सोपानदेव ते संताजी महाराज, देहूच्या भाषणात मोदींनी केला वारकरी पंरपरेतील 'या' संतांचा उल्लेख

फोटो स्रोत, ANI
संत तुकाराम महाराज त्याग आणि वैराग्याचं प्रतीक आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान बोलत होते.
आषाढी वारीसाठी सोमवारी (20 जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
'जे का रंजले गांजले त्यासा म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा,' हा अभंग त्यांनी म्हटला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत भाषण करत उपस्थित वारकरी जनांची मने जिंकली. विविध अभंग आणि ओव्यांचा दाखला देत मोदींनी भाषण केले. त्यांचे भाषण या ठिकाणी देत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण
श्री विठ्ठलाय नम:. नमो सदगुरु ज्ञानदीप. नमो सदगुरू भक्त कल्याणमूर्ती
नमो सद्गगुरू. मस्तक आहे पायावरी, या वारकरी संताच्या सर्वांना वंदन. संतांचा सत्संग सगळ्यात दुर्लभ मानलं जातं. संतांची अनुभूती झाली तर देवाची भेट झाली असं मानलं जातं. मला इथे येण्याचं भाग्य मिळालं. मला हीच अनुभूती मिळते आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
देहू संतशिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी गाव, तेथे नांदे पांडुरंग, लोक ते देवाचे. उच्चारिता वाचे नामघोष.
देहूत पांडुरंगाचा सदैव निवास आहे. भक्तीने ओतप्रोत भरलेलं आहे. मी देहूच्या नागरिकांना, माताबहिणींना आदरपूर्वक नमन करतो. काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्ग चौपदरीकरण उपक्रमाचं भूमीपूजन करण्याची संधी मिळाली.

फोटो स्रोत, PMO
तीन टप्प्यात पालखी मार्गाचं काम होईल. या सगळ्या टप्प्यात 350 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे हायवे. 11000 कोटी रुपये खर्चून हायवे बांधला जाईल. परिसराच्या विकासाला गती मिळेल. पवित्र शिळामंदिराच्या लोकापर्णासाठी देहूत येण्याची संधी मिळाली.
ज्या शिळेवर स्वत: संत तुकारामांनी 13 दिवस साधना केली. ती शिळा नाही, भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा आहे. देहूचं मंदिर भारताचं भविष्य उज्ज्वल करतं. सगळ्यांचं मन:पूर्वक अभिनंदन.
संताजी महाराज जगदाळे यांचं स्थानही जवळच आहे. त्यांनाही मी वंदन करतो. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. जगातल्या सगळ्यात जुनं नागरीकरण आपल्याकडे आहे. आपल्या संस्कृतीत ऋषी होते. भारत संतांची भूमी आहे. देश, समाजाला दिशा देण्यासाठी कोणी ना कोणी महान आत्मा अवतरली आहे.

फोटो स्रोत, ANI
संत कबीर, संत सोपानदेव यांची भूमी आहे. यांनी आपली परंपरा कायम राखली. संत तुकाराम यांना संत बहिणीबाई यांना कलश म्हटलं आहे. त्यांनी संघर्षमय जीवनाचा सामना केला. त्यांनी भूक पाहिली, भूकबळी पाहिले. दुष्काळ पाहिला. जेव्हा बाकीचे लोक आशा सोडून देत होते तेव्हा संत बाकी समाजासाठी आशेचा किरण झाले.
ही शिळा तुकारामांच्या त्याग आणि वैराग्याचं प्रतीक आहे. तुकारामांची दया, करूणा, भक्ती दिसते. जो भंग होत नाही, जो कालातीत असतो तो अभंग असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत परंपरेतल्या सर्व संतांच्या नावाचा उल्लेख केला. संत तुकाराम म्हणायचे, उच्च नीच असं काहीच नसतं. माणसामाणसांमध्ये भेद करणं चुकीचं आहे. त्यांचा उपदेश राष्ट्रभक्तीसाठी, समाजभक्तीसाठी आहे. वारकरी बांधव पंढरपूरची यात्रा करतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे हातकड्यांना चिपळ्यासारखे वापरत
स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिक्षा झाली तेव्हा कोठडीत हातकड्यांना चिपळ्यांसारखा वापर करत ते तुकारामांचे अभंग गात असत. शिवरायांच्या आयुष्यात संत तुकारामांचं मोठं योगदान आहे. संतांची ऊर्जा कायमच समाजाला प्रेरित करत राहते.
एक भारत, श्रेष्ठ भारत संतांनी कायम राखलं. प्राचीन ओळख आणि परंपरा जिवंत राखण्यासाठी संतांचं योगदान समजून घेणं आवश्यक आहे. विकास आणि वारसा दोन्ही एकत्र पुढे जाणे आवश्यक आहे.

फोटो स्रोत, ANI
संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबाकाका, संत चोखामेळा यांच्या अभंगांमधून आपल्याला नव्याने प्रेरणा मिळते.
आज येथे संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवाराने रचलेल्या सार्थ अभंगगाथेचे माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचे मला सौभाग्य लाभले. या सर्थ अभंग गाथेमध्ये संत परिवाराच्या 500 पेक्षा जास्त अभंग रचनांना सोप्या भाषेत अर्थासहित सांगण्यात आले आहेत.
देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान हे मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये 'जल भूषण' या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होईल.
त्यानंतर 'मुंबई समाचार' या गुजराती दैनिकाला 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








