डॉलरचं शक्तिशाली होणं जगभरातल्या अर्थव्यवस्थांसाठी कसं धोकादायक आहे?

डॉलर

फोटो स्रोत, Getty Images

जगातल्या इतर शक्तिशाली चलनांच्या तुलनेत डॉलरच्या किमतीत मागच्या एका वर्षात 12 टक्के वाढ झालीय.

डॉलरच्या तुलनेत जगातल्या इतर मुख्य चलनांचा दर घसरत चालला असल्याने संबंधित देशांच्या आर्थिक अडचणी वाढल्यात.

डॉलरचं शक्तिशाली होणं ही जगापुढची एकमेव समस्या नाहीये. अमेरिकेत व्याजदरांमध्ये झालेली वाढदेखील अनेक अर्थव्यवस्थांसाठी धोकादायक ठरतेय.

अर्थात, जगभरातल्या अर्थव्यवस्थांसमोरच्या आव्हानांचं प्रमुख कारण डॉलर किंवा अमेरिकेतल्या व्याजदरांमध्ये वाढ हे नाहीये. पण डॉलरच्या वाढत्या दरामुळे आगीत तेल पडतंय. त्यामुळे भडका कधीही उडू शकतो.

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेलं अनिश्चिततेचं वातावरण हे एक कारण आहे. शिवाय जगभरात अत्यावश्यक वस्तूंचा विक्रमी दर पाहता परिस्थिती गंभीर होत चाललीय.

जागतिक अर्थव्यवस्था

तज्ज्ञांच्या मते डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे जगभरात निरनिराळ्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांत आलेली मंदी आणखी वाढतेय.

मेक्सिकोमधले इकॉनॉमिक्स आणि फायनान्सचे प्रोफेसर एडवर्डो कार्बाजाल म्हणतात, "डॉलर शक्तिशाली होत चालल्याने आर्थिक वाढीवर प्रभाव पडतोय. महागाईचा दर विक्रमी असतानाच्या काळात हे घडतंय. या प्रचंड चलनवाढीचा सामना व्याजदरांमध्ये वाढ करून करावा लागतोय."

प्रोफेसर एडवर्डो यांच्या मते "डॉलरचा दर वाढल्यामुळे फक्त अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात कर्ज घेणं महाग झालंय."

डॉलर शक्तिशाली होत चालल्याने आर्थिक वाढीवर प्रभाव पडतोय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉलर शक्तिशाली होत चालल्याने आर्थिक वाढीवर प्रभाव पडतोय

याचाच अर्थ असा की देश, कंपन्या आणि सामान्य जनतेसाठी कर्जाचे व्याजदर प्रचंड वाढतील तेव्हा आर्थिक व्यवहारांत मंदी येईल. आधीच मंदीच्या विळख्यात सापडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थांना पुन्हा रूळावर आणणं खूप कठीण होईल.

हे सगळं अत्यंत नाजूक समतोलावर आधारित आहे. त्यामुळे एका देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेला थोडाही बदल यंत्रणेच्या दुसऱ्या भागाचं संतुलन बिघडवेल.

आयात आणखी महागणार

वित्तीय कन्सल्टन्सी फर्म एसअँडपी ग्लोबल रेटिंगचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एलिझा ऑलिव्हरोस- रोझेन सांगतात, "डॉलरचा दर वाढल्याचा दुसरा परिणाम आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीवर होतो. त्यामुळे आयात होणाऱ्या वस्तू महाग होतात आणि चलनवाढीचा वेग वाढतो."

"त्याचवेळी आपल्या कर्जांची परतफेड डॉलरमध्ये करावी लागणाऱ्या देशांसाठी ही परतफेड महाग होईल. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या अर्थव्यवस्थांची तूट आणखी वाढेल."

आर्थिक बजेट कमी झाल्यामुळे आधीच कोरोनाच्या महासंकटामुळे कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्था मान टाकू शकतात. त्यांना पुन्हा रूळावर आणण्यासाठी सरकारांना आणखी अडचणी येतील.

त्यांच्याकडे लोककल्याणकारी उपक्रमांसाठी पैसा उरणार नाही. अनेक देशांमधल्या लोकांना या आर्थिक मदतीची सध्या गरज आहे. अनेक देशांना या चलनवाढीच्या घोडदौडीला आटोक्यात आणता येणार नाही.

ढच्या काही महिन्यांत जगभरातल्या देशांच्या अर्थव्यवस्थेची गाडी घसरताना दिसणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ढच्या काही महिन्यांत जगभरातल्या देशांच्या अर्थव्यवस्थेची गाडी घसरताना दिसणार आहे.

डॉलर महाग झाल्यामुळे लोकांचा खर्च कमी होईल. त्यामुळे अमेरिकेबाहेर गुंतवणुकीचा दरही कमी होईल. याचा परिणाम म्हणून जगभरातल्या आर्थिक बाजारपेठांमध्ये चढउतार वाढतील. या परिस्थितीत पुढच्या काही महिन्यांत जगभरातल्या देशांच्या अर्थव्यवस्थेची गाडी घसरताना दिसणार आहे.

डॉलरची किंमत आणखी किती वाढेल?

ब्लूमबर्ग डॉलर स्पॉट इंडेक्सच्या मते मागच्या वर्षी डॉलरची किंमत जगातल्या सगळ्यांत शक्तिशाली चलनांच्या तुलनेत 12 टक्क्यांनी वाढली होती. पण या वर्षी हा दर अजूनपर्यंत फक्त 7 टक्के वाढलाय. डॉलरचा वापर आणि त्याच्या दरातील चढउतार ब्लूमबर्ग डॉलर स्पॉट इंडेक्सनेच तपासला जातो.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेने महागाईवर उपाय म्हणून व्याजदरांमध्ये वाढीची घोषणा केली. त्यामुळे जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना जास्त कर भरावा लागेल. याचा परिणाम म्हणून डॉलरचा भाव कडाडलाय.

अमेरिकेत व्याजदरांची ही वाढ किमान एक वर्षभर तरी चालेल असं मत बाजारात व्यक्त केलं जातंय. शिवाय आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी डॉलर खरेदी करताहेत.

जगातल्या इतर विकसित अर्थव्यवस्थांसाठी ही आव्हानाची परिस्थिती आहे. युरो, स्विस फ्रँक आणि पाऊंड स्टर्लिंगसारख्या चलनांची स्थिती आता खालावलेली दिसतेय.

विकसनशील देशांसमोरची आव्हानं कशी आहेत?

लॅटिन अमेरिकेपासून ते भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांचीही स्थिती काहीशी गंभीर आहे.

डॉलर

त्यांना आपल्या घसरत्या चलनांना सावरण्यासाठी व्याजदर वाढवावे लागताहेत. भारतानेही हल्लीच रेपो रेट वाढवण्याची घोषणा केलीय.

2021 पासून आतापर्यंत अर्जेंटिना, चिली आणि कोलंबियासारख्या देशांच्या चलनांची क्रयशक्ती 27 टक्के कमी झालीय. ब्राझील जरा बऱ्या स्थितीत आहे. त्यांचं चलन या काळात 3.7 टक्के मजबूत झालंय.

महागाईवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं तरच या बिघडणाऱ्या परिस्थितीवर मात करता येईल, असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे आता व्याजदरात वाढ होतच राहील असं दिसतं. पण असं झालं तर जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला येतील.

पैसा बाहेर जाईल का?

हे तर अख्ख्या जगात होतंय. अर्थतज्ज्ञ म्हणतात की, सध्या एकतर महागाईमुळे मंदी वाढतेय किंवा मंदीच्या सर्वोच्च टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत. म्हणजेच आपल्याला चलनवाढीच्या वाढत्या दरासोबतच विकासदर कमी होण्याचाही सामना करावा लागेल.

आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मते युरोप आणि अमेरिका मंदीच्या विळख्यात अडकू शकतात. चीनसुद्धा हळूहळू आर्थिक मंदीच्या चक्रव्यूहात अडकण्याची शक्यता आहे. कर्ज घेणं तर महागडं होतच राहील.

अमेरिकेतले दर वाढल्यामुळे गुंतवणूकदारांना सध्या अमेरिकन बाजारपेठ आकर्षित करतेय. या गुंतवणूकदारांना विकसनशील देशांमध्ये पैसा गुंतवून अडचणीत यायची इच्छा नाहीये. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्सच्या मते हे आता सगळीकडे घडू लागलंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)