मुंबई: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला सावरकरांचा नाव देण्याचा निर्णय

शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

मुंबई विद्यापीठात आज पार पडलेल्या मॅनेजमेंट काऊंसिलमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला विनायक दामोदर सावकर यांचं नाव देण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला.

"वीर सावरकर यांच्या नावालाही कुलुगुरू कुठेतरी स्थान देतील. जगभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास आणि त्यांचं कार्य कळू शकेल. यामुळे भारताप्रती त्यांच्या मनात आदर वाढेल," मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांचं नाव देण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात केली होती.

राज्यपालांच्या या सुचनेनंतर या वसतिगृहाच्या नामकरणावरून नवीन वादाला सुरुवात झालीय. कारण विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. वसतिगृहाला सावरकरांचं नव्हे तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात यावं अशी विद्यार्थी संघटनांची मागणी होती.

सावरकर यांचे शैक्षणिक योगदान काय? त्यावेळेसच्या पुरोहितांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले आताही वसतिगृहाला शाहूंचं नाव नाकारलं. आजही यांना शाहूंच्या नावाचं वावडं आहे. अशा संतप्त भावना व्यक्त करत छात्र भारतीने मुंबई विद्यापीठाचा निषेध केला आहे.

आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेटने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव द्यावे हा प्रस्ताव नाकारला आणि सावरकरांच्या नावाचा ठराव केला. याविषयावर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहे. शाहू महाराजांचा अवमान कदापि सहज करणार नाही. छात्रभारती तीव्र आंदोलन करणार, असा इशारा छात्र भारतीचे राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी दिला आहे.

या वादामुळे विद्यापीठासमोर एक नवीन पेच निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय वसतिगृहाच्या नामकरणावरून सुरू झालेला वाद नेमका काय होता? हा वाद कुठून सुरू झाला? यावर तोडगा कसा निघणार? आणि विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाचं आहे? या प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.

'कुलगुरू कुठेतरी सावरकरांना स्थान देतील'

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून नवीन वसतिगृह बांधण्यात आलं आहे.

146 विद्यार्थ्यांची क्षमता असलेलं हे वसतिगृह सहा मजल्यांचं आहे. पश्चिम मुंबईतील सांताक्रूझ येथील कलिना कॅम्पसमध्ये हे वसतिगृह बांधण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह

फोटो स्रोत, Mumbai University

फोटो कॅप्शन, मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह

8 जुलै 2022 रोजी कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल आपल्या भाषणादरम्यान कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर यांच्याकडे पाहून म्हणाले, "वीर सावरकर यांनी 1857 चा पहिला स्वातंत्र्यसंग्राम लिहिला. मला वाटतं कुलगुरू त्यांच्या नावाला विद्यापीठात कुठेतरी स्थान देतील."

ते म्हणाले, "वीर सावरकर यांनी इंग्लंडमध्ये अभ्यास करून 1857 चा पहिला स्वातंत्र्यसंग्राम लिहिला. तशी तर ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे. इथे एकापेक्षा एक दिव्य महिला आणि पुरुषांनी जन्म घेतला. पण या विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये करण्यात आली आणि 1857 चा संग्राम ज्यांनी लिहिला अशा वीर सावरकरांना इथे स्थान द्यावं असं मला वाटतं."

ते पुढे सांगतात, "तुम्ही आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला वीर सावरकरांचं नाव दिलं तर जगभरातील विद्यार्थ्यांना आपला इतिहास कळेल. त्यांच्या मनात आपल्या देशाबाबत आदर निर्माण होईल. आमचं लक्ष्य आहे की, देशातील विविध विद्यापीठात बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना ही ऋषी मुनींची भूमी आहे, विवेकांनंदांची भूमी आहे असं वाटलं पाहिजे," असं कोश्यारी म्हणाले होते.

'छत्रपती शाहू महाराजांचं नाव अधिक समर्पक'

राज्यपालांच्या या भाषणानंतर विद्यार्थी संघटनांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली. छात्र भारती, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन, एनएसयूआय, राष्ट्रवादी काँग्रेस अशा अनके विद्यार्थी संघटनांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला सावरकरांचे नाव देण्यास विरोध केला आहे.

छात्र भारतीचं कुलगुरुंना पत्र

फोटो स्रोत, RoHIT DHALE

फोटो कॅप्शन, छात्र भारतीचं कुलगुरुंना पत्र

'सर्व जाती, धर्माच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराज यांचं योगदान मोठं आहे,' अशी भूमिका घेत विद्यार्थी संघटनांनी वसतिगृहाला त्यांचं नाव देण्याची मागणी केली आहे.

छात्र भारतीने यासंदर्भात कुलुगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, 'छत्रपती शाहू महाराज यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य समस्त विद्यार्थी वर्गासाठी प्रेरणादायी आहे. शाहू महाराजांनी समस्त जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केली. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती सुरू केली.'

'छत्रपती शाहू महाराजांचं हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यांचं निधन मुंबईत झालं. म्हणून विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला त्यांचं नाव द्यावं अशी आमची विनंती आहे.'

बीबीसी मराठीशी बोलताना छात्र भारतीचे राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले म्हणाले, "आम्हाला वाटतं की छत्रपती शाहू महाराज यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य मोठं आहे. वसतिगृहांची संकल्पना त्यांनीच आणली. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी कार्य केलं. त्यामुळे त्याचंचं नाव देण्यासाठी आम्ही आग्रही आहोत."

मुंबई विद्यापीठ

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC

फोटो कॅप्शन, छात्र भारती संघटनेचे रोहित ढाले, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट युनीयनच्या साम्या कोरडे आणि इतर सहकारी

केवळ छात्र भारती ही एकच संघटना नव्हे तर प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन या विद्यार्थी संघटनेचीही हीच भूमिका आहे. संघटनेच्या सम्या कोरडे म्हणाल्या, "आमचा कोणाच्या नावाला विरोध नाही पण वसतिगृहाच्या नावासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं नाव अधिक समर्पक आहे. मला वाटतं केवळ संघटनांचीच नव्हे तर विद्यार्थ्यांची सुद्धा हीच भूमिका आहे."

येत्या आठवड्यात या विद्यार्थी संघटना मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवणार आहेत. या स्वाक्षऱ्यांचे फलक कलिना कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावले जातील असंही संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले.

वादात राजकीय पक्षांची उडी

विद्यार्थी संघटनांसह आता राजकीय पक्षांनीही या वादा उडी घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सावरकरांच्या नावाला विरोध करत वसतिगृहाला शाहू महाराजांचं नाव दिलं जावं अशा मागणीचं पत्र कुलगुरुंना पाठवलं आहे.

रा. काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणासे, "मुंबई विद्यापीठात नव्याने निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे नाव छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह करण्यात यावे अशा मागणीचं पत्र आम्ही कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पाठवलं आहे. छ. शाहू महाराज यांनी मागासलेल्या समाजात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी वसतिगृह बांधली आणि म्हणूनच आमची ही मागणी आहे. मला खात्री आहे की कुलगुरु याला समर्थन देतील."

रा. काँ. पाठोपाठ काँग्रेसनेही हीच भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, "छत्रपतींचं नाव या वास्तूला देण्याने समताधिष्ठित महाराष्ट्र घडवण्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाला त्यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त मुंबई विद्यापीठाने दिलेली उचित आदरांजलीही ठरेल."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता युवा सेना यासंदर्भात काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे. परंतु अद्याप आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने मात्र याप्रकरणी मौन राहणं पसंत केलं आहे.

नामकरणाची प्रक्रिया काय?

सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार, विद्यापीठाच्या कोणत्याही शैक्षणिक इमारतीला नाव देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

नामकरणासाठी प्रशासनाला सर्वप्रथम विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काऊन्सिल समोर प्रस्ताव मांडावा लागतो. मॅनेजमेंट काऊन्सिलमध्ये चर्चा केल्यानंतर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर होतो.

राज्यातील प्रत्येक विद्यापीठाच्या सर्वोच्च स्थानावर कुलपती म्हणून राज्यपाल विराजमान असतात. खुद्द कुलपतींनीच नाव सुचवल्याने मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावरही एकप्रकारे दबाव आहे.

या शैक्षणिक वर्षापासून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे लवकरच ही प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

दरम्यान, या प्रकरणी आम्ही मुंबई विद्यापीठाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप कोणतीही प्रतिक्रिया विद्यापीठाकडून देण्यात आलेली नाही.

उच्च शिक्षणमंत्र्याचं पद रिक्त

या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. विद्यार्थी संघटनांनी यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठवण्यात आलं आहे.

सध्या राज्याला उच्च शिक्षणमंत्री नसल्याने अशा वादग्रस्त प्रकरणावर तोडगा कसा काढायचा असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर आहे.

एकाबूजाला कुलपतींची सूचना आणि दुसऱ्या बाजूला अनेक विद्यार्थी संघटनांचा विरोध यामुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनासमोरही आव्हान निर्माण झालं आहे.

त्यामुळे शिंदे सरकार यात हस्तक्षेप करणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची दखल घेणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

'महापुरुषांच्या नावापेक्षा शिक्षणाकडे लक्ष द्या'

उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि कॅम्पसमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र या वादापेक्षा शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष द्या अशी प्रतिक्रिया दिली.

मुंबई विद्यापीठात शिकवणाऱ्या एका प्राधापकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, "मला वाटतं नाव काय द्यायचं हा वाद घालण्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा कशा देऊ शकतो याला प्राधान्य दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही महत्त्वाची आहे. वसतिगृहाला केवळ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह असं म्हटलं तर चालणार नाही का?"

मुंबई विद्यापीठ

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पंडित विद्यासागर सांगतात, "महापुरुषांची नावं देऊन काही होत नाहीत त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण काय करतो याला महत्त्व आहे. त्यांच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी अध्ययन सुरू करणं, विविध कार्यक्रम करणं, शिष्यवृत्ती देणं असे उपक्रम करू शकतो. मी नांदेड विद्यापीठात ही भूमिका घेतली होती, कुठल्याही इमारतीला नावं देऊ नका त्यापेक्षा महापुरुषांच्या नावाने अध्ययन सुरू करा, शिष्यवृत्ती सुरू करा असा निर्णय घेतला होता."

ते म्हणाले, "नामकरणासाठी असा आग्रह करणं यातून केवळ भावनीक समाधान मिळेल. समाजात वेगवेगळ्या विचारधारा आहेत. लोकांचे आदर्श वेगवेगळे आहेत. आपल्या आदर्शानुसार ते मागणी करत असतात. पण शैक्षणिक संस्थांनी महापुरुषांच्या विचारांनुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काय करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)