राज ठाकरेंना शिवसेनेच्या पडझडीत हुकलेली संधी मिळाली आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि त्यावर त्यांचं नाव न घेता धारदार प्रतिक्रिया जर कोणाची आली असेल तर ती राज ठाकरेंची होती. एका वाक्याचं ट्वीट होतं. पण हातचं काही राखून न ठेवणारं होतं. त्यातली तीव्र भावना कोणालाही जाणवणारी होती.
राज यांनी लिहिलं: "एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशीबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवशी त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो."
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे द्वंद्व गेल्या दोन दशकांतल्या महाराष्ट्रातल्या राजकारणातलं सर्वांत तीव्रतेनं लढलं आणि चर्चिलं गेलेलं द्वंद्व आहे. दोन भावांमधल्या या चढाओढीत निवडणुकांच्या निकालांवरुन ठरवायचं असेल तर सरशी उद्धव यांची झाली आहे.
पण आता उद्धव यांच्यासह शिवसेनेचं राजकीय अस्तित्व पणाला लागलेलं असतांना गेल्या 15 वर्षांत स्वत:ला आणि त्यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला सिद्ध करण्याची हुलकावणी देत आलेली संधी आता राज यांना मिळाली आहे का?
"जो विचार माझ्या आजोबांचा, बाळासाहेबांचा, त्या विचारांचा वारसा मी चालवतोय," असं राज ठाकरे नुकत्याच 'झी 24 तास' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 'पुत्रप्रेमामुळं सेना बुडाली' असंही ते म्हणाले.
2006 मध्ये झालेलं राज ठाकरेंचं बंड हे शिवसेनेवरच्या दाव्यावरुन होतं. त्यावेळेपासून आजपर्यंत एक प्रश्न राज्याच्या राजकारणात आजही जिवंत आहे, तो म्हणजे बाळासाहेबांच्या राजकारणाचा वारसदार कोण, राज की उद्धव? सध्याच्या दुफळी झालेल्या शिवसेनेमुळे ही वासरदारी सिद्ध करण्याची संधी राज यांना पुन्हा मिळाली आहे का?
एकनाथ शिंदेंच्या बंडादरम्यान शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात असलेल्या राज ठाकरेंनी आणि मनसेनं राज घरी परतल्यावर शिवसेनेवरची टीका दिवसागणिक वाढवत नेली आहे. मुलाखतीत 'उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही' असं म्हणून राज यांनी अगदी टोकाची टीकाही केली.
एकंदरीतच राज यांनी घेतलेली भूमिका, देवेंद्र फडणवीस, विनय सहस्त्रबुद्धे या भाजपा नेत्यांच्या घेतलेल्या भेटी, गरज पडली तर एकनाथ शिंदेंच्या गटाला 'मनसे'मध्ये सामावू घेण्याची नाकारली नसलेली शक्यता यावरुन हेच दिसतं आहे की उद्धव यांच्या शिवसेनेला खिंडीत गाठण्याची चालून आलेली संधी राज सोडू इच्छित नाही आहेत.
मराठीचा मुद्दा ते 'हिंदुजननायक'
'मनसे'ची स्थापना झाल्यापासून भूमिपुत्रांचा मुद्दा राज यांनी आक्रमकतेनं हाती घेतला. वास्तविक तोच सेनेच्या स्थापनेपासूनचा मुद्दा होता. पण राज यांची वाटचाल जणू सेनेच्या वाटेवरुनच पुढे झाली. तेव्हा असं म्हटलं गेलं की शिवसेनेच्या मतांमधलाच हिस्सा राज यांची 'मनसे' हिसकावून घेईल. तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते. त्यामुळे राज यांच्या प्रभावाबद्दल काहींनी शंकाही उपस्थित केली. पण मनसेच्या सुरुवातीच्या टप्प्यात तसं झालं नाही.
राज यांचं प्रभावी वक्तृत्व आणि मनसेची रस्त्यावरच्या आंदोलनांची आक्रमक स्टाईल यामुळे त्यांच्या बाजूनं वातावरण तयार झालं. 'भाषणं मतांमध्ये रुपांतरित होत नाहीत' असं म्हटलं जात असतांनाही 2009 च्या निवडणुकांमध्ये, स्थापनेनंतर अवघ्या तीन वर्षांत मनसेनं कमाल केली. 13 आमदार निवडून आले. अनेक जण खासदार होता होता राहिले.
मुंबई, पुणे, नाशिक महापालिकांमध्ये मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून आले. मनसेमुळे असंख्य ठिकाणी सेना-भाजपाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
कोणत्याही पक्षाला स्थापनेच्या पहिल्याच टप्प्यात मिळालेलं हे यश लक्षणीय होतं. पण पुढे काहीच काळात हा मिळालेला जनाधार मात्र मनसेला टिकवता आला नाही. निवडणुकांमधल्या पराभवांचं सत्र सुरु झालं. भूमिकांमध्ये सातत्य राहात नाही अशी टीका राज यांच्यावर होऊ लागली. त्यांचेही अनेक जवळचे साथीदार निघून गेले.

फोटो स्रोत, @mnsadhikrut
या सगळ्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली राजकीय स्पर्धा तीव्र होत गेली, प्रसंगी कटु झाली. 'राज-उद्धव एकत्र येणार का' हे राजकीय स्वप्न अधून मधून कोणीतरी रंगवत राहिलं, पण प्रत्यक्षात अंतरं वाढत गेली.
अर्थात, जेव्हा उद्धव यांच्या शस्त्रक्रियेवेळेस जेव्हा राज त्यांना स्वत: गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये गेले, किंवा बाळासाहेबांचं निधन झालं तेव्हा जसे एकत्र आले तेव्हा पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा झाल्याच.
खरंतर 2014, 2017 अशा निवडणुकांमध्ये राजकीय युतीची बोलणीही झाली. पण प्रत्यक्षात काहीही आलं नाही. जेव्हा त्याबाबतच प्रश्न नुकत्याच झालेल्या मुलाखतीत विचारला गेला तेव्हाच राज 'उद्धव हे विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती नाही' असं म्हणाले. त्यावरुन पडद्यामागे काय झालं असावं याचा अंदाज येतो.
एकीकडे सेना भाजपासोबत सत्तेत असतांना राज ठाकरे एकटे निवडणुकांमधल्या यशासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करत होते. अगोदर नरेंद्र मोदींचं कौतुक करणा-या राज यांनी 2014 मध्ये मोदींचं सरकार आल्यावर काही काळानं टीकात्मक भूमिका घेतली.
2019 च्या लोकसभा निवडणुका त्यांनी लढवल्या नाहीत पण नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सभा मात्र घेतल्या. तेव्हा राज 'यूपीए' मध्ये जातील अशा चर्चा सुरु झाल्या. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी कॉंग्रेससोबत उद्धव यांना एकत्र आणले आणि 'महाविकास आघाडी' बनली. राज या सगळ्यातनं लांब गेले.
पण उद्धव हे भाजपासोबत लांब गेल्यानं तयार झालेल्या भाजपाच्या मित्रपक्षाची जागा घेण्यासाठी राज सरसावले. त्यानंतर राज यांनी उघडपणे आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली. पक्षाचा झेंडा बदलला. भोंगा आणि हनुमानचालिसा यांच्यावरुन या मुद्द्यांवरुन आंदोलनं सुरू केली. रोख एकच होता, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, उद्धव यांनी हिंदुत्व सोडलं. ती जागा राज घेत होते. त्यांना 'हिंदूजननायक' असं त्यांचे कार्यकर्ते म्हणायला लागले.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
एकंदरीतच उद्धव यांच्यासोबत सेनेत असल्यापासून राजकीय वर्चस्वाची स्पर्धा, सेनेतून बाहेर पडल्यावर निवडणुकांच्या मैदानातली स्पर्धा, बाळासाहेबांची वारसदारी आणि हिंदुत्व यांच्यावरचा हक्क अणि आता भाजपाचं मैत्र या सगळ्या आघाड्यांवर उद्धव यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी राज यांना सद्य राजकीय परिस्थितीनं दिली आहे. ती संधी ते घेत आहेत असं चित्र आहे.
भाजपाशी जवळीक, पण भाजपा राज यांना किती मोठं होऊ देईल?
शिवसेनेच्या पडझडीत तयार झालेली संधी राज कधी घेत आहेत याचा अंदाज भाजपा आणि मनसेच्या गोटात सुरू असलेल्या हालचालींवरुनही येते. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर फडणवीसांना पाऊल माघारी का घ्यावं लागलं अशी चर्चा सर्वत्र सुरू असतांना राज यांनी त्यांना एक जाहीर अभिनंदनपर पत्र लिहिलं आणि ही माघार नसून 'बाण अधिक पुढे जाण्यासाठी प्रत्यंचा अधिक मागे ओढावीच लागते' असं राज यांनी म्हटलं.
मग देवेंद्र फडणवीस हे स्वत: राज यांना भेटायला 'शिवतीर्थ'वर गेले. ही औपचारिक, प्रकृती स्वास्थ्य विचारण्याची भेट आहे असं म्हटलं गेलं. पण राजकीय टायमिंग अचूक होतं.
देवेंद्र दुसऱ्यांदा राज यांच्या नव्या घरी गेले होते. त्यानंतर लगेचच भाजपाचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे राज यांना भेटायला गेले. गेल्या दोन वर्षांपासूनच भाजपा आणि राज ठाकरे यांच्या एकत्र युतीची चर्चा होते आहे. भेटी अनेकदा झाल्या आहेत. पण आता उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळल्यावर गांभीर्य अधिक वाढलं आहे.

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis
त्यातच बंडानंतर एकनाथ शिंदे आणि राज यांचं फोनवर बोलणं झाल्याचंही पुढे आलं. जेव्हा शिंदेंचं सरकार स्थापन झाल्यावर सगळे आमदार परत आले तेव्हा दादर-माहिमचे शिंदेगटात गेलेले आमदार सदा सरवणकर हे राज यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यावरुन दादरची स्थानिक गणितंही बदलत आहेत अशी चिन्हं आहेत.
उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांच्यावर राजकीय कुरघोडी करतांना जसं एकनाथ शिंदेंची पक्षांतर्गत ताकद जशी भाजपाच्या कामी आली तशी राज ठाकरे यांचा करिष्मा, त्यांच्या संघटनेचं ताकद, हिंदुत्वाची भूमिका आणि उद्धव यांच्या विरुद्ध असलेली भूमिका हेसुद्धा राजकीय आघाडीत भाजपा वापरु शकते. तसे प्रयत्न गेले काही काळ दिसत आहेत.
पण प्रश्न हाही आहे की शिवसेना-भाजपा युतीमध्ये जेवढी सेना मोठी होती, तेवढी राज यांची सेना असेल का? राज यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली, पण नरेंद्र मोदी यांचाच चेहरा देशभरात प्रमुख असणारा भाजपाच्या मैत्रीत 'हिंदुजननायक' भूमिका घेतल्या राज ठाकरेंचं महत्व किती असेल?
शिवाय 50 आमदारांसह आलेले एकनाथ शिंदे हे भाजपासाठी सध्या सगळ्यात जवळचे आहेत. जर राज यांच्यासोबत युती झाली तर तिघांचं एकत्र समीकरण कसं असणार? शिवसेनेतून बाहेर पडल्यावर आजवर स्वतंत्र रस्ता पत्करलेल्या राज यांच्यापुढे उद्धव यांच्या शिवसेनेविरुद्ध एकत्र झालेल्या या अनेकांमधलं एक झाल्यावर स्वत:च्या पक्षाचं वेगळं अस्तित्व टिकवणं हाही प्रश्न असेल.
'संधीपेक्षा ही गरज आहे'
ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभय देशपांडे यांच्या मते ही मनसेसाठी राजकीय संधी असण्यापेक्षा त्यांच्यासाठी गरजही आहे.
"एक मला असं वाटतं की एकनाथ शिंदेंमुळे त्यांचा तोटाच झाला. कारण बंडाअगोदर भाजपात मनसेला जे महत्व होतं ते आता आहे का? शिंदेंचा एक मोठा गट आमदार-खासदारांसहित आला आहे. सहाजिक आहे की त्यांचं महत्त्व अधिक असणार. म्हणूनच राज ठाकरे त्या मुलाखतीत 'या गटाला गरज पडल्यास आपल्या पक्षात घेण्याचा विचार करु' अशा आशयाचं विधान केलं," देशपांडे म्हणतात.
पण राज यांच्याकडून शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न होतील असंही देशपांडे यांना वाटतं. "जे शिवसैनिक या बंडानंतर संभ्रमित झाले आहेत, ज्यांना कोणत्या गटाकडे जावं हे समजत नाही आहे, त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न होती.
"जमिनीवरची शिवसेनेची जी ताकद आहे तीही मोठी आहे. त्यांना राज हा पर्याय वाटू शकतो. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दलही विधानं केली. थेट बोलले. दोघे एकत्र येणार वगैरे ज्या काही बातम्या सुरू झाल्या होत्या त्या थांबवणं आवश्यक होत्या. म्हणून ते टीका करणारं बोलले, असं मला वाटतं," देशपांडे म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








