोचले. हे चार खून आणि नालासोपाऱ्याची केस या पाच प्रकरणांत काही लोक समान आहेत. चार्जशीटमध्ये उल्लेख केलेला आहे की डॉ. दाभोलकरांची हत्या ही एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे. डॉ. तावडे 2016 सालीच पकडले गेले आहेत. त्यानंतरही खून झाले आणि नालासोपाऱ्यात शस्त्र सापडली.

त्यामुळे निश्चितच यांपेक्षा वेगळे सुत्रधार यात आहेत. सुत्रधार पकडले जाणं महत्त्वाचं आहे," असं डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितिच्या राज्य कार्यकारी समिती सदस्य अॅड मुक्ता दाभोलकर यांनी सांगितलं.

डॉ. दाभोलकरांची हत्या आणि त्यांनतर झालेल्या 3 खुनांचा तपास करण्यासाठी अनेक तपास यंत्रणा कार्यरत आहेत. पण मुक्ता दाभोलकर यांनी वर उपस्थित केलेल्या मुद्द्याचं उत्तर अजूनही पुढे आलेलं नाही.

"2016 मध्ये डॉ. तावडेला दाभोळकरांच्या हत्येच्या केसमध्ये पकडलं. त्यानंतर दोन खून झाले आहेत. त्यानंतर अमोल काळेला पिंपरी चिंचवडमधून सुत्रधार म्हणून कर्नाटक पोलिसांनी पकडलं. यात कर्नाटक एसआयटी, कर्नाटक सीआयडी, महाराष्ट्र पोलीस, एटीएस आणि सीबीआय एवढ्या यंत्रणा हा सगळा तपास करत होत्या. एवढं होऊनही यामागचा सुत्रधार सापडलेला नाही. सुत्रधार म्हणून अमोल काळे आणि तावडे पर्यंतच मर्यादित आहे. हा एवढा मोठा कट आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर

आम्ही असं मानतो की, या विचारांनी काम करणारे ऑपरेटिव्ह पकडले गेले. या एका टप्प्यावर तरी या हत्यांचा तपास आला. सुत्रधार पकडले जाणं गरजेचं आहे," असं पुढे मुक्ता दाभोळकर यांनी सांगितलं.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भातला खटला आता सुरु आहे. यामध्ये मार्च 2022 मध्ये एक महत्त्वाची घडामोड झाली. दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप असणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना गोळ्या झाडणारे आरोपी म्हणून प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं.

महापालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाऱ्याची साक्ष नोंदवण्यात आली. तपास पूर्ण होऊन आरोपांची निश्चिती व्हायलाच 8 वर्षं लागल्याने आता खटल्याची न्यायालयीन प्रक्रिया जलद पूर्ण होऊन योग्य निर्णय देण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.

"या प्रकरणात सध्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्याचं काम सुरु आहे. आतापर्यंत 8 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. अजून कमीतकमी 12-15 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या जातील. लवकरात लवकर प्रक्रिया संपवण्याचा प्रयत्न आहे," असं सरकारी वकिल प्रकाश सूर्यवंशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.

2013 साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर, 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉम्रेड गोविद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

कॉ. गोविंद पानसरे हत्येचा तपास महाराष्ट्र CID च्या विशेष तपास पथकाकडून (SIT) काढून, ATS ला देण्यात यावा, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. ती आता मान्य करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणातल्या काही तपास अधिकाऱ्यांची आता एटीएसमध्ये बदली करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.

पानसरेंच्या हत्येनंतर काही महिन्यांनी 30 ऑगस्ट 2015 रोजी विचारवंत आणि साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांचीही धारवाड मध्ये गोळ्या झाडून हत्या झाली. त्यानंतर 5 सप्टेंबर 2017 रोजी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)